Thursday, 12 May 2022

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी...बदलत्या संकल्पना आणि छेद देणार्‍या रूढी....भाग 3

 कालचा दिवस सगळ्यानीच खूप धमाल केली . कडक उन्हात ही कूलर , ए. सी. ला लाजवणारा  आमराईतला गारवा सगळ्यानाच सुखावून गेला .


गाव पाटलाची आमराई होती ती. शहरातील मंडळी येणार म्हणून त्यांनी उत्तम बडदास्त ठेवली होती होती आमची. 


कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यांचा तरुण मुलगा चांगला शिकला सवरलेला शेती करण्यात फार  उत्साही होता. नवीन तंत्रज्ञानाची उत्तम जाण होती त्याला तरीही नैसर्गिक संसाधने वापरण्यावर अधिक भर होता. 


जुन्या नव्याची उत्तम सांगड घातली होती त्याने. महत्वाचे म्हणजे वडीलांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. त्याने तयार केलेल्या नवीन प्रयोगा बद्दल त्याने बरीच माहिती दिली.


गप्पा च्या नादात किती फिरलो हे कुणालाच कळले नाही . गरम पिठले आणि भाकरीच्या सुगंधाने सगळ्यांना भुकेची जाणीव झाली. भाकरी, पिठले, मिरचीचा ठेचा , ताक , भात आणि सोबतीला मनसोक्त आंब्याचा रस. सगळ्यानीच आडवा हात मारला आणि गर्द हिरव्या आमराईत विसावले .


उन्ह उतरली तसे आम्ही आमच्या मुक्कामी परतलो .  


सुस्तावलेल्या शरीराला ताजतवाने  करण्याची गरज होतीच . तेव्हड्यात राणीने कालची चर्चा पुढे नेण्याचा प्रस्ताव ठेवला आणि मी कबूल केल्याप्रमाणे त्या दुर्दैवी मुलीची गोष्ट सांगायला सुरवात केली .


आटपाट नगर होते. त्या नगराच्या मध्यभागी गजबजलेल्या वस्तीत एक मोठ्ठे देवस्थान होते. मोठ्ठा वाडाच म्हणा ना. पिढ्या न पिढ्या त्या जागेवर लहाना च्या मोठ्या झाल्या . बाहेरच जग बदलले पण इथल्या रूढी आणि परंपरा मात्र बदलल्या नाहीत . किंबहुना त्या रूढीं नी जास्तच विकृत स्वरुप धारण केले असे मला वाटते.


देवस्थान म्हणून सगळेच सणवार सतत होत असतच. तेही परंपरे नुसार,  सोवळेओवळे सांभाळून.  गोतावळा पण खूप मोठा . घरातलेच कुटुंब सदस्य धरले तर ४०-५० भरतील . त्यात येणारा जाणारा , भक्त मंडळी.  घरातल्या बायका २४ तास चूल आणि मूल ह्यात गुंतलेल्या .


अशा घरात जर सण असताना  एखाद्या स्त्रीचा मासिक धर्म सुरू झाला तर तिच्या नशिबी चार दिवस अंधार कोठडी.  जिथे मोकळा वारा नाही , नीट उजेड नाही तिथे तिने स्वतः ला बंदिस्त करून घ्यायचे.  घरातला धबडगा आटोपला की मग तिच्या पर्यंत जेवण पोहोचणार.


काळ उलटत होता. केंव्हा तरी घरातल्या एका सुनेने शहाणपणा करून डॉ . कडून अशा प्रसंगी पाळी लांबवायची कशी ह्यासाठी गोळ्या  घेऊन आली . मग काय सगळ्या बायकांमधे जणू शर्यतच लागली . कुळाचार असो, काही सण असो जा डॉ. कडे घे गोळ्या . त्याच्या परिणामाची कोणालाही जाणीव नव्हती.


ह्याच घरातली ती मुलगी कोवळी कळी होती. सुरवाती पासूनच तिला मासिक पाळीचा खूप त्रास व्हायचा.  त्यातच जर कोणती पूजा वगैरे असली की ती आरामात गोळ्या घ्यायची . पाळीचा  त्रास थोडा उशिराने सहन करावा लागणार ह्याचाच आनंद तिला मोठा वाटायचा . पण प्रॉपर गायनिक कडे जाऊन व्यवस्थित उपचार घेण्याचा विचार ती आणि तिच्या घरातल्या निर्बुद्ध जेष्ठ व्यक्तीनी केला नाही. 


व्हायचा तोच परिणाम झाला . एक दिवस तिची तब्येत अचानक खूप बिघडली. दवाखान्यात भरती करायची वेळ आली . पण केस हाताबाहेर गेली होती. डॉक्टरांच्या प्रयत्नाना यश नाही मिळाले. काही तासातच पोरीने डोळे मिटले. 


आई - वडिलांची एकुलती एक पोर काळाच्या पडद्याआड निघून गेली होती . अवघ्या २४ वर्षाची एक उमलती कळी लग्नाचे स्वप्न पहात सरणावर चढली .


घरातल्या इतरांनी सोयीस्कर रित्या डॉक्टरांच्या डोक्यावर अपयशाचे खापर फोडले  आणि आपल्या नित्य कर्मात स्वतः ला गुंतवून घेतले.


जीर्ण झालेल्या त्या वाड्याने एक उसासा सोडला. आजही त्या वाड्याचे भग्न अवशेष तिथेच उभे आहेत. भाऊ बंदकीत त्या वाड्याची रया पार बदलून गेली आहे.


पण ह्या उदाहरणावरून त्या घरातील कोणीही व्यक्ती शहाणी झाली नाहीये ही खरी शोकांतिका.....


जग पुढे जातय , मुली स्पेस मध्ये जातात, चंद्रावर जातात , पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत .... अगदी तिथेच स्त्री ची अशीही विटंबना होते ...


काय म्हणावे अशा विचारांना.  स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ....




वाचक वर्ग हा भाग प्रकाशित करायला  खूपच उशीर झाला . ......तब्येत चांगली नव्हती ....... क्षमा करा ...... पण वाचा , .......प्रतिक्रिया तर हव्याच...पण जिथे कुठे अशा गोष्टी घडत असतील तिथे स्त्रीलाच जागृत करा ....विरोध करा .... तूच तुझी शत्रू  असे म्हणायची वेळ येऊ देऊ नका . तर आणि तरच माझ्या लिखाणाचा काही अर्थ आहे असे मला वाटेल ..


समाप्त .


©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 



Saturday, 30 April 2022

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी..बदलत्या संकल्पना आणि छेद देणार्‍या रूढी

 झुंजूमुन्जु व्हायला लागले होते. पक्षांचा किलबिलाट खूप सुखद  अनुभव देत होता. सोबतीला थंडगार मोकळा वारा . निसर्गाची ही मुक्त भरभरून देणगी आपण शहरवासियांनी कधीच नाकारली आहे . हजारो लाखो रुपये खर्च करून कुलर आणि एसी त राहून स्वतः चे स्वास्थ्य गमावण्यातच आपण धन्यता मानतो. दूरवरून मंदिरातून  येणारे  काकड आरती चे स्वर प्रसन्नतेत भर घालत होती. 


आतून चुलीवर खळखळणार्‍या चहाचा दरवळ सगळ्यानाच जागा करून गेला.  त्यातच सुभा दादा  ने मारलेली आरोळीने "चाय झाला ताई लोग , दादा लोग , या बीगी बीगी..."  सगळ्यानाच  उठायला भाग पाडले.


कालच्या गप्पांची विचारचक्र अजूनही सगळ्यांच्याच डोक्यात चालू होते . प्रत्येकाचाच चेहरा त्याबद्दल बोलत होता. सगळ्यांची चुप्पी भंग करण्यासाठी मी अचानक  विचारले "तुम्ही देवाला कोणत्या लिमिट पर्यंत मानता ?"


माझ्या प्रश्नाने जवळपास सगळेच चकित झाले. हा प्रश्न कालच्या विषयाला  सुसंगत नव्हताच मुळी. त्या स्तब्धतेचा  भंग निशाने केला..


निशा : Honestly speaking, I am speechless on this point, so no comment 🙏🙏🙏


राणी : मी आता इतकचं लिहते की मी देवाला सृष्टीत बघते .


मनिषा : देव ...  जेव्हा मी खचते, माणसांवरून विश्वास उडतो तेव्हा

मला जगण्याचा आधार वाटतो तो म्हणजे माझा देव...

कशाही परिस्थितीत तग धरून रहायची हिंमत देते ,

अपयशाने न खचता पुन्हा भरारीसाठी सज्ज ज्यांच्या विश्वासावर होते तो म्हणजे माझा देव ...

माझ्या साठी तो सदैव आहे मला प्रेरणा देत, जगण्याचे बळ देत ज्याच्याजवळ मी मनातली कोणतीही गोष्ट बोलते, एकटीच भांडते, चर्चा करते, तोडगा काढते तो म्हणजे माझा देव...

मला माहिती आहे जे त्या दगडावर विश्वांस ठेवत नाही ते देवही माननार नाही, माझा आग्रही नाही पण

जी गोष्ट तुम्हाला पडतांना सावरते ,

चुकल्यावर अनुभव देते,

जिंकण्याची ताकत देते,

तो दगड असो की माणूस ,

पशू प्राणि वृक्ष काहीही ,

तो माझ्यासाठी माझा देवच आहे...


माझी माझ्या गजाननावर असिम श्रद्धा आहे ज्या परिस्थितीत मी व्यथित होते किंवा मला परिस्थिती सांभाळता येत नाही अशा वेळेस मी सर्व त्यावर सोपवते आणि मला मार्ग सापडतो ...

कदाचित तो मार्ग माझा मलाच सापडत असेल पण जेव्हा मी पूर्ण शरण जाते तेव्हा माझ्यातली मी मला नव्याने सापडते आणि हाच माझ्यासाठी माझा देव आहे ...

या रोबोटिक जगात जेव्हा सर्व कामे यंत्राने होतात तरीही मन अशी गोष्ट आहे ज्यांचे अजून यंत्र झाले नाही ...

तो हसतो रडतो झुरतो बोलतो अदृश्य असूनही आपल्या तालावर नाचवतो अश्या स्थितीत कोणीतरी पाहिजे जे त्याला बळकटी देईल . स्थिर ठेवेल त्याला आई सारखे वळण लावेल . ती आई म्हणजे माझ्यासाठी माझा देव आहे ...

श्रध्दा असणे म्हणजे अंधश्रद्धा नाही, हेही तेवढेच खरे आहे ...

माझा देव त्या पाण्यात खळाळतो,

क्षितीजांवर रंग उधळतो ,

आसमंत डोळ्यात साठवते ,

वाऱ्यासवे गाणे गातो ,

जीवनाला जीवन म्हणून सांगतो,

कर्तव्याची जाण देतो ...

हो तो माझा देव आहे ...

हो तो माझा देव आहे...


सचिन : *कुठे देव पहिला?*

माने भक्ती असे अंतरी पण

देव आहे का कोणी पहिला

आला काळ जेव्हा नेण्या

कोठे मग तो लपून राहिला


जीवांचा इतका खेळ

जो त्याचे दारी खेळला 

चेंगारले ते कित्येक देह

तेव्हा तो भक्ता कसा विसरला


दर्शनासाठी जर त्याचे

द्यावया लागे जिथे प्राण

आहे का तो खरं तिथे

आता तरी हे सत्य जाण


का शोधसी तिथेच देवा

अंतरी ही तो विराजमान

देव आहे सर्वत्र ना देवळात

सत्य हेच आता तरी जाण 


माय बाप ही आहे देव

देव तिथे जिथे असे दया,नम्रता

मिळे अस्तित्व तिथे त्याचे

जिथे असे प्रेम,त्याग ,ममता


मोहन दा : देवाला मानण्याची मते आप आपल्या परीने वेगवेगळी आहे, कोणी म्हणतात देवाचे अस्तित्वच नाही तेव्हा मग प्रश्न पडतो, की सृष्टी आपोआप तयार झाली का..? राम ,कॄष्ण , शंकर, विष्णु,इंद्र, काली, हनुमान, आताच्या काळात, गजानन महाराज, साईबाबा ,ताजुद्दीन हे झालेच नाही म्हणतात.     लोक जरी हे मानत नसतील तरी मी देवाला मानतो कारण , पाच लोकांना कुटुबातील चारचाकी सहा पल्टी खाल्यावर खरोच न लागणे म्हणजे देवानेच वाचवणे होय, आमचे दुसरे आयुष्य समजावे हे



उर्मी: देव ही संकल्पना खूप अफाट आहे.. आपल्या मनाला उभारी देणारी पॉसिटीव्ह उर्जा म्हणजे देव.. 

माझी देव ह्या संकल्पनेवर नितांत श्रद्धा आहे..

म्हणूनच भुताखेतांवर ही आहे..

मला देवाबद्दल जितकी आत्मीयता वाटते तितकीच भीती भुतांबद्दलही वाटते 😊



अनघा : देवाला मी कायमच माझ्या अवतीभवती पाहते. अदृश्य असला तरी जवळ वाटतो. मनाला दिलासा देतो. प्रचंड श्रध्दा आहे देवावर. माणसातही देव कधीकधी दिसून येतो. आशेची पणतीही देवच मनात जागृत ठेवतो. स्वतःच्या अंतरंगातही देव मला आढळतो


वर्षा : मंदिरातला देव कधी माझ्यासोबत बोललाच नाही अन देवाचा उदे उदे करणारे माणसाला कमी लेखल्याशिवाय राहत नाही .

डेबूजींसारखाच माझा देव सुद्धा माणसातच आहे .

श्रद्धा जगायला शिकवते मन शुद्ध  होते साकारात्मकतेमुळे ...पण गावातली लोक डोक्याबाहेरची विचारसरणी आहे .


सगळ्यांचे देवाबद्दल चे निकोप विचार मी ऐकत होती . पण मला हवे होते ते उत्तर मिळत नव्हते. शेवटी न राहवून मी म्हणाले 


देव मीही मानते मैत्रिणींनो.  फक्त मी त्याकडे एक +ve ऊर्जा म्हणून पाहते.  देव आणि दानव . एक +ve , सुदृढ पॉवर किंवा विचारधारा तर दानव ही वाईट , दुष्ट वृत्तीची विचारधारा.   कदाचित सायन्स स्टुडंट असल्याने अस समजत असेन मी .  कुणी त्याला सगुण रूप दिले कुणी निर्गुणाचा पूजक आहे . 

ह्याच देवाने आपल्याला शरीर दिले . कुणी पुरुष झाला कुणी स्त्री जन्म घेऊन आली .   


त्या जन्मदात्या ने म्हणजे  देवाने पुरुषाला आणि स्त्रियांना एकमेकांचे पूरक बनविले. म्हणजे कुणी एकटा पूर्ण नाही . एकमेकांशिवाय ते दोघेही अधुरे आहेत .


स्त्री ला सृजनशीलता दिली आहे. म्हणजेच नव उत्पत्ती ची देणगी . पण त्यासाठी तिच्या शरीराला विशिष्ट ऋतु चक्रातून जावे लागते.  त्या शिवाय नव निर्मिती होणे नाहीच . असे असताना ह्या निसर्ग चक्रातून जाताना स्त्रीला आजही विचित्र वागणूक का दिली जाते?


त्याही पुढे जाऊन एखाद्या धार्मिक कार्य प्रसंगी जर तिची पाळी येणार असेल तर तिला pills घ्यायला का भाग पाडतात? त्यात देवाने काय येऊन सांगितले ? ह्या कुप्रथेपायी एका मासूम जीवा ला आपले प्राण गमवावे लागले. त्या घटनेची मी दुर्दैवी साक्षीदार आहे.  खरच  माणसाला आपला जीव गमवावा लागला तरीही चालेल पण देव कोपु नये म्हणून अघोरी उपाय अवलंबिले पाहिजे का ?


म्हणून माझा प्रश्न होता  तुम्ही देवाला कोणत्या लिमिट पर्यंत मानता ?


सगळेच एकदम स्तब्ध झाले होते . आणि  अचानक सगळ्यानीच एकदम गलका केला. कोण होती ती मुलगी ? कुठली घटना आहे ही ?


उद्या सगळ्यांना सांगीन असे प्रॉमीस करून मी विषय संपवला . आता आमराई फिरायला जायचे आहे ह्याचीही आठवण करून दिली . त्यामुळे आन्हिके आटोपायला  सगळेच पळाले. 



...क्रमशः 


वाचक वर्ग तुम्ही दाद दिली नाही तर तर माझा स्त्री जागृतीचा प्रयत्न व्यर्थ गेला असे वाटेल. स्पेशली स्त्री वर्गा कडून माझ्या फार अपेक्षा आहे . कमेन्ट,  स्टिकर भरभरून द्या ..



©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 



Thursday, 28 April 2022

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ...बदलत्या संकल्पना आणि छेद देणार्‍या रूढी

 आमचा एक मस्त ग्रुप आहे.  लिखाण आणि वाचन करणार्‍यांचा. अगदी ६४ वर्षापासुन ते लग्नाळु वयाच्या मुलामुलींचा ग्रुप.  

वयाची तफावत  आम्हाला जाणवतच नाही कारण इथे प्रत्येकाच्या विचारांची योग्य दखल घेतल्या जाते.  भांडण आणि वाद इथे वर्ज्य आहे. त्यामुळेच आम्ही एकमेकांना प्रेमाच्या धाग्याने घट्ट धरून आहोत . असो. तर आमचा हा ग्रुप आज मस्त फिरायला आला आहे .  रोजच्या कामाच्या  धबडग्यात सगळेच पिचले होते . म्हणून आम्ही सर्वानी  मिळून  ठरवले की कुठे तरी शांत शांत  ठिकाणी दोन दिवस जाऊ या . म्हणून भंडारा जिल्ह्यातील अंभोरा ह्या गावी आम्ही आलो आहोत . 

शांत चांदण्यांची रात्र आहे. समोर वैनगंगा आपल्या गतीने  वाहते आहे. तिच्या पाण्याच्या खळखळाटाचा आवाज नीरव शांततेत अजूनच कर्णमधुर वाटतो आहे. सगळेच भारावलेले. निसर्गाच्या मनोहर रुपात रमलेले.


अशावेळी गप्पांचा विषय वळला  gender equality  कडे . ज्ञानु खूप creative आहे. सतत डोक्यात नव नवीन विचार, संकल्पना आणि त्यावर अंमलबजावणी करण्याची तिची धडपड वाखाणण्याजोगी आहे. म्हणूनच आमच्या ग्रुपची ती लाडोबा नंबर वन आहे .


ज्ञानु एकदम सरसावून बसली आणि म्हणाली :By all your respect दादा.....एक प्रश्न विचारते .... scientifically कोण prove करेल स्त्री ही सहनशक्ती चे दुसरे रूप आहे ???

तिची आणि पुरुषांची भावनिक, मानसिक, सामजिक सर्वच गरजा सारख्या....काही शारीरिक फरक सोडले त तर.....हे जे पुरातन काळापासून बिंबवल्या जाते ना ते बंद व्हायला हवे आधी....

We are not the superior.... We are just human being....Just a human being...

प्रत्येकाने आपल्या मुलीचे संगोपन करतांना हे सांगा तिला....तुझी आणि तुझ्या भावाची, तुझ्या नवऱ्याची इच्छा ,जिद्द, जगण्याचा अधिकार,कर्तव्य आणि सहनशक्ती सर्वच समान आहेत म्हणून.....

माफ करा दादा...तुम्हाला क्रॉस करत नाहीये....

Gender equality साठी धडपडणारी व्यक्ती म्हणून बोलत आहे.


सर्वच जण तिचे विचार शांतपणे समजून घेत होते. 

मोहनदा चा विचार जरा वेगळा होता.बाई मध्ये सहनशक्ती जास्त असते असे त्यांचे मत होते .


मी तिला म्हणाले ...I fully support you . पण समाजमन बदलणे जवळपास अशक्य वाटते.  मला वाटत अजून ५ -१० पिढ्या खपल्या की घडले तर घडेल. कदाचित आपण founder members असू.


मोहनदा: मी प्रुव्ह करु शकतो, लवकरच एक लेख सादर करिल, स्त्री सहनशक्तीचे दुसरे रुप आहे


ज्ञाना : नक्की दादा...फक्त ते scientifically हवं....

जुने दाखले किंवा उदाहरणे नकोत......कारण ते या समाजाचे प्रतिनिधित्व करते....आजवर चालत आलेल्या परंपरांचे प्रतिबिंब दाखविते...


आम्ही त्या समाजाविषयी बोलतोय जो घडावा हा मानस आहे.


सीतेच्या गोष्टी सांगून सांगून आमच्याकडून नकळत अग्नीपरिक्षेची अपेक्षा केली जाते...


मोहन दा : आजची स्त्री आधुनिक जरी असली तरी, तिच्या वॄत्तीत असा फारसा बदल झाला नाही, अग्नीपरिक्षा देणाऱ्या काही स्त्रिया आहे काही नाही आहे. आणि सगळ्याच स्त्रिया सहनशक्तीवाल्या नाही, काही अरेरावित गेल्या ( अरेरावी हा शब्द इथल्या स्त्रियांसाठी नाही, समाजातील काही स्त्रियांशी निगडित आहे)काही सहनशक्ती म्हणजेच सहणार्या आहेत.


Dnyanu : याला तिची सहनशक्ती नाही दादा जबाबदारी म्हणतात.....ती कितपत सहन करू शकते हे विचारण्याची तसदी समाजाने घेतलीच केव्हा???..तिच्या सहनशक्तीच्या मर्यादा परस्पर ठरवून मोकळा झाला.  तुमचंच वाक्य..


"सगळ्यात स्त्रिया सहन शक्तिवाल्या नाही, काही अरेरावित गेल्या..."


ही च भीती!!!!....मी सहन केले नाही तर मुजोर ठरेल....तिला सर्वच सहन करायला लावते.

सहन करत जाणे....आणि अरेरावी करणे.....या दोघांच्या मध्ये तिसरी जागाच नाही का?


मोहन दा: तसे नाही ताई, आज समाज बदललेला आहे प्रत्येक ठिकाणी असे नाही आहे, स्त्रीकडे पूर्वी पासून त्याच नजरेने पाहिले जाते की, ती घरचा स्वयंपाक,  झाडुपोछा, घरचे सगळे काम फक्त स्त्रीनेच करावे,मुलाबाळाला तिनेच पहावे


ज्ञाना : फक्त घरातील कामाची जबाबदारी इतकाच विचार नाही स्त्री पुरुष समता मध्ये... बाईच्या गोष्टी चुली पासून सुरू होतात...आणि चुलीवर येऊन थांबतात.


निशा : प्रत्येक गोष्टीचे बरेच पैलू असतात आणि प्रत्येकच मुद्द्यावर प्रत्येकाचे विचार सारखे असतील असे नाही.. प्रत्येकाने आखो देखे दाखलेही दिलेले आहेत.. तरीही मला "तुच तुझी कट्टर शत्रू" हा मुद्दा योग्य वाटतो..


ज्ञाना: *डिस्कशन शेवटी कोणत्या टॉपिक वर येऊन थांबेल सांगू.....स्त्री आणि पुरुष दोघेही शेवटी एकमेकांशिवाय अपुरे आहे.....एकमेकांना परिपूर्ण करतात...वैगेरे..."*

मला नेमके तेच म्हणायचे आहे ..स्त्री पुरुष एकमेकास पूरक आहेत ना..काही  फरकासह(यात शारीरिक म्हणायचे आहे मला) त्यांची निर्मिती झाली आहे ....बस संपला विषय.....त्यात मध्येच मग स्त्री ला आदिशक्ती,सहनशक्ती....वैगेरे विशेषणे का लावता??*


वर्षा : ज्ञाना ताई च्या मताशी मी सहमत आहे .समानता हि फक्त पुस्तकात अन फार कमी लोकांमध्ये आहे .मंजूताईने पण बरोबर म्हणजे खरंच सांगितलं आहे .समाजाकडून अपेक्षा करूच नये हे माझं मत आहे .आपण समानतेची सुरवात स्वतःपासून करू शकतो .कारण समाज म्हणजे त्यात आपणही आहोतच .


चर्चा खूप जोमात चालू होती. वेळेचे भान कोणालाच नव्हते . प्रत्येकचजण हिरीरीने आपापली मते मांडत होता पण त्यात दुसर्‍याला खाली खेचायची भावना अजिबात नव्हती. रात्रीचा जवळपास दुसरा प्रहर  संपत आला होता. ज्येष्ठत्वाच्या नात्याने आवर घालायला हवाच होता. 

लगेचच सगळ्यांना थांबायची विनंती केली आणि प्रत्येकच जण निद्रादेवीच्या अधीन झाला.


........... क्रमशः 


माझ्या तमाम वाचकांनो तुमचा प्रतिसाद अपेक्षित आहे . वाट पाहते आहे 



Wednesday, 20 April 2022

पत्र तरूणाईला

चि. तरुण / तरुणी  (१०/१२ वी पास झालेले )

अनेक शुभाशीर्वाद---

"तुमच्या वाढदिवसा प्रीत्यर्थ अनेक शुभ कामना"

चमकला का ? प्रश्न पडला असेल ना आमच्या सगळ्यांचाच वाढदिवस एकाच दिवशी कसा ? 

बघा. तुमच्यातील अनेकानी १० वी पास केली , बरेच लोकां नी १२ वी पास केली. आज पर्यंत आई बाबांच्या सुरक्षित पंखाखाली तुम्ही होतात . पण  जसा तुमचा निकाल लागला तस तुमच्या विचारांना चालना मिळाली . सायन्स घेऊ  की कॉमर्स ? शाळेतच अ‍ॅडमिशन घेऊ की कॉलेज मध्ये?  माझ्या मित्राने जिथे अ‍ॅडमिशन घेतली तिथेच घेऊ का ? बाबांच्या पॉकेटला ह्या कॉलेज चा खर्च झेपेल का? विचारांच्या आवर्तनात अडकले की राव तुम्ही.  म्हणजेच बुद्धीला चालना मिळाली की . बुद्धीची वाढ होतेय . जिथे वाढ होतेय तिथे वाढदिवस साजरा झालाच पाहिजे . म्हणून  तुम्हाला वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. 

आज तुम्ही जितक्या वर्षांचे झालात तितकी गेलेली वर्षे तुम्हाला फक्त वयात वाढ झाली ह्याचीच जाणिव करुन देत गेली .

अगदी लहानपणी वाढदिवसाचा अर्थ म्हणजे मौज- मजा-  मस्ती,  खूप सारे प्रेझेंट,  आवडीच्या वस्तु खाणे आणि सर्वांच्या कौतुकाचा केंद्र बिंदू बनणे एव्हढाच होता . सगळ्यात मुख्य म्हणजे आई बाबानी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मनसोक्त उपभोगू दिल्या आणि तुमच्या आनंदात आनंद मानला.

पण...

आज तुम्ही ज्या सीमारेषेवर उभे आहात त्या ठिकाणी तुमची स्वतः ची ओळख तुम्हालाच नव्याने करून देण्याची गरज आहे.

यापुढे येणारा प्रत्येक वाढदिवस तुमच्या हातात एक एक नव्या  जबाबदारीचे प्रेझेंट देऊन जाणार आहे.  ते पेलण्यासाठी आपले तनच नव्हे तर मनही बळकट असणे आवश्यक आहे. तनामना च्या  स्वास्थ्यासाठी स्वतः वर विश्वास ठेवण्याची क्षमता असली पाहिजे .

समोर उभे राहिलेले कोणतेही आव्हान स्वीकारून  ते यशस्वी रित्या मी पूर्णत्वास नेईन हा आत्मविश्वास असणे आवश्यक आहे.  एक मिनिट...थांबा..

आत्मविश्वास म्हणजे over कॉन्फिडन्स नव्हे .

हा आत्मविश्वास जागृत ठेवण्या साठी जीवनावर श्रद्धा ठेवायला शिका. श्रद्धा ठेवा देवावर, आईबाबां वर , गुरुजनां वर .

मंडळी कंटाळलात का ?

सगळ्याच गोष्टी  एकदम तुमच्यावर लादणार नाही . एकेक घास चर्वण करून खा . पचवा.  मगच पुढचा मेवा मिळणार तुम्हाला.

.......स्वस्थ रहा मस्त जगा.❤🧡❤🧡❤
   
                                ..... तुमची लाडकी ताई . 

*ता.क. उद्या पुन्हा भेटू*

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 
💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦

पत्र 2

माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींनो, 

अनेक शुभाशीर्वाद ,

माझे मागचे पत्र वाचून तुमच्या मनात काही ना काही विचार तरंग निश्चितच उमटले असणार. शंभर टक्के खात्री आहे मला . (ह्यालाच मी आत्मविश्वास म्हणतेय) म्हणजे बघा तुमच्या मनाला , डोक्याला विचार करायची सवय लावायची हाच माझा उद्देश होता . आणि आज तुमच्या चेहर्‍या कडे पाहून मी सांगू शकते माझा उद्देश पूर्ण झाला . माझा आत्मविश्वास दुणावला आहे. असो.

एखादे कार्य हातात घेतल्यावर ते पूर्णत्वास नेण्यासाठी काही पायर्‍या आपल्याला चढाव्या लागतील. काही गुण अंगात बाणवायला लागतील.

उत्तम नियोजन : वेळेचे , कष्टाचे, आणि आवश्यकता असल्यास आर्थिक नियोजनही करावे लागेल . आपल्या नियोजनात कुठेही त्रुटी राहू देऊ  नका . ह्या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊ या.  कुठलीही मोहीम राबवताना त्यांचा बारकाईने अभ्यास केला जात असे. उद्भवू शकणार्‍या सर्व संकटांचा आढावा घेऊन त्यावर उपाय योजना आधी पासूनच ठरवली जात असे. येवढे करूनही जर अपयश येते आहे असे वाटल्यास दुसरा मार्ग कोणता निवडायचा हेही पाहिले पासूनच ठरलेले असायचे.
तुमच्याच शब्दांत सांगते - एखादी गोष्ट साध्य करताना प्लॅन A बरोबरच प्लॅन B तय्यार ठेवा . कारण यश मिळविण्यासाठी ७५ ते ८० टक्के कष्टाचे असले तरी उरलेले टक्के नशिबा चेही असतात.  प्लॅन A फसला तरी  प्लॅन B प्रमाणे लगेचच कृती करायला सुरवात करा . 

लक्षात ठेवा अपयश आले म्हणजे लगेचच जीवन संपवायची वेडी  घाई करू नका.  

तुम्हाला तो अधिकार कोणीही दिला नाहीय.

बाळानों, अशाच विफल प्रसंगी तुमची जीवनावरची , देवावरील , आई - वडील , गुरुजनांवरची श्रद्धा  कामाला येणार आहे. ते त्याप्रसंगी रागावले तरी त्यांच्या अंतर्मनात तुमच्या यशाचीच कामना असते .

श्रद्धा आणि प्रार्थना आपल्याला जगण्यासाठी फार मोठे बळ देत असतात. आपल्याला जीवनाची उज्ज्वल बाजू दाखवत असतात. आपल्या मनाला वाम मार्गाचा उपयोग न करण्यासाठी आवर घालत असतात.  येणारे वाईट वा चांगले अनुभव सहन करण्याची ताकद देत असतात . आपली सहनशीलता वाढवीत असतात .

एकदा का सहनशीलता वाढलीय की आपोआपच माणूस आपल्यात सद्गुणांचा संग्रह वाढवीत जातो .

माझ्या विद्यार्थी मित्रानो , तुम्हाला असे सद्गुणांचा पुतळा  होऊन जगभर यश पताका मिरवताना मला पहायचे आहे . आणि हे सुख, ही गुरू दक्षिणा तुम्ही मला नक्की देणार ...

यशाचा मंत्र : मेहनत करने वालोंकी कभी  हार नाही होती.

    .                    . ..तुमची लाडकी ताई .

©️®️  सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 
💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦

पत्र 3

नमस्कार तरुणाई, 

आश्चर्यचकीत झालात ना .ताई एकदम नमस्कार म्हणू लागली. काही थांग पत्ताच नाही लागत हिच्या मनाचा.   असे नाही बाळांनो . मोठे झालात आता तुम्ही.  आपली हिंदू संस्कृती आहे ना ती फार श्रीमंत आहे . आयुष्याच्या प्रत्येक काना कोपर्‍या चा विचार त्यात केला गेला आहे .

लालयेत् पञ्च वर्षाणि , दश वर्षाणि ताडयेत्।
प्राप्ते तु षोडशे वर्षे, पुत्रं मित्रवदाचरेत्।।

सोळा वर्षाच मूल झाले की त्याला मित्रा प्रमाणे वागवावे. तुम्हीही आज त्याच सीमारेषेवर उभे आहात. त्यामुळे नमस्कार. तसेच आज हे शेवटचे पत्र. तुम्ही degree मिळवून याल तेंव्हा पुन्हा भेटूच . तोपर्यंत हे पाथेय (शिदोरी) तुम्हाला दीप स्तंभा प्रमाणे मार्गदर्शक ठरो.

ह्यावेळेपर्यंत तुमच्या शाळा कॉलेज सुरू होऊन त्यात  तुम्ही स्थिरावला असाल . मोकळे आभाळ तुम्हाला उडायला मिळाले आहे . खूप उंच भरारी घ्यायची आहे तुम्हाला . आणि इथेच , ह्या वळणावरच सावध ही रहायचे आहे. तुमच्या मार्गात  अनेक आमिष आहेत. वेगवेगळी व्यसन , मुला - मुलीं मधील आकर्षण , पैशासाठी वाम मार्गाचा  वापर , आई - वडिलांची दिशाभूल करणे  इत्यादी इत्यादी. बाबानो कटाक्षाने दूर राहा ह्या सगळ्यां पासून . समजा एव्हडे करूनही चूक झालीच तर ती अगदी लगोलग आई बाबांना कळवा. कदाचित ते रागवतील ही. पण ते तुमचे योग्य मार्गदर्शनही करतील.  आकर्षण वाटणे हे कितीही नैसर्गिक भावना असली तरी,  त्याच्या आहारी जाण्याची ही ती वेळ नाही . अजूनही तुम्ही शारिरीक,  मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे जागृत रहा.

तुमच्या आई बाबांनी तुम्हाला आयुष्यात खूप यश, सुकिर्ती , आयुरारोग्य मिळो अशीच कामना केली . त्याच बरोबर आपली म्हणता येतील अशा माणसांचा सहवास लाभो हा ही विचार केला असेल.  त्या दृष्टीने शक्य तितके प्रयत्न ही केले असतील.  पण ह्यापुढचा मार्ग तुमचा आहे .

बाळांनो,  यश मिळविण्याचा मार्ग फारसा सोपी नाही . अमाप कष्टानी तो पार करता येतो. प्रसंगी अत्यंत प्रिय गोष्टींचा त्याग करावा लागतो .

हा वाढदिवस तुम्हाला सांगतो आहे .. ह्या मार्गावरील तुमचा प्रवास सुरू झाला आहे.  त्यागाची सवय करा .  आळस, झोप ह्याना त्यागा. मौज,  मजा , मस्ती यांना तात्पुरते दूर ठेवा . खूप कष्ट करा आणि यशश्री  खेचून आणा. 

रोज रात्री झोपण्या पूर्वी  आपल्या मनाला प्रश्न विचारा .....  काल ज्या ठिकाणी मी उभी/उभा होतो त्या पुढची पायरी मी चढली/चढलो का ?

ती पायरी असावी ... उच्च विचारांची,  श्रद्धेची , आत्मविश्वासाची,  यशाची , कीर्तीची, समाधानाची.

विद्यार्थ्यांनों, समाधानाने जगता आले  पाहिजे. कोणाच्याही आनंदात आनंद मानता आला पाहिजे .  दुसर्‍याच्या चांगल्या गुणांचा आदर करता आला पाहिजे . स्वतः ची स्तुती स्वतः करू नये. ती दुसर्‍यां नी केली पाहिजे .

"शुभ चिंतावे, शुभ इच्छावे , वचनी  शुभ बोलावे ,
शुभ कर्माच्या सामर्थ्याने कर जीवन सोने."

पुन्हा तुमच्या सगळ्यासाठी संपूर्ण सुखाची कामना ईश्वरचरणी करून थांबते. 

पुन्हा मला भेटायला याल ही आशा आणि इच्छा.

तुम्हाला निरोप देताना मी फार व्याकुळ झाली आहे . पण प्रयत्न पूर्वक तुम्हाला निरोप देते .

सुखी व्हा .

            ...... तुमची मार्गदर्शिका,  शिक्षिका     आणि   .......लाडकी ताई .

