Wednesday, 13 December 2023

संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर

 ती माणसच निराळी असतात ,

पूर असतो त्यांच्या स्वभावात, 

किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात ,

कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात .


हृदय अर्पण करतात 

ती माणसच निराळी असतात ....

                     ....    .... .... ....  शिरीष पै


अशाच निराळ्या  व्यक्तीचे सान्निध्य मी फार थोड्या काळासाठी अनुभवले.   थोड्या काळासाठी जरी मी तिच्या सान्निध्यात आली तरी ते व्यक्तिमत्त्व माझ्या मनात खोलवर रुजले आहे.  


जुने नागपूर आणि महाल परिसर म्हंटला की माझ्या डोळ्यासमोर दोन वास्तु प्रकर्षाने उभ्या राहतात. जीवनाला साधेपणाचा, शिस्तीचा, नियमितपणाचा पाठ शिकवणारी संघ बिल्डींगची वास्तू  आणि  त्याच्याच समोर असणाऱ्या वेदशास्त्र संपन्न व्यक्तिनी भरलेल्या आर्वीकरांची वास्तु . 


ह्या घराचा आणि माझ्या माहेरच्या घराचा संबंध तीन चार पिढ्या आधीपासूनचा. त्यामुळे रक्ताचे नाते नसले तरी भावनांनी आम्ही एकमेकांशी पिढ्यान् पिढ्या जुळले आहोत. असो.


आर्वीकर म्हटले की  एका एका वेदशास्त्रींची नावे डोळ्यापुढुन सरकू लागतात भैय्याजी आर्वीकर,  भाऊजी आर्वीकर, विनुकाका आर्वीकर .......... ह्या सर्व पुरुष वेदशास्त्री मधे आवर्जुन नाव घ्यावे असे एक स्त्री वेदाभ्यासी व्यक्तिमत्त्व म्हणजे माझी ललिता काकू.    सौ. ललिताशास्त्री विनायक आर्वीकर.


ललिता काकूचा जन्म १९४४ सालचा .  पूर्वाश्रमीची ही ललिता रोडी .   वडील कै. गोविंद नरहरी रोडी .  वडिलांचे वेद , शास्त्र,  उपनिषद,  मीमांसा,  न्याय  इत्यादि शास्त्रांच्या विषयावर प्रभुत्व.   ह्याव्यतिरिक्त गणित, इंग्रजी विषयात  प्रावीण्य.  ते यम - नियम , ब्राह्मणांची कर्तव्ये पार पाडण्यात तत्पर असणारे असे होते.  आईही नवविधा भक्तिमार्ग आचरणारी.  अशा सोज्वळ  भक्तिमार्गात लीन असणार्‍या दाम्पत्याच्या पोटी  ह्या सुकन्येने जन्म घेतला.   अर्थातच ह्या कन्येवर गर्भात असतानाच सात्विक संस्कार झाले .  त्यामुळे बालवयातच श्लोक, स्तोत्र, कविता,  भाषणे , वादविवाद इत्यादी स्पर्धांमध्ये भाग घेऊन आणि अनेक पारितोषिके मिळवुन तिने  जनमानसात आपला ठसा उमटविला. 


शालेय शिक्षण घेता घेताच  पुढील शिक्षणाचा आराखडा तयार होता.  संस्कृत आणि संस्कृतीची धुरा समर्थपणे पेलून ती पुढच्या पिढीच्या  हाती सोपवताना  पुढची पिढीही तितकीच समर्थ बनवायची हे कदाचित काकूंनी तेंव्हाच योजिले असावे.   यासाठी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी कला शाखेची निवड केली.   लघुसिद्धान्त कौमुदी,  पाणिनीय सूत्र,  वेद , शास्त्र , उपनिषद,  पुराण ह्याचा नित्य सखोल अभ्यास करून  काकू अभूतपूर्व यशाची धनी झाली.  त्यानंतर संस्कृत विषयात  एम. ए., प्राज्ञ, शास्त्री इत्यादी पदव्या आणि पदविका प्राप्त केल्या.  जर्मन भाषेवर ही प्रभुत्व मिळविले.   झगमगत्या शैक्षणिक यशाचे फळ म्हणुन की काय केंद्र सरकारच्या आयकर खात्यात चांगल्या पदावर तिला नोकरी मिळाली .


ह्याच दरम्यान काकूंच्या आयुष्यात काही महान घटना घडणार होत्या.  काकूंना हरिद्वार  निवासी सत्-चित्  आनंदमूर्ती  असणारे प. पू. सद्गुरू  स्वामी राम ह्यांचा अनुग्रह प्राप्त झाला.  त्यांनी काकूंकडून ॐकार साधना करून घेतली.  ह्या सद्गुरू कृपेने अज्ञान तिमीराचा नाश होऊन मोक्षदायक ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार झाला.  तसेच त्या दरम्यान  प.पू. करपात्री महाराज आणि वासुदेवानंद सरस्वती अनुग्रहीत , श्रीविद्येचे  गाढे ज्ञानी आणि उपासक पंडित रामचंद्रशास्त्री  जोशींनी श्रीविद्येची पंचदशाक्षरी  आणि षोडशी दीक्षा दिली.  दैवी कृपेने तिला कांची  कामकोटी  शंकराचार्यांनी षोडशी उपदेशाचा अधिकार दिला होता.  त्यांच्याच समक्ष  ह्याच षोडशीचा अनुग्रह काकूंनी आपला बंधू आणि सुपुत्र ह्यांना दिला  .  सासर आणि माहेरच्या गृही ही उपासना अखंडित चालू राहील ह्यासाठी जणू तजवीज करून ठेवली. 


देवऋण , ऋषिॠण, पितृऋण  ह्या तिन्ही ऋणांची पूर्तता गृहस्थाश्रमात होते.  म्हणून सद्गुरूंच्या  आदेशानुसार  त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला.  वेदशास्त्रसंपन्न,  वैदिकी आणि याज्ञिकी मध्ये प्रवीण असलेल्या विनायकशास्त्री  आर्वीकरांशी ललिताकाकूचा  विवाह झाला.


सांसारिक जीवन सुरू झाले.  त्याच बरोबर नोकरीही चालूच होती.  नोकरीला जाण्यापूर्वी तेव्हढ्या घाईत सोवळ्यात स्वयंपाक  करून , सगळ्यांची जेवणे आटोपून घाईघाईने ऑफिस गाठावे लागत होते.  पण कधीही चेहर्‍यावर नाराजी न येऊ देता सर्व व्रतवैकल्ये,  सणवार , नवरात्र , महालक्ष्म्या काकू सगळ्याच  आघाड्या कुशलतेने सांभाळत होती.  हे सगळे व्याप  सांभाळून नागपूर विश्व विद्यालयाची संस्कृत शास्त्री ही परिक्षा ती उच्च श्रेणीत पास झाली.   


आता सासर्‍यांच्या सरस्वती संस्कृत विद्यालयात जाऊन बी . ए. व  एम. ए. च्या विद्यार्थ्यांंना ही शिकवावे लागत होते .  एक जबाबदारी अजून वाढली होती.  हे काम तिच्या अत्यंत आवडीचे होते.  पण ह्या सगळ्या आघाड्या सांभाळताना ऑफिस मध्ये जायला उशीर होऊ लागला.  वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जाणे आले.  तरी ही न डगमगता, जिद्दीने  तीन  चार दिवसात दुचाकी  (लुना) शिकून ती ऑफिसला लुनाने जाऊ लागली.    ऑफिस मध्ये ही कामाचा आवाका जबरदस्त होता.  ती कामात अतिशय चोख होती.   लंचटाइम  मध्ये ही अथर्वशीर्ष,  शिवमहिम्न स्तोत्र शिकविण्याचे काम चालू राहातच असे.


ह्या सगळ्या बरोबर भागवत स्वाहाकार, अनेक लहान मोठे यज्ञ, भागवताचे श्रवण नित्य नियमाने चालू राहातच होते.


सर्वसामान्यांच्या संसारात जशा अडचणी येतात तशा तिच्या ही संसारात अडचणी  आल्या.  पण न घाबरता, न डगमगता ती हिमतीने उभी रहात होती.   ती उत्तम सहचारिणी, उत्तम गृहिणी होती.  भावंडांचे लालनपालन असो, सासू सासर्‍यांची  सेवा असो , घरातील व्रत वैकल्याचे पालन असो   किंवा ऑफिस मधले काम असो सारख्याच  तन्मयतेने ती पूर्णत्वास नेत असे.  


पहाटे तीन ते रात्री अकरा बारा वाजेपर्यंत अखंड कर्तव्यपूर्ती  हाच वसा तिने घेतला होता.  हळूहळू कष्टाचे फळ मिळू लागले.  जीवनात स्थैर्य येऊ लागले.  संसार वेल बहरू लागली.     सुधांशु  आणि भूषण  ही दोन अपत्ये झाली.  त्यांच्या संगोपनात  तिने कोणतीच कसर ठेवली नाही.  त्यांना वैदिकी, याज्ञिकी  आणि लौकिक शिक्षण देऊन ज्ञानाचा  वसा दिला.


विनुकाकांना  (विनायकशास्त्री )  काही अपरिहार्य कारणास्तव  बँकेतून स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली.  तेंव्हा ही आर्थिक बाजू तिने सांभाळून घेतली.  घर बांधताना ही काकांना तोच खंबीर पाठींबा दिला .     


द्वारकेला  श्रीमद्भागवताचे वाचन काका (विनायकशास्त्री ) करीत होते .  अचानक त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला.  मीठापूर येथे त्यांना दवाखान्यात भरती करावे लागले.  औषधोपचार सुरू झाले पण हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.  पण काकू हिमतीने सर्व परिस्थिती सांभाळत होती.   तशातच  काकांनी  सांगितले की सप्ताह अर्ध्यावर सोडू नये.  काकूच्या मानसिक संघर्षाची देव जणू परीक्षा पाहत होता .  पत्नीधर्म  म्हणुन काकांच्या शुश्रूषेसाठी  त्यांच्याजवळ थांबावे की पती आज्ञा शिरसावंद्य मानून सप्ताह पूर्णत्वास न्यावा ?   अर्थातच तिने पती आज्ञेचे  पालन केले.  ही भागवत सेवा  श्रीकृष्ण चरणी अर्पण केली आणि ती काकांना सुखरूप घेऊन परतली.


ललिता काकूच्या प्रोत्साहनाने काकानी भागवताचा सखोल अभ्यास करून  लक्ष्मी नगरातील सिद्ध हनुमान मंदिरात एकवीस वर्षे  प्रवचने केलीत आणि ही एकवीस  वर्षे काकू न चुकता श्रवण भक्ती करण्यासाठी ऑफिसचे काम बारा वाजेपर्यंत पूर्ण करून मंदिरात येत असे.  पुराण संपले की पुन्हा ऑफिस मध्ये हजर.


