मागच्या भागात काय झाले ..
पण तिची लगबगीने चालण्याची ढब पाहून ती सुमती तर नाही ना? असा विचार त्याच्या मनात चमकून गेला .
ऊफ्फ, पुन्हा एकदा सुमती . त्याला आत्ता स्वतःचाच राग आला.
तेवढ्यातच त्याचा सहकारी लंचला चल म्हणून बोलवायला आला त्यामुळे त्याची विचार शृंखला तुटली आणि तो लंच करायला निघून गेला.
कोण होती ती तरुणी ? सुमती की दुसरीच कोणीतरी? रमाकांत सारखाच सुमतीचा विचार का करत होता?
आता पुढे ...
लंच अवर मध्ये सगळ्यांची हसत खेळत जेवण झाले . आता कस्टमर साठी बँक बंद करून रमाकांतच्या सेन्डऑफची तयारी करायची होती . त्यामुळे सगळ्यानाच कामातून सुटका मिळाली होती . रमाकांत मात्र एका ठिकाणी बसूनच सगळ्यांची धावपळ पहात होता .
एकदाचा साडेचार वाजता समारंभ चालू झाला . ब्रँच मॅनेजर म्हणून जोशी साहेबांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यानंतर उत्स्फूर्तपणे अजून एक दोघांनी भाषण दिले. अर्थात सगळ्यानी रमाकांत वर स्तुतिसुमनेच उधळली . शाल , नारळ , मोठ्ठा फुलांचा गुच्छा देऊन त्याचा सत्कार केला . शेवटी अल्पोपाहार करून सर्व मंडळी आपापल्या घराच्या रस्त्याला लागली.
काकूंनी दिलेला लाडवांचा डब्बा , फुलांचा गुच्छा, शाल नारळ, स्मिता गोडबोले दिलेला शर्ट आणि अजून एक दोघांनी दिलेले छोटे मोठे गिफ्ट एव्हढा सगळा बाड बिस्तर घरी कसा घेऊन जाऊ या विचारात रमाकांत होता. तोच त्याच्या समोर एक दुचाकी येऊन थांबली .
त्या व्यक्तीच्या डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे, चेहरा ही पूर्णपणे कपड्यांनी झाकला असल्यामुळे आणि जीन्स , टी-शर्ट घातल्यामुळे ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे ओळखणे जरा कठीणच जात होते.
" काही मदत हवीय का ?" आवाज मात्र बायकी आल्यामुळे तो दोन पावले मागेच सरकला . आवाज काहीसा ओळखीचा वाटत होता .
रमाकांतच्या चेहर्यावरील प्रश्नचिन्ह आणि गोंधळ पाहून त्या व्यक्तीने हेल्मेट काढले. पण चेहरा मात्र झाकलेलाच होता. फक्त डोळे तेवढे दिसत होते.
हे करारी, पाणीदार डोळे त्याच्या चांगलेच ओळखीचे होते. सुमती त्याच्या समोर उभी राहून विचारत होती आणि त्याला बोलायला काहीच सुचत नव्हते. त्याची नजर मात्र त्या पाणीदार डोळ्यावरून हलायचे नाव घेत नव्हती .
रमाकांतच्या अशा वागण्याने सुमती एकदम गडबडली आणि ओशाळून म्हणाली ,
" म्हणजे तुमच्या घराच्या बाजूलाच माझे एक काम आहे . तुमच्याजवळ खूप सामान दिसले आणि तुमच्याजवळ काही वाहन ही दिसले नाही म्हणून विचारले ."
रमाकांत ने दूरवर पाहिले . एकही रिक्षा दिसत नव्हती. हे सगळे सामान लळत लोंबकळत कसे न्यायचे हा प्रश्नच होता. त्याने क्षणात विचार केला आणि तिला म्हणाला , " तसे तुम्हाला असे काम सांगणे मला जीवावर येते आहे . पण दूरवर एकही रिक्षा दिसत नाहीये. तुम्ही प्लीज एव्हडे सामान माझ्या घराच्या अंगणात ठेवून द्या . मी पोहोचतोच तिथे पाच मिनिटात ."
