Sunday, 16 July 2023

आई नसलेले घर : पर्व १ : भाग ४

 मागच्या भागात काय झाले ....

कशीबशी आवरा सावर करून तो झोपायला पळाला.  अंथरूणावर पडल्या पडल्या  मनाशीच उद्याच्या कामाचा कच्चा आराखडा  त्याने तयार केला. उद्या बँकेत लवकर जायचे आणि झपाट्याने कामाचा निपटारा करायचा .  त्यासाठी लवकर उठून स्वयंपाक आणि इतर कामे लवकर करावी लागतील.  त्यापेक्षा सुमती कडूनच डब्बा मागवावा का ? 


हा विचार मनात येताच तो स्वतः शीच दचकला .  किती सहजतेने आपल्याला तिचे नाव लक्षात राहिले ?  

आजवर कधीही मुलीं कडे  ढुंकूनही न पाहणारा रमाकांत सुमती चा विचार करत करत झोपी गेला .


आता पुढे ....


रमाकांतला इतकी गाढ  झोप लागली की त्याला अलार्म झालेला ऐकूच आला नाही.  त्याला जाग आली तेंव्हा दिवस चांगलाच वर आला होता. त्याने  घड्याळ पाहिली.  ओ नो साडे सात.   बाबा  त्याला आवाज देऊन देऊन थकले होते आणि चिडले ही होते.  त्यांना चहा हवा होता . बॉटल मधले पाणीही संपले होते .


तो हडबडून उठला . तोच बाबांचा चिडका आवाज त्याच्या कानी पडला .  फ्रेश होत होत त्याने चहा मांडला,  पाण्याच्या बॉटल भरल्या. एकीकडे नाश्त्याची तयारी केली .  बाबांना चहा , पाणी , बिस्किट एकसाथ नेऊन दिले.  त्यामुळे त्यांची चिडचिड थोडी कमी झाली. 


चहा घेता घेता त्याचा उपमा ही तयार झाला होता .  गिझर  चालू करून  त्याने बाबांसाठी उपम्याची डिश भरली.   त्यांना पटापट नाश्ता संपवायला सांगून त्याने कसाबसा आपला चहा नाश्ता संपवला.   बाबांना हाताला धरून बाथरूममध्ये घेऊन गेला . त्यांची आंघोळ आटोपून होईस्तोवर त्याने त्यांची खोली नीटनेटकी करून ठेवली. 


घड्याळाकडे नजर टाकताच त्याच्या लक्षात आले की कितीही घाई केली तरी स्वयंपाक वेळेत होणे शक्य नाही किंवा स्वयंपाक करत बसलो तर लेटमार्क लागणार.


पुन्हा एकदा सुमती कडून डब्बा मागवावा लागणार. विचार करायला सुद्धा  वेळ नव्हता . बाबांना खोलीत आरामात बसवून त्याने घाईघाईने सुमतीला फोन लावला .


आज रेवतीनेच डब्बा आणून दिला.  सुमती आलीच नव्हती .  त्याच्या मनात विचार आला का नसेल आली ती ?  पण विचारणे योग्य दिसणार नाही म्हणून त्याने निमुटपणे डब्बा घेतला.


बाबांचे ताट वाढून त्याने स्वतः साठी मात्र ऑफिस मधेच डब्बा न्यायचे ठरवले . कारण त्याशिवाय तो वेळेत पोचू शकणार नव्हता.  


ऑफिसची वेळ गाठण्यासाठी त्याला खूप सारी धावपळ करावी लागली होती. आणि  आता ऑफिस मधे ही झोकून देऊन काम करावे लागणार होते .  


थोडासा विचार करून त्याने मनाशी एक निश्चय केला आणि अमलातही आणला.  सुमतीला फोन  करून एक महिन्याचा डब्बा लावून घेतला.  आता तो जरा शांत झाला होता.  प्यूनला  आधी चहा पाठवण्या बाबत सांगून  तो कामाला लागला .


लंचच्या वेळेपर्यंत  त्याचे बरेचसे काम आटोक्यात आले होते.  लंच ब्रेक मध्ये जेवण झाल्यावर त्याने कामाचा जरा अदमास घेतला.  रिलिव्हर साठी आवश्‍यक सूचना लिहून काढल्या .  नको असलेला कचरा काढून टाकला . सगळ्या गोष्टी नीटनेटक्या लावून  ठेवल्या  आणि पुन्हा कामाला लागला .


एक दिवसाची सुट्टी मिळवण्यासाठी त्याची सगळी धडपड चालू होती .  त्या हिशोबाने त्याच्या हातात फक्त उद्याचाच एक दिवस होता . पण त्याने जवळपास  पूर्ण काम संपवले होते . उद्या एक शेवटचा हात फिरवायचा.  आपल्यामुळे कोणालाही अडचण होऊ नये , आपल्या जागेवर जो कोणी रुजू होईल त्याला कोणताही त्रास होऊ नये ह्याकडे त्याचा कटाक्ष होता. त्याच्या ह्याच काम करण्याच्या पद्धती वर त्याचे वरीष्ठ फार खुष असायचे.  म्हणूनच त्याला एक दिवसाची सुट्टी नक्की मिळणारच होती. 


त्याने आपल्या कामाचा पूर्ण रीपोर्ट तयार केला . सुट्टीचा अर्जही लिहिला . सगळे कागदपत्र घेऊन तो साहेबांच्या केबिन पाशी आला .


"मे आय कम ईन सर.." दरवाज्यावर टकटक करत त्याने प्रश्न केला .


साहेबांनी वर पहात त्याला यायची खूण केली.  


" काय म्हणता देशमुख ?"


रमाकांतने सगळी कागदपत्रे  त्यांच्या सुपूर्द केली .


"व्वा देशमुख , तुमचे सगळे काम नीटनेटके असते  आणि वेळेच्या आधी तयार असते. अशा तत्परतेने काम करणार्‍या कर्मचाऱ्यांची खरंच खूप गरज आहे. " कागदपत्रांवर नजर फिरवत साहेबांनी त्याचे कौतुक केले .


सुखावलेल्या  रमाकांतने त्यांच्या पुढे रजेचा अर्ज करत म्हंटले , " सर , एक विनंती आहे. माझी परवाची सुट्टी मंजूर व्हावी. "


साहेबांनी काहीही खळखळ न करता त्याची सुट्टी मंजूर केली. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि हसतमुखाने रमाकांत केबिन बाहेर आला.


तो बाहेर येताच त्याचे सहकर्मी त्याच्या सभोवती जमा झाले .  त्यांनी उद्या त्याला सेन्डऑफ देण्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रम ठरविला होता त्याचे निमंत्रण दिले.  खूप खुश असलेल्या रमाकांतने लगेचच त्याचा स्विकार केला .  उद्या चार  वाजल्यानंतर बँकेचे काम बंद ठेवून हा कार्यक्रम आयोजित केला होता.   त्याच्या उरलेल्या कामाचा त्याने फडशा पाडला आणि  साडे पाच वाजता घराचा रस्ता पकडला .


घरी येताच त्याने बाबांना त्याच्या प्रमोशनची आणि बदलीची माहिती दिली .  सोमवार पासून त्याला शिवाजी नगर ब्रँचला जावे लागणार होते. त्यासाठी घरातून कमीत कमी अर्धा ते पाउण तास लवकर निघावे लागणार होते.  सकाळच्या घाईत स्वयंपाक करणे  शक्य होणार नव्हते म्हणून त्याने खानावळीचा डब्बा लावला आहे हेही सांगून टाकले .


त्याच्या प्रमोशनच्या बातमीने खुष झालेल्या बाबांनी मात्र डब्बा लावला आहे ह्या बातमीवर नाराजी व्यक्त केली.   आणि त्याच्यावर तोंडसुख घ्यायला सुरवात केली.  त्यांना काही सांगितले तरी ते काहीच ऐकून घेणार नाही आणि त्याची अडचण ही समजून घेणार नाही हे त्याला पक्के ठाऊक होते.  म्हणून त्याने तिथून काढता पाय घेतला .


त्याने स्वतः साठी फक्कड चहा बनविला , हातात आवडते पुस्तक घेतले आणि खोलीत पलंगावर अगदी आरामात पाय पसरून  बसला .  आज आपल्याला स्वयंपाक करायचा नाही ह्या भावनेनेच त्याला फार हायसे वाटत होते.  


तिकडे बाबांची चिडचिड चालूच होती . तिकडे पूर्णतया दुर्लक्ष करून  तो वाचनात गुंग होऊन गेला .  


मध्ये उठून त्याने घरभर दिवे लावले .  बाबांना काही हवे आहे का विचारले .  त्यांनी तुसडेपणाने नकारात्मक मान हलविली .   ह्यांच्या अशा तुसडेपणा मुळेच आई घर सोडून गेली असावी .  त्याच्या मनात झटकन विचार चमकून गेला . तो विचार त्याने  पटकन झटकून टाकला .


तो लगेच पुन्हा खोलीत येऊन आपल्या वाचनात रमला.


साडे आठ वाजता बरोबर  बेल वाजली आणि तो शर्ट घालत घालतच पुढे आला. 


दारात सुमती डब्बा घेऊन उभी होती .   आज तिच्याबरोबर रेवती आली नव्हती .


"अरे,  आज रेवती नाही आली का?" त्याने उगीचच विचारायचे म्हणून विचारले.


"नाही.  काही काम होते का तिच्याकडे ? " तिने प्रतिप्रश्न  केला. 


त्याला उगीचच वाटून गेले तिचा स्वर जरा तीक्ष्ण आहे.


" नाही नाही , मी सहजच विचारले "


" ठिक आहे , निघते मी ." असे म्हणत तिने पाठ फिरवली.


तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे तो अनिमिष नेत्राने पहात तिथेच उभा राहिला.


आतून बाबांचा तिरकस स्वर उमटला , "आला वाटते खानावळीचा थंडगार, बेचव डब्बा.  आता नशिबात तेच खाणे असेल तर काय करणार?  आणा आता,  लवकर  वाढा . गिळतो कसातरी ?"


बाबांचे तिरकस बोलणे ऐकून तो आत वळला .  म्हणजे ह्याना आत्तापर्यंत कळलेच नाही की ते गेले तीन दिवस खानावळीचेच  जेवण जेवत होते.


त्याच्या चेहर्‍यावर मंद स्मित झळकले .  त्याने घाईघाईने डब्बा उघडला . लसणाच्या चटणीचा खमंग वास घरभर पसरला.   गरमागरम मुगाची खिचडी , मऊसूत भाकर्‍या , पिठलं,  तळलेल्या लाल मिरच्या , कांद्याची कोशिंबीर आणि ताक . ते सगळे पाहून तोच खूप खुश झाला .


"व्वा,  असे गरमगरम जेवण आयुष्यभर आयते वायते मिळाले तर काय मज्जा येईल "  तो स्वतःशीच  बडबडला .  आणि दुसर्‍याच क्षणी चपापला .  हे काय आपल्या मनात  चालू आहे ?


पटकन बाबांना वाढून त्यानेही जेवणावर आडवा हात मारला.  इतके व्यवस्थित जेवण पाहुन बाबांची  बोलती बंद झाली होती . पण हे कबूल  करायची त्यांची तयारी नव्हती .


त्यांच्या प्रतिक्रिये कडे फारसे लक्ष न देता . त्याने चटचट  कामे आटोपली. खोलीत जाऊन मघाचे पुस्तक वाचण्यात तो गुंगून गेला.  वाचता वाचता केंव्हा तरी त्याचा डोळा लागला . 


भविष्याची मस्त स्वप्ने पाहण्यात तो रमला होता . मधेच त्या स्वप्नात सुमती डोकावली .  ती त्याला हाताला धरून ओढत कुठे तरी घेऊन जात होती . तो नको नको  म्हणून ओरडत उठला .  जशी जाग आली तसे त्याच्या लक्षात आले आपण स्वप्न पाहत होतो.  दिवा बंद न करताच तो  झोपला होता. उठून त्याने दिवा बंद केला.  घड्याळाने दिलेले तीनचे ठोके त्याने ऐकले . आणि बराच वेळ तो कूस बदलवत झोपेची आराधना करत राहिला. 


भेटू या उद्याच्या भागात .....


तुम्ही मात्र मला स्टिकर्स आणि समीक्षा द्यायला उद्याची वाट पाहत बसू नका . आत्ताच द्या बर का.


🧚‍♂️ ❤️ 🧚‍♂️ ❤️ 🧚‍♂️ ❤️ 🧚‍♂️ ❤️ 🧚‍♂️ 


......... ......... .........   क्रमशः 



©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 



1 comment:

  1. व्वा 👌
    खूप छान कथानक सुंदरच लेखनशैली 👌
    आबा
    👍

    ReplyDelete

Welcome

संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर

 ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात,  किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...