Monday, 28 March 2022

कातरवेळ आणि अजून काही

🌇 कातरवेळ 🌇

ती कातर वेळा अजुनी स्मरते मजला ,
तो रवी क्षितिजा स्पर्शित झाला होता .
तो चंद्र हासरा नभात विहरत  होता ,
दिवा तमाचा  खेळ मनोहर ,
हृदया रमवित होता .
ती कातर .....
दर्याची ती गाज साथीला ,
खगे शोधीती आश्रय तरुचा,
पशू धन ते परते घरला.
भासे मजला कृष्ण सावळा ,
मुरली घुमवत आला ,
ती कातर......
अशा समयी त्या  दृष्य आगळे ,
पाहून मी ही स्तंभित झाले.
बाल मूर्ती ती कटि घेऊनी ,
ममतामयी ती त्यास जोजवी.
तेज तिच्या त्या मुख कमलाचे
रवी शशीला  हरवित होते .
ती कातर ...

©® सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित

💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦

🌇 कातरवेळ - २ 🌇

कातरवेळी का गे सजणी ,
भरले तुझिया नयनी पाणी .
अस्ताला तो रवी चालला ,
चल गे सखये आता गृहाला.
कपिला आणिक तिचे पाडसे ,
हंबरून तुज साद घालते,
पिंजर्‍या मधूनी राघू - मैना ,
तुझ्या विना गे त्यांची दैना .
उदीत होईल शशी गे आता ,
शांत सागरी उठतील लाटा ,
दुडदुडणारी सान पाऊले,
आसुसलेली तव मायेला.
सखे साजणी सावर आता,
हुरहूर लावी कातरवेळा,
तव प्रेमाची मागत भिक्षा,
अलख् निरंजन जोगी आला.

©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦

🐥 गान कोकिळा 🐥 

आठवतोय का तुला तो पावसाळी दिवस
गच्च भरलेले आभाळ अन् पाण्यात भिजलेली हिरवळ
हात तुझा हाती ,बेभान झालेले मन ,
कागदी होडीत बसूनच फिरून आलोत सारे जग .
जग ही आपले न्यारेच, नव्हते ह्या जगा परी,
नव्हता स्वार्थ तिथे, नव्हती चिंता उद्याची.
नव्हते कोणते दुःख,  नव्हती कोणती विराणी,
शब्द ,शब्द आणि शब्दच, साथीला तुझी वाणी.
आठवतोय का तुला तो पावसाळी दिवस
गच्च भरलेले आभाळ अन् पाण्यात भिजलेली हिरवळ .

क्षणात घालत होतो आभाळाला गवसणी,
क्षणात डुंबत होतो दर्याच्या खोल तळी.
चांदणे आणि रत्ने मिरवीत होतो सारख्याच भावनेने, 
वृक्षांच्या त्या हळव्या सावल्या , तृप्त कोकिळेच्या कूजनाने.
आठवतोय का तुला तो पावसाळी दिवस
गच्च भरलेले आभाळ अन् पाण्यात भिजलेली हिरवळ .

आजही रमतेय त्याच शब्दांच्या जगात, फिरवून आणतात ते मला क्षणात तिन्ही लोकात ,
अजूनही तरंगते तीच कागदी बोट मनात,  घेऊन जाते ती मला त्याच हिरव्या बनात ,
कोकिळेचे कूजन ही अगदी तसेच आहे , चेहरा मात्र तिचा स्वर्गात गेला आहे .
आठवतोय का तुला तो पावसाळी दिवस
गच्च भरलेले आभाळ अन् पाण्यात भिजलेली हिरवळ .

©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

पयोधी तो शांत होता..

रात्र ती नि:शब्द होती ,
द्वितीयेच्या  चंद्रमाची.
भारलेल्या तारका त्या ,
पयोधी तो शांत होता.

दूर त्या दुसर्‍या किनारी ,
आर्तता खुणवीत होती,
वेणूच्या त्या आर्त नादी ,
मी स्वतःला शोधीत होती .

कोण मी ? कोण मी ?
सागरा तू सांग रे,
ऐकुनी प्रश्नास माझ्या ,
तू कसा शांत रे ?

हारले एकदा मी पुन्हा रे,
शोधता  मज त्या किनारी,
हरवले मी पुन्हा रे,
शांतशा त्या  सागरी .

©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित

💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧

प्रतिभेला प्रतिभेची 
जाणीव असावी 
सोन्याच्या कोंदणाने
हिरकणी अलगद उचलून घ्यावी 

©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️

भास आभासाचा हिंदोळा ,
खुणावतो तो आजही मजला .
येशील कारे सखया कृष्णा ,
वाट पाहते वेडी राधा .

©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 
🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩

चंद्र सावळ्या नभी उगवला
पवन शीतल मंद भासला
वनी केवडा फुलून आला
बंसीतून  तो कृष्ण ही वदला
वृथा सारे सखये तुज वीण
का फिरते तू होऊन विरहीण

©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻

सहस्र रश्मी पसरून जगभर 
जीवन देई तो धरणी वर 
नसे दुजा त्या रवी राजा सम
नसे विसावा त्याला क्षणभर

©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅

Wednesday, 9 March 2022

समिक्षण : उपक्रम ज्ञानदेवीचा-सहभाग माझा

 ज्ञानाने म्हणजेच ज्ञानदेवीने  एक सुंदर उपक्रम राबवला . प्रत्येकाने आपण वाचलेल्या कोणत्याही कथा,कादंबरी वा कवितेवर समीक्षा द्यायची. एकदा समीक्षा द्यायची ठरविल्यावर डोळ्यासमोर मोठ्या मोठ्या दिग्गजांची नावे डोळ्यासमोर तरळू लागली.

वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे,  व. पु. काळे,  सुमती क्षेत्रमाडे , पुरंदरे , शांता शेळके , कुसुमाग्रज , कवि अनिल , ग्रेस , पाटणकर ... अरे यादी संपायचे नावच नाही. केव्हढी श्रीमंती ही माय मराठी ची. साहित्याचे प्रकार तरी किती हो . सामाजिक , वैचारिक , संत साहित्य , ऐतिहासिक , पौराणिक, जुने, नवे अबबब ......शेवटी ठरविले अख्ख्या मराठी माणसाला गारुड घालणाऱ्या व. पु. नाच निवडावे.  ठरले.  व. पु. ची माणस हे पुस्तक मी निवडले .हे  पुस्तक निवडण्या मागचे कारण असे की हे पुस्तक वाचल्यानंतर माणस वाचण्याचा मला नादचा लागला असे म्हणावे लागेल.


पुस्तकाचे नाव : व. पु. ची माणसे


सुरवातच फार सुंदर , बहिणाबाईंच्या कवितेने ---


मानसा मानसा, कधी व्हशीन माणूस
लोभा साठी झाला मानसाचा रे कानूस


ह्या पुस्तकात व.पु. नी ५२ माणस वाचलीत हो. त्या सगळ्यांवर समीक्षा लिहायची ठरविली तर ह्या पुस्तका पेक्षा ही मोठी कादंबरी तयार होईल. म्हणून मला  मनापासून खूप आवडलेल्या व्यक्तिचित्रा वरच समीक्षा देतेय.

वांद्र्याहून सुटणार्‍या हार्बर गाडीत ही व्यक्ती म्हणजे आनंद - व. पु.चा मित्र - अनेक वर्षानी भेटलेला . त्यांच्या गप्पांची सुरवात ही कशी सुंदर.

व. पु. - गड्या लग्नाचे आमंत्रण ही दिले नाहीस ?
आनंद - तू रागवण्यातला नाहीस हे मला माहिती     आहे .
आणि ह्यावर व. पु. चे खूप सुरेख मनाला स्पर्श करणारे वाक्य--  आपला मित्र आपल्याला संपूर्ण समजला म्हणजे रागच उरत नाही .

हे वाक्‍य वाचल्यानंतर पुस्तक खाली ठेवणारा निश्चितच करंटा.

तर ही कथा आनंद आणि त्याची बायको ह्या दोन व्यक्तीं भोवती फिरते . 

आनंदचा दिनक्रम असा : पहाटे चारला उठणे,  साडेपाच पर्यंत ध्यानधारणा , आठ वाजता एका ऑफिस मध्ये  पार्ट टाइम जॉब , शाप १०.३० ते ५.३० बँक . पुन्हा सहा ते साडे आठ  दुसर्‍या ऑफिस मध्ये जॉब आणि हे सगळे आटोपून रात्री १०.३० ला बॅक टू पॅव्हेलियन.
मुंबईतल्या चाकरमान्याच्या कष्टाचे मूर्तिमंत वर्णन. 

बर ही धडपड कोणासाठी ? तर वुई साठी . आहे ना मजा! बायकोचे नाव वुई . कसे ठेवले हे नाव ?

व. पु. विचारतात कोणत्या नावाचा हा शॉर्ट फॉर्म?
आनंद चे ही उत्तर जबरदस्त , शॉर्ट फॉर्म नावाचा नाही वृत्तीचा.   Wife मधला if काढून टाकला आणि Wife ची वुई झाली. 

ह्या वुई ची आईही तेव्हडीच कणखर . लग्न ठरे पर्यंत तिला स्वतःच्या मनाने जगू दे , नंतर बेड्या आहेतच, असे  म्हणणारी. तेव्हडीच सामाजिक भान असणारी - तिच्या जिवाला धोका नाही ना एव्हडेच मी बघते असे म्हणणारी.

आणि जुई ? थ्रील शिवाय आयुष्यात मजा नाही असे म्हणणारी . तर ही जुई पायाला सतत भिंगरी लावून फिरणारी , आयुष्य झोकून देऊन जगणारी,  क्रिकेटप्रेमी, नवर्‍याच्या वाटेला अभावानेच येणारी.

पण नवरा अत्यंत संयमी आणि समाधानी . वुईचे बेभानपणे जगणे सहन करण्यासाठी त्या वरच्या शक्ति कडे प्रार्थना करणारा आनंद .

हे सगळे केंव्हा थांबेल?
तर बाळंतपण वाट्याला आले की थांबेल , अगदी तात्काळ उत्तर तयार.
वुई mother केंव्हा होईल ?
तर आनंद अगदी शांतपणे उत्तरतो,  mother मधला other तिला हवासा वाटेल तेंव्हा किंवा वुई ला प्रेग्नन्सी थ्रीलींग वाटेल तेंव्हा . असा समजूतदार नवरा म्हणजे  नवलच.
ह्या व्यक्तीचे थक्क करणारे विचार मोठे की  व. पु. ची लेखन शैली मोठी ? हा एक अनुत्तरीत प्रश्न .

तेव्हडीच मोठी वुई . नवर्‍याला अस म्हणणारी. Husband मधला ban म्हणजे बंदी घालणारा ही अक्षरेच  उडवून लावणारी.
Possession  ऐवजी belonging ला महत्व देऊन अहम् ला विरघळवणारी ही जोडी.
Overtime ला चैतन्याची पूजा म्हणणारा आनंद ग्रेट की नवर्‍याचा स्वातंत्र्य देण्यातला आनंद सांभाळणारी वुई मोठी?

पुन्हा एकदा व. पु. ना वंदन करण्याचा मोह आवरत नाही .
कथेचा शेवट खूप काही सांगणारा :
If we love somebody , set it free. If  it comes back to you, it was yours.  If doesn't,  it was never.

माणस वाचण्याचा नाद लावणार्‍या व. पु. ना त्यांच्याच माणसातून वाचा.
धन्यवाद .

विशेष धन्यवाद dnyandevi wankhde चे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

मिळालेल्या काही प्रतिक्रिया 


ज्ञानदेवी वानखडेची प्रतिक्रिया

नागपूर गेट टुगेदर मध्ये लिपी वरील बऱ्याच लेखकांची ओळख झाली...त्यात काही व्यक्तिमत्त्व कायम मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवावेत असे होते..त्यातील एक म्हणजे मंजूषा अपराजित...वयाचा विचार करायला गेले तर आई मुलीचं नात लागेल आमच्यात पण मैत्री झाली आणि माझ्यासाठी ती मंजू झाली...

                 तिचे दांडगे वाचन हे तिच्यासोबत बोलतांना तिच्या शब्द संपत्ती वरूनच जाणवते.... मंजू च्या मुखातून निघणारा एक एक शब्द म्हणजे जणू समुद्रातील एक एक माणिक मोती टीपावा !! 

               वसा वाचनाचा या पावन कार्याची सुरुवात तिने  दर्जेदार केलीय. सुरुवातीला ती अनेक दिग्गजांचे नाव घेत होती ना तेव्हा माझा जीव वर खाली होत होता कारण ही मंडळी वाचून च मी लहानाची मोठी झालेय पण मनावरच गारूड काही उतरत नाही.आणि शेवटी तिने  व. पु.यांचं नाव घेतलं आणि माझे ओठ आपोआप रुंदावले. 

          मी हे पुस्तक वाचले नाही अद्याप...पण आता लालसा जागी झालीय..नवऱ्याचा बर्थ डे आहे पुढे....त्याला रिटर्न गिफ्ट म्हणून हेच पुस्तक मागणार .. ठरलंय माझं😉😉.700

               सुरुवात उत्कंठा वाढविणारी होती आणि म्हणून सलग  व्हिडिओ मी बारकाईने दोनदा पाहिला...काही वाक्य नोट करून ठेवलीत...

पुस्तकातील एक वाक्य मनात घर करून गेलं...

' मित्र पुरेपूर कळला की राग उरत नाही '.

आणि त्यावर मंजू च  वाक्य.."हे वाचून जो पुस्तक खाली ठेवेल तो करंटा".

'ओव्हरटाईम म्हणजे चैतन्याची पूजा '.

काय तो एकेक ओळीचा गाभा आणि त्यात मंजुचा मधुर आवाज...हो मधुरच....दुसरी उपमा नाहीच

     सुरुवात ते शेवट कधी झाला मला कळलेच नाही...

काहीतरी चांगलं सुरू करतोय याच समाधान मिळालं.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

निशा पांढरेची प्रतिक्रिया  :

उत्तम.. अतिउत्तम.. प्रत्येक वाक्याला प्रसंग आणि ते सादर करताना तुमचा निरागस, शांत चेहरा आठवला.. us आणि we मस्तच. त्याकाळी अशी बेभान जगणारी we होती आणि तिला समजून घेणारा us होता, याचं नवल वाटतं.. खरंच आहे, व. पु. ची माणसे श्रेष्ठ की त्यांची लेखनशैली श्रेष्ठ, विचार करायला लावणारी बाब आहे.. व. पु. आणि त्यांची माणसे आमच्यापर्यंत पोचवणाऱ्या तुम्हीही ग्रेटच..  मस्तच....👌🏻👌🏻👌🏻👌🏻

✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍

              चला चारोळी च्या दुनियेत 

🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆

एक रस्ता मी निवडलेला ...🔥
शब्दांच्या वाटेने जाणारा...🔥
शब्दसंतांची संगत घडविणारा...🔥
पुण्य नगरीत घेऊन जाणारा ..
..🔥

⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

एक रस्ता मी निवडलेला..
शब्दांच्या गर्दीत हरवलेला ..
वेडी वाकडी वळणं नसलेला ..
स्वान्तः सुखाय ची अनुभुती देणारा ..

©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित

⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

एक मार्ग माझ्या आवडीचा ...💞
हात हाती घेऊन चालण्याचा..🤝
सुख दुःखाने भारलेला...😀😭
अंतिम श्वासापर्यंत साथ देणारा 

⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

आयुष्याच्या चित्रपटात मी एक कलाकार आहे
भूमिका देणारा मात्र तो देव आहे.
कधी सुखाच्या, कधी दुःखाच्या सार्‍या भूमिका त्याच्याच आवडीच्या.
त्याच्याच दिग्दर्शनात मी नाचते आहे,स्वतःलाच नशिबवान मानते आहे.

©️®️मंजूषा श्रीकांत अपराजित

⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

जरी विराला दव बिंदू तो ओल्या पातीवरूनी,
हळव्याश्या  त्या कुणा क्षणाला परते मोती बनूनी.
नको ग सखये होऊ कातर, विरहाचा तो क्षण ही 
मंगल ,
जाता जाता देऊन जाईन प्रेमाचा तो गंध सुगंधित
⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

 तुझा सुप्रभात चा सांगावा ,
माझी सकाळ प्रसन्न करून गेला .
दिवसभर राहील सोबतीला आता ,
तोच तुझा हसरा , गोड  चेहरा .

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

आपल्या वेळेची किम्मत आपणच ठरवावी ,
तेवढ्याच वेळेत एखादी छान कृती करावी .
त्या  कृतीने जगाचे कल्याण व्हावे
तुमचे नाव त्रिखंडात दुमदुमावे
⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

मन थोड अडलंय अडलंय ,
नाठाळ बनलय बनलय.
शब्द गेले संपून  संपून ,
चारोळी बसली रुसून रुसून 

⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित



वामांगी- अबला की सबला

वामांगी - वाम अंगाला  असणारी ती वामांगी.  वाम म्हणजे डावा.  त्यानुसार डाव्या भागाला असणारी ती वामांगी.

आता कुणाच्या डाव्या भागाला ? पुरुषा च्या म्हणजेच नवर्‍याच्या डाव्या भागाला अथवा हाताशी असणारी ती त्याची बायको .  अनेक शुभ प्रसंगी,  पूजा अर्चना करताना गुरुजी सुद्धा सांगतात - बायकोने  नवर्‍याच्या डाव्या हाताला बसा . का ? उत्तर नंतर शोधू या.

आता डावा भाग जो आहे तो नेहमी उजव्या भागापेक्षा थोडा कमकुवत मानतात.  कधी कधी वाईट सुद्धा मानतात .  उदा.  वाम मार्गी  म्हणजे वाईट चालीचा अथवा कमकुवत, असहाय्य , कमी शक्तीचा मानल्या जातो. ह्या हिशोबाने  वामांगी ही पुरुषा पेक्षा कमकुवत , असहाय्य , कमी शक्ति असणारी स्त्री झाली.  पुरुषप्रधान संस्कृतीने सरसकट ह्या विचाराला मान्यता दिली.  आणि स्त्री अबला, बलहीन,  क्षुद्र,  कमकुवत ठरली.

अगदी विरुद्ध अथवा विरोधाभासी विचार पहा....

१. A road sign -  For safety  follow लेफ्ट side. लेफ्ट side is attributed to शक्ति.

२. वामे  शक्ति धरम्  - म्हणजे डाव्या हाताला शक्ति धारण करणारा असा तो शिव .  सर्व  विश्वाचा संहार कर्ता  - ओळखल्या जातो आहे पार्वती मुळे - डाव्या भागाला असणार्‍या शक्ति मुळे . सांगा स्त्री अबला की सबला ?

३. वामे  तु जनकात्मजा - म्हणजे कोण ? मर्यादा पुरुषोत्तम  श्रीराम प्रभू. ओळख कशी ह्यांची. डाव्या बाजूला असलेल्या सीते मुळे . श्रीराम प्रभू ची ही शक्ति आहे. तरीही स्त्री अबला ?


जिजाऊ मातेने संकटाशी सामना करत प्रसंगी तलवार चालवून शिवबाच्या मनी स्वराज्याचे बीज पेरले. ती माता अबला कशी? "श्री, सखी , राज्ञी जयती " असा शिक्का कट्यारीचा मान मिळवणारी येसु बाई राणी सगळ्यानाच ठाऊक आहे.

पुराणातील दाखले , इतिहासातील उदाहरणे आपल्याला सशक्त नारीचेच  दर्शन घडवितात. स्वातंत्र्य पूर्व  काळातील दाखला द्यायचा ठरविले तर सावरकरांच्या "त्या तिघी " कमी का होत्या ?  गरोदर पणाचे  नाटक करत जिवंत बॉम्ब पोटाला बांधुन क्रांतिकारकां पर्यंत पोहोचवण्याचे पुण्यकर्म करणार्‍या अबला नाहीत.

काय ह्या स्त्रीया फक्त आजच्या एका दिवसाच्या मानाच्या भुकेल्या होत्या? निश्चितच नाही.

स्त्री आणि पुरुष एकमेकांना  पूरक आहेत. "धर्मे च  अर्थे च कामे च मोक्षे च  नातिचरामी" असे वचन देणारा पुरुष हे वचन फार लवकर विसरतो . तरी ही शक्तिरूपीणी सगळाच लढा एकटीने देत असते.

जेंव्हा पूजा सांगणारे गुरुजी मंत्रोच्चार करताना स्त्री ला "हाताला हात " लावा असे सांगतात त्यावेळी हे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडावे ह्या साठी त्या स्त्रीच्या शक्तीचा आधार मागितल्या जातो.

समाज पुरुषा जागा हो. एक दिवस स्त्री चा  उदो उदो करून उरलेल्या सगळ्या दिवशी तिची पिळवणूक करण्याचा अधिकार निश्चितच तुला नाही. तिची अवहेलना करू नका.
मनू स्मृतीत अगदी स्पष्टपणे नमूद केले आहे -


यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः|
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः||


म्हणजेच ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा होते त्या ठिकाणी देवतांचा निवास असतो . ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होत नाही त्या ठिकाणी केल्या गेलेली सर्व चांगली कर्मे निष्फळ होतात.

रावणाचे उदाहरण आपल्याला ठाऊकच आहे.  अत्यंत मुत्सद्दी राजकारणी , महापराक्रमी , ज्ञानी, कट्टर शिवभक्त असून सुद्धा स्त्रीचा अपमान करण्याचे घोर पातक त्याच्या हातून घडले होते. त्यामुळे त्याच्या उत्तम गुणांचा र्‍हास झाला. आपल्या सर्व पुत्रांना गमावावे लागले. अंततोगत्वा त्याचा ही विनाशच झाला.

म्हणून एकच  सांगणे स्त्रीचे केवळ एक दिवस पूजन करून भागणार नाही. सदैव तिचे ऋणी रहा. माता , भगिनी,  पुत्री, भार्या, स्नुषा ह्या सगळ्या रूपाचा आदर करा.

©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित


Welcome

संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर

 ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात,  किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...