Saturday, 30 April 2022

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी..बदलत्या संकल्पना आणि छेद देणार्‍या रूढी

 झुंजूमुन्जु व्हायला लागले होते. पक्षांचा किलबिलाट खूप सुखद  अनुभव देत होता. सोबतीला थंडगार मोकळा वारा . निसर्गाची ही मुक्त भरभरून देणगी आपण शहरवासियांनी कधीच नाकारली आहे . हजारो लाखो रुपये खर्च करून कुलर आणि एसी त राहून स्वतः चे स्वास्थ्य गमावण्यातच आपण धन्यता मानतो. दूरवरून मंदिरातून  येणारे  काकड आरती चे स्वर प्रसन्नतेत भर घालत होती. 


आतून चुलीवर खळखळणार्‍या चहाचा दरवळ सगळ्यानाच जागा करून गेला.  त्यातच सुभा दादा  ने मारलेली आरोळीने "चाय झाला ताई लोग , दादा लोग , या बीगी बीगी..."  सगळ्यानाच  उठायला भाग पाडले.


कालच्या गप्पांची विचारचक्र अजूनही सगळ्यांच्याच डोक्यात चालू होते . प्रत्येकाचाच चेहरा त्याबद्दल बोलत होता. सगळ्यांची चुप्पी भंग करण्यासाठी मी अचानक  विचारले "तुम्ही देवाला कोणत्या लिमिट पर्यंत मानता ?"


माझ्या प्रश्नाने जवळपास सगळेच चकित झाले. हा प्रश्न कालच्या विषयाला  सुसंगत नव्हताच मुळी. त्या स्तब्धतेचा  भंग निशाने केला..


निशा : Honestly speaking, I am speechless on this point, so no comment 🙏🙏🙏


राणी : मी आता इतकचं लिहते की मी देवाला सृष्टीत बघते .


मनिषा : देव ...  जेव्हा मी खचते, माणसांवरून विश्वास उडतो तेव्हा

मला जगण्याचा आधार वाटतो तो म्हणजे माझा देव...

कशाही परिस्थितीत तग धरून रहायची हिंमत देते ,

अपयशाने न खचता पुन्हा भरारीसाठी सज्ज ज्यांच्या विश्वासावर होते तो म्हणजे माझा देव ...

माझ्या साठी तो सदैव आहे मला प्रेरणा देत, जगण्याचे बळ देत ज्याच्याजवळ मी मनातली कोणतीही गोष्ट बोलते, एकटीच भांडते, चर्चा करते, तोडगा काढते तो म्हणजे माझा देव...

मला माहिती आहे जे त्या दगडावर विश्वांस ठेवत नाही ते देवही माननार नाही, माझा आग्रही नाही पण

जी गोष्ट तुम्हाला पडतांना सावरते ,

चुकल्यावर अनुभव देते,

जिंकण्याची ताकत देते,

तो दगड असो की माणूस ,

पशू प्राणि वृक्ष काहीही ,

तो माझ्यासाठी माझा देवच आहे...


माझी माझ्या गजाननावर असिम श्रद्धा आहे ज्या परिस्थितीत मी व्यथित होते किंवा मला परिस्थिती सांभाळता येत नाही अशा वेळेस मी सर्व त्यावर सोपवते आणि मला मार्ग सापडतो ...

कदाचित तो मार्ग माझा मलाच सापडत असेल पण जेव्हा मी पूर्ण शरण जाते तेव्हा माझ्यातली मी मला नव्याने सापडते आणि हाच माझ्यासाठी माझा देव आहे ...

या रोबोटिक जगात जेव्हा सर्व कामे यंत्राने होतात तरीही मन अशी गोष्ट आहे ज्यांचे अजून यंत्र झाले नाही ...

तो हसतो रडतो झुरतो बोलतो अदृश्य असूनही आपल्या तालावर नाचवतो अश्या स्थितीत कोणीतरी पाहिजे जे त्याला बळकटी देईल . स्थिर ठेवेल त्याला आई सारखे वळण लावेल . ती आई म्हणजे माझ्यासाठी माझा देव आहे ...

श्रध्दा असणे म्हणजे अंधश्रद्धा नाही, हेही तेवढेच खरे आहे ...

माझा देव त्या पाण्यात खळाळतो,

क्षितीजांवर रंग उधळतो ,

आसमंत डोळ्यात साठवते ,

वाऱ्यासवे गाणे गातो ,

जीवनाला जीवन म्हणून सांगतो,

कर्तव्याची जाण देतो ...

हो तो माझा देव आहे ...

हो तो माझा देव आहे...


सचिन : *कुठे देव पहिला?*

माने भक्ती असे अंतरी पण

देव आहे का कोणी पहिला

आला काळ जेव्हा नेण्या

कोठे मग तो लपून राहिला


जीवांचा इतका खेळ

जो त्याचे दारी खेळला 

चेंगारले ते कित्येक देह

तेव्हा तो भक्ता कसा विसरला


दर्शनासाठी जर त्याचे

द्यावया लागे जिथे प्राण

आहे का तो खरं तिथे

आता तरी हे सत्य जाण


का शोधसी तिथेच देवा

अंतरी ही तो विराजमान

देव आहे सर्वत्र ना देवळात

सत्य हेच आता तरी जाण 


माय बाप ही आहे देव

देव तिथे जिथे असे दया,नम्रता

मिळे अस्तित्व तिथे त्याचे

जिथे असे प्रेम,त्याग ,ममता


मोहन दा : देवाला मानण्याची मते आप आपल्या परीने वेगवेगळी आहे, कोणी म्हणतात देवाचे अस्तित्वच नाही तेव्हा मग प्रश्न पडतो, की सृष्टी आपोआप तयार झाली का..? राम ,कॄष्ण , शंकर, विष्णु,इंद्र, काली, हनुमान, आताच्या काळात, गजानन महाराज, साईबाबा ,ताजुद्दीन हे झालेच नाही म्हणतात.     लोक जरी हे मानत नसतील तरी मी देवाला मानतो कारण , पाच लोकांना कुटुबातील चारचाकी सहा पल्टी खाल्यावर खरोच न लागणे म्हणजे देवानेच वाचवणे होय, आमचे दुसरे आयुष्य समजावे हे



उर्मी: देव ही संकल्पना खूप अफाट आहे.. आपल्या मनाला उभारी देणारी पॉसिटीव्ह उर्जा म्हणजे देव.. 

माझी देव ह्या संकल्पनेवर नितांत श्रद्धा आहे..

म्हणूनच भुताखेतांवर ही आहे..

मला देवाबद्दल जितकी आत्मीयता वाटते तितकीच भीती भुतांबद्दलही वाटते 😊



अनघा : देवाला मी कायमच माझ्या अवतीभवती पाहते. अदृश्य असला तरी जवळ वाटतो. मनाला दिलासा देतो. प्रचंड श्रध्दा आहे देवावर. माणसातही देव कधीकधी दिसून येतो. आशेची पणतीही देवच मनात जागृत ठेवतो. स्वतःच्या अंतरंगातही देव मला आढळतो


वर्षा : मंदिरातला देव कधी माझ्यासोबत बोललाच नाही अन देवाचा उदे उदे करणारे माणसाला कमी लेखल्याशिवाय राहत नाही .

डेबूजींसारखाच माझा देव सुद्धा माणसातच आहे .

श्रद्धा जगायला शिकवते मन शुद्ध  होते साकारात्मकतेमुळे ...पण गावातली लोक डोक्याबाहेरची विचारसरणी आहे .


सगळ्यांचे देवाबद्दल चे निकोप विचार मी ऐकत होती . पण मला हवे होते ते उत्तर मिळत नव्हते. शेवटी न राहवून मी म्हणाले 


देव मीही मानते मैत्रिणींनो.  फक्त मी त्याकडे एक +ve ऊर्जा म्हणून पाहते.  देव आणि दानव . एक +ve , सुदृढ पॉवर किंवा विचारधारा तर दानव ही वाईट , दुष्ट वृत्तीची विचारधारा.   कदाचित सायन्स स्टुडंट असल्याने अस समजत असेन मी .  कुणी त्याला सगुण रूप दिले कुणी निर्गुणाचा पूजक आहे . 

ह्याच देवाने आपल्याला शरीर दिले . कुणी पुरुष झाला कुणी स्त्री जन्म घेऊन आली .   


त्या जन्मदात्या ने म्हणजे  देवाने पुरुषाला आणि स्त्रियांना एकमेकांचे पूरक बनविले. म्हणजे कुणी एकटा पूर्ण नाही . एकमेकांशिवाय ते दोघेही अधुरे आहेत .


स्त्री ला सृजनशीलता दिली आहे. म्हणजेच नव उत्पत्ती ची देणगी . पण त्यासाठी तिच्या शरीराला विशिष्ट ऋतु चक्रातून जावे लागते.  त्या शिवाय नव निर्मिती होणे नाहीच . असे असताना ह्या निसर्ग चक्रातून जाताना स्त्रीला आजही विचित्र वागणूक का दिली जाते?


त्याही पुढे जाऊन एखाद्या धार्मिक कार्य प्रसंगी जर तिची पाळी येणार असेल तर तिला pills घ्यायला का भाग पाडतात? त्यात देवाने काय येऊन सांगितले ? ह्या कुप्रथेपायी एका मासूम जीवा ला आपले प्राण गमवावे लागले. त्या घटनेची मी दुर्दैवी साक्षीदार आहे.  खरच  माणसाला आपला जीव गमवावा लागला तरीही चालेल पण देव कोपु नये म्हणून अघोरी उपाय अवलंबिले पाहिजे का ?


म्हणून माझा प्रश्न होता  तुम्ही देवाला कोणत्या लिमिट पर्यंत मानता ?


सगळेच एकदम स्तब्ध झाले होते . आणि  अचानक सगळ्यानीच एकदम गलका केला. कोण होती ती मुलगी ? कुठली घटना आहे ही ?


उद्या सगळ्यांना सांगीन असे प्रॉमीस करून मी विषय संपवला . आता आमराई फिरायला जायचे आहे ह्याचीही आठवण करून दिली . त्यामुळे आन्हिके आटोपायला  सगळेच पळाले. 



...क्रमशः 


वाचक वर्ग तुम्ही दाद दिली नाही तर तर माझा स्त्री जागृतीचा प्रयत्न व्यर्थ गेला असे वाटेल. स्पेशली स्त्री वर्गा कडून माझ्या फार अपेक्षा आहे . कमेन्ट,  स्टिकर भरभरून द्या ..



©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 



No comments:

Post a Comment

Welcome

संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर

 ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात,  किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...