चि. तरुण / तरुणी (१०/१२ वी पास झालेले )
अनेक शुभाशीर्वाद---
"तुमच्या वाढदिवसा प्रीत्यर्थ अनेक शुभ कामना"
चमकला का ? प्रश्न पडला असेल ना आमच्या सगळ्यांचाच वाढदिवस एकाच दिवशी कसा ?
बघा. तुमच्यातील अनेकानी १० वी पास केली , बरेच लोकां नी १२ वी पास केली. आज पर्यंत आई बाबांच्या सुरक्षित पंखाखाली तुम्ही होतात . पण जसा तुमचा निकाल लागला तस तुमच्या विचारांना चालना मिळाली . सायन्स घेऊ की कॉमर्स ? शाळेतच अॅडमिशन घेऊ की कॉलेज मध्ये? माझ्या मित्राने जिथे अॅडमिशन घेतली तिथेच घेऊ का ? बाबांच्या पॉकेटला ह्या कॉलेज चा खर्च झेपेल का? विचारांच्या आवर्तनात अडकले की राव तुम्ही. म्हणजेच बुद्धीला चालना मिळाली की . बुद्धीची वाढ होतेय . जिथे वाढ होतेय तिथे वाढदिवस साजरा झालाच पाहिजे . म्हणून तुम्हाला वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा.
आज तुम्ही जितक्या वर्षांचे झालात तितकी गेलेली वर्षे तुम्हाला फक्त वयात वाढ झाली ह्याचीच जाणिव करुन देत गेली .
अगदी लहानपणी वाढदिवसाचा अर्थ म्हणजे मौज- मजा- मस्ती, खूप सारे प्रेझेंट, आवडीच्या वस्तु खाणे आणि सर्वांच्या कौतुकाचा केंद्र बिंदू बनणे एव्हढाच होता . सगळ्यात मुख्य म्हणजे आई बाबानी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मनसोक्त उपभोगू दिल्या आणि तुमच्या आनंदात आनंद मानला.
पण...
आज तुम्ही ज्या सीमारेषेवर उभे आहात त्या ठिकाणी तुमची स्वतः ची ओळख तुम्हालाच नव्याने करून देण्याची गरज आहे.
यापुढे येणारा प्रत्येक वाढदिवस तुमच्या हातात एक एक नव्या जबाबदारीचे प्रेझेंट देऊन जाणार आहे. ते पेलण्यासाठी आपले तनच नव्हे तर मनही बळकट असणे आवश्यक आहे. तनामना च्या स्वास्थ्यासाठी स्वतः वर विश्वास ठेवण्याची क्षमता असली पाहिजे .
समोर उभे राहिलेले कोणतेही आव्हान स्वीकारून ते यशस्वी रित्या मी पूर्णत्वास नेईन हा आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. एक मिनिट...थांबा..
आत्मविश्वास म्हणजे over कॉन्फिडन्स नव्हे .
हा आत्मविश्वास जागृत ठेवण्या साठी जीवनावर श्रद्धा ठेवायला शिका. श्रद्धा ठेवा देवावर, आईबाबां वर , गुरुजनां वर .
मंडळी कंटाळलात का ?
सगळ्याच गोष्टी एकदम तुमच्यावर लादणार नाही . एकेक घास चर्वण करून खा . पचवा. मगच पुढचा मेवा मिळणार तुम्हाला.
.......स्वस्थ रहा मस्त जगा.❤🧡❤🧡❤
..... तुमची लाडकी ताई .
*ता.क. उद्या पुन्हा भेटू*
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦
पत्र 2
माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींनो,
अनेक शुभाशीर्वाद ,
माझे मागचे पत्र वाचून तुमच्या मनात काही ना काही विचार तरंग निश्चितच उमटले असणार. शंभर टक्के खात्री आहे मला . (ह्यालाच मी आत्मविश्वास म्हणतेय) म्हणजे बघा तुमच्या मनाला , डोक्याला विचार करायची सवय लावायची हाच माझा उद्देश होता . आणि आज तुमच्या चेहर्या कडे पाहून मी सांगू शकते माझा उद्देश पूर्ण झाला . माझा आत्मविश्वास दुणावला आहे. असो.
एखादे कार्य हातात घेतल्यावर ते पूर्णत्वास नेण्यासाठी काही पायर्या आपल्याला चढाव्या लागतील. काही गुण अंगात बाणवायला लागतील.
उत्तम नियोजन : वेळेचे , कष्टाचे, आणि आवश्यकता असल्यास आर्थिक नियोजनही करावे लागेल . आपल्या नियोजनात कुठेही त्रुटी राहू देऊ नका . ह्या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊ या. कुठलीही मोहीम राबवताना त्यांचा बारकाईने अभ्यास केला जात असे. उद्भवू शकणार्या सर्व संकटांचा आढावा घेऊन त्यावर उपाय योजना आधी पासूनच ठरवली जात असे. येवढे करूनही जर अपयश येते आहे असे वाटल्यास दुसरा मार्ग कोणता निवडायचा हेही पाहिले पासूनच ठरलेले असायचे.
तुमच्याच शब्दांत सांगते - एखादी गोष्ट साध्य करताना प्लॅन A बरोबरच प्लॅन B तय्यार ठेवा . कारण यश मिळविण्यासाठी ७५ ते ८० टक्के कष्टाचे असले तरी उरलेले टक्के नशिबा चेही असतात. प्लॅन A फसला तरी प्लॅन B प्रमाणे लगेचच कृती करायला सुरवात करा .
लक्षात ठेवा अपयश आले म्हणजे लगेचच जीवन संपवायची वेडी घाई करू नका.
तुम्हाला तो अधिकार कोणीही दिला नाहीय.
बाळानों, अशाच विफल प्रसंगी तुमची जीवनावरची , देवावरील , आई - वडील , गुरुजनांवरची श्रद्धा कामाला येणार आहे. ते त्याप्रसंगी रागावले तरी त्यांच्या अंतर्मनात तुमच्या यशाचीच कामना असते .
श्रद्धा आणि प्रार्थना आपल्याला जगण्यासाठी फार मोठे बळ देत असतात. आपल्याला जीवनाची उज्ज्वल बाजू दाखवत असतात. आपल्या मनाला वाम मार्गाचा उपयोग न करण्यासाठी आवर घालत असतात. येणारे वाईट वा चांगले अनुभव सहन करण्याची ताकद देत असतात . आपली सहनशीलता वाढवीत असतात .
एकदा का सहनशीलता वाढलीय की आपोआपच माणूस आपल्यात सद्गुणांचा संग्रह वाढवीत जातो .
माझ्या विद्यार्थी मित्रानो , तुम्हाला असे सद्गुणांचा पुतळा होऊन जगभर यश पताका मिरवताना मला पहायचे आहे . आणि हे सुख, ही गुरू दक्षिणा तुम्ही मला नक्की देणार ...
यशाचा मंत्र : मेहनत करने वालोंकी कभी हार नाही होती.
. . ..तुमची लाडकी ताई .
©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦
पत्र 3
नमस्कार तरुणाई,
आश्चर्यचकीत झालात ना .ताई एकदम नमस्कार म्हणू लागली. काही थांग पत्ताच नाही लागत हिच्या मनाचा. असे नाही बाळांनो . मोठे झालात आता तुम्ही. आपली हिंदू संस्कृती आहे ना ती फार श्रीमंत आहे . आयुष्याच्या प्रत्येक काना कोपर्या चा विचार त्यात केला गेला आहे .
लालयेत् पञ्च वर्षाणि , दश वर्षाणि ताडयेत्।
प्राप्ते तु षोडशे वर्षे, पुत्रं मित्रवदाचरेत्।।
सोळा वर्षाच मूल झाले की त्याला मित्रा प्रमाणे वागवावे. तुम्हीही आज त्याच सीमारेषेवर उभे आहात. त्यामुळे नमस्कार. तसेच आज हे शेवटचे पत्र. तुम्ही degree मिळवून याल तेंव्हा पुन्हा भेटूच . तोपर्यंत हे पाथेय (शिदोरी) तुम्हाला दीप स्तंभा प्रमाणे मार्गदर्शक ठरो.
