ती माणसच निराळी असतात ,
पूर असतो त्यांच्या स्वभावात,
किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात ,
कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात .
हृदय अर्पण करतात
ती माणसच निराळी असतात ....
.... .... .... .... शिरीष पै
अशाच निराळ्या व्यक्तीचे सान्निध्य मी फार थोड्या काळासाठी अनुभवले. थोड्या काळासाठी जरी मी तिच्या सान्निध्यात आली तरी ते व्यक्तिमत्त्व माझ्या मनात खोलवर रुजले आहे.
जुने नागपूर आणि महाल परिसर म्हंटला की माझ्या डोळ्यासमोर दोन वास्तु प्रकर्षाने उभ्या राहतात. जीवनाला साधेपणाचा, शिस्तीचा, नियमितपणाचा पाठ शिकवणारी संघ बिल्डींगची वास्तू आणि त्याच्याच समोर असणाऱ्या वेदशास्त्र संपन्न व्यक्तिनी भरलेल्या आर्वीकरांची वास्तु .
ह्या घराचा आणि माझ्या माहेरच्या घराचा संबंध तीन चार पिढ्या आधीपासूनचा. त्यामुळे रक्ताचे नाते नसले तरी भावनांनी आम्ही एकमेकांशी पिढ्यान् पिढ्या जुळले आहोत. असो.
आर्वीकर म्हटले की एका एका वेदशास्त्रींची नावे डोळ्यापुढुन सरकू लागतात भैय्याजी आर्वीकर, भाऊजी आर्वीकर, विनुकाका आर्वीकर .......... ह्या सर्व पुरुष वेदशास्त्री मधे आवर्जुन नाव घ्यावे असे एक स्त्री वेदाभ्यासी व्यक्तिमत्त्व म्हणजे माझी ललिता काकू. सौ. ललिताशास्त्री विनायक आर्वीकर.
ललिता काकूचा जन्म १९४४ सालचा . पूर्वाश्रमीची ही ललिता रोडी . वडील कै. गोविंद नरहरी रोडी . वडिलांचे वेद , शास्त्र, उपनिषद, मीमांसा, न्याय इत्यादि शास्त्रांच्या विषयावर प्रभुत्व. ह्याव्यतिरिक्त गणित, इंग्रजी विषयात प्रावीण्य. ते यम - नियम , ब्राह्मणांची कर्तव्ये पार पाडण्यात तत्पर असणारे असे होते. आईही नवविधा भक्तिमार्ग आचरणारी. अशा सोज्वळ भक्तिमार्गात लीन असणार्या दाम्पत्याच्या पोटी ह्या सुकन्येने जन्म घेतला. अर्थातच ह्या कन्येवर गर्भात असतानाच सात्विक संस्कार झाले . त्यामुळे बालवयातच श्लोक, स्तोत्र, कविता, भाषणे , वादविवाद इत्यादी स्पर्धांमध्ये भाग घेऊन आणि अनेक पारितोषिके मिळवुन तिने जनमानसात आपला ठसा उमटविला.
शालेय शिक्षण घेता घेताच पुढील शिक्षणाचा आराखडा तयार होता. संस्कृत आणि संस्कृतीची धुरा समर्थपणे पेलून ती पुढच्या पिढीच्या हाती सोपवताना पुढची पिढीही तितकीच समर्थ बनवायची हे कदाचित काकूंनी तेंव्हाच योजिले असावे. यासाठी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी कला शाखेची निवड केली. लघुसिद्धान्त कौमुदी, पाणिनीय सूत्र, वेद , शास्त्र , उपनिषद, पुराण ह्याचा नित्य सखोल अभ्यास करून काकू अभूतपूर्व यशाची धनी झाली. त्यानंतर संस्कृत विषयात एम. ए., प्राज्ञ, शास्त्री इत्यादी पदव्या आणि पदविका प्राप्त केल्या. जर्मन भाषेवर ही प्रभुत्व मिळविले. झगमगत्या शैक्षणिक यशाचे फळ म्हणुन की काय केंद्र सरकारच्या आयकर खात्यात चांगल्या पदावर तिला नोकरी मिळाली .
ह्याच दरम्यान काकूंच्या आयुष्यात काही महान घटना घडणार होत्या. काकूंना हरिद्वार निवासी सत्-चित् आनंदमूर्ती असणारे प. पू. सद्गुरू स्वामी राम ह्यांचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांनी काकूंकडून ॐकार साधना करून घेतली. ह्या सद्गुरू कृपेने अज्ञान तिमीराचा नाश होऊन मोक्षदायक ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार झाला. तसेच त्या दरम्यान प.पू. करपात्री महाराज आणि वासुदेवानंद सरस्वती अनुग्रहीत , श्रीविद्येचे गाढे ज्ञानी आणि उपासक पंडित रामचंद्रशास्त्री जोशींनी श्रीविद्येची पंचदशाक्षरी आणि षोडशी दीक्षा दिली. दैवी कृपेने तिला कांची कामकोटी शंकराचार्यांनी षोडशी उपदेशाचा अधिकार दिला होता. त्यांच्याच समक्ष ह्याच षोडशीचा अनुग्रह काकूंनी आपला बंधू आणि सुपुत्र ह्यांना दिला . सासर आणि माहेरच्या गृही ही उपासना अखंडित चालू राहील ह्यासाठी जणू तजवीज करून ठेवली.
देवऋण , ऋषिॠण, पितृऋण ह्या तिन्ही ऋणांची पूर्तता गृहस्थाश्रमात होते. म्हणून सद्गुरूंच्या आदेशानुसार त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. वेदशास्त्रसंपन्न, वैदिकी आणि याज्ञिकी मध्ये प्रवीण असलेल्या विनायकशास्त्री आर्वीकरांशी ललिताकाकूचा विवाह झाला.
सांसारिक जीवन सुरू झाले. त्याच बरोबर नोकरीही चालूच होती. नोकरीला जाण्यापूर्वी तेव्हढ्या घाईत सोवळ्यात स्वयंपाक करून , सगळ्यांची जेवणे आटोपून घाईघाईने ऑफिस गाठावे लागत होते. पण कधीही चेहर्यावर नाराजी न येऊ देता सर्व व्रतवैकल्ये, सणवार , नवरात्र , महालक्ष्म्या काकू सगळ्याच आघाड्या कुशलतेने सांभाळत होती. हे सगळे व्याप सांभाळून नागपूर विश्व विद्यालयाची संस्कृत शास्त्री ही परिक्षा ती उच्च श्रेणीत पास झाली.
आता सासर्यांच्या सरस्वती संस्कृत विद्यालयात जाऊन बी . ए. व एम. ए. च्या विद्यार्थ्यांंना ही शिकवावे लागत होते . एक जबाबदारी अजून वाढली होती. हे काम तिच्या अत्यंत आवडीचे होते. पण ह्या सगळ्या आघाड्या सांभाळताना ऑफिस मध्ये जायला उशीर होऊ लागला. वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जाणे आले. तरी ही न डगमगता, जिद्दीने तीन चार दिवसात दुचाकी (लुना) शिकून ती ऑफिसला लुनाने जाऊ लागली. ऑफिस मध्ये ही कामाचा आवाका जबरदस्त होता. ती कामात अतिशय चोख होती. लंचटाइम मध्ये ही अथर्वशीर्ष, शिवमहिम्न स्तोत्र शिकविण्याचे काम चालू राहातच असे.
ह्या सगळ्या बरोबर भागवत स्वाहाकार, अनेक लहान मोठे यज्ञ, भागवताचे श्रवण नित्य नियमाने चालू राहातच होते.
सर्वसामान्यांच्या संसारात जशा अडचणी येतात तशा तिच्या ही संसारात अडचणी आल्या. पण न घाबरता, न डगमगता ती हिमतीने उभी रहात होती. ती उत्तम सहचारिणी, उत्तम गृहिणी होती. भावंडांचे लालनपालन असो, सासू सासर्यांची सेवा असो , घरातील व्रत वैकल्याचे पालन असो किंवा ऑफिस मधले काम असो सारख्याच तन्मयतेने ती पूर्णत्वास नेत असे.
पहाटे तीन ते रात्री अकरा बारा वाजेपर्यंत अखंड कर्तव्यपूर्ती हाच वसा तिने घेतला होता. हळूहळू कष्टाचे फळ मिळू लागले. जीवनात स्थैर्य येऊ लागले. संसार वेल बहरू लागली. सुधांशु आणि भूषण ही दोन अपत्ये झाली. त्यांच्या संगोपनात तिने कोणतीच कसर ठेवली नाही. त्यांना वैदिकी, याज्ञिकी आणि लौकिक शिक्षण देऊन ज्ञानाचा वसा दिला.
विनुकाकांना (विनायकशास्त्री ) काही अपरिहार्य कारणास्तव बँकेतून स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली. तेंव्हा ही आर्थिक बाजू तिने सांभाळून घेतली. घर बांधताना ही काकांना तोच खंबीर पाठींबा दिला .
द्वारकेला श्रीमद्भागवताचे वाचन काका (विनायकशास्त्री ) करीत होते . अचानक त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. मीठापूर येथे त्यांना दवाखान्यात भरती करावे लागले. औषधोपचार सुरू झाले पण हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण काकू हिमतीने सर्व परिस्थिती सांभाळत होती. तशातच काकांनी सांगितले की सप्ताह अर्ध्यावर सोडू नये. काकूच्या मानसिक संघर्षाची देव जणू परीक्षा पाहत होता . पत्नीधर्म म्हणुन काकांच्या शुश्रूषेसाठी त्यांच्याजवळ थांबावे की पती आज्ञा शिरसावंद्य मानून सप्ताह पूर्णत्वास न्यावा ? अर्थातच तिने पती आज्ञेचे पालन केले. ही भागवत सेवा श्रीकृष्ण चरणी अर्पण केली आणि ती काकांना सुखरूप घेऊन परतली.
ललिता काकूच्या प्रोत्साहनाने काकानी भागवताचा सखोल अभ्यास करून लक्ष्मी नगरातील सिद्ध हनुमान मंदिरात एकवीस वर्षे प्रवचने केलीत आणि ही एकवीस वर्षे काकू न चुकता श्रवण भक्ती करण्यासाठी ऑफिसचे काम बारा वाजेपर्यंत पूर्ण करून मंदिरात येत असे. पुराण संपले की पुन्हा ऑफिस मध्ये हजर.
जसा भरभक्कम पाठींबा तिने काकांना दिला त्याचप्रमाणे तिने मुले , सुना, नातवंडे ह्यांना ही सरस्वतीचे दालन खुले करून दिले. जगत् उत्पत्ती, परमेश्वरी कार्य , ईश्वरी सेवेची फलश्रुती यावर ती चर्चा करीत असे. ज्ञानेश्वरी , श्रीमद्भागवत कथा व सिद्धांताचे निवेदन, श्री देवी भागवत यावर विवेचन करून शंकानिरसन करत असे.
आपल्या दोन्ही सुनांना प्रेमाने व्रत वैकल्ये, सणवार ह्याचे महत्व पटवून सर्व कार्यात कुशल केले. आदरातिथ्य , सदाचरण , घराण्याची परंपरा सहजपणे सुनांच्या सुपूर्द केली. तिचा अन्नपूर्णेचा वसा तिच्या माघारी तिच्या सुना पुढे चालवतात आहे.
गृहस्थाश्रमाचे कर्तव्ये यशस्वीपणे पार पाडताना सत्गुरुनी दिलेल्या स्वाध्यायांनी ॐकार व अष्टांग योगाची साधना चालूच होती.
जैन महामुनी श्री अरुणविजयजी महाराजांनी चेन्नई येथे अखिल भारतीय संस्कृत महापरिषदेचे आयोजन केले होते. नागपुरातून केवळ दोनच व्यक्ती आमंत्रित होत्या . एक प्रा. के. रा. जोशी आणि सौ ललिता काकू. तेथे संस्कृत भाषेतून
" सांख्य तत्त्वज्ञानानुसार आत्म्याचे अस्तित्व " हा विषय अत्यंत प्रभावीपणे मांडला. श्री. अरुणविजयजीच्या हस्ते प्रशस्तिपत्रासह तिचा सत्कारही करण्यात आला.
गृहस्थाश्रमातील सर्व कर्तव्ये सुखेनैव पार पडली. निवृत्तीचे वय आले. निवृत्तीनंतर श्रीमद्भागवताचा सूक्ष्मरितीने अभ्यास सुरू झाला. श्री सेनाड यांच्या घरी श्रावण मासात पाच सहा वर्षे भागवत कथन केले.
अखंड उपासना , व्रतवैकल्ये, भागवत सप्ताह, जप , मानसपूजा या तप:सामर्थ्याने तिला कवित्वरुपाचे दैवी वरदान मिळाले.
भागवतातील राधा तिचे आवडीचे व्यक्तिमत्त्व . ही कृष्णसखी काकूच्या मनात इतकी ठसली की कवीमनाच्या काकूने राधेवर संस्कृतमधे राधायनम् हे महाकाव्य रचले . नुसतेच रचले नाही तर सामान्यांना त्याचा आस्वाद घेता यावा, आनंद घेता यावा म्हणुन त्याचे स्वतः इंग्रजी आणि मराठीत भाषांतर सुद्धा केले. एवढेच नव्हे तर संगणकावर देवनागरी लिपी वापरुन स्वतः त्याची अक्षरजुळवणी केली. पुरातन आणि आधुनिक कौशल्याचा हा सुंदर मिलाफ होता. असे महाकाव्य रचणारी सांप्रत युगातली ही एकमेव स्त्री आहे. या महाकाव्या करिता महाराष्ट्र सरकारने तिला प्राचीन संस्कृत पंडित ह्या उपाधीने गौरवान्वित करून प्रशस्तीपत्र व मानधनासह सन्मानित केले.
श्रीमद्भागवत ग्रंथ गीर्वाण भाषेत असल्यामुळे त्यातील अनेक गूढ अर्थ व सिद्धांत सामान्य माणसाला समजणे शक्य नाही हे जाणून अशा गहन पुराणावर सरळ सोप्या मराठी भाषेत "श्रीमद्भागवत चित्सुधा " ह्या महान ग्रंथाची तिने निर्मिती केली. भारतवर्षांतील व हिन्दु राष्ट्रांतील आपल्या संस्कृतीवर प्रेम करणार्या सर्वांना आपल्या ज्ञानाचा फायदा व्हावा ही त्यामागील नि:स्वार्थ भावना. समाजातील लोकांना ज्ञानदानाचे अभूतपूर्व कार्य आपल्या पुस्तकाद्वारे, काव्याद्वारे , महाकाव्याद्वारे व्हावे ह्यासाठी ती अविरतपणे धडपडत होती.
आर्वीकर कुळाची कुलदेवता " श्री वाराही देवी " . पण तिच्या बद्दल फार थोडी माहिती उपलब्ध होती. काकूने अति कष्टाने तिची माहिती गोळा केली. तिच्या प्रासादिक लेखनातून " श्री वाराही चरितम् " ह्या संस्कृत काव्याची रचना झाली. त्या योगे कुळातील लोकांना आणि इतर भगवती भक्तांना वाराही देवीची उपासना, स्तुती कशी करावी हे मराठी आणि इंग्रजी अनुवादासह पुस्तकाद्वारे प्रकाशित करून सुपूर्द केले.
महाराष्ट्राला परिचित नसणार्या दाक्षिणात्य कवींच्या मूकपंचशती व नारायणीयम् या दोन ग्रंथाचा काकूने मराठी अनुवाद केला . ह्या ग्रंथाद्वारे पुन्हा तिच्या प्रगल्भ प्रज्ञेचा प्रत्यय आल्या शिवाय राहत नाही. दाक्षिणात्यांचा सांस्कृतिक वारसा महाराष्ट्रीयांना सुलभतेने समजावून सांगायचे मोठे काम ह्या लिखाणाद्वारे केल्या गेले.
ललिता काकूने मनुष्य जन्म खरोखर सार्थकी लावला. पार्थिव देहाचा जरी त्याग केला तरी कर्तृत्व रूपे आणि कीर्ती रूपे ती अमरच आहे. तिच्या वर्णनासाठी अमुक एक विशेषण पुरेसे आहे असे म्हणताच येत नाही.
ती सुसंस्कृत, सुशिक्षित , बहुपुरस्कृता, प्रथितयश साहित्यिका होती.
तिच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वात ज्ञानार्जन, कर्तव्यपालन , आत्मविश्वास , निर्भयता , परमेश्वर निष्ठा हे आध्यात्मिक गुण प्रकर्षाने जाणवायचे.
ममत्व, समत्व, वात्सल्य, प्रेम , आदरातिथ्य , सुख , शांती, समाधानाचे व आनंदाचे भांडार होती.
ती एक आदर्श कन्या , प्रेमळ भगिनी , सुसंस्कृत पत्नी , पतिव्रता नारी, सुविद्य माता आणि कल्याणकारी गुरूमाऊली होती.
असे हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व नाथ षष्ठीच्या पवित्र दिनी ईश्वर पदी लीन झाले.
©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
No comments:
Post a Comment