Tuesday, 12 July 2022

जावईपूरम् भाग 3

 वैभव सकाळी अगदी ४ वाजतापासून जागा होता . रात्री ही त्याला शांत झोप लागली नव्हती. काहीतरी भयानक स्वप्ने पडून तो थोड्या थोड्या वेळाने जागा होत होता.


आता आपल्यासमोरचे सगळे पर्याय संपले हे त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्याने आता आपल्या मनाची तयारी केली होती . 


पटकन उठून त्याने आपले नियमित कामे भरभर आटोपली . आईवर कमीत कमी कामाचा भार पडावा  अशी त्याची इच्छा होती.  तिच्यापुढे गरमागरम चहाचा कप ठेवला . हसतमुखाने देवाला आणि आईला नमस्कार करून तो जायला सज्ज झाला .


बरोबर सकाळी ६.३० वाजता त्याच्या दारासमोर  जावईपूरम् ची गाडी उभी राहिली.  त्यातल्या ताईने पटकन उतरून वैभवचे अभिनंदन केले आणि आवश्‍यक ती कागदपत्रे त्याच्या आईच्या सुपूर्द केली. तिच्या सहकारी ताईने वैभव च्या मदतीने त्याचे सामान गाडीत टाकले आणि तिघानी आईला टाटा केला. 


वैभव च्या  आयुष्याची गाडी आता वेगळया वळणावरून धावू लागली होती.


त्याच्या घरात आणि आता तो ज्या भागात जाणार होता त्या भागात केवळ एका उंच भिंतीचे  अंतर होते तरी  तिकडे एंट्री घेण्यासाठी जवळपास 3 किलोमीटर चा वळसा देऊन जावे लागत असे .


त्या रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्यामुळे आणि सकाळची वेळ असल्यामुळे १५ व्या मिनिटाला ते एका खूप मोठ्या दारासमोर येऊन पोहोचले . दाराच्या आत गेल्यानंतर एका पाटीवर मोठ्या अक्षरात सुस्वागतम असे लिहिले होते .  तिथून थोडे पुढे गेले गेल्याबरोबर दुतर्फी असलेल्या मोठमोठ्या वृक्षांच्या साह्याने घोषणा पत्रक लागले होते 

           बेटी बचाओ , बेटी पढाओ


            बेटी हिंदुस्थान की शान है 


हळूहळू वैभव वर ताण येऊ लागला होता . इतक्यातच त्यांची गाडी थांबली आणि वैभवला खाली उतरण्यास सांगितले गेले.   त्याचे सामान त्याच्या पर्यंत नंतर पाठविण्यात येणार होते.


तो खाली उतरला आणि पुढे चार पावले चालत नाही तोच त्याच्या समोर त्याच्या आईने निवडलेल्या चार मुली आई बाबा सह त्याच्या स्वागताला सज्ज होत्या .



एक मुलगी आलेली नव्हती पण तिचे बाबा मात्र हजर होते. सगळ्यानी  टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले .  त्यातला एका स्त्रीने त्याला इथे पाळावयाचे नियम समजावून सांगितले .


त्यानंतर दुसर्‍या स्त्रीने घोषणा केली ...


ज्याना वैभव ला नाकारायचे असेल त्यांनी आत्ताच आपला नकार कळवावा.  कारण त्यानुसार वैभव ला कोणाकडे किती दिवस राहावे लागणार ते ठरवावे लागणार होते .


वैभवला वाटले इथे आपला लिलाव चाललाय की  काय? हा अनुभव त्याच्यासाठी फारच क्लेशदायक होता. त्याच्या निवडीला येथे प्राधान्य नव्हते .


त्यातल्या तीन मुलींनी माघार घेतली होती. त्यांनी दिलेली कारणे अशी होती ..


व्हीडिओ मध्ये जितका चटपटीत दिसत होता तेवढा हा प्रत्यक्षात दिसत नाही आहे . मला वेळेत नाश्ता तरी करून देईल का ह्याची शाश्वती वाटत नाही.....


ह्याची शरीरयष्टी छान आहे पण ह्याने जो शर्ट घातला आहे त्याचा रंग माझ्या आवडीचा नाही. तसेच त्याच्या दाताची ठेवण आणि केसांचा रंग मला आवडला नाही़ ....


तिसरी ने सरळ सरळ सांगितले हा माझ्या स्वप्नातील राजकुमार नाही....


जावईपूरम् मधला पहिला अनुभव  वैभवला पचवणे अवघड होत होते . पण काय करतो ? आलीय भोगासी असावे सादर ...


त्या तिघी तिथून निघून गेल्या . उरलेल्या मुलीने सांगितले मी दोन दिवस आधी तुझे सगळे काम पाहीन त्यानंतर मी तुला  हो किंवा नाही म्हणीन. 


पाचव्या मुलीच्या बाबांनी तत्परतेने सांगितले ......


डिकरा मंग तू अशे कर तूच पहिले हेला आपल्या संगट घेऊन जा .


बहुदा त्याला ह्या  मुलीच्या स्वभावाची पूर्ण कल्पना असावी आणि ती नाही म्हणणार ह्याचीही खात्री असावी ....


अगदी  हाच विचार वैभवच्या मनाला चाटून गेला. पण  त्याच्या मनाचा विचार कोणीच करणार नव्हते . जो आदेश येईल त्याप्रमाणे वागायचे असे आईने १०० वेळा बजावले होते .


त्या मुलीचे नाव लतिका सुभेदार होते . तिच्या पाठोपाठ जाणे आता अपरिहार्य होते . तिच्या घरात शिरल्या बरोबर तिने आदेश सोडला ...


वैभव माझ्या ह्या चपला त्या स्टँड वर ठेव आणि घरातल्या घेऊन ये. लवकर ...


बिचारा वैभव . चुपचाप कामाला लागला . तिच्या चपलेच्या रॅक पाशी तो थबकला आणि नेमकी कोणती चप्पल न्यावी या विचारात पडला . कारण तिथे कमीत कमी १५ चपले चे जोड होते . तेवढ्यात जोरात खेकसत लतिका तिथे पोहोचली ए वेंधळा लवकर चा अर्थ नाही समजत का ?


वैभवाने पटकन हाती येईल त्या चपलेचा जोड तिच्यासमोर ठेवला आणि तिथून आपल्या जाण्याचा मार्ग जवळपास निश्चित केला .


  कारण घाईघाईत त्याने एक चप्पल गुलाबी आणि एक चप्पल निळी उचलून तिच्यासमोर ठेवली होती. त्याच्याकडे रागारागाने कटाक्ष टाकला आणि दुसरी गुलाबी घेऊन ती तरातरा चालली गेली.


अरे बापरे ही तर लवंग लतिका दिसतेय. तिथून तो पुन्हा हॉल मध्ये आला . आपल्या चुकीची त्याला आता लाज वाटू लागली.


तेवढ्यातच लतिका तिच्या आई बरोबर तिथे आली. लतिका च्या आईने त्याला कडक शब्दांत समज दिली. सगळ्या कामांची यादी त्याचा हातात देऊन त्याला किचन कडे येण्याचे फर्मान सोडले .


सगळ्या वस्तूंच्या जागा सांगून अर्धा तासात नाश्ता बनवायला सांगितले. 


१. लतिका साठी व्हेज सँडविचेस 


२. तिच्या बाबासाठी ब्रेड-बटर आणि त्याबरोबर ओल्या नारळाची चटणी.


३. आईसाठी ऑम्लेट ब्रेड आणि ग्रीन सॅलड. 


४. लतिका ची लहान बहीण... रसिका साठी फ्रूट स्मुदी


आणि हे सर्व अर्ध्या तासात . ....


वैभव  ने आपले सर्व कौशल्य पणाला लावले आणि सर्व नाश्ता तयार केला.  टेबल वर सर्व नीटपणे लावताना त्याने घड्याळ पाहिले ........ .. तो पाच मिनिटे लेट होता . कोणाकडे पहायची त्याची हिम्मत झाली नाही. 


सगळ्यानी तोंड वाकडे करत नाश्ता फस्त केला  पण त्याचे किंचितही कौतुक केले नाही. त्याला स्वतः साठी काहीतरी करून खाऊन घेण्यासाठी सांगून ते निघण्याच्या तयारीत असतानाच रसिका चिवचिवली....


माझे होणारे जीजू यू आर द बेस्ट 


तिच्या ह्या वाक्या साठी लतिका ने तिच्या पाठीत एक जोरदार रट्टा दिला .


तिला तसच मुसमुसत ठेवून वैभव सगळे सामान आवरून किचन मध्ये  घेऊन गेला .  त्याला पुढची कामे वेळात आवरायची होती .


दोन ब्रेड भाजून बटर लावुन त्याने कशीबशी संपविली ...


भांडी डिश वाॅशर मध्ये टाकली आणि पुढच्या कामाला लागला ....


आपण नाकारले जाणार असे त्याला वाटत होते...


पण अजून १½ दिवस तर तिथेच काढावा लागेल हे त्याला माहीत होते   ...


चला एव्हढ्यात आपण आपल्या बद्दलचे मत बदलविण्याचा  प्रयत्न करू या.  


कारण कुठेतरी लतिका कडे त्याचे झुकते माप होते ....


पण मनातील गोष्ट कोणाकडे बोलायची सोय नव्हती....


                                          क्रमशः 


©️®️ सौ.मंजूषा श्रीकांत अपराजित 

❤️🌷❤️🌷❤️🌷❤️🌷❤️🌷❤️🌷


मुलांच्या आयांनो आपल्या मुलाची तगमग 

पाहवेलं का ?  तो असा जुन्या काळातल्या सासुरवाशीण सारखाच छळ सोसत आहे , ही कल्पना कशी वाटते ? 


त्रास होतोय ना ? 


असे घडू न देणे तुमच्याच हातात आहे. आपल्या उदरात वाढणार्‍या मुलीचा गर्भ पाडू नका . खंबीर पणे विरोध करा .


म्हणजे असा प्रसंग तुमच्या मुलाच्या बाबतीत घडणार नाही.


कथा मनापासून वाचा . अतिरंजित गोष्टी हसून सोडून द्या .

No comments:

Post a Comment

Welcome

संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर

 ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात,  किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...