जसा भरभक्कम पाठींबा तिने काकांना दिला त्याचप्रमाणे तिने मुले , सुना, नातवंडे  ह्यांना ही  सरस्वतीचे दालन खुले करून दिले.    जगत् उत्पत्ती,  परमेश्वरी कार्य , ईश्वरी सेवेची  फलश्रुती यावर ती चर्चा करीत असे.  ज्ञानेश्वरी , श्रीमद्भागवत कथा व सिद्धांताचे निवेदन, श्री देवी भागवत यावर विवेचन करून शंकानिरसन करत असे.


आपल्या दोन्ही सुनांना प्रेमाने व्रत वैकल्ये,  सणवार ह्याचे महत्व पटवून सर्व कार्यात कुशल केले.  आदरातिथ्य , सदाचरण ,  घराण्याची  परंपरा सहजपणे सुनांच्या सुपूर्द केली.   तिचा अन्नपूर्णेचा वसा तिच्या माघारी तिच्या सुना पुढे चालवतात आहे. 


गृहस्थाश्रमाचे  कर्तव्ये यशस्वीपणे पार पाडताना सत्गुरुनी दिलेल्या स्वाध्यायांनी ॐकार व अष्टांग योगाची साधना चालूच होती.


जैन महामुनी  श्री अरुणविजयजी  महाराजांनी चेन्नई येथे अखिल भारतीय संस्कृत महापरिषदेचे  आयोजन केले होते.  नागपुरातून केवळ दोनच व्यक्ती आमंत्रित होत्या . एक प्रा. के. रा. जोशी आणि सौ ललिता काकू.  तेथे संस्कृत भाषेतून    

" सांख्य  तत्त्वज्ञानानुसार आत्म्याचे अस्तित्व " हा विषय अत्यंत प्रभावीपणे मांडला.   श्री. अरुणविजयजीच्या  हस्ते प्रशस्तिपत्रासह तिचा सत्कारही करण्यात आला.


गृहस्थाश्रमातील सर्व कर्तव्ये सुखेनैव पार पडली.  निवृत्तीचे वय आले. निवृत्तीनंतर  श्रीमद्भागवताचा सूक्ष्मरितीने  अभ्यास सुरू झाला.  श्री सेनाड यांच्या घरी श्रावण मासात पाच सहा वर्षे भागवत कथन केले.  


अखंड उपासना , व्रतवैकल्ये,  भागवत सप्ताह, जप , मानसपूजा या तप:सामर्थ्याने तिला कवित्वरुपाचे दैवी वरदान मिळाले.


भागवतातील राधा तिचे आवडीचे व्यक्तिमत्त्व .  ही कृष्णसखी  काकूच्या मनात इतकी ठसली की कवीमनाच्या  काकूने  राधेवर संस्कृतमधे राधायनम् हे महाकाव्य रचले .  नुसतेच रचले नाही तर सामान्यांना त्याचा आस्वाद घेता यावा, आनंद घेता यावा म्हणुन त्याचे स्वतः इंग्रजी आणि मराठीत भाषांतर सुद्धा केले. एवढेच नव्हे तर  संगणकावर देवनागरी लिपी वापरुन स्वतः त्याची अक्षरजुळवणी  केली. पुरातन आणि आधुनिक कौशल्याचा हा सुंदर मिलाफ होता.  असे महाकाव्य रचणारी सांप्रत युगातली ही एकमेव स्त्री आहे.  या महाकाव्या करिता महाराष्ट्र सरकारने तिला प्राचीन संस्कृत पंडित   ह्या उपाधीने गौरवान्वित करून प्रशस्तीपत्र व मानधनासह सन्मानित केले.


श्रीमद्भागवत ग्रंथ गीर्वाण भाषेत असल्यामुळे त्यातील अनेक गूढ अर्थ व सिद्धांत सामान्य माणसाला समजणे शक्य  नाही हे जाणून अशा गहन पुराणावर  सरळ सोप्या मराठी भाषेत "श्रीमद्भागवत चित्सुधा "  ह्या महान ग्रंथाची तिने निर्मिती केली.   भारतवर्षांतील  व  हिन्दु राष्ट्रांतील आपल्या संस्कृतीवर प्रेम करणार्‍या  सर्वांना  आपल्या ज्ञानाचा  फायदा व्हावा ही त्यामागील नि:स्वार्थ भावना.  समाजातील लोकांना  ज्ञानदानाचे अभूतपूर्व कार्य आपल्या पुस्तकाद्वारे,  काव्याद्वारे , महाकाव्याद्वारे  व्हावे ह्यासाठी  ती  अविरतपणे  धडपडत होती.


आर्वीकर  कुळाची कुलदेवता " श्री वाराही देवी " . पण तिच्या बद्दल फार थोडी माहिती उपलब्ध  होती.  काकूने अति कष्टाने  तिची माहिती गोळा केली.  तिच्या प्रासादिक लेखनातून  " श्री वाराही चरितम् " ह्या  संस्कृत काव्याची रचना झाली. त्या योगे कुळातील लोकांना आणि  इतर भगवती भक्तांना वाराही  देवीची  उपासना,  स्तुती कशी करावी हे मराठी आणि इंग्रजी अनुवादासह पुस्तकाद्वारे प्रकाशित करून सुपूर्द केले.


महाराष्ट्राला परिचित नसणार्‍या दाक्षिणात्य कवींच्या  मूकपंचशती  व  नारायणीयम् या दोन ग्रंथाचा काकूने मराठी अनुवाद केला .  ह्या ग्रंथाद्वारे पुन्हा  तिच्या  प्रगल्भ प्रज्ञेचा प्रत्यय  आल्या शिवाय  राहत नाही.  दाक्षिणात्यांचा  सांस्कृतिक वारसा महाराष्ट्रीयांना सुलभतेने समजावून सांगायचे मोठे काम ह्या लिखाणाद्वारे  केल्या गेले.


ललिता काकूने मनुष्य जन्म  खरोखर सार्थकी  लावला.    पार्थिव देहाचा जरी त्याग केला तरी कर्तृत्व रूपे  आणि कीर्ती रूपे ती अमरच आहे.  तिच्या वर्णनासाठी अमुक एक विशेषण पुरेसे आहे असे म्हणताच येत नाही. 


ती सुसंस्कृत, सुशिक्षित  , बहुपुरस्कृता,   प्रथितयश साहित्यिका होती.  


तिच्या बहुआयामी  व्यक्तिमत्त्वात ज्ञानार्जन,  कर्तव्यपालन , आत्मविश्वास , निर्भयता , परमेश्वर निष्ठा हे आध्यात्मिक  गुण प्रकर्षाने जाणवायचे.   


ममत्व,  समत्व,  वात्सल्य,  प्रेम , आदरातिथ्य , सुख , शांती, समाधानाचे व आनंदाचे भांडार होती.


ती एक आदर्श कन्या , प्रेमळ भगिनी , सुसंस्कृत पत्नी , पतिव्रता नारी, सुविद्य माता  आणि कल्याणकारी गुरूमाऊली होती.


असे हे  उत्तुंग व्यक्तिमत्त्व नाथ षष्ठीच्या  पवित्र दिनी ईश्वर पदी लीन झाले.


©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 



Tuesday, 18 July 2023

आई नसलेले घर : पर्व १ : भाग ६

 मागच्या भागात काय झाले ..


पण तिची लगबगीने चालण्याची ढब पाहून ती सुमती तर नाही ना? असा विचार त्याच्या मनात चमकून गेला .


ऊफ्फ,  पुन्हा एकदा सुमती .  त्याला आत्ता स्वतःचाच राग आला.  


तेवढ्यातच त्याचा सहकारी  लंचला चल म्हणून बोलवायला आला  त्यामुळे त्याची विचार शृंखला तुटली आणि तो लंच  करायला निघून गेला.



कोण होती ती तरुणी ? सुमती की दुसरीच कोणीतरी? रमाकांत सारखाच सुमतीचा विचार का करत होता?


आता पुढे ...


लंच अवर मध्ये सगळ्यांची हसत खेळत जेवण झाले . आता  कस्टमर साठी बँक बंद करून रमाकांतच्या  सेन्डऑफची तयारी करायची होती .  त्यामुळे सगळ्यानाच   कामातून सुटका मिळाली होती .  रमाकांत मात्र एका ठिकाणी बसूनच सगळ्यांची धावपळ पहात होता .


एकदाचा साडेचार वाजता  समारंभ चालू झाला .  ब्रँच मॅनेजर म्हणून जोशी साहेबांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यानंतर  उत्स्फूर्तपणे अजून एक दोघांनी भाषण दिले.  अर्थात सगळ्यानी रमाकांत वर  स्तुतिसुमनेच उधळली . शाल ,  नारळ ,  मोठ्ठा फुलांचा गुच्छा देऊन त्याचा सत्कार केला .  शेवटी अल्पोपाहार  करून सर्व मंडळी आपापल्या घराच्या रस्त्याला लागली.


काकूंनी दिलेला लाडवांचा डब्बा , फुलांचा गुच्छा, शाल नारळ,  स्मिता गोडबोले दिलेला शर्ट  आणि अजून एक दोघांनी दिलेले छोटे मोठे गिफ्ट एव्हढा सगळा बाड बिस्तर घरी कसा घेऊन जाऊ या विचारात रमाकांत होता. तोच त्याच्या समोर एक दुचाकी येऊन थांबली .  


त्या व्यक्तीच्या डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे, चेहरा ही पूर्णपणे कपड्यांनी झाकला असल्यामुळे   आणि  जीन्स , टी-शर्ट  घातल्यामुळे ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे ओळखणे  जरा कठीणच जात होते.


" काही मदत हवीय का ?" आवाज मात्र बायकी   आल्यामुळे तो दोन पावले  मागेच सरकला .  आवाज काहीसा ओळखीचा वाटत होता .


रमाकांतच्या  चेहर्‍यावरील प्रश्नचिन्ह आणि गोंधळ पाहून त्या व्यक्तीने हेल्मेट काढले.  पण चेहरा मात्र झाकलेलाच होता.  फक्त डोळे तेवढे दिसत होते.


हे करारी,  पाणीदार डोळे त्याच्या चांगलेच ओळखीचे होते.  सुमती त्याच्या समोर उभी राहून विचारत  होती आणि त्याला बोलायला काहीच सुचत नव्हते.  त्याची नजर मात्र त्या पाणीदार  डोळ्यावरून हलायचे नाव घेत नव्हती .


रमाकांतच्या  अशा वागण्याने  सुमती एकदम गडबडली आणि ओशाळून म्हणाली ,

" म्हणजे तुमच्या घराच्या बाजूलाच माझे एक काम आहे .  तुमच्याजवळ खूप सामान दिसले आणि तुमच्याजवळ काही वाहन ही दिसले नाही म्हणून विचारले ."


रमाकांत ने दूरवर पाहिले .  एकही रिक्षा दिसत नव्हती.   हे सगळे सामान लळत लोंबकळत  कसे न्यायचे हा प्रश्नच होता.  त्याने क्षणात विचार केला  आणि तिला म्हणाला , " तसे तुम्हाला  असे काम सांगणे मला जीवावर येते आहे .  पण दूरवर एकही  रिक्षा दिसत नाहीये.  तुम्ही प्लीज एव्हडे सामान माझ्या घराच्या अंगणात ठेवून द्या . मी पोहोचतोच तिथे पाच मिनिटात ."


तिने मान डोलावली  आणि त्याचे  सामान  आपल्या टु व्हीलर वर नीट रचून घेतले आणि क्षणात दिसेनाशी झाली.


आपण सुमतीशी इतके बोलू शकलो  ह्याबद्दल त्याचे त्यालाच आश्चर्य वाटले.  तो झपाझप पावले उचलत घराकडे निघाला .  पुन्हा तिथे  सुमती भेटेल ही त्याच्या मनात सुप्त इच्छा होती.


जवळपास धावतपळत घरापाशी पोहोचला.  अंगणात तिचा किंवा सामानाचा  मागमूसही नव्हता.   नाराज होऊन तो बंद दारापाशी पोहोचला .  दार उघडताना त्याने सहज बाजूला नजर टाकली तर तिथे सर्व सामान व्यवस्थित ठेवले होते.  सुमती मात्र निघून गेली होती.


सामान उचलून तो आत गेला.  त्याला उगीचच खूप रिकामं रिकामं वाटू लागले.  उद्याची सुट्टी, परवाचा रविवार.  बापरे इतका वेळ आपण रिकामे कसे बसणार ?  एरवी स्वयंपाक तरी मागे होता .  आता तेही नाही.  कळवावे का दोन दिवसाचा  डब्बा नको म्हणून ?  पण मग दोन दिवस सुमतीचे दर्शन होणार नाही. 


आता त्याचा स्वतःशीच संवाद चालू झाला होता .  एक मन म्हणाले , " नाही झाले दर्शन तर नाही झाले , काय बिघडणार आहे ? " 


दुसरे मन जरा स्तब्ध झाले.  खरच आपण का विचार करतो आहे तिचा ? पण हे मन हार  मानायला तयार नव्हते, 

" वावा,  असे कसे ? चविष्ट भोजन नाही ना मिळणार ? "


" असेही होऊ शकते ना , की सुमती च्या जागी रेवती येऊ शकते " पहिल्या  मनाने उगीचच दुसर्‍या मनाला उचकावले .


आतापर्यंत दुसरे मन चांगलेच निर्ढावले होते. 

" तेच तर कुणीही येऊ दे , मला काहीच फरक नाही पडत . फक्त डब्बा मी मागवणारच , हे फायनल .  आणि आता गप्प बस."  त्याने दोन्ही मनाला दरडावले.   आणि आपल्या खोलीत जाऊन एकेक गिफ्ट उघडून पाहू लागला.


त्याने सगळे गिफ्ट नीट लावून ठेवले .  उगीचच आलमारीतले कपडे पुन्हा पुन्हा व्यवस्थित लावून ठेवले.  वेळ कसा घालवावा हे त्याला समजतच  नव्हते.


घड्याळाकडे पुन्हा पुन्हा पाहताना त्याला उगीचच वाटले की काटे जरा हळू हळू फिरतात आहे .  साडे आठ वाजायला अजून अर्धा तास बाकी आहे. 


आजवर आपण असे कधीच घड्याळ वारंवार पहात नव्हतो .  आताच असे का होते आहे  ? आपल्याला जवळचे मित्रही नाहीत .  आजूबाजूच्या  शेजार्‍यांशी  आपण कधीच संबंध प्रस्तापित केले नाही.  किंबहुना बाबांनी ते कधी करूच दिले नाही. कोणी येणारा नाही की कोणी जाणारा नाही .


आई निघून गेल्यानंतर बाबांनी सर्व नातेवाईकांशी संबंध तोडून टाकले. मामा , मावशीला तर ते दारातही उभे करत नसे.  


बाबांच्या विचित्र स्वभावामुळे आत्या स्वतःहूनच  घराकडे फिरकली नाही. ती तिच्याच घरच्यांमुळे  त्रस्त होती . त्यात रमाकांतची जबाबदारी येऊन पडलीय तर तिला ती नको होती.


एक लहान काका होता .  तो बरेचदा बाबांना समजावायचा प्रयत्न करायचा.  पण बाबांचा हेकेखोरपणा नेहमी आड यायचा .  संभाषणाचे रूपांतर वादात आणि त्यानंतर कडाक्याच्या भांडणात व्हायचे .


छोटा रमाकांत घाबरून एखाद्या कोपर्‍यात थरथरत मुळूमुळू  रडत बसायचा. भांडणाचा अतिरेक झाला की काका बाहेर निघून जायचा . त्यानंतर  बाबा सगळा राग  रमाकांत वर काढायचे .  त्याला बदड बदड मारायचे. 


रमाकांत अजूनच घाबरून घरभर पळत सुटायचा. ह्या पळापळीत बाबा थकले की मग त्याची सुटका होत असे.  मनावरच्या  जखमा आणि शरीरावरील  माराचे  वळ ह्याने अपमानित झालेला रमाकांत कित्येकदा उपाशी पोटी झोपला .


एक दिवस  काका असाच चिडून घराबाहेर पडला.  दोन दिवस तो घरीच आला नाही .  बाबांनी ही त्याला शोधायचा प्रयत्न केला नाही .  उलट त्यांची धुसफूस चालू होती दोन दिवस.  रमाकांत गुपचूप आपला आपला शाळेसाठी तयार व्हायचा , पानात पडेल ते खायचा .  बाबा ऑफिसला गेले की घराला कुलूप लावून शाळेत जायचा .   शाळेतून आला की घराला लागलेले कुलूप पाहिले की त्याला खूप रडू यायचे . पण आजूबाजूच्या लोकांना कळलेले बाबांना चालणार नाही हे त्याला चांगलेच कळून आले होते.  जोरात लागलेली भूक मग मरून जायची . पोटभर पाणी पिऊन तो तसाच बाबांची वाटत पाहत बसायचा . कधी कधी बसल्या जागी पेंगायचा .  रात्री मात्र त्याला काकांची फार आठवण यायची .  तोच नेहमी रमाकांतला आंजारून गोंजारून नीजवित  असे . रमाकांतच्या  रखरखीत आयुष्यात तीच एक हिरवळ होती.


त्या दिवशी असाच तो शाळेतून तो घरी आला  तर घराचे दार त्याला उघडे दिसले . तो धावत पळत  घरात शिरला .  दारातच त्याला काकाचा आवाज आला .  शाळेची बॅग तशीच फेकून तो धावतच काकांकडे झेपावला आणि क्षणात जागच्या जागी थिजून उभा राहिला.   कुणीतरी  एक बाई काकाला चहा करून देत होती . काका हसून हसून तिच्याशी गप्पा मारत होता.


गोंधळलेला रमाकांत तिथेच उभा राहिला. 


काकाने त्याला प्रेमाने जवळ बोलावले आणि म्हणाला , " कांता ही तुझी काकू .  आजपासून तुला जो काही हट्ट करायचा  तो हिच्याकडे करायचा .  ती तुझे सगळे लाड पुरविल."


तिनेही तत्परतेने पुढे होऊन त्याला जवळ घेतले .   प्रेमाने ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत राहिले.  त्याच्या आयुष्यातला,  त्याच्या आठवणीतला तो पहिला  मायेचा स्पर्श तो डोळे मिटून अनुभवत  होता. 


दोनच मिनिटे त्याने हे सुख अनुभवले असेल नसेल  तोच त्याच्या पाठीवर जोरात रट्टा पडला आणि तो कोलमडत बाजूच्या भिंतीवर धाडकन आपटला आणि त्याला जोरात चक्कर आली.  पुढे काय  झाले ते त्याला कळलेच नाही.


काय घडले असेल तिथे ?  कोणी मारले रमाकांतला ?  


पाहूया पुढच्या भागात ....


.... ..... ...... ...... ...... .....  क्रमशः 

🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸🥸


©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 



Monday, 17 July 2023

आई नसलेले घर : पर्व १ : भाग ५

 मागच्या भागात काय घडले....


भविष्याची मस्त स्वप्ने पाहण्यात तो रमला होता . मधेच त्या स्वप्नात सुमती डोकावली .  ती त्याला हाताला धरून ओढत कुठे तरी घेऊन जात होती . तो नको नको  म्हणून ओरडत उठला .  जशी जाग आली तसे त्याच्या लक्षात आले आपण स्वप्न पाहत होतो.  दिवा बंद न करताच तो  झोपला होता. उठून त्याने दिवा बंद केला.  घड्याळाने दिलेले तीनचे ठोके त्याने ऐकले . आणि बराच वेळ तो कूस बदलवत झोपेची आराधना करत राहिला .....


आता पुढे 


मधेच त्याला झोप लागत होती तर मधेच तो दचकून जागा होत होता.  मधेच सुमती त्याला खुणावत होती तर कधी ती हात धरून त्याला फिरायला घेऊन जात होती. ह्या सगळ्या लपंडावात त्याच्या झोपेचे पार खोबरे झाले.    केव्हातरी त्याचा डोळा लागला.  पहाटेच्या  साखरझोपेत त्याला कळलेच नाही की आता उठायची वेळ झाली आहे.  उन्हाची तिरीप चेहर्‍यावर पडताच तो खडबडून  जागा झाला. पहिल्यांदा तो जरा गडबडला पण मग आज स्वयंपाकाची  घाई नाही म्हणून जरा निवांत झाला .


शांतपणे त्याने आन्हिके आटोपली , बाबांची सगळी  व्यवस्था करून दिली आणि ऑफिस च्या तयारीला लागला . 


आज जरा तो व्यवस्थित तयार झाला . स्काय ब्लू कलरचा  शर्ट , वर त्याला मॅचिंग ब्लेझर आणि पँट.     मोजे-बूट .  चापून चोपून बसवलेले केस . त्याच्या उंच पुर्‍या शरीरयष्टीला  आणि गोर्‍या रंगाला सारे शोभून दिसत होते.  


नऊ वाजता बरोब्बर दारावरची बेल वाजली.  रमाकांत घड्याळ बांधत बांधतच बाहेर आला.  दारात सुमती डबा घेऊन उभी होती . 


ती अवाक् होऊन एकटक त्याच्याच कडे पाहत उभी राहिली .  आजवर तिने त्याच्या कडे फारसे निरखून पाहिले नव्हते . पण आज त्याच्यावरून तिची नजर हालत नव्हती .  रमाकांत च्याही लक्षात ही बाब आली. मनाच्या आतल्या कप्प्यात तोही सुखावला.  पण त्याला उशीर होत होता. तो  उगीचच खाकरला.  त्यासरशी गोरीमोरी होत तिने डब्बा त्याच्या हातात दिला आणि पटकन पाठमोरी होऊन तरातरा चालू लागली.


तिच्या ह्या कृतीचे त्याला हसू आले आणि तो तिथेच तिची लगबग पहात उभा राहिला.


आपल्या मूर्खपणाची तिला लाज वाटली आणि स्वतः चा खूप राग ही आला .  पण पुन्हा एकदा चोर नजरेनी त्याच्याकडे पाहण्याचा मोह ती आवरू शकली नाही.  आणि तो तिथेच उभा राहून आपल्याकडे मिश्किल पणे पाहतो आहे हे लक्षात येताच ती मनातल्या मनात स्वतःवर चडफडत पटकन तिथून नाहीशी झाली.


ती नजरेआड होईस्तोवर तो तिथेच उभा होता.   आत वळता वळता त्याला आपल्या वागण्याचा अर्थच उमगेना. पण मन मात्र खूप प्रसन्न होते. असे का वाटते आहे आपल्याला ? त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला . उत्तर न मिळाल्याने तो थोडासा अस्वस्थ झाला.  इतक्यात त्याला रात्रीचे स्वप्न आठवले आणि समोर पाहणारे कुणीही नसताना तो चांगलाच  गोरामोरा झाला.


त्याने पटापट बाबांचे आणि स्वतःचे  जेवण आटोपले  आणि  बँकेत जायला निघाला .  आज त्याला फार हलके हलके वाटत होते.  आज फारसे ऑफिसचे काम ही नव्हते.   उद्याची सुट्टी ही सॅन्क्शन झाली  होती.   त्याच्या  नकळत तो शिळ वाजवत बँकेत शिरला.   दारावरच्या शिपायाने मारलेला कडक सॅल्युटला त्याने हसून उत्तर दिले .


त्याच्या पाठोपाठ येणार्‍या स्मिता गोडबोले च्या लाडिक बोलण्याकडे रोज सारखे दुर्लक्ष न करता त्याने तिला गुडमॉर्निंग म्हंटले.  आज हा असा काय वागतोय ? असे हावभाव तिच्या चेहर्‍यावर दिसताच त्याने त्याकडे सोयीस्कर रीत्या दुर्लक्ष केले.


मागून येणार्‍या सरिताने आवाज देताच , तो थांबला .  तिलाही त्याने गुडमॉर्निंग म्हणत हास्य वदनाने त्याने तिच्याकडे पाहिले.  


" रमाकांत , आज एकदम सुटाबुटात ? पण छान दिसताय.  उद्यापासून मिस करू तुम्हाला .  अधून मधून येत जा भेटायला. "


"हो , हो  अवश्य " म्हणून तो पुढे सरकला .


चार पावले चालत नाही तोच पेंशन सेक्शन च्या काकू सुंदरसा प्लास्टिकचा डबा घेऊन समोर येऊन  थांबल्या.  रमाकांत बद्दल त्यांना सॉफ्ट कॉर्नर होता. त्याच बरोबर आपल्या भाची साठी एक चांगले स्थळ ह्या दृष्टीने त्या रमाकांतला पहात असे.


" रमाकांत , माझ्याकडून ही छोटीशी भेट . "


चांगले आठ दहा बेसनाचे लाडू भरलेला  डब्बा त्याच्यापुढे करत काकू बोलल्या .  


" आणि हो , डब्बा परत करायच्या भानगडीत पडू नको. खास तुझ्यासाठीच घेतला आहे.  पुढे मागे तुझ्या संसाराला उपयोगी पडेल ."  त्यांनी हसत हसत डब्बा पुढे केला.


त्यांच्या शेवटच्या वाक्याने संकोचून गेलेला रमाकांत म्हणाला ,

" काकू, अहो कशाला तुम्ही  तसदी घेतली ?"


"अरे , आपल्या माणसासाठी करायला काही तसदी होत नाही ."


"येत जा हो अधून मधून .  अगदी हक्काने माग काय हवे नको ते. हे माझे कार्ड . फोन करत जा अधून मधून ."  त्याच्या हातात जबरदस्तीने डब्बा ठेवत काकू बोलल्या.


त्यांच्या पासून कशीबशी सुटका करून घेत रमाकांत आपल्या काऊंटर वर येऊन थबकला.  लाडू पाहून तसा तो खुषच झाला होता .  पण काकूंचे बोलणे त्याला रुचले नव्हते.


थोडा वेळ शांत बसून त्याने स्वतःला स्थिरस्थावर  केले . उरलेले काम त्याने एक तासात पूर्ण केले .  घड्याळात डोकावून पाहिले तेंव्हा लंच ब्रेकला अजून अवकाश होता .  


त्याने आजूबाजूला नजर टाकली .  जो तो  आपापल्या कामात मग्न होता .  कस्टमरची ये जा चालू होती. कोणी पैसे जमा करायला येत होते , तर कोणी काढायला .   सायबर क्राइमच्या  बळींची  लाइन फारच मोठी होती .  त्यात  जास्तीत जास्त म्हातारे लोकच दिसून येत होते . तेही स्वतः च्या  मुलाबाळां कडूनच फसविल्या गेलेले.  त्याला त्या लोकांची खूपच किव आली.   आपण  कधीही  आपल्या पोरांवर  इतका आंधळा विश्वास टाकायचा  नाही , त्याने मनोमन ठरविले.  मग त्यालाच त्याच्या विचाराची मजा वाटली.


आजकाल आपण असे विचार का करतो ? 


आता दृष्टीसमोर दिसणार्‍या लोकांचा विचार करण्यापेक्षा त्याने स्वतःचे अंतरंग तपासायला सुरवात केली.  गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांची त्याने उजळणी करायला सुरवात केली.   मिळालेले प्रमोशन,  जोशी साहेबांचे लग्नाच्या बाबतीतले वाक्य , काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण केलेली धावपळ,  आज पेन्शन डिपार्टमेंट च्या  काकूंचे सूचक वाक्य आणि ह्या पळापळीत आपली सुमतीशी झालेली भेट. 


तिचा तो कडक शिस्तीचा स्वभाव.  वेळ पाळण्याचा आग्रह , केवळ मेहनतीचेच पैसे स्विकारण्याचा  कटाक्ष .........


तो पूर्णपणे  सुमतीचा  विचार करण्यात गुंगून गेला होता.  तिचा स्वाभिमानी  स्वभाव त्याला कुठेतरी भावला होता त्याचवेळी तिच्यासारख्या मुलीने आपल्याला असे सडेतोड उत्तर द्यावे ह्यात त्याचा पुरुषी अहंकार ही दुखावल्या गेला होता. 


विचार करता करता त्याची नजर सहज बाहेर गेली.  फॉर्म भरण्याच्या  टेबल पाशी बरेच लोक  घोळका करून उभे होते. त्या घोळक्यात एक मुलगी भराभर कोणाला पेईंग स्लिप  तर कोणाला विथड्रावल फॉर्म भरून देत होती.  त्याचे कुतूहल चाळावले.  त्याने जरा निरखून पाहण्यास सुरवात केली पण काही केल्या त्याला तिचा चेहरा दिसेना.


तेवढ्यात एक  वयस्कर माणूस त्या गर्दीपाशी येऊन मोठ्याने बोलला.   


" अग सुमा , झाली नाही का तुझी लोकसेवा ? चल लवकर दादाची औषधं घ्यायला जायचे आहे अजून . उशीर नको व्हायला .  


त्यांचा आवाज ऐकताच ती म्हणाली , " हो हो काका, आलेच लगेच ..."


हातातली स्लिप भरून देत आणि बाकीच्यांचे काम नंतर करून देईन म्हणत ती त्या गर्दीतून लगबगीने बाहेर पडली.   मघापासून कुतूहलाने तिकडेच पहात असलेल्या रमाकांतला आत्ताही ती पाठमोरीच दिसली . पण तिची लगबगीने चालण्याची ढब पाहून ती सुमती तर नाही ना? असा विचार त्याच्या मनात चमकून गेला .


ऊफ्फ,  पुन्हा एकदा सुमती .  त्याला आत्ता स्वतःचाच राग आला.  


तेवढ्यातच त्याचा सहकारी  लंचला चल म्हणून बोलवायला आला  त्यामुळे त्याची विचार शृंखला तुटली आणि तो लंच  करायला निघून गेला.



कोण होती ती तरुणी ? सुमती की दुसरीच कोणीतरी? रमाकांत सारखाच सुमतीचा विचार का करत होता?


पाहू सगळ्या प्रश्नांची  उत्तर पुढच्या भागात .


...... ...... ...... ..... ...... ...... क्रमशः 


😇🤨😇🤨😇🤨😇🤨😇🤨😇🤨😇🤨©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 



Sunday, 16 July 2023

आई नसलेले घर : पर्व १ : भाग ४

 मागच्या भागात काय झाले ....

कशीबशी आवरा सावर करून तो झोपायला पळाला.  अंथरूणावर पडल्या पडल्या  मनाशीच उद्याच्या कामाचा कच्चा आराखडा  त्याने तयार केला. उद्या बँकेत लवकर जायचे आणि झपाट्याने कामाचा निपटारा करायचा .  त्यासाठी लवकर उठून स्वयंपाक आणि इतर कामे लवकर करावी लागतील.  त्यापेक्षा सुमती कडूनच डब्बा मागवावा का ? 


हा विचार मनात येताच तो स्वतः शीच दचकला .  किती सहजतेने आपल्याला तिचे नाव लक्षात राहिले ?  

आजवर कधीही मुलीं कडे  ढुंकूनही न पाहणारा रमाकांत सुमती चा विचार करत करत झोपी गेला .


आता पुढे ....


रमाकांतला इतकी गाढ  झोप लागली की त्याला अलार्म झालेला ऐकूच आला नाही.  त्याला जाग आली तेंव्हा दिवस चांगलाच वर आला होता. त्याने  घड्याळ पाहिली.  ओ नो साडे सात.   बाबा  त्याला आवाज देऊन देऊन थकले होते आणि चिडले ही होते.  त्यांना चहा हवा होता . बॉटल मधले पाणीही संपले होते .


तो हडबडून उठला . तोच बाबांचा चिडका आवाज त्याच्या कानी पडला .  फ्रेश होत होत त्याने चहा मांडला,  पाण्याच्या बॉटल भरल्या. एकीकडे नाश्त्याची तयारी केली .  बाबांना चहा , पाणी , बिस्किट एकसाथ नेऊन दिले.  त्यामुळे त्यांची चिडचिड थोडी कमी झाली. 


चहा घेता घेता त्याचा उपमा ही तयार झाला होता .  गिझर  चालू करून  त्याने बाबांसाठी उपम्याची डिश भरली.   त्यांना पटापट नाश्ता संपवायला सांगून त्याने कसाबसा आपला चहा नाश्ता संपवला.   बाबांना हाताला धरून बाथरूममध्ये घेऊन गेला . त्यांची आंघोळ आटोपून होईस्तोवर त्याने त्यांची खोली नीटनेटकी करून ठेवली. 


घड्याळाकडे नजर टाकताच त्याच्या लक्षात आले की कितीही घाई केली तरी स्वयंपाक वेळेत होणे शक्य नाही किंवा स्वयंपाक करत बसलो तर लेटमार्क लागणार.


पुन्हा एकदा सुमती कडून डब्बा मागवावा लागणार. विचार करायला सुद्धा  वेळ नव्हता . बाबांना खोलीत आरामात बसवून त्याने घाईघाईने सुमतीला फोन लावला .


आज रेवतीनेच डब्बा आणून दिला.  सुमती आलीच नव्हती .  त्याच्या मनात विचार आला का नसेल आली ती ?  पण विचारणे योग्य दिसणार नाही म्हणून त्याने निमुटपणे डब्बा घेतला.


बाबांचे ताट वाढून त्याने स्वतः साठी मात्र ऑफिस मधेच डब्बा न्यायचे ठरवले . कारण त्याशिवाय तो वेळेत पोचू शकणार नव्हता.  


ऑफिसची वेळ गाठण्यासाठी त्याला खूप सारी धावपळ करावी लागली होती. आणि  आता ऑफिस मधे ही झोकून देऊन काम करावे लागणार होते .  


थोडासा विचार करून त्याने मनाशी एक निश्चय केला आणि अमलातही आणला.  सुमतीला फोन  करून एक महिन्याचा डब्बा लावून घेतला.  आता तो जरा शांत झाला होता.  प्यूनला  आधी चहा पाठवण्या बाबत सांगून  तो कामाला लागला .


लंचच्या वेळेपर्यंत  त्याचे बरेचसे काम आटोक्यात आले होते.  लंच ब्रेक मध्ये जेवण झाल्यावर त्याने कामाचा जरा अदमास घेतला.  रिलिव्हर साठी आवश्‍यक सूचना लिहून काढल्या .  नको असलेला कचरा काढून टाकला . सगळ्या गोष्टी नीटनेटक्या लावून  ठेवल्या  आणि पुन्हा कामाला लागला .


एक दिवसाची सुट्टी मिळवण्यासाठी त्याची सगळी धडपड चालू होती .  त्या हिशोबाने त्याच्या हातात फक्त उद्याचाच एक दिवस होता . पण त्याने जवळपास  पूर्ण काम संपवले होते . उद्या एक शेवटचा हात फिरवायचा.  आपल्यामुळे कोणालाही अडचण होऊ नये , आपल्या जागेवर जो कोणी रुजू होईल त्याला कोणताही त्रास होऊ नये ह्याकडे त्याचा कटाक्ष होता. त्याच्या ह्याच काम करण्याच्या पद्धती वर त्याचे वरीष्ठ फार खुष असायचे.  म्हणूनच त्याला एक दिवसाची सुट्टी नक्की मिळणारच होती. 


त्याने आपल्या कामाचा पूर्ण रीपोर्ट तयार केला . सुट्टीचा अर्जही लिहिला . सगळे कागदपत्र घेऊन तो साहेबांच्या केबिन पाशी आला .


"मे आय कम ईन सर.." दरवाज्यावर टकटक करत त्याने प्रश्न केला .


साहेबांनी वर पहात त्याला यायची खूण केली.  


" काय म्हणता देशमुख ?"


रमाकांतने सगळी कागदपत्रे  त्यांच्या सुपूर्द केली .


"व्वा देशमुख , तुमचे सगळे काम नीटनेटके असते  आणि वेळेच्या आधी तयार असते. अशा तत्परतेने काम करणार्‍या कर्मचाऱ्यांची खरंच खूप गरज आहे. " कागदपत्रांवर नजर फिरवत साहेबांनी त्याचे कौतुक केले .


सुखावलेल्या  रमाकांतने त्यांच्या पुढे रजेचा अर्ज करत म्हंटले , " सर , एक विनंती आहे. माझी परवाची सुट्टी मंजूर व्हावी. "


साहेबांनी काहीही खळखळ न करता त्याची सुट्टी मंजूर केली. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि हसतमुखाने रमाकांत केबिन बाहेर आला.


तो बाहेर येताच त्याचे सहकर्मी त्याच्या सभोवती जमा झाले .  त्यांनी उद्या त्याला सेन्डऑफ देण्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रम ठरविला होता त्याचे निमंत्रण दिले.  खूप खुश असलेल्या रमाकांतने लगेचच त्याचा स्विकार केला .  उद्या चार  वाजल्यानंतर बँकेचे काम बंद ठेवून हा कार्यक्रम आयोजित केला होता.   त्याच्या उरलेल्या कामाचा त्याने फडशा पाडला आणि  साडे पाच वाजता घराचा रस्ता पकडला .


घरी येताच त्याने बाबांना त्याच्या प्रमोशनची आणि बदलीची माहिती दिली .  सोमवार पासून त्याला शिवाजी नगर ब्रँचला जावे लागणार होते. त्यासाठी घरातून कमीत कमी अर्धा ते पाउण तास लवकर निघावे लागणार होते.  सकाळच्या घाईत स्वयंपाक करणे  शक्य होणार नव्हते म्हणून त्याने खानावळीचा डब्बा लावला आहे हेही सांगून टाकले .


त्याच्या प्रमोशनच्या बातमीने खुष झालेल्या बाबांनी मात्र डब्बा लावला आहे ह्या बातमीवर नाराजी व्यक्त केली.   आणि त्याच्यावर तोंडसुख घ्यायला सुरवात केली.  त्यांना काही सांगितले तरी ते काहीच ऐकून घेणार नाही आणि त्याची अडचण ही समजून घेणार नाही हे त्याला पक्के ठाऊक होते.  म्हणून त्याने तिथून काढता पाय घेतला .


त्याने स्वतः साठी फक्कड चहा बनविला , हातात आवडते पुस्तक घेतले आणि खोलीत पलंगावर अगदी आरामात पाय पसरून  बसला .  आज आपल्याला स्वयंपाक करायचा नाही ह्या भावनेनेच त्याला फार हायसे वाटत होते.  


तिकडे बाबांची चिडचिड चालूच होती . तिकडे पूर्णतया दुर्लक्ष करून  तो वाचनात गुंग होऊन गेला .  


मध्ये उठून त्याने घरभर दिवे लावले .  बाबांना काही हवे आहे का विचारले .  त्यांनी तुसडेपणाने नकारात्मक मान हलविली .   ह्यांच्या अशा तुसडेपणा मुळेच आई घर सोडून गेली असावी .  त्याच्या मनात झटकन विचार चमकून गेला . तो विचार त्याने  पटकन झटकून टाकला .


तो लगेच पुन्हा खोलीत येऊन आपल्या वाचनात रमला.


साडे आठ वाजता बरोबर  बेल वाजली आणि तो शर्ट घालत घालतच पुढे आला. 


दारात सुमती डब्बा घेऊन उभी होती .   आज तिच्याबरोबर रेवती आली नव्हती .


"अरे,  आज रेवती नाही आली का?" त्याने उगीचच विचारायचे म्हणून विचारले.


"नाही.  काही काम होते का तिच्याकडे ? " तिने प्रतिप्रश्न  केला. 


त्याला उगीचच वाटून गेले तिचा स्वर जरा तीक्ष्ण आहे.


" नाही नाही , मी सहजच विचारले "


" ठिक आहे , निघते मी ." असे म्हणत तिने पाठ फिरवली.


तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे तो अनिमिष नेत्राने पहात तिथेच उभा राहिला.


आतून बाबांचा तिरकस स्वर उमटला , "आला वाटते खानावळीचा थंडगार, बेचव डब्बा.  आता नशिबात तेच खाणे असेल तर काय करणार?  आणा आता,  लवकर  वाढा . गिळतो कसातरी ?"


बाबांचे तिरकस बोलणे ऐकून तो आत वळला .  म्हणजे ह्याना आत्तापर्यंत कळलेच नाही की ते गेले तीन दिवस खानावळीचेच  जेवण जेवत होते.


त्याच्या चेहर्‍यावर मंद स्मित झळकले .  त्याने घाईघाईने डब्बा उघडला . लसणाच्या चटणीचा खमंग वास घरभर पसरला.   गरमागरम मुगाची खिचडी , मऊसूत भाकर्‍या , पिठलं,  तळलेल्या लाल मिरच्या , कांद्याची कोशिंबीर आणि ताक . ते सगळे पाहून तोच खूप खुश झाला .


"व्वा,  असे गरमगरम जेवण आयुष्यभर आयते वायते मिळाले तर काय मज्जा येईल "  तो स्वतःशीच  बडबडला .  आणि दुसर्‍याच क्षणी चपापला .  हे काय आपल्या मनात  चालू आहे ?


पटकन बाबांना वाढून त्यानेही जेवणावर आडवा हात मारला.  इतके व्यवस्थित जेवण पाहुन बाबांची  बोलती बंद झाली होती . पण हे कबूल  करायची त्यांची तयारी नव्हती .


त्यांच्या प्रतिक्रिये कडे फारसे लक्ष न देता . त्याने चटचट  कामे आटोपली. खोलीत जाऊन मघाचे पुस्तक वाचण्यात तो गुंगून गेला.  वाचता वाचता केंव्हा तरी त्याचा डोळा लागला . 


भविष्याची मस्त स्वप्ने पाहण्यात तो रमला होता . मधेच त्या स्वप्नात सुमती डोकावली .  ती त्याला हाताला धरून ओढत कुठे तरी घेऊन जात होती . तो नको नको  म्हणून ओरडत उठला .  जशी जाग आली तसे त्याच्या लक्षात आले आपण स्वप्न पाहत होतो.  दिवा बंद न करताच तो  झोपला होता. उठून त्याने दिवा बंद केला.  घड्याळाने दिलेले तीनचे ठोके त्याने ऐकले . आणि बराच वेळ तो कूस बदलवत झोपेची आराधना करत राहिला. 


भेटू या उद्याच्या भागात .....


तुम्ही मात्र मला स्टिकर्स आणि समीक्षा द्यायला उद्याची वाट पाहत बसू नका . आत्ताच द्या बर का.


🧚‍♂️ ❤️ 🧚‍♂️ ❤️ 🧚‍♂️ ❤️ 🧚‍♂️ ❤️ 🧚‍♂️ 


......... ......... .........   क्रमशः 



©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 



Friday, 14 July 2023

आई नसलेले घर : पर्व १ : भाग ३

 रमाकांत ने घड्याळ पाहिली , त्याचीही निघण्याची वेळ झाली होती .  घरात येऊन त्याने आपली बॅग उचलली,  बाबांना सांगून त्याने दाराला कुलूप घातले आणि झपाझप बँकेच्या दिशेने चालू लागला .  


बँकेच्या दारातच स्मिता गोडबोले ने त्याला गाठले आणि लालभडक लिपस्टिकने रंगवलेल्या ओठांचा चंबू करत ती त्याला म्हणाली , " गुडमॉर्निंग  सर...


तिच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत  त्याने मस्टर वर सही केली आणि आपल्या खुर्चीकडे वळला.


उगीचच मनातल्या मनात त्याने स्मिता गोडबोले आणि कालच्या मुलीची तुलना केली . 


आणि मग आपण असे का करतोय हे त्यालाच समजेना . आपल्याला तर साधे तिचे नावही माहिती नाही .


काय असेल तिचे नाव ? .....


आपल्याच विचारांचे त्याला आश्चर्य वाटले.  दुसर्‍याच क्षणी आपले विचार झटकून टाकत तो कामाला लागला. 


पूर्ण दिवसभरात त्याला विचार करायला फुरसत मिळाली नाही .  त्याच्या हातात आता फक्त पाच  दिवस  होते.   त्यातला एक दिवस आपल्यासाठी राखून ठेवावा असा त्याचा विचार होता . म्हणजे चारच दिवसात काम पूर्ण करणे त्याला भाग होते.  त्यामुळे जग काय करताय किंवा काय म्हणतय  ह्याच्याशी त्याला काही देणे घेणे नव्हते.


एकदम लंच टाइम झाला तेंव्हा  तो उठला .  पाच मिनिटात जेवण आटोपून तो पुन्हा कामाला लागला .  चार वाजता  प्यूनने आणून ठेवलेला चहा ठंडा झाला तरी त्याचे त्याकडे लक्ष नव्हते.   शेवटी सहा वाजता प्यून ने त्याला दुसरा चहा आणून देऊ का असे विचारले तेंव्हा तो भानावर आला. त्याला हो म्हणत त्याने टेबल आवरायला सुरवात केली.


प्यून ने चहा आणून दिला तेंव्हा तो रिलॅक्स होऊन बसला होता .  मस्त पाय लांब करून तो चहा प्यायला आणि तडक बॅग उचलून घराच्या दिशेने चालू लागला.


घर उघडताच त्याला दिवसभराचा थकवा जाणवला . फ्रेश होऊन पंधरा वीस मिनिटे पाठ टेकवायची असा  त्याचा विचार होता.  रोजच्या सवयीने त्याने बाबांच्या खोलीकडे डोकावून पाहिले आणि तो हतबुद्ध झाला .  टेबलवर सगळीकडे चहा सांडला होता .  त्याचे ओघळ सर्वत्र खोलीभर पसरले होते.  दुपारचा नाश्ता अर्धवट डिशमध्ये आणि अर्धा खाली सांडला होता .  आणि बाबा झोपून गेले होते .


सगळाच शीण विसरून त्याने पहिल्यांदा दिवा लावला आणि  बाबांना जागे  केले.  पहिल्या आवाजातच त्यांनी डोळे उघडले म्हणून त्याला हायसे वाटले .   कितीही काहीही झाले तरी ते त्याचे जन्मदाते होते . त्यांनी प्रेम दिले नसले तरी तो त्यांचे बोट धरूनच मोठा झाला होता .  सवयीने माणूस प्राण्यांवर ही जीव लावतो. इथे तर ते प्रत्यक्षात  वडील होते .


"काय झाले बाबा तुम्हाला ?" त्यानी कापर्‍या आवाजात विचारले. 


"अरे,  मला खाता खाता झोप लागून गेली. बहुदा झोपेत चहाच्या कपाला हात लागून सांडला चहा."


"ठीक आहे , तुम्हाला काही त्रास नाही ना होत ?"


त्यांनी नकारात्मक मान हलविली तसा तो तिथून उठला . लगबगीने  कपडे बदलून त्याने बाबांची रूम आधी स्वच्छ केली .  बाबांना स्पन्जिंग करून दिले . सगळ्या कामाचा निपटारा करता करता आठ वाजून गेले .  दिवसभराचा थकवा त्याला आता जाणवू लागला.  अजून स्वयंपाक राहीलाच होता .  त्याला काही एक करायची इच्छा नव्हती.


त्याने शांतपणे फोन उचलला आणि कालच्याच खानावळी मध्ये फोन लावला.


"हॅलो,  मी रमाकांत देशमुख बोलतोय , इंद्रप्रस्थ कॉलनी मधून ."


"हं,  हं,  बोला बोला . मी सुमती करंजकर बोलतेय गुरुदेव खानावळी मधून ." एक सुस्पष्ट बायकी स्वर उमटला. 


"मी कालच तुमच्याकडून  डब्बा मागवला होता.  तुम्ही मला आजही प्लीज देऊ शकाल का ?  खरं म्हणजे मला उशीर झालाय कळवायला पण मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला ."


" अहो त्यात काय येव्हडे ? पाठवते की तुम्हाला डब्बा.  आमचे कामच ते आहे. पण स्पष्ट सांगते आमच्या नियमाप्रमाणे पहिल्या दिवशी आम्ही ऐंशी 

रुपये पर हेड घेतो त्यानंतर मात्र शंभर रुपये पर हेड घेतो . चालणार आहे का ?  आणि चिल्लर साठी अडवू नका. नेमके पैसे द्या. लक्षात ठेवा आम्ही टीप स्विकारत नाही. "


येवढी रोखठोक बोलणे ऐकण्याची रमाकांतला सवय नव्हती.  उलट बोलण्याची उर्मी त्याने दाबून ठेवली.


"चालेल चालेल आणि थँक्स हं. वेळेवर सांगूनही तुम्ही माझी अडचण दूर केलीत."


"ठीक आहे , पंधरा मिनिटात पाठवते डब्बा." असे म्हणून तिने फोन ठेवला.


लगोलग तिने डब्बा भरला . आपली लहान बहीण रेवतीला घेऊन ती निघाली सुद्धा. 


आपले मागचे बोलणे विसरून सुमती ने डब्बा द्यायचे कबूल केले  ह्याचे रमाकांतला आश्चर्य वाटले. 


पण सुमती मुळी होतीच  गुणी.  परक्याशी जेवढ्यास तेवढे बोलायचे. आपला कोणालाही अपमान करू नाही द्यायचा पण आपला व्यवसायही बुडू नाही द्यायचा.   


तिला आईचे कष्ट लवकरात लवकर दूर करायचे होते .  ग्रॅज्युएट,  पोस्ट ग्रॅज्युएट  होऊन नोकरी करायची होती .


समज आल्यापासून तिने आईचे अखंड कष्ट पाहिले होते.  प्रचंड हुशार असलेल्या वडीलांना पॅरॅलिसिस झाल्यामुळे अंथरूणावर हतबल होऊन पडलेले पाहिले होते . अतिशय करारी असलेल्या आईने न हरता त्यांची सेवा करत, कोणाचीही मदत न घेता सगळाच डोलारा सांभाळला होता . त्यांची तुटपुंजी पेंशन,  दोघी लहानग्या मुलींचे शिक्षण , वाढता खर्च, वडीलांच्या औषधांचा खर्च ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या जबाबदार्‍या तिने खूप शांतपणे सांभाळल्या होत्या.


आईचा करारीपणा , वडिलांची हुशारी ह्यांचा उत्तम संयोग सुमती मधे  झाला होता .  आपल्या लहान बहिणीला सुद्धा ती  आपल्यासारखीच स्वयंसिद्धा बनवत होती. 


अगदी ह्या कारणामुळे तिने रमाकांतचे कालचे वागणे बोलणे मनावर घेतले नव्हते.  पंधराव्या मिनिटाला ती त्याच्या घरापाशी पोहोचली होती. तो ही तिची वाट पाहत बसला होता.  तिने त्याच्या हवाली डब्बा केला आणि त्याबरोबरच आपल्या खानावळीचे पत्रक त्याला दिले. त्यानेही निमुटपणे नेमके पैसे तिच्या हवाली केले.


"दादा , मी उद्या नऊ वाजता येते डब्बा घ्यायला " रेवती चिवचिवली.


त्यानेही हसून मान डोलावली .


बाबांचे ताट वाढता वाढता त्याने खानावळीचे पत्रक वाचले.  त्यात तिथले नियम काय आहेत ह्याची माहिती होती . त्याबरोबरच महिन्याकाठी डब्बा लावला तर खर्च कसा कमी पडेल ह्याचेही विवरण होते .  


त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत त्याने स्वतः चेही पण पान वाढून घेतले.  काल सारखेच आजचे ही जेवण चविष्ट होते .


दिवसभराचा शीण , आल्यावर बाबांची करावी लागलेली उस्तवार आणि आत्ताचे गरमागरम जेवण , ह्यामुळे त्याला चांगलीच गुंगी येऊ लागली होती. 


कशीबशी आवरा सावर करून तो झोपायला पळाला.  अंथरूणावर पडल्या पडल्या  मनाशीच उद्याच्या कामाचा कच्चा आराखडा  त्याने तयार केला. उद्या बँकेत लवकर जायचे आणि झपाट्याने कामाचा निपटारा करायचा .  त्यासाठी लवकर उठून स्वयंपाक आणि इतर कामे लवकर करावी लागतील.  त्यापेक्षा सुमती कडूनच डब्बा मागवावा का ? 


हा विचार मनात येताच तो स्वतः शीच दचकला .  किती सहजतेने आपल्याला तिचे नाव लक्षात राहिले ?  


आजवर कधीही मुलीं कडे  ढुंकूनही न पाहणारा रमाकांत सुमती चा विचार करत करत झोपी गेला .


उद्याची सकाळ रमाकांत साठी कशी असणारं होती ? सुमतीला तो डब्ब्यासाठी पुन्हा फोन करेल का ? 


पाहूया उद्याच्या भागात .....



🧚‍♂️ ❤️ 🧚‍♂️ ❤️ 🧚‍♂️ ❤️ 🧚‍♂️ ❤️ 🧚‍♂️ ❤️©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित 



Thursday, 13 July 2023

आई नसलेले घर : पर्व १ : भाग २

 मागच्या भागात काय झाले ......


कामाच्या गडबडीत तो तहान, भूक , घर, बाबा, खानावळीचा डब्बा सगळेच विसरला.  आठ वाजले तसे प्यून त्याच्या आजूबाजूला घुटमळत उभा राहिला. पण त्याला काही फरकच पडत नव्हता.

त्यामुळे शेवटी त्याला आवाज दिला , " रमाकांत सर,  घरी बाबा तुमची वाट पाहत असतील ...."


आता  पुढे......


घाईघाईने रमाकांत बँकेतून बाहेर पडला .  दहा मिनिटात तो घरापाशी पोहोचला .  अंगणात सर्वत्र अंधार होता . फक्त समोरच्या हॉल मधला दिवा जळत होता . कारण ऑफिस मध्ये जाताना तो दिवा तो लावून जात असे .  बाबा चार पावलांशिवाय  जास्त चालू शकत नाही ह्याची त्याला पूर्ण कल्पना होती.


म्हणून ऑफिस मधे जाण्यापूर्वी तो त्यांची सगळी तयारी करुन ठेवत असे.   त्यांना डायपर लावून जाणे,  औषधे , पाण्याच्या बाटल्या, दुपारचा  चहा थर्मास मध्ये भरून ठेवणे,  बिस्किटे  अगदी सगळ्या वस्तु  सहजतेने ते घेऊ शकतील अशी व्यवस्था तो करून जात असे .


आज जास्तीच उशीर झाला म्हणून त्याने घाईघाईने कुलूप उघडले .  अंगणातला दिवा लावला.  बॅग जागेवर ठेवली.  समोरचा दरवाजा लावून तो फ्रेश व्हायला गेला.   


हातपाय धुवून  आणि कपडे बदलून तो बाबांशी  बोलायला येतच होता तोच दारावरची बेल वाजली.  ह्या वेळेला आपल्याकडे कोण आले असेल ह्याचा विचार करत त्याने दरवाजा उघडला . दारात एक २०-२१ वर्षाची सावळ्या रंगाची , धारदार नाकाची आणि अत्यंत तेजस्वी डोळ्यांची  तरुणी एका हातात टीफिन घेऊन आणि दुसर्‍या हाताने १० वर्षाच्या गोबर्‍या आणि हसर्‍या चेहर्‍याच्या बालिकेचा हात धरून उभी होती .


रमाकांत ह्या वेळेपर्यंत खानावळीतून डब्बा  बोलावलाय हे विसरून गेला होता .  त्या मुलीच्या हातातल्या डब्ब्या कडे पाहून आता त्याच्या लक्षात आले. घाईघाईने  त्याने तिच्या हातातून डब्बा घेतला आणि  तिच्यापुढे दोनशेची नोट धरली.  


" सर,  माझ्याकडे चिल्लर नाही.  तुम्ही आमच्याकडून पहिल्यांदा डब्बा घेतला म्हणून आमच्या नियमाप्रमाणे आजचा डब्बा ऐंशी रुपये पर हेड राहील.   त्यामुळे एकतर मला एकशे साठ रुपये द्या  किंवा उद्या डब्बा न्यायला येईन तेव्हा मला माझे पैसे द्या. " असे म्हणून लगबगीने ती परत फिरली.


दोन क्षण काहीच न सुचून रमाकांत तसाच उभा होता . पण लगेचच भानावर येत त्याने तिला आवाज दिला .


" अहो मिस,  नाही नाही , तुम्हीच मला नंतर वापस करा पैसे , नाहीतर ठेवून घ्या तुमच्याकडे .  उद्या तुम्ही याल तेंव्हा  मी घरी असणारं नाही . डब्बा इथे बाहेर ठेवलेला असेल ."


त्याचे शब्द ऐकताच ती नागिणी सारखी फुत्कारली, "सर , तुम्ही मला डब्ब्याचे पैसे नाही दिले तरी चालेल .  पण तुम्ही मला टीप देण्याचा प्रयत्न करू नका.  मी  मेहनतीचे पैसे घेते फक्त. फुकटचे पैसे नको मला. " 


तिचा रागाने लालबुंद झालेला चेहरा पाहून रमाकांत जरा दचकलाच .  आजवर त्याने अशी रणरागिणी  पाहिली नव्हती .  त्याच्या बँकेतल्या मुली त्याच्याभोवती लाळघोटेपणा करत फिरत असे .  त्यामुळे सगळ्यांनाच तो एकाच मोजपट्टीने मोजत असे. 


पण हे पाणी काही वेगळेच आहे हे त्याच्या लक्षात आले. नरमाईचे स्वरात तो तिला म्हणाला , " सॉरी, सॉरी , मला असे नव्हते म्हणायचे .  माझे शब्द मी मागे घेतो .  घाई गडबडीत मी असे बोलून गेलो."


त्याचा नरमाईचे स्वर ऐकून तिनेही शांतपणा धारण केला .  


तो म्हणाला , " हे बघा , तुम्ही सकाळी किती वाजता येणार आहात ? माझी बँक दहा वाजता चालू होते . मी साडे नऊच्या दरम्यान  निघून जातो . त्या आधी तुमचे येणे जमेल का ? "


"मी  नऊ वाजता येईन.  तेंव्हा  डब्बा आणि पैसे तयार ठेवा. " 

येव्हडे बोलून तिने बहिणीचा हात धरला आणि तरातरा निघून गेली.


हतबुद्ध होऊन रमाकांत थोडावेळ तिथेच उभा राहिला.  आतून त्याच्या बाबांनी त्याला आवाज दिला तेंव्हा भानावर आला .


" आज काय मला जेवण मिळणार आहे की नाही ? "  त्यांनी तुकड्या स्वरात रमाकांतला विचारले .


रमाकांत गुपचूप टिफिन घेऊन आत गेला . त्याने डब्बा उघडला आणि मस्त भरल्या  ढेणसाच्या भाजीचा घमघमाट घरभर पसरला .


त्याने पटकन बाबांचे ताट वाढले. गरमागरम भाजी,  पोळ्या , गरम आमटी , दह्याची वाटी , पापड , लोणचे  असे साग्रसंगीत जेवण पाहून तो फारच खुष झाला .  


त्या वासाने त्याची पण भूक खवळली. पटकन बाबांना वाढून त्याने आपले पण पान वाढून घेतले. 


बाबा सुद्धा इतक्या कमी वेळात  इतके सगळे पदार्थ रमाकांतने कसे बनविले ह्याबद्दल जरा आश्चर्यचकित झाले. पण काही न बोलता त्यांनी जेवायला सुरवात केली. 


खूप चविष्ट भोजन ते दोघेही खूप वर्षानी जेवत होते. त्यामुळे खूप आनंदाने ते  दोघे ही एकही शब्द  न बोलता पोटभर जेवले.


जेवण झाल्यावर बाबांना औषध देताना बाबांनी रमाकांतला शेवटी  विचारलेच . 

" आज कसे काय इतक्या कमी वेळात इतका सगळाच स्वयंपाक कसा करता आला तुला ? "


त्यांच्या प्रश्नाकडे सोयीस्कररित्या त्याने दुर्लक्ष केले .  बँकेतल्या कामाने तो अतिशय थकला होता . त्यात  गरमागरम स्वादिष्ट जेवणाने त्याला गुंगी येत होती.  कसेबसे कामे आटोपून तो झोपायला आपल्यासाठी खोलीत चालला गेला .


अंथरूणात पडल्या पडल्या तो निद्रादेवीच्या आधीन झाला.  रोज पेक्षा लवकरच तो झोपी गेला .


रात्रभर शांत झोप झाल्यामुळे सकाळीही तो लवकर  जागा झाला.  सगळे कसे प्रसन्न प्रसन्न वाटत होते त्याला. 


स्वतःशीच आश्चर्य करत तो उठून स्वयंपाक घरात आला .  ओट्यावरचा  पसारा पाहून त्याला आत्ता जाणवले , अरे आपण पोटभर जेवलो आणि आवराआवरी न करताच झोपायला गेलो.


बाकी जेवण उत्तमच होते. चला पटापट आवरायला  हवे.   


सवयीने त्याचे हात भराभर कामे उरकत होते.  पटापट त्याने स्वयंपाक केला.  कालच्या चविष्ट भोजनाची चव अजूनही जिभेवर रेंगाळत होती. एकदा त्याच्या मनात विचार आला लावून घ्यावा का पर्मनंट डब्बा ?  आपले काम तरी वाचेल .  पण त्याच्या दुसर्‍या मनाने  त्याला झिडकारले . 


विचारांच्या हिंदोळ्यावर झुलत झुलत तो भराभर  कामे आटोपून मोकळा झाला. घड्याळाचा काटा पावणे नऊ वर स्थिरावला होता.


लगेचच खानावळवालीचा डब्बा त्याने स्वच्छ घासला आणि पिशवीत भरता भरता  त्याला कालचा संवाद आठवला . त्या मुलीचा चेहराही त्याच्या डोळ्या समोर तरळला.   अशाही मुली असतात म्हणजे. 


त्याने मोजून एकशे साठ रुपये  डब्ब्यात ठेवले आणि  पिशवी घेऊन तो अंगणाच्या दाराशी जाऊन उभा राहिला .  का कोण जाणे ती मुलगी बाबांच्या नजरेला पडावी आणि त्यांचे नकारात्मक बोलणे आपल्याला ऐकावे लागू नये यासाठी त्याची धडपड  चालू होती .


दाराशी उभा राहून येणार्‍या जाणार्‍या वर्दळीकडे  पहात होता . अचानक त्याच्या समोर  एक सायकल थांबली . आणि त्यावरून कालची ती बालिका उतरली .  


"दादा , ताईला वेळ नव्हता म्हणून मीच आली डब्बा आणि पैसे घ्यायला . माझ्यामुळे तुम्हाला उशीर नाही ना झाला ?"


रमाकांतने हळूच घड्याळ पाहिले , बरोब्बर नऊ वाजले होते.   नकारात्मक मान हालवत तो म्हणाला , " नाही तू एकदम वेळेत आलीस. हा तुझा डब्बा.   पैसे डब्ब्यातच ठेवले आहे . तेही बरोब्बर मोजून एकशे साठ. " 


"दादा,  तुम्हाला कालचे जेवण आवडले का ?"


"हो, हो , एकदम उत्तम होते.  का ग , तुझ्या ताईने विचारले का ?"


"छे छे, तिला अजिबात वेळ नसतो .  काल खूप उशीर झाला होता आणि  मला अंधाराची भीती वाटते ना म्हणून ती माझ्याबरोबर आली होती. 


आई सगळा स्वयंपाक करते आणि  मी डब्बे पोहोचवून देण्याचे काम करते . 


ताईला खूप अभ्यास असतो ना म्हणून आई तिला सध्या ह्या कामात अडकवत नाही . चला  मी निघते , माझीही शाळा आहे .  पुन्हा केंव्हाही डब्बा  लागला की फोन करा . बाय म्हणत ती दिसेनाशी झाली सुद्धा. "


रमाकांत ने घड्याळ पाहिली , त्याचीही निघण्याची वेळ झाली होती .  घरात येऊन त्याने आपली बॅग उचलली,  बाबांना सांगून त्याने दाराला कुलूप घातले आणि झपाझप बँकेच्या दिशेने चालू लागला .  


बँकेच्या दारातच स्मिता गोडबोले ने त्याला गाठले आणि लालभडक लिपस्टिकने रंगवलेल्या ओठांचा चंबू करत ती त्याला म्हणाली , " गुडमॉर्निंग  सर...


तिच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत  त्याने मस्टर वर सही केली आणि आपल्या खुर्चीकडे वळला.


उगीचच मनातल्या मनात त्याने स्मिता गोडबोले आणि कालच्या मुलीची तुलना केली . 


आणि मग आपण असे का करतोय हे त्यालाच समजेना . आपल्याला तर साधे तिचे नावही माहिती नाही .


काय असेल तिचे नाव ? .....


पाहूया पुढच्या भागात ...


...............      ........      ........           क्रमशः 


🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃


©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित 



Wednesday, 12 July 2023

आई नसलेले घर : पर्व १ : भाग १

सुमतीला जाऊन १५ दिवस झाले होते.  पण येणाऱ्यांची संख्या काही कमी होत नव्हती .  सगळ्यांची उस्तवार करता करता तिची मुलगी पूर्वा थकून जात होती.  

तिची मोठी बहीण अपूर्वा  अमेरिकेत होती.  त्यात तिची नुकतीच म्हणजे आई जायच्या आदल्या दिवशीच डिलिव्हरी झाली होती.   आईचे शेवटचे दर्शनही तिला घेता आले नव्हते.  तिला दुसरा मुलगा झाल्याचे आईने ऐकले आणि त्यानंतर पाचच मिनिटातच तिने डोळे मिटले होते.

ना आई आजारी होती ना अंथरूणावर झोपून होती .

नेहमीप्रमाणेच सकाळची सगळी काम तिने आटोपली होती. 

काल संध्याकाळीच अपूर्वाचा फोन आला होता की  ती  अ‍ॅडमिट होतेय.  तिच्या मुलीला सांभाळायला सासू सासरे आलेत. त्यामुळे काळजी करू नको.

.........................................................
चला जरा पूर्वेतिहास पाहू या ...

अपूर्वा,  पूर्वा ,बाबा रमाकांत , आई सुमती  आणि शेंडेफळ अपूर्व असे ते  देशमुखांचे कुटुंब . 

रमाकांत अत्यंत कर्मठ.  तेव्हढाच प्रामाणिक, कष्टाळू.  पण घरात वावरताना आपल्या मतांबाबत अति आग्रही असणारा . 

घराबाहेर प्रत्येकाशी गोड बोलणारा . प्रत्येकाच्या अडचणी समजून घेऊन त्याप्रमाणे वागणारा, त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणारा . 

त्यामुळे  बाहेर त्याची ख्याती एक अत्यंत सुस्वभावी,  गुणी माणूस अशीच होती .

घरात शिरता शिरता रमाकांतचा  हा मुखवटा  गळून पडत असे . मुळात स्त्री विषयी मनात घृणा  असलेला हा मनुष्य.  कारणही जबरदस्त.  

ह्याच्या जन्मानंतर आईने, वडीलांच्या त्रासाला कंटाळून कोणालाही न सांगता गृहत्याग केला.  ती माहेरी ही  नाही  गेली .   पुढे तिचा कधीही पत्ता लागला नाही .

लोक प्रवादाला घाबरून वडीलांनी चक्क तिला चारित्र्यहीन ठरविले आणि मोठ्या होत चाललेल्या मुलाच्या मनात ही तेच विष कालवत गेले. 

एकदाच तो आईच्या आठवणीने  खूप रडला होता. त्या दिवशी त्याच्या बाबांनी त्याला खूप बदडून काढले होते.  ह्या घरात तिचे पुन्हा  नाव काढायचे नाही म्हणून त्याला तंबी दिली होती. तसेच बाहेर कोणालाही आपले दुःख  दिसले नाही पाहिजे ही जरबही दिली होती . त्यामुळे घराबाहेर हसतमुखाने राहायचे आणि घरात शिरल्यावर  राग राग व्यक्त करायचा , हा त्याचा स्वभावधर्म  झाला होता .

लहान असताना  आईविना पोर म्हणून आजूबाजूचे  सहानुभूती दाखवत ती त्याला असह्य होत असे.

कधी मित्रांच्या आईने हातावर खाऊ ठेवला की तो त्याला नकोसा होत असे .

असे प्रसंग घडले की तो घरी येऊन आदळआपट करीत असे. 

मनात कटू भावना ठेवत रमाकांत लहानाचा मोठा झाला.  समस्त स्त्री जाती विषयी मनात तुच्छतेची भावना सरत्या काळाबरोबर वाढतच गेली.

शिक्षण आटोपले . बँकेत लगेचच नोकरी लागली.  आता वडील ही म्हातारे झाले होते.  जो पर्यंत त्यांना झेपत होते तोवर ते स्वतः घरातील कामे करत. स्वयंपाकाला सुद्धा त्यांनी बाई ठेवली नव्हती.

पण अलीकडे त्यांना सर्व कामे जमत नव्हती .  रमाकांत ती कामं करून घेत होता पण त्यामुळे त्याची तारेवरची कसरत होत होती.  

त्यातच एक दिवस वडील पडले आणि त्यांनी अंथरूण धरले .  रमाकांतची अजूनच ओढाताण होऊ लागली .  वडिलांची सेवा , त्यांचे औषधपाणी , त्यांचे पथ्य,  घरातली सगळी कामं  आणि हे सगळे आटोपून  वेळेत बँक गाठायची.

प्रमोशन ड्यु असल्यामुळे सुट्टीही घेणे शक्य नव्हते. 

थकून भागून घरी आल्यावर पुन्हा  कामांची यादी तयारच असायची .  जोडीला दिवसभर घरात एकटेच राहावे लागल्यामुळे बाबांची कुरकुर चालूच रहायची.  

तरी बरे घर आणि बँक वॉकिंग डिस्टंस वर  होते.  लंच ब्रेक मध्ये रमाकांत घरी येऊन बाबांना हवे नको  पाहून जात असे .  ते नीट जेवले की नाही ह्याकडेही  त्याचे बारीक लक्ष असे.

त्याच्या बँकेतल्या एका सहकार्‍याला त्याची अडचण कळली .  त्याने  त्याला एका घरगुती खानावळीचा पत्ता दिला.  त्या खानावळ चालवणार्‍या काकू घरपोच डब्बे ही देतात असेही सांगितले .

पण रमाकांतने सुरवातीला तिकडे दुर्लक्ष केले.  कारण बाबा फार कटकट करतील ह्याची त्याला पूर्ण कल्पना होती .  पण थोड्या दिवसातच तो ह्या सगळ्या  गोष्टीना कंटाळून गेला .

एक दिवस बँकेत भरपूर काम पुरले त्याला.  सगळे आटोपून घरी पोहोचायला त्याला जवळपास आठ वाजणार होते .   गेल्यावर पुन्हा स्वयंपाक करणे त्याच्या जिवावर आले .  

त्याच्या सहकार्‍याने दिलेल्या खानावळीचा फोन नंबर त्याने फिरवला आणि दोघांच्या साठी घरपोच डब्बा साडे आठ वाजेपर्यंत पोहोचवायला सांगितला .

खानावळीचा पत्ता विचारताना त्याच्या लक्षात आले की खानावळ त्याच्या घराच्या मागच्याच आळीत आहे.  

त्याने विचार केला ,आज खाऊन तर पाहूया .  आवडले तर परत मागवता येईल .  तसाही आपल्याला फारसा स्वयंपाक करणे जमत ही नाही  आणि आवडतही नाही.

तेवढ्यातच प्यूनने  येऊन सांगितले की साहेबांनी बोलावले आहे.  मनातला विचार झटकत तो साहेबांच्या  केबिन मध्ये शिरला.

मे आय कम इन ,सर ? 

या या देशमुख , बसा.  फाईल मधले  डोके वर न करता जोशी साहेबानी त्याला खुर्चीवर बसायचा संकेत दिला .

पाच मिनिटे केबिन मध्ये शांतता होती.  काम होताच जोशी साहेब  रमाकांतला म्हणाले ,  "अभिनंदन , तुमचे .  तुमचे प्रमोशन झालेय.   क्लास वन ऑफिसर झालात आता तुम्ही .  

तुमची बदली  शिवाजीनगर ब्रँचला झालीय.   आठ दिवसात तुम्हाला  तिथे जॉईन व्हायचे आहे . "

प्रमोशनच्या  नावाने हसरा झालेला रमाकांतचा  चेहरा बदलीच्या नावाने खाडकन उतरला.

शिवाजी नगर ब्रँच म्हणजे घरापासून तासभराच्या अंतरावर. दहा वाजता ऑफिस गाठायचे म्हणजे  नऊ वाजताच घर सोडावे लागणार .  त्याआधी घरची सगळी काम आटोपून , बाबांची आंघोळ , नाश्ता,  औषधपाणि ,  बापरे  चांगलीच धावपळ होणार .

काय झाले देशमुख ?  आनंद नाही झाला का तुम्हाला ?

भानावर येत रमाकांत म्हणाला , " असे नाही सर,  आनंद तर झालाय , फक्त बाबांचा विचार मनात आला म्हणून थोडा विचारात पडलो "

"देशमुख ,  आता  पटकन लग्न करून टाका. म्हणजे तुमची बाबांविषयीची काळजी दूर होईल .  घरी हक्काचे माणूस राहील .  चवीढवीचे  खायला मिळेल .  आता पगारवाढ ही झालीय म्हणजे कोणीही डोळे झाकून मुलगी देईल ."  ज्येष्ठत्वाच्या  नात्याने जोशी सरांनी हसत हसत सल्ला दिला. 

रमाकांतने फक्त चेहरा हसरा केला  आणि म्हणाला, " सर येऊ आता ."

हो, हो  अवश्य  . पुनश्च एकदा अभिनंदन.  

जोशी सरांच्या केबिन बाहेर येताच त्याचे सहकारी त्याच्या भोवती जमा झाले आणि त्यांनी त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव केला . 

प्रत्येकाचे अभिनंदन स्विकारत तो आपल्या खुर्चीकडे निघाला तोच स्त्री वर्गाने त्याला गराडा  घातला.

कधीही कोणाही स्त्रीला हाय हॅलो न म्हणणारा रमाकांत गडबडून गेला . 

साधारण त्याच्याच वयाची लोन डिपार्टमेंटची सरिता चिवचिवली,  "अभिनन्दन रमाकांत,  पार्टी द्या आता आम्हाला."

पेन्शन डिपार्टमेंटच्या काकू म्हणाल्या , " रमाकांत खूप खूप अभिनंदन . उद्या तुझ्यासाठी बेसनाचे लाडू नक्की घेऊन येईन हा. "

नव्यानेच जॉईन झालेली  स्मिता गोडबोले, गालावर खळी पाडत , लाजत लाजत शेकहँड साठी हात पुढे करत म्हणाली , " सर,  अभिनंदन".

बावचळून गेलेला रमाकांतला काय करावे ते समजेना . कसेबसे हात जोडून त्यांना धन्यवाद म्हणत आपली सुटका कशी करावी ह्याचा विचार तो करत होता .

त्यांचे प्रश्न त्याच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हते.
त्यांना धड उत्तर ही देऊ  शकत नव्हता .  त्याच्या स्वभावाची पूर्ण कल्पना असलेला प्यून दुरूनच त्याची गम्मत पहात होता.

शेवटी त्याची दया येऊन तो चहा घेऊन आला आणि म्हणाला , "अग तायानों, आपले रमाकांत दादा भारी आहेत बर. त्यांनी मला मघाशीच तुम्हाला सगळ्यांना चा-बिस्किट त्यांच्याकडून द्यायला सांगितले. "

अगबाई हो का ? म्हणत सारा स्त्री वर्ग आता प्यूनच्या  दिशेने झेपावला आणि रमाकांतची सुटका झाली .

खर म्हणजे त्याला प्यूनचा  त्यानी केलेल्या आगाऊपणा बद्दल  खूप राग आला होता .  पण आपल्या सुटकेसाठी त्याने ही युक्ती केली हेही त्याला जाणवले. 

म्हणून वरून हसत हसत पण मनातून चडफडत त्याने सगळ्यांच्या चहा बिस्किटाचे पैसे प्यूनच्या स्वाधीन केले.  आणि तो आपल्यासाठी कामात दंग झाला.

आठ दिवसात इथले काम संपवायची जबाबदारी त्याची होती आणि कामाच्या बाबतीत तो अत्यंत चोख होता.  त्यामुळे त्याचे हात भराभर कामे उरकू लागले .

कामाच्या गडबडीत तो तहान, भूक , घर, बाबा, खानावळीचा डब्बा सगळेच विसरला.  आठ वाजले तसे प्यून त्याच्या आजूबाजूला घुटमळत उभा राहिला. पण त्याला काही फरकच पडत नव्हता.

त्यामुळे शेवटी त्याला आवाज दिला , " रमाकांत सर,  घरी बाबा तुमची वाट पाहत असतील ...."

रमाकांतने घड्याळ पाहिले आणि हडबडून उठत भराभर आपला टेबल आवरून तो घराकडे निघाला सुद्धा. 

चला पाहूया घरापाशी पोहोचता पोहोचता काय काय घडते . पुढच्या भागात पुन्हा भेटू ..

क्रमशः .😀😀

©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित 


Welcome

संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर

 ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात,  किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...