Wednesday, 12 July 2023

आई नसलेले घर : पर्व १ : भाग १

सुमतीला जाऊन १५ दिवस झाले होते.  पण येणाऱ्यांची संख्या काही कमी होत नव्हती .  सगळ्यांची उस्तवार करता करता तिची मुलगी पूर्वा थकून जात होती.  

तिची मोठी बहीण अपूर्वा  अमेरिकेत होती.  त्यात तिची नुकतीच म्हणजे आई जायच्या आदल्या दिवशीच डिलिव्हरी झाली होती.   आईचे शेवटचे दर्शनही तिला घेता आले नव्हते.  तिला दुसरा मुलगा झाल्याचे आईने ऐकले आणि त्यानंतर पाचच मिनिटातच तिने डोळे मिटले होते.

ना आई आजारी होती ना अंथरूणावर झोपून होती .

नेहमीप्रमाणेच सकाळची सगळी काम तिने आटोपली होती. 

काल संध्याकाळीच अपूर्वाचा फोन आला होता की  ती  अ‍ॅडमिट होतेय.  तिच्या मुलीला सांभाळायला सासू सासरे आलेत. त्यामुळे काळजी करू नको.

.........................................................
चला जरा पूर्वेतिहास पाहू या ...

अपूर्वा,  पूर्वा ,बाबा रमाकांत , आई सुमती  आणि शेंडेफळ अपूर्व असे ते  देशमुखांचे कुटुंब . 

रमाकांत अत्यंत कर्मठ.  तेव्हढाच प्रामाणिक, कष्टाळू.  पण घरात वावरताना आपल्या मतांबाबत अति आग्रही असणारा . 

घराबाहेर प्रत्येकाशी गोड बोलणारा . प्रत्येकाच्या अडचणी समजून घेऊन त्याप्रमाणे वागणारा, त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणारा . 

त्यामुळे  बाहेर त्याची ख्याती एक अत्यंत सुस्वभावी,  गुणी माणूस अशीच होती .

घरात शिरता शिरता रमाकांतचा  हा मुखवटा  गळून पडत असे . मुळात स्त्री विषयी मनात घृणा  असलेला हा मनुष्य.  कारणही जबरदस्त.  

ह्याच्या जन्मानंतर आईने, वडीलांच्या त्रासाला कंटाळून कोणालाही न सांगता गृहत्याग केला.  ती माहेरी ही  नाही  गेली .   पुढे तिचा कधीही पत्ता लागला नाही .

लोक प्रवादाला घाबरून वडीलांनी चक्क तिला चारित्र्यहीन ठरविले आणि मोठ्या होत चाललेल्या मुलाच्या मनात ही तेच विष कालवत गेले. 

एकदाच तो आईच्या आठवणीने  खूप रडला होता. त्या दिवशी त्याच्या बाबांनी त्याला खूप बदडून काढले होते.  ह्या घरात तिचे पुन्हा  नाव काढायचे नाही म्हणून त्याला तंबी दिली होती. तसेच बाहेर कोणालाही आपले दुःख  दिसले नाही पाहिजे ही जरबही दिली होती . त्यामुळे घराबाहेर हसतमुखाने राहायचे आणि घरात शिरल्यावर  राग राग व्यक्त करायचा , हा त्याचा स्वभावधर्म  झाला होता .

लहान असताना  आईविना पोर म्हणून आजूबाजूचे  सहानुभूती दाखवत ती त्याला असह्य होत असे.

कधी मित्रांच्या आईने हातावर खाऊ ठेवला की तो त्याला नकोसा होत असे .

असे प्रसंग घडले की तो घरी येऊन आदळआपट करीत असे. 

मनात कटू भावना ठेवत रमाकांत लहानाचा मोठा झाला.  समस्त स्त्री जाती विषयी मनात तुच्छतेची भावना सरत्या काळाबरोबर वाढतच गेली.

शिक्षण आटोपले . बँकेत लगेचच नोकरी लागली.  आता वडील ही म्हातारे झाले होते.  जो पर्यंत त्यांना झेपत होते तोवर ते स्वतः घरातील कामे करत. स्वयंपाकाला सुद्धा त्यांनी बाई ठेवली नव्हती.

पण अलीकडे त्यांना सर्व कामे जमत नव्हती .  रमाकांत ती कामं करून घेत होता पण त्यामुळे त्याची तारेवरची कसरत होत होती.  

त्यातच एक दिवस वडील पडले आणि त्यांनी अंथरूण धरले .  रमाकांतची अजूनच ओढाताण होऊ लागली .  वडिलांची सेवा , त्यांचे औषधपाणी , त्यांचे पथ्य,  घरातली सगळी कामं  आणि हे सगळे आटोपून  वेळेत बँक गाठायची.

प्रमोशन ड्यु असल्यामुळे सुट्टीही घेणे शक्य नव्हते. 

थकून भागून घरी आल्यावर पुन्हा  कामांची यादी तयारच असायची .  जोडीला दिवसभर घरात एकटेच राहावे लागल्यामुळे बाबांची कुरकुर चालूच रहायची.  

तरी बरे घर आणि बँक वॉकिंग डिस्टंस वर  होते.  लंच ब्रेक मध्ये रमाकांत घरी येऊन बाबांना हवे नको  पाहून जात असे .  ते नीट जेवले की नाही ह्याकडेही  त्याचे बारीक लक्ष असे.

त्याच्या बँकेतल्या एका सहकार्‍याला त्याची अडचण कळली .  त्याने  त्याला एका घरगुती खानावळीचा पत्ता दिला.  त्या खानावळ चालवणार्‍या काकू घरपोच डब्बे ही देतात असेही सांगितले .