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

✍✍✍✍®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 








Monday, 28 March 2022

कातरवेळ आणि अजून काही

🌇 कातरवेळ 🌇

ती कातर वेळा अजुनी स्मरते मजला ,
तो रवी क्षितिजा स्पर्शित झाला होता .
तो चंद्र हासरा नभात विहरत  होता ,
दिवा तमाचा  खेळ मनोहर ,
हृदया रमवित होता .
ती कातर .....
दर्याची ती गाज साथीला ,
खगे शोधीती आश्रय तरुचा,
पशू धन ते परते घरला.
भासे मजला कृष्ण सावळा ,
मुरली घुमवत आला ,
ती कातर......
अशा समयी त्या  दृष्य आगळे ,
पाहून मी ही स्तंभित झाले.
बाल मूर्ती ती कटि घेऊनी ,
ममतामयी ती त्यास जोजवी.
तेज तिच्या त्या मुख कमलाचे
रवी शशीला  हरवित होते .
ती कातर ...

©® सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित

💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦

🌇 कातरवेळ - २ 🌇

कातरवेळी का गे सजणी ,
भरले तुझिया नयनी पाणी .
अस्ताला तो रवी चालला ,
चल गे सखये आता गृहाला.
कपिला आणिक तिचे पाडसे ,
हंबरून तुज साद घालते,
पिंजर्‍या मधूनी राघू - मैना ,
तुझ्या विना गे त्यांची दैना .
उदीत होईल शशी गे आता ,
शांत सागरी उठतील लाटा ,
दुडदुडणारी सान पाऊले,
आसुसलेली तव मायेला.
सखे साजणी सावर आता,
हुरहूर लावी कातरवेळा,
तव प्रेमाची मागत भिक्षा,
अलख् निरंजन जोगी आला.

©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦

🐥 गान कोकिळा 🐥 

आठवतोय का तुला तो पावसाळी दिवस
गच्च भरलेले आभाळ अन् पाण्यात भिजलेली हिरवळ
हात तुझा हाती ,बेभान झालेले मन ,
कागदी होडीत बसूनच फिरून आलोत सारे जग .
जग ही आपले न्यारेच, नव्हते ह्या जगा परी,
नव्हता स्वार्थ तिथे, नव्हती चिंता उद्याची.
नव्हते कोणते दुःख,  नव्हती कोणती विराणी,
शब्द ,शब्द आणि शब्दच, साथीला तुझी वाणी.
आठवतोय का तुला तो पावसाळी दिवस
गच्च भरलेले आभाळ अन् पाण्यात भिजलेली हिरवळ .

क्षणात घालत होतो आभाळाला गवसणी,
क्षणात डुंबत होतो दर्याच्या खोल तळी.
चांदणे आणि रत्ने मिरवीत होतो सारख्याच भावनेने, 
वृक्षांच्या त्या हळव्या सावल्या , तृप्त कोकिळेच्या कूजनाने.
आठवतोय का तुला तो पावसाळी दिवस
गच्च भरलेले आभाळ अन् पाण्यात भिजलेली हिरवळ .

आजही रमतेय त्याच शब्दांच्या जगात, फिरवून आणतात ते मला क्षणात तिन्ही लोकात ,
अजूनही तरंगते तीच कागदी बोट मनात,  घेऊन जाते ती मला त्याच हिरव्या बनात ,
कोकिळेचे कूजन ही अगदी तसेच आहे , चेहरा मात्र तिचा स्वर्गात गेला आहे .
आठवतोय का तुला तो पावसाळी दिवस
गच्च भरलेले आभाळ अन् पाण्यात भिजलेली हिरवळ .

©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

पयोधी तो शांत होता..

रात्र ती नि:शब्द होती ,
द्वितीयेच्या  चंद्रमाची.
भारलेल्या तारका त्या ,
पयोधी तो शांत होता.

दूर त्या दुसर्‍या किनारी ,
आर्तता खुणवीत होती,
वेणूच्या त्या आर्त नादी ,
मी स्वतःला शोधीत होती .

कोण मी ? कोण मी ?
सागरा तू सांग रे,
ऐकुनी प्रश्नास माझ्या ,
तू कसा शांत रे ?

हारले एकदा मी पुन्हा रे,
शोधता  मज त्या किनारी,
हरवले मी पुन्हा रे,
शांतशा त्या  सागरी .

©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित

💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧

प्रतिभेला प्रतिभेची 
जाणीव असावी 
सोन्याच्या कोंदणाने
हिरकणी अलगद उचलून घ्यावी 

©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️

भास आभासाचा हिंदोळा ,
खुणावतो तो आजही मजला .
येशील कारे सखया कृष्णा ,
वाट पाहते वेडी राधा .

©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 
🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩

चंद्र सावळ्या नभी उगवला
पवन शीतल मंद भासला
वनी केवडा फुलून आला
बंसीतून  तो कृष्ण ही वदला
वृथा सारे सखये तुज वीण
का फिरते तू होऊन विरहीण

©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻

सहस्र रश्मी पसरून जगभर 
जीवन देई तो धरणी वर 
नसे दुजा त्या रवी राजा सम
नसे विसावा त्याला क्षणभर

©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅

Wednesday, 9 March 2022

समिक्षण : उपक्रम ज्ञानदेवीचा-सहभाग माझा

 ज्ञानाने म्हणजेच ज्ञानदेवीने  एक सुंदर उपक्रम राबवला . प्रत्येकाने आपण वाचलेल्या कोणत्याही कथा,कादंबरी वा कवितेवर समीक्षा द्यायची. एकदा समीक्षा द्यायची ठरविल्यावर डोळ्यासमोर मोठ्या मोठ्या दिग्गजांची नावे डोळ्यासमोर तरळू लागली.

वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे,  व. पु. काळे,  सुमती क्षेत्रमाडे , पुरंदरे , शांता शेळके , कुसुमाग्रज , कवि अनिल , ग्रेस , पाटणकर ... अरे यादी संपायचे नावच नाही. केव्हढी श्रीमंती ही माय मराठी ची. साहित्याचे प्रकार तरी किती हो . सामाजिक , वैचारिक , संत साहित्य , ऐतिहासिक , पौराणिक, जुने, नवे अबबब ......शेवटी ठरविले अख्ख्या मराठी माणसाला गारुड घालणाऱ्या व. पु. नाच निवडावे.  ठरले.  व. पु. ची माणस हे पुस्तक मी निवडले .हे  पुस्तक निवडण्या मागचे कारण असे की हे पुस्तक वाचल्यानंतर माणस वाचण्याचा मला नादचा लागला असे म्हणावे लागेल.


पुस्तकाचे नाव : व. पु. ची माणसे


सुरवातच फार सुंदर , बहिणाबाईंच्या कवितेने ---


मानसा मानसा, कधी व्हशीन माणूस
लोभा साठी झाला मानसाचा रे कानूस


ह्या पुस्तकात व.पु. नी ५२ माणस वाचलीत हो. त्या सगळ्यांवर समीक्षा लिहायची ठरविली तर ह्या पुस्तका पेक्षा ही मोठी कादंबरी तयार होईल. म्हणून मला  मनापासून खूप आवडलेल्या व्यक्तिचित्रा वरच समीक्षा देतेय.

वांद्र्याहून सुटणार्‍या हार्बर गाडीत ही व्यक्ती म्हणजे आनंद - व. पु.चा मित्र - अनेक वर्षानी भेटलेला . त्यांच्या गप्पांची सुरवात ही कशी सुंदर.

व. पु. - गड्या लग्नाचे आमंत्रण ही दिले नाहीस ?
आनंद - तू रागवण्यातला नाहीस हे मला माहिती     आहे .
आणि ह्यावर व. पु. चे खूप सुरेख मनाला स्पर्श करणारे वाक्य--  आपला मित्र आपल्याला संपूर्ण समजला म्हणजे रागच उरत नाही .

हे वाक्‍य वाचल्यानंतर पुस्तक खाली ठेवणारा निश्चितच करंटा.

तर ही कथा आनंद आणि त्याची बायको ह्या दोन व्यक्तीं भोवती फिरते . 

आनंदचा दिनक्रम असा : पहाटे चारला उठणे,  साडेपाच पर्यंत ध्यानधारणा , आठ वाजता एका ऑफिस मध्ये  पार्ट टाइम जॉब , शाप १०.३० ते ५.३० बँक . पुन्हा सहा ते साडे आठ  दुसर्‍या ऑफिस मध्ये जॉब आणि हे सगळे आटोपून रात्री १०.३० ला बॅक टू पॅव्हेलियन.
मुंबईतल्या चाकरमान्याच्या कष्टाचे मूर्तिमंत वर्णन. 

बर ही धडपड कोणासाठी ? तर वुई साठी . आहे ना मजा! बायकोचे नाव वुई . कसे ठेवले हे नाव ?

व. पु. विचारतात कोणत्या नावाचा हा शॉर्ट फॉर्म?
आनंद चे ही उत्तर जबरदस्त , शॉर्ट फॉर्म नावाचा नाही वृत्तीचा.   Wife मधला if काढून टाकला आणि Wife ची वुई झाली. 

ह्या वुई ची आईही तेव्हडीच कणखर . लग्न ठरे पर्यंत तिला स्वतःच्या मनाने जगू दे , नंतर बेड्या आहेतच, असे  म्हणणारी. तेव्हडीच सामाजिक भान असणारी - तिच्या जिवाला धोका नाही ना एव्हडेच मी बघते असे म्हणणारी.

आणि जुई ? थ्रील शिवाय आयुष्यात मजा नाही असे म्हणणारी . तर ही जुई पायाला सतत भिंगरी लावून फिरणारी , आयुष्य झोकून देऊन जगणारी,  क्रिकेटप्रेमी, नवर्‍याच्या वाटेला अभावानेच येणारी.

पण नवरा अत्यंत संयमी आणि समाधानी . वुईचे बेभानपणे जगणे सहन करण्यासाठी त्या वरच्या शक्ति कडे प्रार्थना करणारा आनंद .

हे सगळे केंव्हा थांबेल?
तर बाळंतपण वाट्याला आले की थांबेल , अगदी तात्काळ उत्तर तयार.
वुई mother केंव्हा होईल ?
तर आनंद अगदी शांतपणे उत्तरतो,  mother मधला other तिला हवासा वाटेल तेंव्हा किंवा वुई ला प्रेग्नन्सी थ्रीलींग वाटेल तेंव्हा . असा समजूतदार नवरा म्हणजे  नवलच.
ह्या व्यक्तीचे थक्क करणारे विचार मोठे की  व. पु. ची लेखन शैली मोठी ? हा एक अनुत्तरीत प्रश्न .

तेव्हडीच मोठी वुई . नवर्‍याला अस म्हणणारी. Husband मधला ban म्हणजे बंदी घालणारा ही अक्षरेच  उडवून लावणारी.
Possession  ऐवजी belonging ला महत्व देऊन अहम् ला विरघळवणारी ही जोडी.
Overtime ला चैतन्याची पूजा म्हणणारा आनंद ग्रेट की नवर्‍याचा स्वातंत्र्य देण्यातला आनंद सांभाळणारी वुई मोठी?

पुन्हा एकदा व. पु. ना वंदन करण्याचा मोह आवरत नाही .
कथेचा शेवट खूप काही सांगणारा :
If we love somebody , set it free. If  it comes back to you, it was yours.  If doesn't,  it was never.

माणस वाचण्याचा नाद लावणार्‍या व. पु. ना त्यांच्याच माणसातून वाचा.
धन्यवाद .

विशेष धन्यवाद dnyandevi wankhde चे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

मिळालेल्या काही प्रतिक्रिया 


ज्ञानदेवी वानखडेची प्रतिक्रिया

नागपूर गेट टुगेदर मध्ये लिपी वरील बऱ्याच लेखकांची ओळख झाली...त्यात काही व्यक्तिमत्त्व कायम मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवावेत असे होते..त्यातील एक म्हणजे मंजूषा अपराजित...वयाचा विचार करायला गेले तर आई मुलीचं नात लागेल आमच्यात पण मैत्री झाली आणि माझ्यासाठी ती मंजू झाली...

                 तिचे दांडगे वाचन हे तिच्यासोबत बोलतांना तिच्या शब्द संपत्ती वरूनच जाणवते.... मंजू च्या मुखातून निघणारा एक एक शब्द म्हणजे जणू समुद्रातील एक एक माणिक मोती टीपावा !! 

               वसा वाचनाचा या पावन कार्याची सुरुवात तिने  दर्जेदार केलीय. सुरुवातीला ती अनेक दिग्गजांचे नाव घेत होती ना तेव्हा माझा जीव वर खाली होत होता कारण ही मंडळी वाचून च मी लहानाची मोठी झालेय पण मनावरच गारूड काही उतरत नाही.आणि शेवटी तिने  व. पु.यांचं नाव घेतलं आणि माझे ओठ आपोआप रुंदावले. 

          मी हे पुस्तक वाचले नाही अद्याप...पण आता लालसा जागी झालीय..नवऱ्याचा बर्थ डे आहे पुढे....त्याला रिटर्न गिफ्ट म्हणून हेच पुस्तक मागणार .. ठरलंय माझं😉😉.700

               सुरुवात उत्कंठा वाढविणारी होती आणि म्हणून सलग  व्हिडिओ मी बारकाईने दोनदा पाहिला...काही वाक्य नोट करून ठेवलीत...

पुस्तकातील एक वाक्य मनात घर करून गेलं...

' मित्र पुरेपूर कळला की राग उरत नाही '.

आणि त्यावर मंजू च  वाक्य.."हे वाचून जो पुस्तक खाली ठेवेल तो करंटा".

'ओव्हरटाईम म्हणजे चैतन्याची पूजा '.

काय तो एकेक ओळीचा गाभा आणि त्यात मंजुचा मधुर आवाज...हो मधुरच....दुसरी उपमा नाहीच

     सुरुवात ते शेवट कधी झाला मला कळलेच नाही...

काहीतरी चांगलं सुरू करतोय याच समाधान मिळालं.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

निशा पांढरेची प्रतिक्रिया  :

उत्तम.. अतिउत्तम.. प्रत्येक वाक्याला प्रसंग आणि ते सादर करताना तुमचा निरागस, शांत चेहरा आठवला.. us आणि we मस्तच. त्याकाळी अशी बेभान जगणारी we होती आणि तिला समजून घेणारा us होता, याचं नवल वाटतं.. खरंच आहे, व. पु. ची माणसे श्रेष्ठ की त्यांची लेखनशैली श्रेष्ठ, विचार करायला लावणारी बाब आहे.. व. पु. आणि त्यांची माणसे आमच्यापर्यंत पोचवणाऱ्या तुम्हीही ग्रेटच..  मस्तच....👌🏻👌🏻👌🏻👌🏻

✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍

              चला चारोळी च्या दुनियेत 

🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆

एक रस्ता मी निवडलेला ...🔥
शब्दांच्या वाटेने जाणारा...🔥
शब्दसंतांची संगत घडविणारा...🔥
पुण्य नगरीत घेऊन जाणारा ..
..🔥

⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

एक रस्ता मी निवडलेला..
शब्दांच्या गर्दीत हरवलेला ..
वेडी वाकडी वळणं नसलेला ..
स्वान्तः सुखाय ची अनुभुती देणारा ..

©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित

⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

एक मार्ग माझ्या आवडीचा ...💞
हात हाती घेऊन चालण्याचा..🤝
सुख दुःखाने भारलेला...😀😭
अंतिम श्वासापर्यंत साथ देणारा 

⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

आयुष्याच्या चित्रपटात मी एक कलाकार आहे
भूमिका देणारा मात्र तो देव आहे.
कधी सुखाच्या, कधी दुःखाच्या सार्‍या भूमिका त्याच्याच आवडीच्या.
त्याच्याच दिग्दर्शनात मी नाचते आहे,स्वतःलाच नशिबवान मानते आहे.

©️®️मंजूषा श्रीकांत अपराजित

⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

जरी विराला दव बिंदू तो ओल्या पातीवरूनी,
हळव्याश्या  त्या कुणा क्षणाला परते मोती बनूनी.
नको ग सखये होऊ कातर, विरहाचा तो क्षण ही 
मंगल ,
जाता जाता देऊन जाईन प्रेमाचा तो गंध सुगंधित
⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

 तुझा सुप्रभात चा सांगावा ,
माझी सकाळ प्रसन्न करून गेला .
दिवसभर राहील सोबतीला आता ,
तोच तुझा हसरा , गोड  चेहरा .

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

आपल्या वेळेची किम्मत आपणच ठरवावी ,
तेवढ्याच वेळेत एखादी छान कृती करावी .
त्या  कृतीने जगाचे कल्याण व्हावे
तुमचे नाव त्रिखंडात दुमदुमावे
⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

मन थोड अडलंय अडलंय ,
नाठाळ बनलय बनलय.
शब्द गेले संपून  संपून ,
चारोळी बसली रुसून रुसून 

⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित



वामांगी- अबला की सबला

वामांगी - वाम अंगाला  असणारी ती वामांगी.  वाम म्हणजे डावा.  त्यानुसार डाव्या भागाला असणारी ती वामांगी.

आता कुणाच्या डाव्या भागाला ? पुरुषा च्या म्हणजेच नवर्‍याच्या डाव्या भागाला अथवा हाताशी असणारी ती त्याची बायको .  अनेक शुभ प्रसंगी,  पूजा अर्चना करताना गुरुजी सुद्धा सांगतात - बायकोने  नवर्‍याच्या डाव्या हाताला बसा . का ? उत्तर नंतर शोधू या.

आता डावा भाग जो आहे तो नेहमी उजव्या भागापेक्षा थोडा कमकुवत मानतात.  कधी कधी वाईट सुद्धा मानतात .  उदा.  वाम मार्गी  म्हणजे वाईट चालीचा अथवा कमकुवत, असहाय्य , कमी शक्तीचा मानल्या जातो. ह्या हिशोबाने  वामांगी ही पुरुषा पेक्षा कमकुवत , असहाय्य , कमी शक्ति असणारी स्त्री झाली.  पुरुषप्रधान संस्कृतीने सरसकट ह्या विचाराला मान्यता दिली.  आणि स्त्री अबला, बलहीन,  क्षुद्र,  कमकुवत ठरली.

अगदी विरुद्ध अथवा विरोधाभासी विचार पहा....

१. A road sign -  For safety  follow लेफ्ट side. लेफ्ट side is attributed to शक्ति.

२. वामे  शक्ति धरम्  - म्हणजे डाव्या हाताला शक्ति धारण करणारा असा तो शिव .  सर्व  विश्वाचा संहार कर्ता  - ओळखल्या जातो आहे पार्वती मुळे - डाव्या भागाला असणार्‍या शक्ति मुळे . सांगा स्त्री अबला की सबला ?

३. वामे  तु जनकात्मजा - म्हणजे कोण ? मर्यादा पुरुषोत्तम  श्रीराम प्रभू. ओळख कशी ह्यांची. डाव्या बाजूला असलेल्या सीते मुळे . श्रीराम प्रभू ची ही शक्ति आहे. तरीही स्त्री अबला ?


जिजाऊ मातेने संकटाशी सामना करत प्रसंगी तलवार चालवून शिवबाच्या मनी स्वराज्याचे बीज पेरले. ती माता अबला कशी? "श्री, सखी , राज्ञी जयती " असा शिक्का कट्यारीचा मान मिळवणारी येसु बाई राणी सगळ्यानाच ठाऊक आहे.

पुराणातील दाखले , इतिहासातील उदाहरणे आपल्याला सशक्त नारीचेच  दर्शन घडवितात. स्वातंत्र्य पूर्व  काळातील दाखला द्यायचा ठरविले तर सावरकरांच्या "त्या तिघी " कमी का होत्या ?  गरोदर पणाचे  नाटक करत जिवंत बॉम्ब पोटाला बांधुन क्रांतिकारकां पर्यंत पोहोचवण्याचे पुण्यकर्म करणार्‍या अबला नाहीत.

काय ह्या स्त्रीया फक्त आजच्या एका दिवसाच्या मानाच्या भुकेल्या होत्या? निश्चितच नाही.

स्त्री आणि पुरुष एकमेकांना  पूरक आहेत. "धर्मे च  अर्थे च कामे च मोक्षे च  नातिचरामी" असे वचन देणारा पुरुष हे वचन फार लवकर विसरतो . तरी ही शक्तिरूपीणी सगळाच लढा एकटीने देत असते.

जेंव्हा पूजा सांगणारे गुरुजी मंत्रोच्चार करताना स्त्री ला "हाताला हात " लावा असे सांगतात त्यावेळी हे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडावे ह्या साठी त्या स्त्रीच्या शक्तीचा आधार मागितल्या जातो.

समाज पुरुषा जागा हो. एक दिवस स्त्री चा  उदो उदो करून उरलेल्या सगळ्या दिवशी तिची पिळवणूक करण्याचा अधिकार निश्चितच तुला नाही. तिची अवहेलना करू नका.
मनू स्मृतीत अगदी स्पष्टपणे नमूद केले आहे -


यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः|
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः||


म्हणजेच ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा होते त्या ठिकाणी देवतांचा निवास असतो . ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होत नाही त्या ठिकाणी केल्या गेलेली सर्व चांगली कर्मे निष्फळ होतात.

रावणाचे उदाहरण आपल्याला ठाऊकच आहे.  अत्यंत मुत्सद्दी राजकारणी , महापराक्रमी , ज्ञानी, कट्टर शिवभक्त असून सुद्धा स्त्रीचा अपमान करण्याचे घोर पातक त्याच्या हातून घडले होते. त्यामुळे त्याच्या उत्तम गुणांचा र्‍हास झाला. आपल्या सर्व पुत्रांना गमावावे लागले. अंततोगत्वा त्याचा ही विनाशच झाला.

म्हणून एकच  सांगणे स्त्रीचे केवळ एक दिवस पूजन करून भागणार नाही. सदैव तिचे ऋणी रहा. माता , भगिनी,  पुत्री, भार्या, स्नुषा ह्या सगळ्या रूपाचा आदर करा.

©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित


Welcome

संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर

 ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात,  किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...