शंकर , इंद्र आणि विष्णु ह्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते तरी ते निसर्ग नियमाने मोठे होत होते . आईचे प्रेमळ छत्र हरवल्या नंतर लवकरच आजीही देवाघरी गेली.
घरातले स्त्री राज्य संपले. मुलांच्या डोक्यावरचे होते नव्हते ते ही प्रेमळ छत्र हरवले. मुले जमेल तसे शिकत होती. अभ्यास केला तर केला . नाही केला तर शाळेत मार खात होते . तारणहार कोणीच नाही.
तात्यांनी आपला दिनक्रम आखून घेतला होता . सोमवार ते शुक्रवार शिकवणी वर्ग . सकाळी ५ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते रात्री ८. जेवणानंतर शतपावली, बातम्या आणि त्यानंतर निद्रादेवीची आराधना .
शनिवार, रविवार ते शेतीवर जात असत. वडिलांची थोडीफार शेती आणि त्यांच्या काकानी दिलेली शेती. तात्या आपले मन तिथे रमवायचा प्रयत्न करत होते .
मुलं मोठी होता होता शिकत होती ........ शिकता शिकता मोठी होत होती.
शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणापेक्षा अनुभवाच्या शाळेत जास्त शिकत होती . घरात मोलाने ठेवलेल्या बाईने रांधलेले निमुट गिळत होती . आवडीनिवडीचा प्रश्नच नव्हता.
हा पण वाड्यात भाड्याने राहणार्या एखाद्या कुटुंबातील मातेचे वात्सल्य उफाळून आले तर प्रेमाचे दोन शब्द वाटेला येत होते .
मुलं बाहेर प्रेम शोधत होती. दिवसच्या दिवस घराबाहेर राहत होती. सगळ्यांच्याच मनात एक विचित्र अढी घर करून होती . तात्या निर्विकारपणे सगळ्या घटनांना सामोरे जात होते.
मात्र शिकवणी वर्गातला एखादा विद्यार्थी प्रावीण्य मिळवून पास झाला की त्याचे भरभरून कौतुक करायला ते कधीही चुकत नव्हते .
काय त्यांचे मन आपल्या मुलांची तुलना ह्या यशस्वी मुलांशी करून दुःखी होत होते ? देवच जाणे.
हा हा म्हणता म्हणता शंकरचे शालेय शिक्षण झाले आणि त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला . एकाचे आयुष्य मार्गी लागण्याचे संकेत दिसू लागले होते.
इंद्र आणि विष्णु ही बर्यापैकी मोठे झाले होते.
मोलाने ठेवलेल्या स्वयंपाक करणार्या बाया किंवा आचारी जास्त दिवस टिकत नव्हते. म्हणून इंद्र आणि विष्णु हळूहळू स्वयंपाक करायला शिकले होते. तात्यांच्या वेळा सांभाळून त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांच्या ताटात पडू लागले होते.
वडिलांची काळजी घ्यायला पाहिजे , ही समज यायला लागली होती.
मित्रांची घरे पाहून घर स्वच्छ ठेवण्यासाठी दोघेही राबत होते .
इंद्र आणि विष्णु ह्या दोघात परस्पर सुसंवाद किंवा प्रेमभावना फार क्षीण असली तरी दोघांचा मित्र संग्रह फार मोठा होता.
ह्या मित्रांच्या परिवारात सामावताना बर्याच चांगल्या वाईट गोष्टी त्यांना अनुभवायला मिळाल्या. भविष्याशी दोन हात करताना हे अनुभवाचे गाठोडे कामी येणार होते.
इंद्र आणि विष्णु डोक्याने तल्लख होते. पण योग्य मार्गदर्शक अजूनही त्यांना मिळाला नव्हता . त्यामुळे अभ्यासातली प्रगती प्रगतीपत्रकात दिसत नव्हती.
त्यातल्या त्यात इंद्र फारच माघार घेत होता . नाईलाजाने तात्यांनी १० वी नंतर इंद्राला आर्ट्स कॉलेजला घातले.
विष्णु १० वी नंतर सायन्स कॉलेजला जाऊ लागला होता. पण घर , स्वयंपाक , येणाराजाणारा ह्या सगळ्यात अभ्यासाला दुय्यम स्थान दिल्या जात होते.
त्यामुळे तोही हुशार असूनही एक सर्वसाधारण विद्यार्थी समजल्या गेला .
मध्यंतरीच्या काळात शंकर इंजिनियर झाला. अगदी गुणवत्ता यादीत चमकला . परिस्थितीने गांजलेल्या तात्यांच्या मनाला एक सुखद दिलासा मिळाला.
एरवी तात्या एकटेपण आल्यामुळे थोडे तिरसट वागू लागले होते. त्यातच घरा संबधी कोर्ट कचेर्या मागे लागल्या होत्या.
घर, शिकवणी वर्ग शेती आणि आता कोर्टा मुळे वकीला कडच्या फेर्या ह्यात ते अडकले होते . पैश्याचा नुसता अपव्यय होत होता. त्याच्या बदल्यात मनस्ताप वाटणीला येत होता .
ह्या सर्व पार्श्वभूमीवर शंकरचे यश खरोखरीच मनाला दिलासा देणारे होते.
तात्या पुन्हा नव्याने सुंदर भविष्याची स्वप्ने पाहण्याच्या मोहाला टाळू शकत नव्हते .
काय तात्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल ? इंद्र आणि विष्णु ह्या स्वप्नात सुंदर रंग भरू शकतील?
नियतीच्या मनात आणि भविष्याच्या उदरात काय काय लपले होते हे कुणालाच ठाऊक नव्हते .
चला जाऊ या भविष्याकडे पुढच्या भागात ...
तोपर्यंत तुमच्या समीक्षा हेच तात्यांना आणि परिवाराला मिळालेले बक्षीस असेल. द्या त्यांना जरा दिलासा .
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
..............क्रमशः
_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/
ह्या कथेशी जर कोणालाही स्वतः च्या वा जवळच्या कुणाच्याही आयुष्याशी साधर्म्य आढळले तर तो योगायोग समजावा .
Kavyapushpa-kavitri-aanuradha Marathi free literature's and poems love poems छान मराठी पुस्तके उत्तम मराठी छान कथा कादंबरी देखील वाचा, ई-बुक्स Marathi Books, Marathi ebook epustak ई-साहित्य .
Thursday, 4 August 2022
द्वेष: मनाचे एक काटेरी टोक भाग २
Wednesday, 3 August 2022
द्वेष: मनाचे एक काटेरी टोक
एखाद्याच्या मनात किती द्वेष असू शकतो ? तोही स्वतः च्या भावंडां विषयी ? इतका द्वेष की मोठा भाऊ शप्पत घेतो की लहान भावाला रस्त्यावर आणीन नाहीतर नाव बदलेन. काय ही मनोवृत्ती ?
ह्या घटनेची सुरवात पहा कशी झाली ...
तो काळ साधारण १९४० चा असावा ...
ते शहर तेंव्हा इतके प्रगत नव्हते झाले. माणूस थोडीफार माणुसकी जपून होता . फ्लॅट सिस्टमने अजून त्या शहरात प्रवेश केला नव्हता . वाडा संस्कृती अजून तग धरून होती .
अशा त्या समयी शहराच्या गजबजलेल्या भागात अजिंक्य यांचा वाडा होता. घरात म्हातारी झालेली तरीही कणखर असणारी आई होती . तिचे चार मुले .
मोठा दादा . अतिशय सहिष्णू वृत्तीचा, देवभोळा.
अतिशय हुशार. अतिशय प्रामाणिक.
त्याची बायको सरिता. नवर्याच्या अति शांत स्वभावा मुळे गांजलेली . मूल नसल्यामुळे सगळ्या दीर जावांच्या हेटाळणीचा विषय झालेली. त्यामुळे नवर्याशी सतत भांडणारी .
जेंव्हा सगळ्या गोष्टींचा अतिरेक होऊ लागला तेंव्हा दादाने आपली बदली दूरच्या गावी करून , बायको बरोबर तिथेच आपले बिऱ्हाड हलवले, पुन्हा एकत्र कुटुंबात न येण्यासाठी .
दुसरा तात्या . तिसरा नाना आणि शेंडेफळ आप्पा.
सगळेच सरस्वती चा आशीर्वाद घेऊन आलेले . आपापल्या क्षेत्रात आघाडीवर असलेले.
पण ह्यांची शिक्षण पूर्ण होऊन ते कमाईपुत होण्याआधी लक्ष्मी जरा रुसली होती. सकाळ संध्याकाळ चे उदरभरण करणे जरा जड जात होते.
अशावेळी दुसर्या मुलाने (तात्यांनी)अतिशय कष्ट करून सगळ्या कुटुंबाला आधार देत भावांची शिक्षण , लग्न लावून देऊन त्यांचे संसार थाटून दिले .
संस्कृत आणि इंग्लिश वर तात्यांनी प्रभुत्व मिळवले. सुरवातीच्या काळात घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना शिकवले , काही महिने शाळेतही शिकवले.
पण त्यांचे ध्येय ह्यापेक्षा वेगळे होते . कोणाच्याही हाताखाली काम करणे त्यांना जमणार नव्हते. विषय सोपा करून शिकविण्याच्या त्यांच्या हातखंड्यामुळे तसेही पाय मागे खेचणाऱ्यांची संख्या वाढतच होती. एकदा एका सहकार्याशी क्षुल्लक कारणासाठी वादंग झाला आणि त्या तिरीमिरीत त्यांनी शाळेला रामराम ठोकला.
पण वाढता प्रपंच आणि जबाबदारी ह्या साठी पोटापाण्याची सोय करणे भाग होते . आणि त्यांनी एक धाडसी पाउल टाकले . विना अनुदानित तत्त्वावर स्वतःचीच शाळा सुरू केली .
त्यांच्या नावाचा आधीच गवगवा होता . शिवाय त्यांची तत्त्व सामान्यातील सामान्यांच्या फायद्याची होती .
नगण्य फी.
तीही न देऊ शकणारा अगदी फुकट शिकू शकणार होता.
गरीब परंतु अत्यंत हुशार विद्यार्थी अगदी त्यांच्या घरी राहून शिकू शकणार होते.
झाले विद्यार्थ्यांचा लोंढा अखंड त्यांच्याकडे वाहू लागला . त्यांनी घडवलेले कित्येक विद्यार्थी मोठमोठ्या हुद्द्यावर चढून त्यांच्या नावाची गरिमा वाढवतच होते. यशाची झिंग डोक्यात भिनु लागली होती.
तात्यांनी आता मोठ्ठा वाडाच विकत घेतला. बायको, तीन मुलं, आणि म्हातारी आई ह्यांच्या सकट गृहप्रवेश केला. आधीचा राहता वाडा नानाच्या नावे करून दिला . धाकटा आप्पा स्वतःच्या मेहनतीने नोकरीला लागला होता आणि बदली होऊन दुसर्या गावी बायको मुलांसकट स्थायिक झाला होता .
सगळे छान चालले आहे असे नियतीला कधीच पाहवत नाही .
अचानक नशिबाने ठोकर मारली आणि छोट्या आजाराचे निमित्त होऊन तात्यांची पत्नी कालवश झाली .
तात्या सैरभैर झाले. तीन मुले आणि म्हातारी आई ह्याना कसे सांभाळावे हा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर होता . त्यावेळी तात्यांचा मोठा मुलगा शंकर जेमतेम ९ वर्षाचा , दुसरा इंद्र ७ वर्षाचा आणि धाकटा विष्णु तर ५ च वर्षाचा होता.
तात्यांनी ज्यांना ज्यांना अडचणीत हात दिला ती सर्व भावंडं दुरूनच सहानुभूती दाखवून आपापल्या कामाला लागली होती. म्हातारी आईने वाकलेल्या कंबरेने आणि थरथरत्या हाताने स्वयंपाक घराचा ताबा घेतला आणि अन्नपूर्णा बनून तात्यांच्या आणि तीन लहानग्यांची पोटाची खळगी भरू लागली.
ह्या आघाताने तात्या निर्लेप झाले . शाळेचा मोठा फाफटपसारा त्यांनी आवरता घेतला . फक्त आपल्या दोन विषयांचे शिकवणी वर्ग चालू केले.
अजिंक्य शिकवणी वर्ग .
एक आई सोडली तर त्यांचे घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. पहाटे ५ ते रात्री १० त्यांनी पूर्णपणे स्वतःला झोकून दिले.
शंकर, इंद्र आणि विष्णु मोठे होत होते. कुणाचाही अंकुश नसल्यामुळे मनमर्जीने वागत होते. नातेवाईकांच्या आणि शेजारच्यांच्या टीकेला पात्र ठरत होते.
काय होणार ह्यांच्या भविष्याचे? काळाच्या उदरात त्यांच्यासाठी काय दडले होते ?
पाहूया पुढच्या भागात .....
तोपर्यंत तुमच्या समीक्षा येऊ द्यात .....स्टिकर द्या ....स्टार्स द्या .
क्रमशः
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
ह्या कथेशी जर कोणालाही स्वतः च्या वा जवळच्या कुणाच्याही आयुष्याशी साधर्म्य आढळले तर तो योगायोग समजावा .
Monday, 18 July 2022
जावईपूरम.. भाग ५
वैभव खूप नाराज होऊन बसला होता . लतिकानी केलेले आकांततांडव आठवून त्याचे मन पुन्हा पुन्हा घाबरून गोठून जात होते .
खर टेंशन तर वेगळेच होते. जर शाह काकांच्या मुलीने त्याला नाकारले तर त्याचे फारच हाल होणार होते. कोणत्या दुसर्या मुलीने त्याचा स्विकार करेपर्यंत त्याला मिळेल ते काम करावे लागणार होते . आईशी आणि श्री शी तो जरी बोलू शकत नसला तरी तरी आई पर्यंत इथली बित्तंबातमी पोहोचली असणारच. ह्या विचाराने तो अजून अजून अस्वस्थ होत होता.
आपल्याच विचारात तो इतका गढला होता की शाह काकानी त्याला दिलेला आवाज त्याच्या पर्यंत पोहोचलाच नव्हता . शेवटी त्यांनी त्याला हालवून आवाज दिला ...डिकरा, ओए डिकरा
वैभव खडबडून जागा झाला आणि पटकन उभा होत म्हणाला .. सॉरी अंकल
धीरुभाई शाह एक अनुभवी , मुरलेला , माणसांचे अंतरंग वाचणारा व्यापारी होता. वैभवची मनस्थिती त्यांनी एका क्षणात जाणली. आणि त्याला हळूहळू आपल्या जाळ्यात ओढणे त्यांनी सुरू केले.
अतिशय प्रेमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले ....
बेटा अशे होतच असते. तने तोह, आनाथी सारी छोकरी मळी जसे.
(तुला हिच्या पेक्षा जास्त चांगली मुलगी मिळेल)
तू नाराज नई थतो (तू नाराज नको होऊ)
वैभवला ह्या क्षणी कुणाच्या तरी आधाराची नितांत गरज होती . त्यामुळे धीरुभाई च्या मधाळ शब्दाने त्याला नव्याने हुरूप चढला.
चला काका , मी तयार आहे तुमच्या बरोबर यायला .
धीरुभाई ने मंदस्मित केले आणि त्याला चलण्याची खूण केली . चालता चालता हळूहळू त्याची माहिती गोळा करत आणि आपली नेमकी माहिती त्याच्यापर्यंत ते पोहचवत राहिले.
आपल्या पत्नीचे नाव कोकिला असून त्यांना दोन मुली असल्याचे त्यांनी वैभवला सांगितले .
मोठी मुलगी रुपाचे लग्न झाले . वर्षभरात त्यांना मुलगा झाला आणि त्यामुळे त्यांना जावईपूरम् च्या नियमानुसार इथून जावे लागले.
सध्या ते अमेरिकेत स्थायिक झालेत.
दुसरी मुलगी नाजूका. आईची अतिशय लाडकी. खूप हुशार . इंजिनियर असलेली . खूप मोठ्या कंपनीत सीईओ असलेली. स्वभावाने अति प्रेमळ .
धीरुभाई चे मिठास बोलणे वैभव ला भुरळ घालत होते .
मारा डिकरिने मराठी वानगियो बऊ भावे छे.
(माझ्या मुलीला तुमचे मराठी पदार्थ खायला फार आवडतात).
हे ऐकून तर तो आनंदाने हसला हे धीरुभाई च्या चाणाक्ष नजरेनी पटकन हेरले होते . बोलता बोलता ते घराजवळ येऊन सुद्धा पोहोचले.
घरात पोहोचताच धीरुभाई ने आवाज दिला , कोकिला...
एका हसतमुख कोकिळेच्या रंगाच्या स्त्रीने भसाड्या आवाजात येते येते म्हणत, आरती च्या ताटा सकट प्रवेश केला.
आल्या आल्या तिने वैभवला ओवाळले . तिच्या नावाचा आणि आवाजाचा अर्था अर्थी संबंध नसल्याचे वैभव ला जाणवून गेले .
कदाचित तिच्या रंगावरून तिचे नाव ठेवण्यात आले असेल असा खट्याळ विचार त्याच्या मनात डोकावून गेला . पण धीरुभाई च्या मिठास बोलण्याचा पगडा अजूनही त्याच्यावर होता. त्यामुळे तो फारसा गडबडला नाही.
मारी डिकरी तने नक्की पसंद करशे (माझी मुलगी तुला नक्की पसंत करेल ) धीरुभाई ने अजून एक साखरेत घोळलेला गोळा फेकला.
मने खात्री छे, तमे मारा डिकरी ने सुखी राखशो.( मला खात्री आहे तू तिला नक्की सुखी ठेवशील).
आता त्यांनी फारच प्रेमाने आपल्यासाठी मुलीला आवाज दिला नाजूका बेटा देख कोण आलाय....
त्या मोठ्या आलिशान हॉल च्या दोन्ही बाजूला असलेल्या भरभक्कम शिसवी जिन्याच्या बाजूने बारीकसा आवाज किणकिणला ...
आली आली पापा...
आवाजाच्या दिशेने वैभव ने पाहिले आणि त्याचे डोळे विस्फारले गेले. हत्तीच्या पिल्लाच्या साईजची नाजूका कसाबसा तोल सावरत त्याच्याकडे येत होती.
तो ताडकन उभा झाला आणि पळू लागला . धीरुभाई ने त्याला पकडले तसा तो गयावया करून ओरडू लागला ...
सोडा मला सोडा ..
जाऊ द्या आईकडे मला ....
मला नापसंत केले तरी चालेल .. सोडा सोडा ..
इतक्यात त्याच्या तोंडावर कोणी तरी पाणी फेकले आणि तो खडबडून जागा झाला . आई त्याच्याकडे घाबरून पहात म्हणाली ..
अरे कशाला ओरडत होता ? कोणी पकडले तुला ? उठ आता , तयार हो . आज तुझा नोकरीचा पहिला दिवस ना ? वेळेत जा.
वैभवने एक निःश्वास सोडला आणि तयारीला लागला .
समाप्त .
©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎
Wednesday, 13 July 2022
जावईपूरम भाग ४
वैभव ने त्याला दिलेली कामांची यादी पुन्हा एकदा वाचली. आजचा सकाळच्या जेवणाचा बेत त्यालाच ठरवायला सांगितला होता .
मराठी माणसाचे घर आहे हे पाहून त्याने आगळा वेगळा बेत ठरविला ...
गोळा-तांदूळ , चिंचेचा सार, हिंग लाल मिरच्या घालून कढवलेले तेल , उकडलेल्या बटाट्याची भाजी , दशम्या ,ताक, हिरव्या मिरचीचा ठेचा . आणि स्वीट डिश म्हणून मस्त सुका मेवा घातलेला, जायफळ विलायचीचा स्वाद असलेला रव्याचा शिरा . वरून हवे तर केशर ही पेरू.
आपण केलेल्या बेतावर तो स्वतःच खूप खुश झाला . त्याचे हात भराभर चालू लागले . त्याबरोबर त्याचे विचार ही वेगाने सुरू होते. लतिका कडे त्याने चोरून चोरून पाहिले होते. त्याच्या मनाच्या कोपर्यात कुठेतरी तिने घर केले होते म्हणूनच तो तिला खुष करण्यासाठी धडपडत होता.
दुसरे कारण असेही होते की इथून नकार घ्यायचा आणि दुसर्या घरी जावून पुन्हा नव्याने आपले इम्प्रेशन तयार करण्यासाठी धडपड करायची . ते त्याला नकोसे वाटत होते .
ठीक १२ वाजता सगळे काम आटोपून . तो किचन मधून बाहेर पडला . टेबल वर सगळे नीट मांडून तो फ्रेश व्हायला गेला . व्यवस्थित तयार होऊन तो १२.२५ ला हसतमुखाने जेवण्याच्या टेबलाजवळ हजर होता . ठीक १२.३० सर्व मंडळी जेवायला हजर झाली .
तिथली जय्यत तयारी बघून सगळेच खुष झाले. लतिका च्या चेहर्यावर हसू पाहून वैभव पण खुशीत आला. त्याने सगळ्यांना वाढायला सुरवात केली.
त्याला आता आईच्या ट्रेनिंगची खरच तारीफ करावीशी वाटत होती .
डाव्या भागाला मीठ , ठेचा, लिंबाच गोड लोणचे वाढून होताच त्याने भाजी वाढली. ताका च्या वाट्या भरून दिल्या. हे सर्व करताना तो लतिका च्या चेहर्यावरचे भाव गुपचूप निरखीत होता .
शिर्याचे बाउल भरून त्याने ताटाच्या बाजूला ठेवले. इथपर्यंत सगळ्यांचे चेहरे फार खुष दिसत होते . आता त्याने गोळा तांदूळ वाढायला सुरवात केली.
ओह यलो राइस.....लतिका चे पुटपुटणे त्याच्या कानावर पडलेच . त्यावर तेल वाढायला सुरवात केली तेव्हढ्यात लतिका चा फोन वाजला आणि ती उठून थोडी बाजूला गेली . तोवर वैभवने तिच्याही भातावर तेल आणि तळलेली लाल मिरची वाढली.
लतिका ही फोन वर बोलून परत आली . भातावर ते तेल आणि मिरची पाहून ती जवळपास किंचाळलीच...
ओह...नाही नाही .... इतके स्पाईसी जेवण ...माय गॉड.... मी नाही खाऊ शकत... यू स्टुपीड ... कोणी सांगितल तुला असा बेत करायला........
तिच्या तोंडाचा पट्टा थांबायचे नावच घेत नव्हता . बाकीच्यांनी कसेबसे जेवण आटोपले आणि आपापल्या खोल्यात निघून गेले . वैभव भांबावून सगळ्यांकडे पाहात राहिला.
आता तिथे तो आणि लतिका हे दोघेच उरले होते . तिने त्याच्याकडे अतिशय खुनशी नजरेनी पहात फोन हातात घेतला . तिने एक नंबर फिरवला .
हॅलो, शाह अंकल मी लतिका बोलते आहे . अंकल वैभव ला तुम्ही येऊन घेऊन जा . मला तो माझ्या नजरे समोर अजिबात नकोय....
.....
ठीक आहे . १ तासात त्याला तयार राहिला सांगते.
त्याच्याकडे रागाने पहात लतिका ने त्याला आपला गाशा गुंडाळायला सांगितला. ठरल्याप्रमाणे २ दिवस ही थांबायची तिची तयारी नव्हती . किंवा त्याचे काय म्हणणे आहे हे ही तिला ऐकून घ्यायचे नव्हते.
अपमानित होऊन आणि खाली मान घालून तो तिथून चालता झाला .
बिचारा वैभव . त्याने आईच्या शिकवणी नुसार दोन घास कसेबसे पोटात ढकलले होते .
सगळे काम आटोपून तो शाह अंकल ची वाट पाहू लागला .
क्रमशः
🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
काय तुम्हाला तुमच्या मुलाचे भविष्य असे असावे ह्याची कल्पना करवते का ?
विचार करा .....
तुम्हाला जागे करण्याचा प्रयत्न करतेय म्हणून नक्की समीक्षा द्या .
Tuesday, 12 July 2022
जावईपूरम् भाग 3
वैभव सकाळी अगदी ४ वाजतापासून जागा होता . रात्री ही त्याला शांत झोप लागली नव्हती. काहीतरी भयानक स्वप्ने पडून तो थोड्या थोड्या वेळाने जागा होत होता.
आता आपल्यासमोरचे सगळे पर्याय संपले हे त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्याने आता आपल्या मनाची तयारी केली होती .
पटकन उठून त्याने आपले नियमित कामे भरभर आटोपली . आईवर कमीत कमी कामाचा भार पडावा अशी त्याची इच्छा होती. तिच्यापुढे गरमागरम चहाचा कप ठेवला . हसतमुखाने देवाला आणि आईला नमस्कार करून तो जायला सज्ज झाला .
बरोबर सकाळी ६.३० वाजता त्याच्या दारासमोर जावईपूरम् ची गाडी उभी राहिली. त्यातल्या ताईने पटकन उतरून वैभवचे अभिनंदन केले आणि आवश्यक ती कागदपत्रे त्याच्या आईच्या सुपूर्द केली. तिच्या सहकारी ताईने वैभव च्या मदतीने त्याचे सामान गाडीत टाकले आणि तिघानी आईला टाटा केला.
वैभव च्या आयुष्याची गाडी आता वेगळया वळणावरून धावू लागली होती.
त्याच्या घरात आणि आता तो ज्या भागात जाणार होता त्या भागात केवळ एका उंच भिंतीचे अंतर होते तरी तिकडे एंट्री घेण्यासाठी जवळपास 3 किलोमीटर चा वळसा देऊन जावे लागत असे .
त्या रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्यामुळे आणि सकाळची वेळ असल्यामुळे १५ व्या मिनिटाला ते एका खूप मोठ्या दारासमोर येऊन पोहोचले . दाराच्या आत गेल्यानंतर एका पाटीवर मोठ्या अक्षरात सुस्वागतम असे लिहिले होते . तिथून थोडे पुढे गेले गेल्याबरोबर दुतर्फी असलेल्या मोठमोठ्या वृक्षांच्या साह्याने घोषणा पत्रक लागले होते
बेटी बचाओ , बेटी पढाओ
बेटी हिंदुस्थान की शान है
हळूहळू वैभव वर ताण येऊ लागला होता . इतक्यातच त्यांची गाडी थांबली आणि वैभवला खाली उतरण्यास सांगितले गेले. त्याचे सामान त्याच्या पर्यंत नंतर पाठविण्यात येणार होते.
तो खाली उतरला आणि पुढे चार पावले चालत नाही तोच त्याच्या समोर त्याच्या आईने निवडलेल्या चार मुली आई बाबा सह त्याच्या स्वागताला सज्ज होत्या .
एक मुलगी आलेली नव्हती पण तिचे बाबा मात्र हजर होते. सगळ्यानी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले . त्यातला एका स्त्रीने त्याला इथे पाळावयाचे नियम समजावून सांगितले .
त्यानंतर दुसर्या स्त्रीने घोषणा केली ...
ज्याना वैभव ला नाकारायचे असेल त्यांनी आत्ताच आपला नकार कळवावा. कारण त्यानुसार वैभव ला कोणाकडे किती दिवस राहावे लागणार ते ठरवावे लागणार होते .
वैभवला वाटले इथे आपला लिलाव चाललाय की काय? हा अनुभव त्याच्यासाठी फारच क्लेशदायक होता. त्याच्या निवडीला येथे प्राधान्य नव्हते .
त्यातल्या तीन मुलींनी माघार घेतली होती. त्यांनी दिलेली कारणे अशी होती ..
व्हीडिओ मध्ये जितका चटपटीत दिसत होता तेवढा हा प्रत्यक्षात दिसत नाही आहे . मला वेळेत नाश्ता तरी करून देईल का ह्याची शाश्वती वाटत नाही.....
ह्याची शरीरयष्टी छान आहे पण ह्याने जो शर्ट घातला आहे त्याचा रंग माझ्या आवडीचा नाही. तसेच त्याच्या दाताची ठेवण आणि केसांचा रंग मला आवडला नाही़ ....
तिसरी ने सरळ सरळ सांगितले हा माझ्या स्वप्नातील राजकुमार नाही....
जावईपूरम् मधला पहिला अनुभव वैभवला पचवणे अवघड होत होते . पण काय करतो ? आलीय भोगासी असावे सादर ...
त्या तिघी तिथून निघून गेल्या . उरलेल्या मुलीने सांगितले मी दोन दिवस आधी तुझे सगळे काम पाहीन त्यानंतर मी तुला हो किंवा नाही म्हणीन.
पाचव्या मुलीच्या बाबांनी तत्परतेने सांगितले ......
डिकरा मंग तू अशे कर तूच पहिले हेला आपल्या संगट घेऊन जा .
बहुदा त्याला ह्या मुलीच्या स्वभावाची पूर्ण कल्पना असावी आणि ती नाही म्हणणार ह्याचीही खात्री असावी ....
अगदी हाच विचार वैभवच्या मनाला चाटून गेला. पण त्याच्या मनाचा विचार कोणीच करणार नव्हते . जो आदेश येईल त्याप्रमाणे वागायचे असे आईने १०० वेळा बजावले होते .
त्या मुलीचे नाव लतिका सुभेदार होते . तिच्या पाठोपाठ जाणे आता अपरिहार्य होते . तिच्या घरात शिरल्या बरोबर तिने आदेश सोडला ...
वैभव माझ्या ह्या चपला त्या स्टँड वर ठेव आणि घरातल्या घेऊन ये. लवकर ...
बिचारा वैभव . चुपचाप कामाला लागला . तिच्या चपलेच्या रॅक पाशी तो थबकला आणि नेमकी कोणती चप्पल न्यावी या विचारात पडला . कारण तिथे कमीत कमी १५ चपले चे जोड होते . तेवढ्यात जोरात खेकसत लतिका तिथे पोहोचली ए वेंधळा लवकर चा अर्थ नाही समजत का ?
वैभवाने पटकन हाती येईल त्या चपलेचा जोड तिच्यासमोर ठेवला आणि तिथून आपल्या जाण्याचा मार्ग जवळपास निश्चित केला .
कारण घाईघाईत त्याने एक चप्पल गुलाबी आणि एक चप्पल निळी उचलून तिच्यासमोर ठेवली होती. त्याच्याकडे रागारागाने कटाक्ष टाकला आणि दुसरी गुलाबी घेऊन ती तरातरा चालली गेली.
अरे बापरे ही तर लवंग लतिका दिसतेय. तिथून तो पुन्हा हॉल मध्ये आला . आपल्या चुकीची त्याला आता लाज वाटू लागली.
तेवढ्यातच लतिका तिच्या आई बरोबर तिथे आली. लतिका च्या आईने त्याला कडक शब्दांत समज दिली. सगळ्या कामांची यादी त्याचा हातात देऊन त्याला किचन कडे येण्याचे फर्मान सोडले .
सगळ्या वस्तूंच्या जागा सांगून अर्धा तासात नाश्ता बनवायला सांगितले.
१. लतिका साठी व्हेज सँडविचेस
२. तिच्या बाबासाठी ब्रेड-बटर आणि त्याबरोबर ओल्या नारळाची चटणी.
३. आईसाठी ऑम्लेट ब्रेड आणि ग्रीन सॅलड.
४. लतिका ची लहान बहीण... रसिका साठी फ्रूट स्मुदी
आणि हे सर्व अर्ध्या तासात . ....
वैभव ने आपले सर्व कौशल्य पणाला लावले आणि सर्व नाश्ता तयार केला. टेबल वर सर्व नीटपणे लावताना त्याने घड्याळ पाहिले ........ .. तो पाच मिनिटे लेट होता . कोणाकडे पहायची त्याची हिम्मत झाली नाही.
सगळ्यानी तोंड वाकडे करत नाश्ता फस्त केला पण त्याचे किंचितही कौतुक केले नाही. त्याला स्वतः साठी काहीतरी करून खाऊन घेण्यासाठी सांगून ते निघण्याच्या तयारीत असतानाच रसिका चिवचिवली....
माझे होणारे जीजू यू आर द बेस्ट
तिच्या ह्या वाक्या साठी लतिका ने तिच्या पाठीत एक जोरदार रट्टा दिला .
तिला तसच मुसमुसत ठेवून वैभव सगळे सामान आवरून किचन मध्ये घेऊन गेला . त्याला पुढची कामे वेळात आवरायची होती .
दोन ब्रेड भाजून बटर लावुन त्याने कशीबशी संपविली ...
भांडी डिश वाॅशर मध्ये टाकली आणि पुढच्या कामाला लागला ....
आपण नाकारले जाणार असे त्याला वाटत होते...
पण अजून १½ दिवस तर तिथेच काढावा लागेल हे त्याला माहीत होते ...
चला एव्हढ्यात आपण आपल्या बद्दलचे मत बदलविण्याचा प्रयत्न करू या.
कारण कुठेतरी लतिका कडे त्याचे झुकते माप होते ....
पण मनातील गोष्ट कोणाकडे बोलायची सोय नव्हती....
क्रमशः
©️®️ सौ.मंजूषा श्रीकांत अपराजित
❤️🌷❤️🌷❤️🌷❤️🌷❤️🌷❤️🌷
मुलांच्या आयांनो आपल्या मुलाची तगमग
पाहवेलं का ? तो असा जुन्या काळातल्या सासुरवाशीण सारखाच छळ सोसत आहे , ही कल्पना कशी वाटते ?
त्रास होतोय ना ?
असे घडू न देणे तुमच्याच हातात आहे. आपल्या उदरात वाढणार्या मुलीचा गर्भ पाडू नका . खंबीर पणे विरोध करा .
म्हणजे असा प्रसंग तुमच्या मुलाच्या बाबतीत घडणार नाही.
कथा मनापासून वाचा . अतिरंजित गोष्टी हसून सोडून द्या .
Monday, 11 July 2022
जावईपूरम्..भाग २
वैभव डोक्याला हात लाऊन बसला होता. कालपासून त्याची फारच चिडचिड होत होती . तो सर्वच बाबतीत सरस असूनही केवळ मुलगा असल्यामुळे त्याच्या हातून मल्टिनॅशनल कंपनी चा जॉब निसटला होता.
मुलींची वाढती संख्या, सरकारने त्यांना दिलेली मुभा , सरकारच्या बदललेल्या पॉलिसी ह्यामुळे त्याच्यासारखे अनेक तरुण हताश झाले होते.
आजपासून साधारण पणे ५०० वर्षापुर्वी मुलींची संख्या जवळपास नगण्य झाली होती म्हणे. तेंव्हा सरकारने एक नवीन योजना राबविली होती .
ज्या घरात मुलगी जन्माला येईल त्या व्यक्तीला एक मोठे घर , मुलीच्या शिक्षणाचा खर्च , मुलीच्या नोकरीची हमी , मुलीच्या लग्नाचा खर्च सर्व काही सरकारी खर्चाने होईल.
मात्र लिंग परीक्षांवर निर्बंध तसेच ठेवले होते . त्यामुळे मुलांच्या संख्येत घट झाली नाही हे नशिब.
ज्या लोकांना सरकारचा हा निर्णय मानवला नव्हता त्यांना सरकारने परदेशात वा परग्रहावर जाण्यासाठी सहजतेने व्हिसा मिळण्याची सोयही करून ठेवली होती.
सरकारच्या ह्या पॉलिसी मुळे जावईपूरम् ची निर्मिती झाली होती .
जावईपूरम् चे सरळ सरळ दोन भाग होते. एक भाग मुली , त्यांचे आई वडील आणि मुलींचे नवरे ह्यांच्या साठी आरक्षित होता .
तर दुसर्या भागात आई वडील आणि त्यांचे मुलगे ह्यांच्यासाठी छोटेखानी घरे होती .
दोन्ही भागांच्या मधे चांगली २५ फुट उंचीची अत्यंत गुळगुळीत भिंत उभी होती. कोणीही कितीही ठरविले तरी एका भागातून दुसर्या भागात भिंतीवरून चढून जाणे केवळ अशक्यच होते.
जावईपूरम् मधल्या कोण्या नवविवाहित जोडप्याला मुलगा झाला तर जावईपूरम् मधून त्यांची हकालपट्टी केल्या जात असे .
ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून करून वैभव थकला होता . आईला आणि श्री ला सोडून जायच्या विचाराने तो अस्वस्थ होत होता.
एकदा गेले की नियमांनुसार दोन वर्ष तो फोन वरून ही संपर्क साधू शकणार नव्हता . परंतु त्याच्या ख्यालीखुशाली ची सगळी माहीती संगणकीय आंतरजाल प्रणाली ने त्याच्या आई पर्यंत पोहोचवली जाणार होती .
एखाद दीड वर्षात श्री सुद्धा २१ वर्षे पूर्ण करणार होता . पुन्हा त्याची भेट केंव्हा होईल देवचे जाणे.
ते पत्र आणि यादी मिळाल्यापासून आई अगदी कामात गुंतून गेली होती. प्रत्येक मुलीची प्रोफाईल अगदी बारकाईने अभ्यासत होती. खूप वेळ त्या यादी चा अभ्यास झाल्यावर तिने फक्त ५ मुलीच निवडल्या. त्याबद्दल जावईपूरम् मधील कार्यालयात कळवून ही टाकले होते .
मला त्या मुलींच्या बद्दल एक एक गोष्ट कमी कमी १० वेळा तरी सांगितली . त्यांचे गुण-अवगुण , निवड करताना कोणते निकष लावायचे ह्याची उजळणी तर किती वेळाच करून झाली होती.
ह्याशिवाय आपले संस्कार, संस्कृती, कष्टाळू पणा ह्या सगळ्या बद्दल पुन्हा पुन्हा उठता बसता मी ऐकतच होतो .
ह्या ५ मुलींपैकी ज्या माझ्या सर्व परफॉर्मन्स वर जास्ती चांगले मार्क्स देतील तिच्याशी माझे लग्न लावून देण्यात येणार होते. त्यावेळी माझी पसंती लक्षात घेण्यात येणार नव्हती.
निमुटपणे लग्नाला उभे राहावे लागणार होते . पडेल ते काम करावे लागणार होते. बायकोच्या तालावर नाचावे लागणार होते .
आईने बॅग भरून ठेवली. काय काय भरले याची यादी ही बॅगवर चिटकवून ठेवली. नवनवीन पदार्थांच्या रेसिपी चे एक मोठ्ठे रजिस्टर तिने बनवून दिले होते .
मी मात्र ह्या तयारी कडे अत्यंत थंड आणि त्रयस्थपणे पहात होतो. समोर येणार्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे ह्या विचारानेच माझ्या मनात प्रचंड उलथापालथ होत होती .
पैसे रग्गड असते तर कदाचित मी परग्रहावर पळून गेलो असतो. पण आता माझ्यासमोर कोणताही पर्याय उरला नव्हता.
फोनच्या आवाजाने मी भानावर आलो . फोन जावईपूरम् मधूनच होता. उद्या सकाळीच मला तिथे हजर होण्यास सांगितले होते. मी धक्का बसून भिंतीवरच्या कॅलेंडर कडे पाहिले . आणि लक्षात आले अरे हो उद्याच निघायचे आहे ... हे ८ दिवस कसे भराभर गेले कळलेच नव्हते . ..
उद्याच्या सकाळ नंतर माझ्या भाग्याची वाट मला कुठे घेऊन जाणार होती हे मलाच ठावूक नव्हते....
.. क्रमशः
©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
माझ्या खूप छान वाचक मित्र मैत्रिणींनो कसा वाटतोय वैभव चा प्रवास ? उद्यापासून बिचारा संकटात पडतोय की सुखात लोळणार हे येणारा दिवसच ठरवणार आहे.
थोडेसे तुमच्या शी हितगुज करायचे आहे. ही कथा काल्पनिक आहे. कल्पना विलास जरा जास्तच हास्यास्पद आहे . पण स्त्री भ्रूण हत्या वेळीच थांबवली नाही तर भविष्यात हेही घडू शकेल नाही का ?
सरकारने स्त्री भ्रूण हत्या कायदेशीर गुन्हा ठरवली असला तरी चोरी छुपे हे घडतेच आहे. सरकार कुठे कुठे पुरणार ? आपल्या खांद्यावर प्रत्येकानेच जबाबदारी उचलायची आहे. विचार करा ..
Saturday, 9 July 2022
जावईपूरम्..भाग १
सकाळी सकाळी आईची आरोळी ऐकून वैभव ला जाग आलीच होती . पण तो अजून अंथरूणात तसाच लोळत पडला होता.
बाजूच्या पलंगावर त्याचा लहान भाऊ श्री सुद्धा आईच्या बडबडीने जागा झाला होता . पण तोंडावर पांघरूण घेऊन तो सुद्धा झोपायचे नाटक करत होता.
आज त्याला काहीच करायची इच्छा होत नव्हती. तशीही आता त्याच्या मनाची तयारी करावी लागणारच होती. जावईपूरम् (?) मध्ये जाण्याचे त्याचे दिवस जवळ येत चालले होते. आई फार दिवस आपल्याला इथे राहू देणार नाही , ह्याची त्याला पूर्ण कल्पना होती.
तिकडे आईची तकतक चालूच होती . पोरगा वयात आला . त्याचे लवकर हात पिवळे झाले की माझी अर्धी जबाबदारी संपेल. तो सासरी नांदता पाहिला की दुसऱ्याकडे निवांत पाहता येईल .
श्री च्या वेळेला मुलगी व्हावी अशी आमची दोघांचीही इच्छा होती. पण कसचं काय ?..
....
मुलगाच झाला . ह्यांचे बाबा काय दुसरा ही मुलगाच झाला म्हणून धसका घेऊन संन्यास घेऊन निघून गेले .....
मुलगी झाली असती तर आज आपण ह्या खुराड्यात नाही तर जावईपूरम् च्या आलिशान वाड्यात असतो .....
शिवाय हाताशी माझ्या एक जावई काम करायला राहिला असता .....
आईचे बोलणे असेच अजून किती तरी वेळ चालूच राहिले असते म्हणून वैभव पटकन उठला , ब्रश केला, चहाचे आधण ठेवले आणि आईच्या हातात गरमागरम चहा ठेवला.
समोरचे छोटेसे अंगण झाडून, सारवुन स्वच्छ केले . वृंदावना समोर सुबकशी रांगोळी ही रेखाटली. घरात येऊन पुढची कामे करण्यासाठी तो वळला होताच तोच पोस्टमन ताईने त्याच्या हातात पत्र ठेवले .
पत्र उघडत उघडत तो आत आला . आणि त्याच्या चेहर्यावरचे भाव झरझर बदलू लागले . सरकार कडून आलेले पत्र होते ते...
मुलाचे लग्नाचे वय आता २४ वर्षा वरून २१ वर्ष करण्यात आले होते. आणि ४ दिवसानंतरच वैभव ला २१ वे लागत होते . सरकारने ताबडतोब म्हणजे ८ दिवसात त्याला जावईपूरम् मध्ये हजर होण्याचे आदेश दिले होते ...
पत्रा बरोबर २५ मुलींची यादी ही पाठवली होती . ह्या २५ मुलीनी ह्या स्थळाला पसंती दर्शविली होती.
त्याच्या जन्मापासूनचे सगळे डिटेल्स त्यांच्या पर्यंत आधीच पोहोचले होते .
त्याचे रूप, त्याची काम करण्याची पद्धत, ह्याचे व्हीडिओ वेळोवेळी त्या मुलींच्या आईवडलां पर्यंत पोहोचतच होते. त्याच्या प्रोफाईल वर सतत ए, ए+,ए++ अशाच ग्रेड होत्या .
त्याचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे त्याला नोकरी नव्हती. त्याच्या ह्या गुणावर ५ मुलींनी चक्क त्याला मागणी घातली होती.
हे सर्व त्याने गुपचूप आईच्या स्वाधीन केले. त्याला वाटले आई आता रडकुंडीला येईल. पण असे काहीच झाले नाही . ती हर्षभरीत होऊन धावत पळत शेजारणीला दाखवायला निघून गेली .
वैभव तिथेच डोके धरून खाली बसला..
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
क्रमशः
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
मुलींची घटणारी संख्या हा आज समाजापुढे मोठा प्रश्न आहे . ह्या प्रश्नाने भयानक स्वरुप धारण करण्या आधीच सगळ्यानी जागृत होणे आवश्यक आहे . ह्या प्रश्नाला समजा सरकारने ह्या कथे प्रमाणे उत्तर दिले तर काय गमतीजमती घडून येतील ते वाचा पुढच्या भागात ...
पुढच्या भागात वैभव चे काय होणार ?
जावई पूर मध्ये तो खुष राहील का ?
मना सारखा जोडीदार आणि कमी राबवून घेणारे सासू सासरे मिळतील का ?
की अजून भलतेच काही त्याच्या नशिबात आहे ?
Welcome
संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर
ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात, किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...
-
मागच्या भागात काय झाले ...... कामाच्या गडबडीत तो तहान, भूक , घर, बाबा, खानावळीचा डब्बा सगळेच विसरला. आठ वाजले तसे प्यून त्याच्या आजूबाजूला...
-
शंकर इंजिनियर झाला, नोकरीला लागला . नोकरी निमित्ताने त्याची वेगवेगळया गावात, शहरात बदली होत असे. आधी शिक्षणामुळे आणि आता नोकरीमुळे सतत बा...
-
नवीन बाळ घरात आले आणि घरातील वातावरण बदलले. वातावरण जरी बदलले तरी स्वभाव कसा बदलणार? फक्त त्या स्वभावाला तात्पुरती मायेची झालर जोडली गेली....