पण रमाकांतने सुरवातीला तिकडे दुर्लक्ष केले.  कारण बाबा फार कटकट करतील ह्याची त्याला पूर्ण कल्पना होती .  पण थोड्या दिवसातच तो ह्या सगळ्या  गोष्टीना कंटाळून गेला .

एक दिवस बँकेत भरपूर काम पुरले त्याला.  सगळे आटोपून घरी पोहोचायला त्याला जवळपास आठ वाजणार होते .   गेल्यावर पुन्हा स्वयंपाक करणे त्याच्या जिवावर आले .  

त्याच्या सहकार्‍याने दिलेल्या खानावळीचा फोन नंबर त्याने फिरवला आणि दोघांच्या साठी घरपोच डब्बा साडे आठ वाजेपर्यंत पोहोचवायला सांगितला .

खानावळीचा पत्ता विचारताना त्याच्या लक्षात आले की खानावळ त्याच्या घराच्या मागच्याच आळीत आहे.  

त्याने विचार केला ,आज खाऊन तर पाहूया .  आवडले तर परत मागवता येईल .  तसाही आपल्याला फारसा स्वयंपाक करणे जमत ही नाही  आणि आवडतही नाही.

तेवढ्यातच प्यूनने  येऊन सांगितले की साहेबांनी बोलावले आहे.  मनातला विचार झटकत तो साहेबांच्या  केबिन मध्ये शिरला.

मे आय कम इन ,सर ? 

या या देशमुख , बसा.  फाईल मधले  डोके वर न करता जोशी साहेबानी त्याला खुर्चीवर बसायचा संकेत दिला .

पाच मिनिटे केबिन मध्ये शांतता होती.  काम होताच जोशी साहेब  रमाकांतला म्हणाले ,  "अभिनंदन , तुमचे .  तुमचे प्रमोशन झालेय.   क्लास वन ऑफिसर झालात आता तुम्ही .  

तुमची बदली  शिवाजीनगर ब्रँचला झालीय.   आठ दिवसात तुम्हाला  तिथे जॉईन व्हायचे आहे . "

प्रमोशनच्या  नावाने हसरा झालेला रमाकांतचा  चेहरा बदलीच्या नावाने खाडकन उतरला.

शिवाजी नगर ब्रँच म्हणजे घरापासून तासभराच्या अंतरावर. दहा वाजता ऑफिस गाठायचे म्हणजे  नऊ वाजताच घर सोडावे लागणार .  त्याआधी घरची सगळी काम आटोपून , बाबांची आंघोळ , नाश्ता,  औषधपाणि ,  बापरे  चांगलीच धावपळ होणार .

काय झाले देशमुख ?  आनंद नाही झाला का तुम्हाला ?

भानावर येत रमाकांत म्हणाला , " असे नाही सर,  आनंद तर झालाय , फक्त बाबांचा विचार मनात आला म्हणून थोडा विचारात पडलो "

"देशमुख ,  आता  पटकन लग्न करून टाका. म्हणजे तुमची बाबांविषयीची काळजी दूर होईल .  घरी हक्काचे माणूस राहील .  चवीढवीचे  खायला मिळेल .  आता पगारवाढ ही झालीय म्हणजे कोणीही डोळे झाकून मुलगी देईल ."  ज्येष्ठत्वाच्या  नात्याने जोशी सरांनी हसत हसत सल्ला दिला. 

रमाकांतने फक्त चेहरा हसरा केला  आणि म्हणाला, " सर येऊ आता ."

हो, हो  अवश्य  . पुनश्च एकदा अभिनंदन.  

जोशी सरांच्या केबिन बाहेर येताच त्याचे सहकारी त्याच्या भोवती जमा झाले आणि त्यांनी त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव केला . 

प्रत्येकाचे अभिनंदन स्विकारत तो आपल्या खुर्चीकडे निघाला तोच स्त्री वर्गाने त्याला गराडा  घातला.

कधीही कोणाही स्त्रीला हाय हॅलो न म्हणणारा रमाकांत गडबडून गेला . 

साधारण त्याच्याच वयाची लोन डिपार्टमेंटची सरिता चिवचिवली,  "अभिनन्दन रमाकांत,  पार्टी द्या आता आम्हाला."

पेन्शन डिपार्टमेंटच्या काकू म्हणाल्या , " रमाकांत खूप खूप अभिनंदन . उद्या तुझ्यासाठी बेसनाचे लाडू नक्की घेऊन येईन हा. "

नव्यानेच जॉईन झालेली  स्मिता गोडबोले, गालावर खळी पाडत , लाजत लाजत शेकहँड साठी हात पुढे करत म्हणाली , " सर,  अभिनंदन".

बावचळून गेलेला रमाकांतला काय करावे ते समजेना . कसेबसे हात जोडून त्यांना धन्यवाद म्हणत आपली सुटका कशी करावी ह्याचा विचार तो करत होता .

त्यांचे प्रश्न त्याच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हते.
त्यांना धड उत्तर ही देऊ  शकत नव्हता .  त्याच्या स्वभावाची पूर्ण कल्पना असलेला प्यून दुरूनच त्याची गम्मत पहात होता.

शेवटी त्याची दया येऊन तो चहा घेऊन आला आणि म्हणाला , "अग तायानों, आपले रमाकांत दादा भारी आहेत बर. त्यांनी मला मघाशीच तुम्हाला सगळ्यांना चा-बिस्किट त्यांच्याकडून द्यायला सांगितले. "

अगबाई हो का ? म्हणत सारा स्त्री वर्ग आता प्यूनच्या  दिशेने झेपावला आणि रमाकांतची सुटका झाली .

