मागच्या भागात काय घडले....
भविष्याची मस्त स्वप्ने पाहण्यात तो रमला होता . मधेच त्या स्वप्नात सुमती डोकावली . ती त्याला हाताला धरून ओढत कुठे तरी घेऊन जात होती . तो नको नको म्हणून ओरडत उठला . जशी जाग आली तसे त्याच्या लक्षात आले आपण स्वप्न पाहत होतो. दिवा बंद न करताच तो झोपला होता. उठून त्याने दिवा बंद केला. घड्याळाने दिलेले तीनचे ठोके त्याने ऐकले . आणि बराच वेळ तो कूस बदलवत झोपेची आराधना करत राहिला .....
आता पुढे
मधेच त्याला झोप लागत होती तर मधेच तो दचकून जागा होत होता. मधेच सुमती त्याला खुणावत होती तर कधी ती हात धरून त्याला फिरायला घेऊन जात होती. ह्या सगळ्या लपंडावात त्याच्या झोपेचे पार खोबरे झाले. केव्हातरी त्याचा डोळा लागला. पहाटेच्या साखरझोपेत त्याला कळलेच नाही की आता उठायची वेळ झाली आहे. उन्हाची तिरीप चेहर्यावर पडताच तो खडबडून जागा झाला. पहिल्यांदा तो जरा गडबडला पण मग आज स्वयंपाकाची घाई नाही म्हणून जरा निवांत झाला .
शांतपणे त्याने आन्हिके आटोपली , बाबांची सगळी व्यवस्था करून दिली आणि ऑफिस च्या तयारीला लागला .
आज जरा तो व्यवस्थित तयार झाला . स्काय ब्लू कलरचा शर्ट , वर त्याला मॅचिंग ब्लेझर आणि पँट. मोजे-बूट . चापून चोपून बसवलेले केस . त्याच्या उंच पुर्या शरीरयष्टीला आणि गोर्या रंगाला सारे शोभून दिसत होते.
नऊ वाजता बरोब्बर दारावरची बेल वाजली. रमाकांत घड्याळ बांधत बांधतच बाहेर आला. दारात सुमती डबा घेऊन उभी होती .
ती अवाक् होऊन एकटक त्याच्याच कडे पाहत उभी राहिली . आजवर तिने त्याच्या कडे फारसे निरखून पाहिले नव्हते . पण आज त्याच्यावरून तिची नजर हालत नव्हती . रमाकांत च्याही लक्षात ही बाब आली. मनाच्या आतल्या कप्प्यात तोही सुखावला. पण त्याला उशीर होत होता. तो उगीचच खाकरला. त्यासरशी गोरीमोरी होत तिने डब्बा त्याच्या हातात दिला आणि पटकन पाठमोरी होऊन तरातरा चालू लागली.
तिच्या ह्या कृतीचे त्याला हसू आले आणि तो तिथेच तिची लगबग पहात उभा राहिला.
आपल्या मूर्खपणाची तिला लाज वाटली आणि स्वतः चा खूप राग ही आला . पण पुन्हा एकदा चोर नजरेनी त्याच्याकडे पाहण्याचा मोह ती आवरू शकली नाही. आणि तो तिथेच उभा राहून आपल्याकडे मिश्किल पणे पाहतो आहे हे लक्षात येताच ती मनातल्या मनात स्वतःवर चडफडत पटकन तिथून नाहीशी झाली.
ती नजरेआड होईस्तोवर तो तिथेच उभा होता. आत वळता वळता त्याला आपल्या वागण्याचा अर्थच उमगेना. पण मन मात्र खूप प्रसन्न होते. असे का वाटते आहे आपल्याला ? त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला . उत्तर न मिळाल्याने तो थोडासा अस्वस्थ झाला. इतक्यात त्याला रात्रीचे स्वप्न आठवले आणि समोर पाहणारे कुणीही नसताना तो चांगलाच गोरामोरा झाला.
त्याने पटापट बाबांचे आणि स्वतःचे जेवण आटोपले आणि बँकेत जायला निघाला . आज त्याला फार हलके हलके वाटत होते. आज फारसे ऑफिसचे काम ही नव्हते. उद्याची सुट्टी ही सॅन्क्शन झाली होती. त्याच्या नकळत तो शिळ वाजवत बँकेत शिरला. दारावरच्या शिपायाने मारलेला कडक सॅल्युटला त्याने हसून उत्तर दिले .
त्याच्या पाठोपाठ येणार्या स्मिता गोडबोले च्या लाडिक बोलण्याकडे रोज सारखे दुर्लक्ष न करता त्याने तिला गुडमॉर्निंग म्हंटले. आज हा असा काय वागतोय ? असे हावभाव तिच्या चेहर्यावर दिसताच त्याने त्याकडे सोयीस्कर रीत्या दुर्लक्ष केले.
मागून येणार्या सरिताने आवाज देताच , तो थांबला . तिलाही त्याने गुडमॉर्निंग म्हणत हास्य वदनाने त्याने तिच्याकडे पाहिले.
" रमाकांत , आज एकदम सुटाबुटात ? पण छान दिसताय. उद्यापासून मिस करू तुम्हाला . अधून मधून येत जा भेटायला. "
"हो , हो अवश्य " म्हणून तो पुढे सरकला .
चार पावले चालत नाही तोच पेंशन सेक्शन च्या काकू सुंदरसा प्लास्टिकचा डबा घेऊन समोर येऊन थांबल्या. रमाकांत बद्दल त्यांना सॉफ्ट कॉर्नर होता. त्याच बरोबर आपल्या भाची साठी एक चांगले स्थळ ह्या दृष्टीने त्या रमाकांतला पहात असे.
" रमाकांत , माझ्याकडून ही छोटीशी भेट . "
चांगले आठ दहा बेसनाचे लाडू भरलेला डब्बा त्याच्यापुढे करत काकू बोलल्या .
" आणि हो , डब्बा परत करायच्या भानगडीत पडू नको. खास तुझ्यासाठीच घेतला आहे. पुढे मागे तुझ्या संसाराला उपयोगी पडेल ." त्यांनी हसत हसत डब्बा पुढे केला.
त्यांच्या शेवटच्या वाक्याने संकोचून गेलेला रमाकांत म्हणाला ,
" काकू, अहो कशाला तुम्ही तसदी घेतली ?"
"अरे , आपल्या माणसासाठी करायला काही तसदी होत नाही ."
"येत जा हो अधून मधून . अगदी हक्काने माग काय हवे नको ते. हे माझे कार्ड . फोन करत जा अधून मधून ." त्याच्या हातात जबरदस्तीने डब्बा ठेवत काकू बोलल्या.
त्यांच्या पासून कशीबशी सुटका करून घेत रमाकांत आपल्या काऊंटर वर येऊन थबकला. लाडू पाहून तसा तो खुषच झाला होता . पण काकूंचे बोलणे त्याला रुचले नव्हते.
थोडा वेळ शांत बसून त्याने स्वतःला स्थिरस्थावर केले . उरलेले काम त्याने एक तासात पूर्ण केले . घड्याळात डोकावून पाहिले तेंव्हा लंच ब्रेकला अजून अवकाश होता .
त्याने आजूबाजूला नजर टाकली . जो तो आपापल्या कामात मग्न होता . कस्टमरची ये जा चालू होती. कोणी पैसे जमा करायला येत होते , तर कोणी काढायला . सायबर क्राइमच्या बळींची लाइन फारच मोठी होती . त्यात जास्तीत जास्त म्हातारे लोकच दिसून येत होते . तेही स्वतः च्या मुलाबाळां कडूनच फसविल्या गेलेले. त्याला त्या लोकांची खूपच किव आली. आपण कधीही आपल्या पोरांवर इतका आंधळा विश्वास टाकायचा नाही , त्याने मनोमन ठरविले. मग त्यालाच त्याच्या विचाराची मजा वाटली.
आजकाल आपण असे विचार का करतो ?
आता दृष्टीसमोर दिसणार्या लोकांचा विचार करण्यापेक्षा त्याने स्वतःचे अंतरंग तपासायला सुरवात केली. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांची त्याने उजळणी करायला सुरवात केली. मिळालेले प्रमोशन, जोशी साहेबांचे लग्नाच्या बाबतीतले वाक्य , काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण केलेली धावपळ, आज पेन्शन डिपार्टमेंट च्या काकूंचे सूचक वाक्य आणि ह्या पळापळीत आपली सुमतीशी झालेली भेट.
तिचा तो कडक शिस्तीचा स्वभाव. वेळ पाळण्याचा आग्रह , केवळ मेहनतीचेच पैसे स्विकारण्याचा कटाक्ष .........
तो पूर्णपणे सुमतीचा विचार करण्यात गुंगून गेला होता. तिचा स्वाभिमानी स्वभाव त्याला कुठेतरी भावला होता त्याचवेळी तिच्यासारख्या मुलीने आपल्याला असे सडेतोड उत्तर द्यावे ह्यात त्याचा पुरुषी अहंकार ही दुखावल्या गेला होता.
विचार करता करता त्याची नजर सहज बाहेर गेली. फॉर्म भरण्याच्या टेबल पाशी बरेच लोक घोळका करून उभे होते. त्या घोळक्यात एक मुलगी भराभर कोणाला पेईंग स्लिप तर कोणाला विथड्रावल फॉर्म भरून देत होती. त्याचे कुतूहल चाळावले. त्याने जरा निरखून पाहण्यास सुरवात केली पण काही केल्या त्याला तिचा चेहरा दिसेना.
तेवढ्यात एक वयस्कर माणूस त्या गर्दीपाशी येऊन मोठ्याने बोलला.
" अग सुमा , झाली नाही का तुझी लोकसेवा ? चल लवकर दादाची औषधं घ्यायला जायचे आहे अजून . उशीर नको व्हायला .
त्यांचा आवाज ऐकताच ती म्हणाली , " हो हो काका, आलेच लगेच ..."
हातातली स्लिप भरून देत आणि बाकीच्यांचे काम नंतर करून देईन म्हणत ती त्या गर्दीतून लगबगीने बाहेर पडली. मघापासून कुतूहलाने तिकडेच पहात असलेल्या रमाकांतला आत्ताही ती पाठमोरीच दिसली . पण तिची लगबगीने चालण्याची ढब पाहून ती सुमती तर नाही ना? असा विचार त्याच्या मनात चमकून गेला .
ऊफ्फ, पुन्हा एकदा सुमती . त्याला आत्ता स्वतःचाच राग आला.
तेवढ्यातच त्याचा सहकारी लंचला चल म्हणून बोलवायला आला त्यामुळे त्याची विचार शृंखला तुटली आणि तो लंच करायला निघून गेला.
कोण होती ती तरुणी ? सुमती की दुसरीच कोणीतरी? रमाकांत सारखाच सुमतीचा विचार का करत होता?
पाहू सगळ्या प्रश्नांची उत्तर पुढच्या भागात .
...... ...... ...... ..... ...... ...... क्रमशः
😇🤨😇🤨😇🤨😇🤨😇🤨😇🤨😇🤨©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित