नवीन बाळ घरात आले आणि घरातील वातावरण बदलले. वातावरण जरी बदलले तरी स्वभाव कसा बदलणार? फक्त त्या स्वभावाला तात्पुरती मायेची झालर जोडली गेली.
शंकरही बदलीच्या गावी एकटा राहून कंटाळला होता. बारशाच्या निमित्ताने तो सुट्टी घेऊन आला. मोठ्या धुमधडाक्यात बारसे आटोपून तो बायको मुलासह आपल्या गावी परतला.
पुन्हा एकदा वाड्यात पुरुषी साम्राज्य सुरू झाले. जो तो आपापल्या कामात गुंतून गेला .
तात्या क्लासेस, कोर्ट , शेती ह्यात रमून गेले . शंकरच्या लग्नाचा भपका पाहिल्यावर नातेवाइकांना तात्याच्या अस्तित्वाची नव्याने जाणीव झाली होती . नातेवाईक, येणारा-जाणारा, पै पाहुण्याने घर गजबजू लागले.
इंद्रा आपल्या नोकरी , कॉलेज , मित्र, अभ्यासात गुंग झाला. लाॅच्या अभ्यासात त्याला गोडी निर्माण झाली आणि त्यानी भरारी घेण्यास सुरवात केली. ग्रॅज्युएशन, पोस्टग्रॅज्युएशन ह्या पायर्या तो भराभर यशस्वीपणे चढला. पोस्टग्रॅज्युएशनला तर तो पहिला आला .
ह्याच बरोबर तो गर्वाने सुद्धा फुगू लागला. सामाजिक संपर्क वाढला . मोठ्या मोठ्या वकील आणि जजशी ओळखी वाढल्या. अर्थात हे सर्व प्राप्त करण्यामागे त्याची प्रचंड मेहनत होती हे नाकारून चालणारच नाही.
तात्यांनाही त्याच्यातील बदल जाणवला. त्याचबरोबर त्यांच्या हेही लक्षात आले की आपल्या कोर्ट कचेरीच्या कामा साठी उत्तम प्यादे आहे . इंद्राच्या मग्रूर स्वभावाला ते नकळतपणे खत पाणी घालू लागले.
चलाख इंद्राच्याही लक्षात ही गोष्ट आली. तात्यांना खुष ठेवले तर ते आपल्यावर मेहेरबान असतात हे त्याच्या लक्षात आले.
आता त्याने पूर्वीच्या नोकरीला रामराम ठोकला आणि त्याने कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी स्विकारली . उंचपुरा , टापटीप राहणारा , तरुण आणि सगळ्यात मुख्य विषय सुलभतेने समजावून सांगणारा शिक्षक ह्या गुणां मुळे तो विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक बनला.
नोकरी होती , नाव , प्रतिष्ठा मिळत होती. भरीस भर म्हणून आता इंद्राने पी.एचडी. चा फॉर्म भरला होता आणि त्यासाठी तो जीव ओतून अभ्यास करत होता.
ह्या सगळ्याबरोबर वय ही वाढत होते. इंद्र लग्नाच्या वयात येऊन पोहोचला होता. मुलीही सांगून येत होत्या . स्वकर्तृत्वावर मोठा झालेल्या इंद्राच्या अपेक्षा ही वाढल्या होत्या .
त्याला सुंदर, सुशिक्षित , कमावती बायको हवी होती. अपेक्षेत बसणारी बायको मिळेपर्यंत थांबायची त्याची तयारी होती . तोपर्यंत पीएचडी चा अभ्यास होताच मन गुंतवायला.
इकडे विष्णुने नवीन व्यवसाय सुरू केला. भांडवलासाठी कर्ज काढले, व्यवसायाची अधिकृत नोंदणी केली. काही पैसे कमी पडत होते. ते त्याने तात्यांना मागितले . तात्या ही कबूल झाले. पण ऐन वेळी पैसे भरायची वेळ आली तेंव्हा तात्यांनी माघार घेतली. पूर्णत्वाला आलेले काम अर्ध्यातून सोडायची वेळ आली .
विष्णुला सर्व गाशा नाईलाजाने गुंडाळावा लागला .
डोक्यावर कर्जाचा बोजा होता. काय करावे , काय करावे ह्या विचाराने डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली .
नातेवाईकांच्या नजरा तीक्ष्ण झाल्या. समारंभ , उत्सव अशा प्रसंगी एकतर त्याला निमंत्रण नसे किंवा बोलवले तरी तो दुर्लक्षित रहात असे.
अशा वेळी विष्णुला तात्या आणि इंद्रा कडून आधार मिळावा अशी माफक अपेक्षा असे . पण
ते दोघे ही इतर आप्तेष्टां प्रमाणे त्याची खिल्ली उडवत असे.
वैतागलेल्या विष्णु समोर तात्यांनी दोन पर्याय ठेवले. एक तर शेती कर किंवा त्यांच्या क्लासेस मध्ये जॉईन हो.
कर्ज फेडण्यासाठी काहीना काही करणे भाग होते . मनावरची मरगळ झटकून विष्णुने क्लासेस घेण्याचे ठरविले . ग्रॅज्युएशन नंतर बांधून ठेवलेला पुस्तकांचा बस्ता त्याने पुन्हा उघडला. आणि मेहनत करायला सिद्ध झाला.
एका विद्यार्थ्यापासून सुरू केलेला शिकवणी वर्ग नावारूपास येऊ लागला . थोडक्या काळात विष्णुने नाव कमावले. कमी फी, जीव तोडून शिकवणे , अगदी कमकुवत विद्यार्थ्यांना सुद्धा समजेल इतक्या सोप्या पद्धतीने शिकविण्याची हातोटी ह्या सगळ्या गुणामुळे विष्णुची कीर्ती दूरवर पसरत होती.
पहिल्या व्यवसायात अपयश आल्यामुळे. विष्णु सावध झाला होता. कर्जाचा डोंगर त्याला घाईने संपवायचा होता. फी मिळाली रे मिळाली की तो त्या दिवशीच्या दिवशी कर्जदाराला पैसे देऊन येत असे. कर्ज फिटे पर्यंत त्याने ना नवीन कपडे घेतले ना नवीन चप्पल. अत्यंत प्रामाणिकपणे त्याची अखंड मेहनत चालू होती . हळूहळू त्याने आपल्यावरील सर्व कर्ज फेडले. विष्णु ही मार्गी लागला.
इंद्राला मुली सांगून येतच होत्या़. आणि तो मनाजोगी मुलगी मिळायची वाट पहात होता . आणि त्याची इच्छा लवकरच पूर्ण झाली. त्याच्याच कॉलेज मध्ये शिकविणाऱ्या मंजिरी सातपुतेचे स्थळ चालून आले . टपोऱ्या डोळ्याची, गौर वर्णाची , स्थूलतेकडे झुकणारी मंजिरी त्याला भावली. त्याच्या पुढे थोडी स्थूल जरी वाटत होती तरी बाकी गोष्टींचा विचार करता त्याने त्या स्थळाला होकार दिला . होकार देण्याचे दुसरे कारण असे की तिचा चुलत भाऊ सुप्रीम कोर्टात जज होता. पुढे मागे त्याला ह्या गोष्टीचा फायदाच होणार होता.
आई , वडील , मंजिरी आणि माधुरी असे छोटे चौकोनी कुटुंब . वडील मोठ्या हुद्द्यावर होते. पदरी माया भरपूर जमवली होती . माधुरी आणि मंजिरी रुपाच्या बाबतीत दोन टोक होती. मंजिरी रूपवती तर माधुरी ठेंगणी , लठ्ठ, दात पुढे , फेन्द्र्या नाकाची. नुकतीच एमेस्सी झालेली . वडीलांना तिच्या लग्नाचा घोर होता. मंजिरीचे हात पिवळे झाले की लगोलग तिच्या लग्नाचे पहायचे त्यांनी ठरवून टाकले होते.
जेंव्हा इंद्राने मंजिरीला होकार कळविला तसे तिचे वडील फारच खुष झाले . एव्हढा मोठा वाडा , राहणारे तिघेच , आपली पोरगी राज्य करेल. त्यांच्या स्वप्नांना पंख फुटू लागले होते .
धुमधडाक्यात लग्न झाले . मंजिरी माप ओलांडून इंद्राच्या घरी आली.
चला पाहूया इंद्राचे, विष्णुचे आयुष्य आता कसे वळण घेते. ..........
क्रमशः
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
ह्या कथेशी जर कोणालाही स्वतः च्या वा जवळच्या कुणाच्याही आयुष्याशी साधर्म्य आढळले तर तो योगायोग समजावा .
Kavyapushpa-kavitri-aanuradha Marathi free literature's and poems love poems छान मराठी पुस्तके उत्तम मराठी छान कथा कादंबरी देखील वाचा, ई-बुक्स Marathi Books, Marathi ebook epustak ई-साहित्य .
Sunday, 14 August 2022
द्वेष : मनाचे एक काटेरी टोक भाग ४
Subscribe to:
Post Comments (Atom)
Welcome
संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर
ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात, किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...
-
मागच्या भागात काय झाले ...... कामाच्या गडबडीत तो तहान, भूक , घर, बाबा, खानावळीचा डब्बा सगळेच विसरला. आठ वाजले तसे प्यून त्याच्या आजूबाजूला...
-
शंकर इंजिनियर झाला, नोकरीला लागला . नोकरी निमित्ताने त्याची वेगवेगळया गावात, शहरात बदली होत असे. आधी शिक्षणामुळे आणि आता नोकरीमुळे सतत बा...
-
नवीन बाळ घरात आले आणि घरातील वातावरण बदलले. वातावरण जरी बदलले तरी स्वभाव कसा बदलणार? फक्त त्या स्वभावाला तात्पुरती मायेची झालर जोडली गेली....
No comments:
Post a Comment