खर म्हणजे त्याला प्यूनचा  त्यानी केलेल्या आगाऊपणा बद्दल  खूप राग आला होता .  पण आपल्या सुटकेसाठी त्याने ही युक्ती केली हेही त्याला जाणवले. 

म्हणून वरून हसत हसत पण मनातून चडफडत त्याने सगळ्यांच्या चहा बिस्किटाचे पैसे प्यूनच्या स्वाधीन केले.  आणि तो आपल्यासाठी कामात दंग झाला.

आठ दिवसात इथले काम संपवायची जबाबदारी त्याची होती आणि कामाच्या बाबतीत तो अत्यंत चोख होता.  त्यामुळे त्याचे हात भराभर कामे उरकू लागले .

कामाच्या गडबडीत तो तहान, भूक , घर, बाबा, खानावळीचा डब्बा सगळेच विसरला.  आठ वाजले तसे प्यून त्याच्या आजूबाजूला घुटमळत उभा राहिला. पण त्याला काही फरकच पडत नव्हता.

त्यामुळे शेवटी त्याला आवाज दिला , " रमाकांत सर,  घरी बाबा तुमची वाट पाहत असतील ...."

रमाकांतने घड्याळ पाहिले आणि हडबडून उठत भराभर आपला टेबल आवरून तो घराकडे निघाला सुद्धा. 

चला पाहूया घरापाशी पोहोचता पोहोचता काय काय घडते . पुढच्या भागात पुन्हा भेटू ..

क्रमशः .😀😀

©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित 


Friday, 16 September 2022

स्त्री भ्रूणहत्या (शंकरपाळी काव्य)

 👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦


                    ए

                  आई

                बाबांना 

              थांबव ना 

            भ्रूणहत्या हे 

          पाप आहे सांग

         मी तुझी सानुली

          त्यांची सावली 

             नाव मोठे

               करीन 

                सांग

                  तू 


                 मी 

                तुझी 

               मुलगी 

             आहे जरी 

            सांभाळ तुम्हा 

           दोघांचा करीन 

            पैसा कमविन 

              सुख देईन

              माझ्यातर्फे 

                तुम्हास 

                 जाण 

                   गे



©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित



Tuesday, 6 September 2022

कलाकार मी त्याच्या रंगमंचावरचा

 (मुक्तछंद)


कलाकार मी त्याच्या रंगमंचावरचा ,

वेळेची  किल्ली भरून पाठवलेला , 

किल्ली संपेस्तोवर नाचणारा,

कुणाला हसवणारा,  कुणाला रडवणारा .


तीन अंकी नाटकाचा नायक ही मीच ,

खलनायक ही मीच,  

नायक खलनायकाची लढाई लढणारा, 

कुणाला हसवणारा,  कुणाला रडवणारा.


पहिल्या अंकाची सुरवात होते माझ्या रडण्याने, 

आणि हर्षभरीत प्रेक्षकांच्या आनंदाने. 

अंक संपता संपता आनंदाची जागा चिंतेने व्यापायला लावणारा,

कुणाला हसवणारा,  कुणाला रडवणारा.


पहिल्या अंकाचा शेवट असेल सुखद, तर दुसरा अंक असतो मस्त ,

आशा आकांक्षा,  इच्छा पूर्तीचा.

नसेल तसा तर तरुणपणीच  वार्धक्याला बोलावणारा,

कुणाला हसवणारा,  कुणाला रडवणारा.


तिसरा अंक सगळ्यात मोठा , सुख दुःखाने भारलेला ,

केलेल्या सत्कृत्याचे गोड फळ देणारा, दुष्कृत्याचा  जाब विचारणारा.

सुटणार्‍यांचे हात धरू पाहणारा,  धरलेल्या हातानी सहजपणे  लाथाडलेला,

येतानाही रडलेला , जातानाही रडणारा , हास्य विसरलेला,  

कलाकार मी त्याच्या रंगमंचावरचा ,

वेळेची  किल्ली भरून पाठवलेला.


©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित. 



Sunday, 14 August 2022

द्वेष : मनाचे एक काटेरी टोक भाग ४

 नवीन बाळ घरात आले आणि घरातील वातावरण  बदलले. वातावरण जरी बदलले तरी स्वभाव कसा बदलणार? फक्त त्या स्वभावाला तात्पुरती मायेची झालर जोडली गेली. 


शंकरही  बदलीच्या गावी एकटा राहून कंटाळला होता.  बारशाच्या निमित्ताने तो सुट्टी घेऊन आला.  मोठ्या धुमधडाक्यात बारसे आटोपून तो बायको मुलासह आपल्या गावी परतला. 


पुन्हा एकदा वाड्यात पुरुषी साम्राज्य सुरू झाले.   जो तो आपापल्या कामात गुंतून गेला . 


तात्या क्लासेस, कोर्ट , शेती ह्यात रमून गेले .  शंकरच्या लग्नाचा भपका पाहिल्यावर नातेवाइकांना तात्याच्या अस्तित्वाची नव्याने जाणीव झाली होती . नातेवाईक, येणारा-जाणारा, पै पाहुण्याने घर गजबजू लागले. 


इंद्रा आपल्या नोकरी , कॉलेज , मित्र, अभ्यासात गुंग झाला. लाॅच्या  अभ्यासात त्याला गोडी निर्माण झाली आणि त्यानी भरारी घेण्यास सुरवात केली. ग्रॅज्युएशन,  पोस्टग्रॅज्युएशन ह्या पायर्‍या तो भराभर यशस्वीपणे चढला. पोस्टग्रॅज्युएशनला तर तो पहिला आला . 


