शंकर इंजिनियर झाला, नोकरीला लागला . नोकरी निमित्ताने त्याची वेगवेगळया गावात, शहरात बदली होत असे. आधी शिक्षणामुळे आणि आता नोकरीमुळे सतत बाहेर राहण्याची सवय झाली त्याला. घराविषयी, वाड्या विषयीची ओढ कमी होऊ लागली .
आता शंकरच्या लग्नासाठी प्रस्ताव येऊ लागले होते. वाडा पुन्हा सुखाच्या पावलांसाठी आसुसला.
तात्यांच्या ही शिलकीत वाढ होत होतीच . बायकोसाठी केलेले दागिने त्यांनी पुन्हा उजळवून घेतले. जणू नव्या सुनेच्या आगमनाचे वेध त्यांनाही लागले हेच त्यांनी सूचित केले होते .
शंकरची प्रगती पाहता त्याला बर्याच मोठ्या घरातील मुली सांगून येत होत्या. अशाच एका मोठ्या (आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या) कुटुंबातील मुलगी सुमती शंकरच्या पसंतीस उतरली.
बोलणी करण्याच्या आधी तात्यांनी इंद्र आणि विष्णुशी संवाद साधला . बड्या घरची बेटी सून म्हणून येणार ह्या विचारानी तात्यांना लोभ सुटला होता . हुंडा मागायचा असे आपले मनोगत त्यांनी सांगताच विष्णु रागावला. हुंड्याचा विरोधात त्याने आपले परखड मत व्यक्त केले . जर हुंडा मागितला तर मी घर सोडून जाईन अशी धमकीही त्याने दिली. त्यामुळे तात्यांचा नाईलाज झाला. हुंड्याचा विचार त्यांनी बारगळला.
पण ह्या प्रसंगाने तात्या नाराज झाले. विष्णु विषयी त्यांच्या मनात एक अढी निर्माण झाली . विष्णुच्या खडतर प्रवासाची सुरवात इथून सुरू झाली हे विष्णुच्या गावी ही नव्हते .
उलट तात्यांनी आपले ऐकले म्हणून विष्णु अत्यंत खुशीत होता.
शंकरचे लग्न ठरले. उदासलेला वाडा मरगळ झटकून तरतरीत झाला .
मोठ्या उत्साहाने विष्णु आणि मित्रमंडळी कामाला लागली . बोलणी , देणेघेणे , साखरपुडा , लग्न सगळे सुरळीत पार पडले .
कु.सुमती बाळकृष्ण गोखलेची सौ. सुमती शंकर अजिंक्य झाली .
चार भावांची एकुलती एक लाडाची बहीण अजिंक्यंच्या घरात गृह स्वामिनी म्हणून प्रवेश करती झाली.
नव्याचे नऊ दिवस सरता सरता तिला एकेकाच्या स्वभावाची ओळख होऊ लागली होती. वडीलांनी लग्नात कोणाच्याही मानापानात कमतरता ठेवली नव्हती तरी तात्या जरा फटकून वागतात हे तिला जाणवू लागले होते .
इंद्रा तसा ठीकठाक वागत होता पण कुठे तरी त्याच्या वागण्यात अहंभाव आहे असे वाटत असे .
धाकटा विष्णु आईच्या मायेला दुरावलेला असल्यामुळे वहिनींच्यात आई शोधत होता. जमेल ती मदत वहिनीला करत होता. तात्यांच्या वाकड्या वागण्या पासून वहिनीला वाचवत होता.
तरी पण कधी कधी कटू प्रसंग उद्भवतच होते . तात्यांना नवी नवरी वगैरेशी काही देणे घेणे नव्हते. मी म्हणेन ती पूर्व दिशा. माझ्या वेळा सांभाळा. जर एखाद दिवशी काही कारणाने थोडाही उशीर झाला तर तात्या त्या दिवशी रागारागाने आपला स्वयंपाक करून घेत . तेवढ्यात जर सुमती येऊन पोहोचली आणि तिने करून देते म्हंटले तरी ते मग तिच्या हातचे खात नसत.
कधी ह्या गोष्टी शंकरच्या कानावर गेल्या की मग तात्यांचे आणि शंकरचे खटके उडत.
तसेही सुमती मोठ्या घरातून आलेली, तिच्या घरी खाण्यापिण्याची ददात नव्हती, तर तात्याचा स्वभाव सगळे काही मोजून मापून करण्याचा. येवढे धान्य इतके दिवस पुरलेच पाहीजे हा त्यांचा दंडक असे.
सुमतीला मात्र स्वयंपाकाची , निरनिराळे पदार्थ करुन खाऊ घालण्याची हौस. घरातील सामान संपले की ती तात्यांना सांगत असे . त्यामुळे तात्यांची फार चिडचिड होई. अजूनही घरातले खर्च त्यांना भागवावे लागतात याचा त्यांना राग येई.
शंकरचा पगार फार काही जास्त नव्हता त्यामुळे घरातील खर्चात त्याचा अजिबात हातभार नव्हता.
इंद्र चलाख होता तो नोकरीला लागला होता पण त्याचा एक मित्र आणि तो बाहेरच्या बाहेर खाणे पिणे, मौज मजा ह्यात पैसा खर्च करत असे . तसेच त्याला कपड्यांचा अति शौक होता. ह्या सर्वासाठी लागणारा पैसा तो जमवून ठेवत असे. तशातच त्याने लाॅ कॉलेजला अॅडमिशन घेतली होती. त्याच्या डोक्याने वकील होण्याचे ठरविले होते . कॉलेजच्या फीचे पैसेही तो तात्या कडून उकळत असे .
विष्णु पैसे कमावण्यासाठी धडपडत होता. पण त्याला सूर गवसत नव्हता . त्याला नोकरी ऐवजी व्यवसाय करण्याची इच्छा होती .
आणि पुन्हा एकदा एक आनंदाची लहर वाड्यात पसरली. शंकर आणि सुमती च्या संसारात नव्या पाहुण्याने येण्याची वर्दी दिली .
शंकरची बदली झाली आणि तो बायकोला वाड्यात ठेवून बदलीच्या गावी निघून गेला. घरात कोणी बाई माणूस नसल्यामुळे सुमतीच्या माहेरच्या फेर्या वाढल्या . कधी कधी तिचे आई वडील येऊन राहू लागले .
तात्यांना ते फार मान देत त्यामुळे तात्या आपण किती छान आहोत हे दाखविण्याचे नाटकं करत.
यथोचित समयी सुमतीने मुलाला जन्म दिला. सर्वत्र आनंदीआनंद झाला.
काय ह्या नातवाच्या आगमनाने तात्यांच्या कडवटपणा स्वभावात फरक पडला ? इंद्राची प्रतिक्रिया काय होती ?
चला पाहूया पुढच्या भागात ...
क्रमशः
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
##################################
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
वाचक वर्ग तुमच्या समीक्षे च्या प्रतिक्षेत
ह्या कथेशी जर कोणालाही स्वतः च्या वा जवळच्या कुणाच्याही आयुष्याशी साधर्म्य आढळले तर तो योगायोग समजावा .
No comments:
Post a Comment