एखाद्याच्या मनात किती द्वेष असू शकतो ? तोही स्वतः च्या भावंडां विषयी ? इतका द्वेष की मोठा भाऊ शप्पत घेतो की लहान भावाला रस्त्यावर आणीन नाहीतर नाव बदलेन. काय ही मनोवृत्ती ?
ह्या घटनेची सुरवात पहा कशी झाली ...
तो काळ साधारण १९४० चा असावा ...
ते शहर तेंव्हा इतके प्रगत नव्हते झाले. माणूस थोडीफार माणुसकी जपून होता . फ्लॅट सिस्टमने अजून त्या शहरात प्रवेश केला नव्हता . वाडा संस्कृती अजून तग धरून होती .
अशा त्या समयी शहराच्या गजबजलेल्या भागात अजिंक्य यांचा वाडा होता. घरात म्हातारी झालेली तरीही कणखर असणारी आई होती . तिचे चार मुले .
मोठा दादा . अतिशय सहिष्णू वृत्तीचा, देवभोळा.
अतिशय हुशार. अतिशय प्रामाणिक.
त्याची बायको सरिता. नवर्याच्या अति शांत स्वभावा मुळे गांजलेली . मूल नसल्यामुळे सगळ्या दीर जावांच्या हेटाळणीचा विषय झालेली. त्यामुळे नवर्याशी सतत भांडणारी .
जेंव्हा सगळ्या गोष्टींचा अतिरेक होऊ लागला तेंव्हा दादाने आपली बदली दूरच्या गावी करून , बायको बरोबर तिथेच आपले बिऱ्हाड हलवले, पुन्हा एकत्र कुटुंबात न येण्यासाठी .
दुसरा तात्या . तिसरा नाना आणि शेंडेफळ आप्पा.
सगळेच सरस्वती चा आशीर्वाद घेऊन आलेले . आपापल्या क्षेत्रात आघाडीवर असलेले.
पण ह्यांची शिक्षण पूर्ण होऊन ते कमाईपुत होण्याआधी लक्ष्मी जरा रुसली होती. सकाळ संध्याकाळ चे उदरभरण करणे जरा जड जात होते.
अशावेळी दुसर्या मुलाने (तात्यांनी)अतिशय कष्ट करून सगळ्या कुटुंबाला आधार देत भावांची शिक्षण , लग्न लावून देऊन त्यांचे संसार थाटून दिले .
संस्कृत आणि इंग्लिश वर तात्यांनी प्रभुत्व मिळवले. सुरवातीच्या काळात घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना शिकवले , काही महिने शाळेतही शिकवले.
पण त्यांचे ध्येय ह्यापेक्षा वेगळे होते . कोणाच्याही हाताखाली काम करणे त्यांना जमणार नव्हते. विषय सोपा करून शिकविण्याच्या त्यांच्या हातखंड्यामुळे तसेही पाय मागे खेचणाऱ्यांची संख्या वाढतच होती. एकदा एका सहकार्याशी क्षुल्लक कारणासाठी वादंग झाला आणि त्या तिरीमिरीत त्यांनी शाळेला रामराम ठोकला.
पण वाढता प्रपंच आणि जबाबदारी ह्या साठी पोटापाण्याची सोय करणे भाग होते . आणि त्यांनी एक धाडसी पाउल टाकले . विना अनुदानित तत्त्वावर स्वतःचीच शाळा सुरू केली .
त्यांच्या नावाचा आधीच गवगवा होता . शिवाय त्यांची तत्त्व सामान्यातील सामान्यांच्या फायद्याची होती .
नगण्य फी.
तीही न देऊ शकणारा अगदी फुकट शिकू शकणार होता.
गरीब परंतु अत्यंत हुशार विद्यार्थी अगदी त्यांच्या घरी राहून शिकू शकणार होते.
झाले विद्यार्थ्यांचा लोंढा अखंड त्यांच्याकडे वाहू लागला . त्यांनी घडवलेले कित्येक विद्यार्थी मोठमोठ्या हुद्द्यावर चढून त्यांच्या नावाची गरिमा वाढवतच होते. यशाची झिंग डोक्यात भिनु लागली होती.
तात्यांनी आता मोठ्ठा वाडाच विकत घेतला. बायको, तीन मुलं, आणि म्हातारी आई ह्यांच्या सकट गृहप्रवेश केला. आधीचा राहता वाडा नानाच्या नावे करून दिला . धाकटा आप्पा स्वतःच्या मेहनतीने नोकरीला लागला होता आणि बदली होऊन दुसर्या गावी बायको मुलांसकट स्थायिक झाला होता .
सगळे छान चालले आहे असे नियतीला कधीच पाहवत नाही .
अचानक नशिबाने ठोकर मारली आणि छोट्या आजाराचे निमित्त होऊन तात्यांची पत्नी कालवश झाली .
तात्या सैरभैर झाले. तीन मुले आणि म्हातारी आई ह्याना कसे सांभाळावे हा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर होता . त्यावेळी तात्यांचा मोठा मुलगा शंकर जेमतेम ९ वर्षाचा , दुसरा इंद्र ७ वर्षाचा आणि धाकटा विष्णु तर ५ च वर्षाचा होता.
तात्यांनी ज्यांना ज्यांना अडचणीत हात दिला ती सर्व भावंडं दुरूनच सहानुभूती दाखवून आपापल्या कामाला लागली होती. म्हातारी आईने वाकलेल्या कंबरेने आणि थरथरत्या हाताने स्वयंपाक घराचा ताबा घेतला आणि अन्नपूर्णा बनून तात्यांच्या आणि तीन लहानग्यांची पोटाची खळगी भरू लागली.
ह्या आघाताने तात्या निर्लेप झाले . शाळेचा मोठा फाफटपसारा त्यांनी आवरता घेतला . फक्त आपल्या दोन विषयांचे शिकवणी वर्ग चालू केले.
अजिंक्य शिकवणी वर्ग .
एक आई सोडली तर त्यांचे घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. पहाटे ५ ते रात्री १० त्यांनी पूर्णपणे स्वतःला झोकून दिले.
शंकर, इंद्र आणि विष्णु मोठे होत होते. कुणाचाही अंकुश नसल्यामुळे मनमर्जीने वागत होते. नातेवाईकांच्या आणि शेजारच्यांच्या टीकेला पात्र ठरत होते.
काय होणार ह्यांच्या भविष्याचे? काळाच्या उदरात त्यांच्यासाठी काय दडले होते ?
पाहूया पुढच्या भागात .....
तोपर्यंत तुमच्या समीक्षा येऊ द्यात .....स्टिकर द्या ....स्टार्स द्या .
क्रमशः
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
ह्या कथेशी जर कोणालाही स्वतः च्या वा जवळच्या कुणाच्याही आयुष्याशी साधर्म्य आढळले तर तो योगायोग समजावा .
Kavyapushpa-kavitri-aanuradha Marathi free literature's and poems love poems छान मराठी पुस्तके उत्तम मराठी छान कथा कादंबरी देखील वाचा, ई-बुक्स Marathi Books, Marathi ebook epustak ई-साहित्य .
Wednesday, 3 August 2022
द्वेष: मनाचे एक काटेरी टोक
Subscribe to:
Post Comments (Atom)
Welcome
संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर
ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात, किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...
-
मागच्या भागात काय झाले ...... कामाच्या गडबडीत तो तहान, भूक , घर, बाबा, खानावळीचा डब्बा सगळेच विसरला. आठ वाजले तसे प्यून त्याच्या आजूबाजूला...
-
शंकर इंजिनियर झाला, नोकरीला लागला . नोकरी निमित्ताने त्याची वेगवेगळया गावात, शहरात बदली होत असे. आधी शिक्षणामुळे आणि आता नोकरीमुळे सतत बा...
-
नवीन बाळ घरात आले आणि घरातील वातावरण बदलले. वातावरण जरी बदलले तरी स्वभाव कसा बदलणार? फक्त त्या स्वभावाला तात्पुरती मायेची झालर जोडली गेली....
No comments:
Post a Comment