तिने मान डोलावली आणि त्याचे सामान आपल्या टु व्हीलर वर नीट रचून घेतले आणि क्षणात दिसेनाशी झाली.
आपण सुमतीशी इतके बोलू शकलो ह्याबद्दल त्याचे त्यालाच आश्चर्य वाटले. तो झपाझप पावले उचलत घराकडे निघाला . पुन्हा तिथे सुमती भेटेल ही त्याच्या मनात सुप्त इच्छा होती.
जवळपास धावतपळत घरापाशी पोहोचला. अंगणात तिचा किंवा सामानाचा मागमूसही नव्हता. नाराज होऊन तो बंद दारापाशी पोहोचला . दार उघडताना त्याने सहज बाजूला नजर टाकली तर तिथे सर्व सामान व्यवस्थित ठेवले होते. सुमती मात्र निघून गेली होती.
सामान उचलून तो आत गेला. त्याला उगीचच खूप रिकामं रिकामं वाटू लागले. उद्याची सुट्टी, परवाचा रविवार. बापरे इतका वेळ आपण रिकामे कसे बसणार ? एरवी स्वयंपाक तरी मागे होता . आता तेही नाही. कळवावे का दोन दिवसाचा डब्बा नको म्हणून ? पण मग दोन दिवस सुमतीचे दर्शन होणार नाही.
आता त्याचा स्वतःशीच संवाद चालू झाला होता . एक मन म्हणाले , " नाही झाले दर्शन तर नाही झाले , काय बिघडणार आहे ? "
दुसरे मन जरा स्तब्ध झाले. खरच आपण का विचार करतो आहे तिचा ? पण हे मन हार मानायला तयार नव्हते,
" वावा, असे कसे ? चविष्ट भोजन नाही ना मिळणार ? "
" असेही होऊ शकते ना , की सुमती च्या जागी रेवती येऊ शकते " पहिल्या मनाने उगीचच दुसर्या मनाला उचकावले .
आतापर्यंत दुसरे मन चांगलेच निर्ढावले होते.
" तेच तर कुणीही येऊ दे , मला काहीच फरक नाही पडत . फक्त डब्बा मी मागवणारच , हे फायनल . आणि आता गप्प बस." त्याने दोन्ही मनाला दरडावले. आणि आपल्या खोलीत जाऊन एकेक गिफ्ट उघडून पाहू लागला.
त्याने सगळे गिफ्ट नीट लावून ठेवले . उगीचच आलमारीतले कपडे पुन्हा पुन्हा व्यवस्थित लावून ठेवले. वेळ कसा घालवावा हे त्याला समजतच नव्हते.
घड्याळाकडे पुन्हा पुन्हा पाहताना त्याला उगीचच वाटले की काटे जरा हळू हळू फिरतात आहे . साडे आठ वाजायला अजून अर्धा तास बाकी आहे.
आजवर आपण असे कधीच घड्याळ वारंवार पहात नव्हतो . आताच असे का होते आहे ? आपल्याला जवळचे मित्रही नाहीत . आजूबाजूच्या शेजार्यांशी आपण कधीच संबंध प्रस्तापित केले नाही. किंबहुना बाबांनी ते कधी करूच दिले नाही. कोणी येणारा नाही की कोणी जाणारा नाही .
आई निघून गेल्यानंतर बाबांनी सर्व नातेवाईकांशी संबंध तोडून टाकले. मामा , मावशीला तर ते दारातही उभे करत नसे.
बाबांच्या विचित्र स्वभावामुळे आत्या स्वतःहूनच घराकडे फिरकली नाही. ती तिच्याच घरच्यांमुळे त्रस्त होती . त्यात रमाकांतची जबाबदारी येऊन पडलीय तर तिला ती नको होती.