ह्यावेळेपर्यंत तुमच्या शाळा कॉलेज सुरू होऊन त्यात तुम्ही स्थिरावला असाल . मोकळे आभाळ तुम्हाला उडायला मिळाले आहे . खूप उंच भरारी घ्यायची आहे तुम्हाला . आणि इथेच , ह्या वळणावरच सावध ही रहायचे आहे. तुमच्या मार्गात अनेक आमिष आहेत. वेगवेगळी व्यसन , मुला - मुलीं मधील आकर्षण , पैशासाठी वाम मार्गाचा वापर , आई - वडिलांची दिशाभूल करणे इत्यादी इत्यादी. बाबानो कटाक्षाने दूर राहा ह्या सगळ्यां पासून . समजा एव्हडे करूनही चूक झालीच तर ती अगदी लगोलग आई बाबांना कळवा. कदाचित ते रागवतील ही. पण ते तुमचे योग्य मार्गदर्शनही करतील. आकर्षण वाटणे हे कितीही नैसर्गिक भावना असली तरी, त्याच्या आहारी जाण्याची ही ती वेळ नाही . अजूनही तुम्ही शारिरीक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे जागृत रहा.
तुमच्या आई बाबांनी तुम्हाला आयुष्यात खूप यश, सुकिर्ती , आयुरारोग्य मिळो अशीच कामना केली . त्याच बरोबर आपली म्हणता येतील अशा माणसांचा सहवास लाभो हा ही विचार केला असेल. त्या दृष्टीने शक्य तितके प्रयत्न ही केले असतील. पण ह्यापुढचा मार्ग तुमचा आहे .
बाळांनो, यश मिळविण्याचा मार्ग फारसा सोपी नाही . अमाप कष्टानी तो पार करता येतो. प्रसंगी अत्यंत प्रिय गोष्टींचा त्याग करावा लागतो .
हा वाढदिवस तुम्हाला सांगतो आहे .. ह्या मार्गावरील तुमचा प्रवास सुरू झाला आहे. त्यागाची सवय करा . आळस, झोप ह्याना त्यागा. मौज, मजा , मस्ती यांना तात्पुरते दूर ठेवा . खूप कष्ट करा आणि यशश्री खेचून आणा.
रोज रात्री झोपण्या पूर्वी आपल्या मनाला प्रश्न विचारा ..... काल ज्या ठिकाणी मी उभी/उभा होतो त्या पुढची पायरी मी चढली/चढलो का ?
ती पायरी असावी ... उच्च विचारांची, श्रद्धेची , आत्मविश्वासाची, यशाची , कीर्तीची, समाधानाची.
विद्यार्थ्यांनों, समाधानाने जगता आले पाहिजे. कोणाच्याही आनंदात आनंद मानता आला पाहिजे . दुसर्याच्या चांगल्या गुणांचा आदर करता आला पाहिजे . स्वतः ची स्तुती स्वतः करू नये. ती दुसर्यां नी केली पाहिजे .
"शुभ चिंतावे, शुभ इच्छावे , वचनी शुभ बोलावे ,
शुभ कर्माच्या सामर्थ्याने कर जीवन सोने."
पुन्हा तुमच्या सगळ्यासाठी संपूर्ण सुखाची कामना ईश्वरचरणी करून थांबते.
पुन्हा मला भेटायला याल ही आशा आणि इच्छा.
तुम्हाला निरोप देताना मी फार व्याकुळ झाली आहे . पण प्रयत्न पूर्वक तुम्हाला निरोप देते .
सुखी व्हा .
...... तुमची मार्गदर्शिका, शिक्षिका आणि .......लाडकी ताई .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
✍✍✍✍®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित