Thursday, 13 July 2023

आई नसलेले घर : पर्व १ : भाग २

 मागच्या भागात काय झाले ......


कामाच्या गडबडीत तो तहान, भूक , घर, बाबा, खानावळीचा डब्बा सगळेच विसरला.  आठ वाजले तसे प्यून त्याच्या आजूबाजूला घुटमळत उभा राहिला. पण त्याला काही फरकच पडत नव्हता.

त्यामुळे शेवटी त्याला आवाज दिला , " रमाकांत सर,  घरी बाबा तुमची वाट पाहत असतील ...."


आता  पुढे......


घाईघाईने रमाकांत बँकेतून बाहेर पडला .  दहा मिनिटात तो घरापाशी पोहोचला .  अंगणात सर्वत्र अंधार होता . फक्त समोरच्या हॉल मधला दिवा जळत होता . कारण ऑफिस मध्ये जाताना तो दिवा तो लावून जात असे .  बाबा चार पावलांशिवाय  जास्त चालू शकत नाही ह्याची त्याला पूर्ण कल्पना होती.


म्हणून ऑफिस मधे जाण्यापूर्वी तो त्यांची सगळी तयारी करुन ठेवत असे.   त्यांना डायपर लावून जाणे,  औषधे , पाण्याच्या बाटल्या, दुपारचा  चहा थर्मास मध्ये भरून ठेवणे,  बिस्किटे  अगदी सगळ्या वस्तु  सहजतेने ते घेऊ शकतील अशी व्यवस्था तो करून जात असे .


आज जास्तीच उशीर झाला म्हणून त्याने घाईघाईने कुलूप उघडले .  अंगणातला दिवा लावला.  बॅग जागेवर ठेवली.  समोरचा दरवाजा लावून तो फ्रेश व्हायला गेला.   


हातपाय धुवून  आणि कपडे बदलून तो बाबांशी  बोलायला येतच होता तोच दारावरची बेल वाजली.  ह्या वेळेला आपल्याकडे कोण आले असेल ह्याचा विचार करत त्याने दरवाजा उघडला . दारात एक २०-२१ वर्षाची सावळ्या रंगाची , धारदार नाकाची आणि अत्यंत तेजस्वी डोळ्यांची  तरुणी एका हातात टीफिन घेऊन आणि दुसर्‍या हाताने १० वर्षाच्या गोबर्‍या आणि हसर्‍या चेहर्‍याच्या बालिकेचा हात धरून उभी होती .


रमाकांत ह्या वेळेपर्यंत खानावळीतून डब्बा  बोलावलाय हे विसरून गेला होता .  त्या मुलीच्या हातातल्या डब्ब्या कडे पाहून आता त्याच्या लक्षात आले. घाईघाईने  त्याने तिच्या हातातून डब्बा घेतला आणि  तिच्यापुढे दोनशेची नोट धरली.  


" सर,  माझ्याकडे चिल्लर नाही.  तुम्ही आमच्याकडून पहिल्यांदा डब्बा घेतला म्हणून आमच्या नियमाप्रमाणे आजचा डब्बा ऐंशी रुपये पर हेड राहील.   त्यामुळे एकतर मला एकशे साठ रुपये द्या  किंवा उद्या डब्बा न्यायला येईन तेव्हा मला माझे पैसे द्या. " असे म्हणून लगबगीने ती परत फिरली.


दोन क्षण काहीच न सुचून रमाकांत तसाच उभा होता . पण लगेचच भानावर येत त्याने तिला आवाज दिला .


" अहो मिस,  नाही नाही , तुम्हीच मला नंतर वापस करा पैसे , नाहीतर ठेवून घ्या तुमच्याकडे .  उद्या तुम्ही याल तेंव्हा  मी घरी असणारं नाही . डब्बा इथे बाहेर ठेवलेला असेल ."


त्याचे शब्द ऐकताच ती नागिणी सारखी फुत्कारली, "सर , तुम्ही मला डब्ब्याचे पैसे नाही दिले तरी चालेल .  पण तुम्ही मला टीप देण्याचा प्रयत्न करू नका.  मी  मेहनतीचे पैसे घेते फक्त. फुकटचे पैसे नको मला. " 


तिचा रागाने लालबुंद झालेला चेहरा पाहून रमाकांत जरा दचकलाच .  आजवर त्याने अशी रणरागिणी  पाहिली नव्हती .  त्याच्या बँकेतल्या मुली त्याच्याभोवती लाळघोटेपणा करत फिरत असे .  त्यामुळे सगळ्यांनाच तो एकाच मोजपट्टीने मोजत असे. 


पण हे पाणी काही वेगळेच आहे हे त्याच्या लक्षात आले. नरमाईचे स्वरात तो तिला म्हणाला , " सॉरी, सॉरी , मला असे नव्हते म्हणायचे .  माझे शब्द मी मागे घेतो .  घाई गडबडीत मी असे बोलून गेलो."


त्याचा नरमाईचे स्वर ऐकून तिनेही शांतपणा धारण केला .  


तो म्हणाला , " हे बघा , तुम्ही सकाळी किती वाजता येणार आहात ? माझी बँक दहा वाजता चालू होते . मी साडे नऊच्या दरम्यान  निघून जातो . त्या आधी तुमचे येणे जमेल का ? "


"मी  नऊ वाजता येईन.  तेंव्हा  डब्बा आणि पैसे तयार ठेवा. " 

येव्हडे बोलून तिने बहिणीचा हात धरला आणि तरातरा निघून गेली.


हतबुद्ध होऊन रमाकांत थोडावेळ तिथेच उभा राहिला.  आतून त्याच्या बाबांनी त्याला आवाज दिला तेंव्हा भानावर आला .


" आज काय मला जेवण मिळणार आहे की नाही ? "  त्यांनी तुकड्या स्वरात रमाकांतला विचारले .


रमाकांत गुपचूप टिफिन घेऊन आत गेला . त्याने डब्बा उघडला आणि मस्त भरल्या  ढेणसाच्या भाजीचा घमघमाट घरभर पसरला .


त्याने पटकन बाबांचे ताट वाढले. गरमागरम भाजी,  पोळ्या , गरम आमटी , दह्याची वाटी , पापड , लोणचे  असे साग्रसंगीत जेवण पाहून तो फारच खुष झाला .  


त्या वासाने त्याची पण भूक खवळली. पटकन बाबांना वाढून त्याने आपले पण पान वाढून घेतले. 


बाबा सुद्धा इतक्या कमी वेळात  इतके सगळे पदार्थ रमाकांतने कसे बनविले ह्याबद्दल जरा आश्चर्यचकित झाले. पण काही न बोलता त्यांनी जेवायला सुरवात केली. 


खूप चविष्ट भोजन ते दोघेही खूप वर्षानी जेवत होते. त्यामुळे खूप आनंदाने ते  दोघे ही एकही शब्द  न बोलता पोटभर जेवले.


जेवण झाल्यावर बाबांना औषध देताना बाबांनी रमाकांतला शेवटी  विचारलेच . 

" आज कसे काय इतक्या कमी वेळात इतका सगळाच स्वयंपाक कसा करता आला तुला ? "


त्यांच्या प्रश्नाकडे सोयीस्कररित्या त्याने दुर्लक्ष केले .  बँकेतल्या कामाने तो अतिशय थकला होता . त्यात  गरमागरम स्वादिष्ट जेवणाने त्याला गुंगी येत होती.  कसेबसे कामे आटोपून तो झोपायला आपल्यासाठी खोलीत चालला गेला .


अंथरूणात पडल्या पडल्या तो निद्रादेवीच्या आधीन झाला.  रोज पेक्षा लवकरच तो झोपी गेला .


रात्रभर शांत झोप झाल्यामुळे सकाळीही तो लवकर  जागा झाला.  सगळे कसे प्रसन्न प्रसन्न वाटत होते त्याला. 


स्वतःशीच आश्चर्य करत तो उठून स्वयंपाक घरात आला .  ओट्यावरचा  पसारा पाहून त्याला आत्ता जाणवले , अरे आपण पोटभर जेवलो आणि आवराआवरी न करताच झोपायला गेलो.


बाकी जेवण उत्तमच होते. चला पटापट आवरायला  हवे.   


सवयीने त्याचे हात भराभर कामे उरकत होते.  पटापट त्याने स्वयंपाक केला.  कालच्या चविष्ट भोजनाची चव अजूनही जिभेवर रेंगाळत होती. एकदा त्याच्या मनात विचार आला लावून घ्यावा का पर्मनंट डब्बा ?  आपले काम तरी वाचेल .  पण त्याच्या दुसर्‍या मनाने  त्याला झिडकारले . 


विचारांच्या हिंदोळ्यावर झुलत झुलत तो भराभर  कामे आटोपून मोकळा झाला. घड्याळाचा काटा पावणे नऊ वर स्थिरावला होता.


लगेचच खानावळवालीचा डब्बा त्याने स्वच्छ घासला आणि पिशवीत भरता भरता  त्याला कालचा संवाद आठवला . त्या मुलीचा चेहराही त्याच्या डोळ्या समोर तरळला.   अशाही मुली असतात म्हणजे. 


त्याने मोजून एकशे साठ रुपये  डब्ब्यात ठेवले आणि  पिशवी घेऊन तो अंगणाच्या दाराशी जाऊन उभा राहिला .  का कोण जाणे ती मुलगी बाबांच्या नजरेला पडावी आणि त्यांचे नकारात्मक बोलणे आपल्याला ऐकावे लागू नये यासाठी त्याची धडपड  चालू होती .


दाराशी उभा राहून येणार्‍या जाणार्‍या वर्दळीकडे  पहात होता . अचानक त्याच्या समोर  एक सायकल थांबली . आणि त्यावरून कालची ती बालिका उतरली .  


"दादा , ताईला वेळ नव्हता म्हणून मीच आली डब्बा आणि पैसे घ्यायला . माझ्यामुळे तुम्हाला उशीर नाही ना झाला ?"


रमाकांतने हळूच घड्याळ पाहिले , बरोब्बर नऊ वाजले होते.   नकारात्मक मान हालवत तो म्हणाला , " नाही तू एकदम वेळेत आलीस. हा तुझा डब्बा.   पैसे डब्ब्यातच ठेवले आहे . तेही बरोब्बर मोजून एकशे साठ. " 


"दादा,  तुम्हाला कालचे जेवण आवडले का ?"


"हो, हो , एकदम उत्तम होते.  का ग , तुझ्या ताईने विचारले का ?"


"छे छे, तिला अजिबात वेळ नसतो .  काल खूप उशीर झाला होता आणि  मला अंधाराची भीती वाटते ना म्हणून ती माझ्याबरोबर आली होती. 


आई सगळा स्वयंपाक करते आणि  मी डब्बे पोहोचवून देण्याचे काम करते . 


ताईला खूप अभ्यास असतो ना म्हणून आई तिला सध्या ह्या कामात अडकवत नाही . चला  मी निघते , माझीही शाळा आहे .  पुन्हा केंव्हाही डब्बा  लागला की फोन करा . बाय म्हणत ती दिसेनाशी झाली सुद्धा. "


रमाकांत ने घड्याळ पाहिली , त्याचीही निघण्याची वेळ झाली होती .  घरात येऊन त्याने आपली बॅग उचलली,  बाबांना सांगून त्याने दाराला कुलूप घातले आणि झपाझप बँकेच्या दिशेने चालू लागला .  


बँकेच्या दारातच स्मिता गोडबोले ने त्याला गाठले आणि लालभडक लिपस्टिकने रंगवलेल्या ओठांचा चंबू करत ती त्याला म्हणाली , " गुडमॉर्निंग  सर...


तिच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत  त्याने मस्टर वर सही केली आणि आपल्या खुर्चीकडे वळला.


उगीचच मनातल्या मनात त्याने स्मिता गोडबोले आणि कालच्या मुलीची तुलना केली . 


आणि मग आपण असे का करतोय हे त्यालाच समजेना . आपल्याला तर साधे तिचे नावही माहिती नाही .


काय असेल तिचे नाव ? .....


पाहूया पुढच्या भागात ...


...............      ........      ........           क्रमशः 


🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃


©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित 



2 comments:

Welcome

संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर

 ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात,  किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...