ह्याच बरोबर तो गर्वाने सुद्धा फुगू लागला.  सामाजिक संपर्क वाढला . मोठ्या मोठ्या वकील आणि जजशी ओळखी वाढल्या.  अर्थात हे सर्व प्राप्त करण्यामागे त्याची प्रचंड मेहनत होती हे नाकारून चालणारच नाही.


तात्यांनाही  त्याच्यातील बदल जाणवला. त्याचबरोबर त्यांच्या हेही लक्षात आले की आपल्या कोर्ट कचेरीच्या कामा साठी उत्तम प्यादे आहे .  इंद्राच्या मग्रूर स्वभावाला ते नकळतपणे खत पाणी घालू लागले. 


चलाख इंद्राच्याही लक्षात ही गोष्ट आली. तात्यांना खुष ठेवले तर ते आपल्यावर मेहेरबान असतात हे त्याच्या लक्षात आले.  


आता त्याने पूर्वीच्या नोकरीला  रामराम ठोकला आणि त्याने कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी स्विकारली .  उंचपुरा , टापटीप राहणारा , तरुण आणि सगळ्यात मुख्य विषय सुलभतेने समजावून सांगणारा शिक्षक ह्या गुणां मुळे तो विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक बनला. 


नोकरी होती , नाव , प्रतिष्ठा  मिळत होती. भरीस भर म्हणून आता इंद्राने पी.एचडी. चा फॉर्म भरला होता आणि त्यासाठी तो जीव ओतून अभ्यास करत होता. 


ह्या सगळ्याबरोबर वय ही वाढत होते. इंद्र लग्नाच्या वयात येऊन पोहोचला होता. मुलीही सांगून येत होत्या . स्वकर्तृत्वावर मोठा झालेल्या इंद्राच्या अपेक्षा ही वाढल्या होत्या . 


त्याला सुंदर, सुशिक्षित , कमावती बायको हवी होती. अपेक्षेत बसणारी बायको मिळेपर्यंत थांबायची त्याची तयारी होती . तोपर्यंत पीएचडी चा अभ्यास होताच मन गुंतवायला. 


इकडे विष्णुने नवीन व्यवसाय सुरू केला. भांडवलासाठी कर्ज काढले, व्यवसायाची अधिकृत नोंदणी केली. काही पैसे कमी पडत होते. ते त्याने तात्यांना मागितले . तात्या ही कबूल झाले. पण ऐन वेळी पैसे भरायची वेळ आली तेंव्हा तात्यांनी माघार घेतली.  पूर्णत्वाला आलेले काम अर्ध्यातून सोडायची वेळ आली .


विष्णुला सर्व गाशा नाईलाजाने गुंडाळावा लागला .

डोक्यावर कर्जाचा बोजा होता. काय करावे , काय करावे ह्या विचाराने डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली . 


नातेवाईकांच्या नजरा तीक्ष्ण झाल्या.  समारंभ , उत्सव अशा प्रसंगी एकतर त्याला निमंत्रण नसे किंवा बोलवले तरी तो दुर्लक्षित रहात असे.  


अशा वेळी विष्णुला तात्या आणि इंद्रा कडून आधार मिळावा अशी माफक अपेक्षा असे . पण 

ते दोघे ही इतर आप्तेष्टां प्रमाणे त्याची खिल्ली उडवत असे.


वैतागलेल्या विष्णु समोर तात्यांनी दोन पर्याय ठेवले.  एक तर शेती कर किंवा त्यांच्या क्लासेस मध्ये जॉईन हो.  


कर्ज फेडण्यासाठी काहीना काही करणे भाग होते .    मनावरची मरगळ झटकून विष्णुने क्लासेस घेण्याचे ठरविले .   ग्रॅज्युएशन नंतर बांधून ठेवलेला  पुस्तकांचा बस्ता त्याने पुन्हा उघडला.   आणि मेहनत करायला सिद्ध झाला. 


एका विद्यार्थ्यापासून  सुरू केलेला शिकवणी वर्ग नावारूपास येऊ लागला .   थोडक्या काळात विष्णुने नाव कमावले.   कमी फी, जीव तोडून शिकवणे , अगदी कमकुवत विद्यार्थ्यांना सुद्धा समजेल इतक्या सोप्या पद्धतीने शिकविण्याची हातोटी ह्या सगळ्या गुणामुळे विष्णुची कीर्ती  दूरवर पसरत होती.


पहिल्या व्यवसायात अपयश  आल्यामुळे. विष्णु सावध झाला होता. कर्जाचा डोंगर त्याला घाईने संपवायचा होता.  फी मिळाली रे मिळाली की तो त्या दिवशीच्या दिवशी कर्जदाराला पैसे देऊन येत असे.  कर्ज फिटे पर्यंत त्याने ना नवीन कपडे घेतले ना नवीन चप्पल. अत्यंत प्रामाणिकपणे  त्याची अखंड मेहनत चालू होती .  हळूहळू त्याने आपल्यावरील सर्व कर्ज फेडले.   विष्णु ही मार्गी लागला.


इंद्राला मुली  सांगून येतच  होत्या़. आणि तो मनाजोगी मुलगी मिळायची वाट पहात होता . आणि त्याची इच्छा लवकरच पूर्ण झाली. त्याच्याच कॉलेज मध्ये शिकविणाऱ्या मंजिरी सातपुतेचे स्थळ चालून आले . टपोऱ्या डोळ्याची,  गौर वर्णाची , स्थूलतेकडे  झुकणारी मंजिरी त्याला भावली.  त्याच्या पुढे थोडी स्थूल जरी वाटत होती तरी बाकी गोष्टींचा विचार करता त्याने त्या स्थळाला होकार दिला . होकार देण्याचे दुसरे कारण असे की तिचा चुलत भाऊ सुप्रीम कोर्टात जज होता. पुढे मागे त्याला ह्या गोष्टीचा फायदाच होणार होता.


आई , वडील , मंजिरी आणि माधुरी असे छोटे चौकोनी कुटुंब . वडील मोठ्या हुद्द्यावर होते. पदरी माया भरपूर जमवली होती .  माधुरी आणि मंजिरी रुपाच्या बाबतीत दोन टोक होती.  मंजिरी रूपवती तर माधुरी ठेंगणी , लठ्ठ,  दात पुढे , फेन्द्र्या नाकाची.  नुकतीच एमेस्सी झालेली . वडीलांना तिच्या लग्नाचा घोर होता.  मंजिरीचे हात पिवळे झाले की लगोलग तिच्या लग्नाचे पहायचे त्यांनी ठरवून टाकले होते. 


जेंव्हा इंद्राने मंजिरीला होकार कळविला तसे तिचे वडील फारच खुष झाले . एव्हढा मोठा वाडा , राहणारे तिघेच , आपली पोरगी राज्य करेल.  त्यांच्या स्वप्नांना पंख फुटू लागले होते .  


धुमधडाक्यात लग्न झाले .  मंजिरी  माप ओलांडून इंद्राच्या घरी आली.  


चला पाहूया इंद्राचे, विष्णुचे आयुष्य आता कसे वळण घेते. ..........


                                          क्रमशः 


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 


$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

ह्या कथेशी जर कोणालाही स्वतः च्या  वा जवळच्या कुणाच्याही आयुष्याशी साधर्म्य  आढळले तर  तो योगायोग समजावा .



Wednesday, 10 August 2022

द्वेष:मनाचे एक काटेरी टोक भाग ३

 शंकर इंजिनियर  झाला, नोकरीला लागला . नोकरी निमित्ताने त्याची वेगवेगळया गावात, शहरात बदली होत असे.  आधी शिक्षणामुळे आणि आता नोकरीमुळे सतत बाहेर राहण्याची सवय झाली त्याला. घराविषयी,  वाड्या विषयीची ओढ कमी होऊ लागली .  


आता शंकरच्या लग्नासाठी प्रस्ताव येऊ लागले होते. वाडा पुन्हा सुखाच्या पावलांसाठी आसुसला.


तात्यांच्या  ही शिलकीत वाढ होत होतीच . बायकोसाठी केलेले दागिने त्यांनी पुन्हा उजळवून घेतले.  जणू नव्या सुनेच्या आगमनाचे वेध त्यांनाही लागले  हेच त्यांनी सूचित केले होते .


शंकरची प्रगती पाहता त्याला बर्‍याच मोठ्या घरातील मुली सांगून येत होत्या.  अशाच एका मोठ्या (आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या) कुटुंबातील मुलगी सुमती शंकरच्या पसंतीस उतरली. 


बोलणी करण्याच्या आधी तात्यांनी इंद्र आणि विष्णुशी संवाद  साधला .  बड्या घरची बेटी सून म्हणून येणार ह्या विचारानी तात्यांना लोभ सुटला होता . हुंडा मागायचा असे आपले मनोगत त्यांनी सांगताच विष्णु रागावला. हुंड्याचा विरोधात त्याने आपले परखड मत व्यक्त केले . जर हुंडा मागितला तर मी घर सोडून जाईन अशी धमकीही त्याने दिली.  त्यामुळे तात्यांचा नाईलाज झाला. हुंड्याचा विचार त्यांनी बारगळला. 


पण ह्या प्रसंगाने तात्या नाराज झाले. विष्णु विषयी त्यांच्या मनात एक अढी निर्माण झाली . विष्णुच्या  खडतर प्रवासाची सुरवात इथून सुरू झाली हे विष्णुच्या  गावी ही नव्हते .


उलट तात्यांनी आपले ऐकले  म्हणून विष्णु अत्यंत खुशीत होता.


शंकरचे लग्न ठरले.  उदासलेला वाडा मरगळ झटकून तरतरीत झाला .


मोठ्या उत्साहाने विष्णु आणि मित्रमंडळी कामाला लागली . बोलणी , देणेघेणे , साखरपुडा ,  लग्न सगळे सुरळीत पार पडले .


कु.सुमती बाळकृष्ण गोखलेची  सौ. सुमती शंकर अजिंक्य झाली .  


चार भावांची एकुलती एक लाडाची बहीण अजिंक्यंच्या घरात गृह स्वामिनी म्हणून प्रवेश करती झाली.


नव्याचे नऊ  दिवस सरता सरता तिला एकेकाच्या स्वभावाची ओळख होऊ लागली होती.  वडीलांनी लग्नात कोणाच्याही मानापानात  कमतरता ठेवली नव्हती  तरी तात्या जरा फटकून वागतात हे तिला जाणवू लागले होते .


इंद्रा तसा ठीकठाक वागत होता पण कुठे तरी त्याच्या वागण्यात अहंभाव आहे असे वाटत असे . 


धाकटा विष्णु आईच्या मायेला दुरावलेला असल्यामुळे वहिनींच्यात आई शोधत होता. जमेल ती मदत वहिनीला करत होता.  तात्यांच्या वाकड्या वागण्या पासून वहिनीला वाचवत होता.


तरी पण कधी कधी कटू प्रसंग उद्भवतच होते .  तात्यांना  नवी नवरी वगैरेशी काही देणे घेणे नव्हते. मी म्हणेन ती पूर्व दिशा. माझ्या वेळा सांभाळा. जर एखाद दिवशी काही कारणाने थोडाही उशीर झाला तर तात्या त्या दिवशी रागारागाने आपला स्वयंपाक करून घेत . तेवढ्यात जर सुमती येऊन पोहोचली आणि तिने करून देते म्हंटले तरी ते मग तिच्या हातचे खात नसत.


कधी ह्या गोष्टी शंकरच्या कानावर गेल्या की मग तात्यांचे आणि शंकरचे खटके उडत. 


तसेही सुमती मोठ्या घरातून आलेली, तिच्या  घरी खाण्यापिण्याची  ददात  नव्हती, तर तात्याचा स्वभाव सगळे काही मोजून मापून करण्याचा.  येवढे धान्य इतके दिवस पुरलेच पाहीजे हा त्यांचा दंडक असे.  


सुमतीला मात्र स्वयंपाकाची , निरनिराळे पदार्थ करुन खाऊ घालण्याची हौस.  घरातील सामान संपले की ती तात्यांना सांगत असे . त्यामुळे तात्यांची फार चिडचिड होई. अजूनही घरातले खर्च त्यांना भागवावे लागतात याचा त्यांना राग येई. 


शंकरचा पगार फार काही जास्त नव्हता त्यामुळे घरातील खर्चात त्याचा अजिबात हातभार नव्हता.


इंद्र चलाख होता तो नोकरीला लागला होता पण त्याचा एक मित्र आणि तो बाहेरच्या बाहेर खाणे पिणे,  मौज मजा ह्यात पैसा खर्च करत असे . तसेच त्याला कपड्यांचा अति शौक होता.  ह्या सर्वासाठी लागणारा पैसा तो जमवून ठेवत असे. तशातच त्याने लाॅ कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतली होती. त्याच्या डोक्याने वकील  होण्याचे ठरविले होते .   कॉलेजच्या फीचे पैसेही तो तात्या कडून उकळत असे .


विष्णु पैसे कमावण्यासाठी धडपडत होता. पण त्याला सूर गवसत नव्हता . त्याला नोकरी ऐवजी व्यवसाय करण्याची इच्छा होती .


आणि  पुन्हा एकदा एक आनंदाची लहर वाड्यात पसरली.  शंकर आणि सुमती च्या संसारात नव्या पाहुण्याने येण्याची वर्दी दिली .


शंकरची  बदली झाली आणि तो बायकोला वाड्यात ठेवून बदलीच्या गावी निघून गेला. घरात कोणी बाई माणूस नसल्यामुळे सुमतीच्या  माहेरच्या फेर्‍या वाढल्या . कधी कधी तिचे आई वडील  येऊन राहू लागले . 


तात्यांना ते फार मान देत त्यामुळे तात्या आपण किती छान आहोत हे दाखविण्याचे नाटकं करत.


यथोचित समयी सुमतीने मुलाला जन्म दिला. सर्वत्र आनंदीआनंद झाला.  


काय ह्या नातवाच्या आगमनाने तात्यांच्या कडवटपणा स्वभावात  फरक पडला ? इंद्राची प्रतिक्रिया काय होती ?  


चला पाहूया पुढच्या भागात ...


                                             क्रमशः 



©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

################################## 

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️


वाचक वर्ग तुमच्या समीक्षे च्या प्रतिक्षेत 

 

ह्या कथेशी जर कोणालाही स्वतः च्या वा जवळच्या कुणाच्याही आयुष्याशी साधर्म्य आढळले तर तो योगायोग समजावा . 


Thursday, 4 August 2022

द्वेष: मनाचे एक काटेरी टोक भाग २

 शंकर , इंद्र आणि विष्णु ह्यांच्याकडे कोणीही लक्ष  देत नव्हते तरी ते निसर्ग नियमाने मोठे होत होते .  आईचे प्रेमळ छत्र हरवल्या नंतर लवकरच आजीही देवाघरी गेली.


घरातले स्त्री राज्य संपले. मुलांच्या डोक्यावरचे होते नव्हते ते ही प्रेमळ छत्र हरवले. मुले जमेल तसे शिकत होती.  अभ्यास केला तर केला .  नाही केला तर शाळेत मार खात होते . तारणहार कोणीच नाही. 


तात्यांनी आपला दिनक्रम आखून घेतला होता .  सोमवार ते शुक्रवार शिकवणी वर्ग . सकाळी ५ ते  दुपारी १ आणि  दुपारी ३ ते रात्री ८. जेवणानंतर शतपावली, बातम्या आणि त्यानंतर निद्रादेवीची आराधना . 


शनिवार,  रविवार  ते शेतीवर जात असत.  वडिलांची थोडीफार शेती आणि त्यांच्या काकानी दिलेली शेती.  तात्या आपले मन तिथे रमवायचा प्रयत्न करत होते .


मुलं मोठी होता होता शिकत होती ........ शिकता शिकता मोठी होत होती. 


शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणापेक्षा अनुभवाच्या शाळेत जास्त शिकत होती . घरात मोलाने ठेवलेल्या बाईने रांधलेले निमुट गिळत होती . आवडीनिवडीचा  प्रश्नच नव्हता. 


हा पण वाड्यात भाड्याने राहणार्‍या एखाद्या कुटुंबातील मातेचे वात्सल्य  उफाळून आले तर प्रेमाचे दोन शब्द वाटेला येत होते .


मुलं बाहेर प्रेम शोधत होती. दिवसच्या दिवस घराबाहेर राहत होती.  सगळ्यांच्याच मनात एक विचित्र अढी घर करून होती .  तात्या निर्विकारपणे  सगळ्या घटनांना सामोरे जात होते.


मात्र  शिकवणी वर्गातला एखादा विद्यार्थी प्रावीण्य मिळवून पास झाला की त्याचे भरभरून कौतुक करायला ते कधीही चुकत नव्हते .


काय त्यांचे मन आपल्या मुलांची तुलना ह्या यशस्वी मुलांशी करून दुःखी होत होते ? देवच जाणे.


हा हा म्हणता म्हणता शंकरचे शालेय शिक्षण झाले आणि त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला . एकाचे आयुष्य मार्गी लागण्याचे संकेत दिसू लागले होते.


इंद्र आणि विष्णु ही बर्‍यापैकी मोठे झाले होते. 


मोलाने ठेवलेल्या स्वयंपाक करणार्‍या बाया किंवा आचारी जास्त दिवस टिकत नव्हते. म्हणून इंद्र आणि विष्णु हळूहळू स्वयंपाक करायला शिकले होते. तात्यांच्या वेळा सांभाळून त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांच्या ताटात पडू लागले होते.


वडिलांची काळजी घ्यायला पाहिजे , ही समज यायला लागली होती. 


मित्रांची घरे पाहून घर स्वच्छ ठेवण्यासाठी दोघेही राबत होते .


इंद्र आणि विष्णु ह्या दोघात परस्पर सुसंवाद किंवा प्रेमभावना फार क्षीण असली तरी दोघांचा  मित्र संग्रह फार मोठा होता. 


ह्या मित्रांच्या  परिवारात सामावताना बर्‍याच चांगल्या वाईट गोष्टी त्यांना अनुभवायला मिळाल्या. भविष्याशी दोन हात करताना हे अनुभवाचे गाठोडे कामी येणार होते.


इंद्र आणि विष्णु डोक्याने तल्लख होते. पण योग्य मार्गदर्शक अजूनही त्यांना मिळाला नव्हता . त्यामुळे अभ्यासातली प्रगती प्रगतीपत्रकात  दिसत नव्हती. 


त्यातल्या त्यात इंद्र फारच माघार घेत होता . नाईलाजाने तात्यांनी १० वी नंतर इंद्राला आर्ट्स कॉलेजला घातले.


विष्णु १० वी नंतर सायन्स कॉलेजला जाऊ लागला होता.  पण घर , स्वयंपाक , येणाराजाणारा  ह्या सगळ्यात अभ्यासाला दुय्यम स्थान दिल्या जात होते. 


त्यामुळे तोही हुशार असूनही एक सर्वसाधारण विद्यार्थी समजल्या गेला . 


मध्यंतरीच्या काळात शंकर इंजिनियर झाला. अगदी गुणवत्ता यादीत चमकला . परिस्थितीने गांजलेल्या तात्यांच्या मनाला एक सुखद दिलासा मिळाला.


एरवी तात्या एकटेपण आल्यामुळे थोडे तिरसट वागू लागले होते.   त्यातच घरा संबधी कोर्ट कचेर्‍या  मागे लागल्या होत्या.  


घर, शिकवणी वर्ग शेती आणि आता कोर्टा मुळे वकीला कडच्या  फेर्‍या ह्यात ते अडकले होते . पैश्याचा नुसता अपव्यय होत होता. त्याच्या बदल्यात मनस्ताप वाटणीला येत  होता .


ह्या सर्व पार्श्वभूमीवर शंकरचे यश खरोखरीच मनाला दिलासा देणारे होते.


तात्या पुन्हा नव्याने सुंदर  भविष्याची स्वप्ने पाहण्याच्या मोहाला टाळू शकत नव्हते .


काय तात्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल ? इंद्र आणि विष्णु ह्या स्वप्नात सुंदर रंग भरू शकतील?


नियतीच्या मनात आणि भविष्याच्या उदरात काय काय लपले होते हे कुणालाच ठाऊक नव्हते .


चला जाऊ या भविष्याकडे पुढच्या भागात ...


तोपर्यंत तुमच्या समीक्षा हेच तात्यांना आणि परिवाराला मिळालेले बक्षीस असेल. द्या त्यांना जरा दिलासा .


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 


                             ..............क्रमशः 

_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/

ह्या कथेशी जर कोणालाही स्वतः च्या  वा जवळच्या कुणाच्याही आयुष्याशी साधर्म्य  आढळले तर  तो योगायोग समजावा .



Wednesday, 3 August 2022

द्वेष: मनाचे एक काटेरी टोक

 एखाद्याच्या मनात किती द्वेष असू शकतो ? तोही स्वतः च्या भावंडां विषयी ?  इतका द्वेष की मोठा भाऊ शप्पत घेतो की लहान भावाला रस्त्यावर आणीन नाहीतर नाव बदलेन. काय ही मनोवृत्ती ? 


ह्या घटनेची सुरवात पहा कशी झाली ...


तो काळ साधारण १९४० चा असावा ...


ते शहर तेंव्हा इतके प्रगत नव्हते झाले. माणूस थोडीफार माणुसकी जपून होता .  फ्लॅट सिस्टमने अजून त्या शहरात प्रवेश केला नव्हता .  वाडा संस्कृती अजून तग धरून होती .


अशा त्या समयी शहराच्या  गजबजलेल्या भागात  अजिंक्य यांचा वाडा होता.  घरात म्हातारी झालेली तरीही कणखर असणारी आई होती . तिचे चार मुले .


मोठा दादा . अतिशय सहिष्णू वृत्तीचा, देवभोळा.

अतिशय हुशार.  अतिशय प्रामाणिक. 

त्याची बायको सरिता.  नवर्‍याच्या अति शांत स्वभावा मुळे गांजलेली . मूल नसल्यामुळे सगळ्या दीर जावांच्या हेटाळणीचा विषय झालेली. त्यामुळे नवर्‍याशी सतत भांडणारी .


जेंव्हा सगळ्या गोष्टींचा अतिरेक होऊ लागला तेंव्हा दादाने आपली बदली  दूरच्या गावी करून , बायको बरोबर तिथेच आपले बिऱ्हाड हलवले, पुन्हा एकत्र कुटुंबात न येण्यासाठी .


दुसरा तात्या . तिसरा नाना  आणि शेंडेफळ आप्पा. 


सगळेच सरस्वती चा आशीर्वाद घेऊन आलेले .  आपापल्या क्षेत्रात आघाडीवर असलेले.


पण ह्यांची शिक्षण पूर्ण होऊन ते कमाईपुत होण्याआधी लक्ष्मी  जरा रुसली होती. सकाळ संध्याकाळ चे उदरभरण करणे जरा जड जात होते. 


अशावेळी  दुसर्‍या मुलाने (तात्यांनी)अतिशय कष्ट करून सगळ्या कुटुंबाला आधार देत भावांची शिक्षण , लग्न लावून देऊन  त्यांचे संसार थाटून दिले .


संस्कृत आणि इंग्लिश वर तात्यांनी प्रभुत्व मिळवले. सुरवातीच्या काळात घरोघरी जाऊन  विद्यार्थ्यांना शिकवले , काही महिने शाळेतही शिकवले. 


पण त्यांचे ध्येय ह्यापेक्षा वेगळे होते . कोणाच्याही हाताखाली काम करणे त्यांना जमणार नव्हते. विषय सोपा करून शिकविण्याच्या त्यांच्या हातखंड्यामुळे तसेही पाय मागे खेचणाऱ्यांची संख्या वाढतच होती. एकदा एका सहकार्‍याशी क्षुल्लक कारणासाठी वादंग झाला आणि त्या  तिरीमिरीत त्यांनी शाळेला रामराम ठोकला.


पण वाढता प्रपंच आणि जबाबदारी ह्या साठी पोटापाण्याची सोय करणे भाग होते . आणि त्यांनी एक धाडसी पाउल टाकले . विना अनुदानित तत्त्वावर स्वतःचीच  शाळा सुरू केली . 


त्यांच्या नावाचा आधीच गवगवा होता . शिवाय त्यांची तत्त्व सामान्यातील सामान्यांच्या फायद्याची होती . 


नगण्य फी. 

तीही न देऊ शकणारा अगदी फुकट शिकू शकणार होता.

गरीब परंतु अत्यंत हुशार  विद्यार्थी अगदी त्यांच्या घरी राहून शिकू शकणार होते.


झाले विद्यार्थ्यांचा लोंढा अखंड त्यांच्याकडे वाहू लागला . त्यांनी घडवलेले कित्येक  विद्यार्थी  मोठमोठ्या हुद्द्यावर चढून त्यांच्या नावाची गरिमा वाढवतच होते. यशाची झिंग डोक्यात भिनु लागली होती. 


तात्यांनी आता मोठ्ठा वाडाच विकत घेतला.  बायको, तीन मुलं, आणि म्हातारी आई ह्यांच्या सकट गृहप्रवेश केला. आधीचा राहता वाडा नानाच्या नावे करून दिला . धाकटा  आप्पा स्वतःच्या  मेहनतीने नोकरीला लागला होता आणि बदली होऊन दुसर्‍या गावी बायको मुलांसकट स्थायिक झाला होता .


सगळे छान चालले  आहे असे नियतीला कधीच पाहवत नाही . 


अचानक नशिबाने ठोकर मारली आणि छोट्या आजाराचे निमित्त होऊन तात्यांची पत्नी कालवश झाली .


तात्या सैरभैर झाले. तीन मुले आणि म्हातारी आई ह्याना कसे सांभाळावे हा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर होता . त्यावेळी तात्यांचा मोठा मुलगा शंकर जेमतेम ९ वर्षाचा , दुसरा इंद्र ७ वर्षाचा आणि धाकटा विष्णु तर ५ च वर्षाचा होता.


तात्यांनी ज्यांना ज्यांना अडचणीत हात दिला ती सर्व भावंडं दुरूनच सहानुभूती दाखवून आपापल्या  कामाला लागली होती. म्हातारी आईने वाकलेल्या  कंबरेने आणि थरथरत्या हाताने स्वयंपाक घराचा ताबा घेतला आणि अन्नपूर्णा बनून  तात्यांच्या आणि तीन लहानग्यांची पोटाची खळगी भरू लागली.


ह्या आघाताने तात्या निर्लेप झाले . शाळेचा मोठा फाफटपसारा त्यांनी आवरता घेतला . फक्त आपल्या दोन  विषयांचे शिकवणी वर्ग चालू केले. 


अजिंक्य शिकवणी वर्ग .


एक आई सोडली तर त्यांचे घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. पहाटे ५ ते रात्री १० त्यांनी पूर्णपणे स्वतःला झोकून दिले.


शंकर, इंद्र  आणि  विष्णु मोठे होत होते. कुणाचाही अंकुश नसल्यामुळे मनमर्जीने वागत होते. नातेवाईकांच्या आणि शेजारच्यांच्या टीकेला पात्र ठरत होते.


काय होणार ह्यांच्या भविष्याचे? काळाच्या उदरात त्यांच्यासाठी काय दडले होते ?


पाहूया पुढच्या भागात .....



तोपर्यंत तुमच्या समीक्षा येऊ द्यात .....स्टिकर द्या ....स्टार्स द्या .

                                             क्रमशः 

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 


ह्या कथेशी जर कोणालाही स्वतः च्या  वा जवळच्या कुणाच्याही आयुष्याशी साधर्म्य  आढळले तर  तो योगायोग समजावा .



Welcome

संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर

 ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात,  किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...