एक लहान काका होता . तो बरेचदा बाबांना समजावायचा प्रयत्न करायचा. पण बाबांचा हेकेखोरपणा नेहमी आड यायचा . संभाषणाचे रूपांतर वादात आणि त्यानंतर कडाक्याच्या भांडणात व्हायचे .
छोटा रमाकांत घाबरून एखाद्या कोपर्यात थरथरत मुळूमुळू रडत बसायचा. भांडणाचा अतिरेक झाला की काका बाहेर निघून जायचा . त्यानंतर बाबा सगळा राग रमाकांत वर काढायचे . त्याला बदड बदड मारायचे.
रमाकांत अजूनच घाबरून घरभर पळत सुटायचा. ह्या पळापळीत बाबा थकले की मग त्याची सुटका होत असे. मनावरच्या जखमा आणि शरीरावरील माराचे वळ ह्याने अपमानित झालेला रमाकांत कित्येकदा उपाशी पोटी झोपला .
एक दिवस काका असाच चिडून घराबाहेर पडला. दोन दिवस तो घरीच आला नाही . बाबांनी ही त्याला शोधायचा प्रयत्न केला नाही . उलट त्यांची धुसफूस चालू होती दोन दिवस. रमाकांत गुपचूप आपला आपला शाळेसाठी तयार व्हायचा , पानात पडेल ते खायचा . बाबा ऑफिसला गेले की घराला कुलूप लावून शाळेत जायचा . शाळेतून आला की घराला लागलेले कुलूप पाहिले की त्याला खूप रडू यायचे . पण आजूबाजूच्या लोकांना कळलेले बाबांना चालणार नाही हे त्याला चांगलेच कळून आले होते. जोरात लागलेली भूक मग मरून जायची . पोटभर पाणी पिऊन तो तसाच बाबांची वाटत पाहत बसायचा . कधी कधी बसल्या जागी पेंगायचा . रात्री मात्र त्याला काकांची फार आठवण यायची . तोच नेहमी रमाकांतला आंजारून गोंजारून नीजवित असे . रमाकांतच्या रखरखीत आयुष्यात तीच एक हिरवळ होती.
त्या दिवशी असाच तो शाळेतून तो घरी आला तर घराचे दार त्याला उघडे दिसले . तो धावत पळत घरात शिरला . दारातच त्याला काकाचा आवाज आला . शाळेची बॅग तशीच फेकून तो धावतच काकांकडे झेपावला आणि क्षणात जागच्या जागी थिजून उभा राहिला. कुणीतरी एक बाई काकाला चहा करून देत होती . काका हसून हसून तिच्याशी गप्पा मारत होता.
गोंधळलेला रमाकांत तिथेच उभा राहिला.
काकाने त्याला प्रेमाने जवळ बोलावले आणि म्हणाला , " कांता ही तुझी काकू . आजपासून तुला जो काही हट्ट करायचा तो हिच्याकडे करायचा . ती तुझे सगळे लाड पुरविल."
तिनेही तत्परतेने पुढे होऊन त्याला जवळ घेतले . प्रेमाने ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत राहिले. त्याच्या आयुष्यातला, त्याच्या आठवणीतला तो पहिला मायेचा स्पर्श तो डोळे मिटून अनुभवत होता.
दोनच मिनिटे त्याने हे सुख अनुभवले असेल नसेल तोच त्याच्या पाठीवर जोरात रट्टा पडला आणि तो कोलमडत बाजूच्या भिंतीवर धाडकन आपटला आणि त्याला जोरात चक्कर आली. पुढे काय झाले ते त्याला कळलेच नाही.
काय घडले असेल तिथे ? कोणी मारले रमाकांतला ?
पाहूया पुढच्या भागात ....
.... ..... ...... ...... ...... ..... क्रमशः
🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸
©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित