Thursday, 16 June 2022

वटवृक्ष

 साल २१२२ (आजपासून १०० वर्षानंतर)


कधी नव्हे तो वरूण राजा ७ जूनलाच अवतरला होता . नाही नाही ......हस्त नक्षत्र नसतांनाही हत्तीच्या पावलानी धुवाधार कोसळला होता . जणू काय प्रलय आला होता . 


सोसाट्याच्या वार्‍याने बर्‍याच लहान मोठ्या वृक्षांना जमीनदोस्त केले होते .


दोन उपनगरांना जोडणाऱ्या त्या रस्त्याच्याकडेला एक वटवृक्ष आपल्या परिवारासह शून्य नजरेने ही वाताहात  पहात उभा होता.


त्याच्या आश्रयाला असलेले पक्षी आपल्या परिवारा सह त्याचा त्याग करून मोठ्या मोठ्या इमारतीच्या आडोशाला गेले होते . 


५ दिवसापासून सूर्य दर्शन काय चिटपाखरू ही नजरेला पडले नव्हते . नदी , नाले , डबकी ओसंडून वाहत होती .  


माणसाने मोठ्या प्रयासाने  बांधलेला तो सीमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पार चिखलमय  झाला होता . 


कालपासून  पाऊस ओसरू लागला होता . पण अजूनही माणसं घराबाहेर पडली नव्हती. 


तसेही आजकाल लोक घराबाहेर पडतच  नव्हती. करोनाचा  नायनाट करायलाच माणसाला ३० - ४०  वर्षे लागली होती.  


त्यातून सावरले म्हणून  निःश्वास  सोडतात ना सोडतात तोच चीनने अजून एका महा विषाणूचा सर्वत्र प्रसार केला . मृत्यूने अक्षरशः तांडव केले होते . 


ह्या वटवृक्षा ने तटस्थपणे हा सर्व विनाश पाहिला होता .  मनोमन तो फार खचला होता.


एके काळचे ते वैभवशाली नगर आता फक्त सिमेंट च्या घरांचे जंगल भासत होते. माणूस जीवाच्या भीतीने माणसालाच टाळत होता.


तेव्हड्यातच मंगळावर मनुष्याने वस्ती करायला  सुरवात केली होती.  पैसेवाल्यांने ह्या संधींचा पुरेपूर फायदा घेतला होता . पृथ्वी वरची लोकसंख्या  बर्‍यापैकी कमी झाली होती. 


पण तोपर्यंत निसर्गाचा पुरेपूर ऱ्हास झाला होता.  पण हा वटवृक्ष अनेक संकटाना तोंड देत तिथेच आपला पसारा वाढवीत उभा होता .


तारीख १४ जून २१२२


वटपौर्णिमेचा दिवस 


वेळ सकाळची ...


तरीही प्रसन्न न वाटणारी ...


कशी वाटणार ?????


गेल्या काही वर्षात माणसांनी टेक्नॉलॉजी चा एव्हढा उदो उदो केला  आणि  फार मोठ संकट ओढवून घेतले .  स्वतः च्या स्वार्थ साधताना आपण निसर्गाचा किती नाश करतोय ह्याकडे लक्ष च नाही ना दिले . 


काल सुद्धा असच झाले . समोरच्या झोपडपट्टी मधील २-३ मुले धावत पळत आली आणि घाईघाईने वडाच्या फांद्या ओरबाडून निघून पण गेली.


खर म्हणजे मुले आपल्याकडे येताना पाहून झाड खूप सुखावले होते. पण त्यांच्या राक्षसी वृत्तीमुळे झाड खुप दुःखी झाले होते.  रात्रभर झालेल्या जखमांनी कण्हत होते.


वटवृक्ष आज खूप आसुसलेल्या नजरेनी त्याच्या टप्प्यात येणार्‍या सगळ्या इमारती आणि घरांकडे पहात होता. त्याला एकटेपणा  नकोसा झाला होता.


कुठे माणसांची हालचाल दिसतेय का ? बायकांची लगबग दिसतेय का ? पण निराशाच त्याच्या पदरात पडत होती  .


पाहता पाहता सूर्य माथ्यावर आला पण अजून तिकडे कोणीही फिरकलेच नव्हते . बहुदा भारतीय  संस्कृती लोप पावली ,असाही एक भयानक विचार त्याच्या मनात डोकावून गेला.


पुन्हा आभाळात काळे ढग तुरळक दिसू लागले होते . सूर्याला झाकण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता.  त्यामुळे त्या लांबलचक रस्त्याचा अर्धा भाग अंधारलेला आणि अर्ध्या भागात उजेड दिसत होता.


आता आपल्याकडे कोणीही येणार नाही ह्या विचाराने तो जरासा अस्वस्थ झाला. त्याच्या पानांची सळसळ वाढली. पानांचे ते मधुर संगीत ऐकण्यात त्याने स्वतःला गुंतवून घेतले .


काळ्या ढगांची गर्दी वाढतच होती . त्यामुळे वेळेआधीच संध्याकाळ झाल्याचा भास होत होता . वडाची आशा पूर्णपणे मावळली होती.  त्यामुळे रस्त्याकडे लक्ष न देता त्याने पूर्णपणे आपले लक्ष ढगांच्या धावपळीकडे केंद्रित केले होते. आणि म्हणूनच  त्याच्याकडे सरकणारी ती धूसर  आकृती त्याच्या अगदी जवळ येऊन ठेपली तरी त्याला पत्ता लागला नाही.


अचानक काही तरी धडपडण्याच्या आवाजाने  वड दचकला .  ती धूसर वाटणारी आकृती  एका तरुणीची होती . चिखलामुळे पाय घसरला होता, पण तिने स्वतःला सांभाळले होते. 


आता वडाने  तिच्याकडे जरा निरखून पाहायला सुरवात केली.  पावसाच्या आशंकेने तिने आधीच रेनकोट घालून ठेवला होता . 


पण रेनकोटची झिप अर्धवट उघडी होती त्यामुळे तिचा पेहेराव लक्षात येत होता . पोपटी रंगाची हेवी टिकली वर्क केलेली  जर्सी, त्याला मॅच करणारी फिक्कट पोपटी रंगाची ओढणी आणि गुडघ्या च्या थोड्या खाली पर्यंत येणारी जीन्स . पायात  गुडघ्या पर्यंत येणारे गम बूट . पाठीवर रेनकोट च्या आत एक बॅग. ह्या पेहरावाला तो वृक्ष सरावला होता.


पण तिच्या चेहर्‍याकडे पाहताच तो आश्चर्यचकित झाला .  कपाळावर मोठी लालचुटुक टिकली. तिचा चेहर्‍यावर ती फार सुंदर दिसत होती तरी तिच्या आधुनिक पेहरावाशी विसंगत वाटत होती.  


ती आता बूट काढून वडा भोवती असणार्‍या पारावर चढली होती . रेनकोट काढून पाठीवरची बॅग  तिने पारावर ठेवली . तोच तिचा हिरवागार चुडा किणकिणला. वडाचे झाड आनंद मिश्रित आश्चर्याने तिच्या कडे पाहू लागला. पुढच्या प्रसंगाची त्याला थोडी थोडी कल्पना येऊ लागली होती . तिच्या विसंगत वेषभूषेशी आता त्याला काहीच देणे घेणे नव्हते .


बॅग उघडून तिने ताम्हण, पळी, ताट , फुलपात्र काढून ठेवले. पाण्याची मोठी बाटली काढून हात पाय धुवून ती पुढच्या तयारीला लागली .  ताटात साग्रसंगीत पूजेचे सामान तिने काढले .  एका छोट्या वाट्यात गहू आणि आंबे  ठेवले. फुलं,  उदबत्ती,  कापूर , फुलवात, तूप  कशाकशाची कमतरता नव्हती . ती तयारी पाहूनच वटवृक्ष सुखावला होता.


ही सर्व तयारी करताना ती सतत मागे वळून पहात होती . जणू कुणाची तरी ती वाट पहात होती.  थोडा वेळ वाट पाहिल्यावर  ती आसनावर बसली . फोनच्या काही बटनावर सराईत बोटे फिरवून तिला हवी ती गोष्ट तिने चालू केली .


फोन मधून आता मंत्रोच्चार येऊ लागले होते .


ॐ केशवाय नम: , नारायणाय नम:,.....


पूर्ण मन लावून तिने पूजा केली . तेवढ्यात ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती तोच आवाज तिच्या कानी आला .  तिचा सहचर वेळेत येऊन पोहोचला होता. 


कच्च्या  सुताचा गुंढाळा हसतमुखाने त्याच्या हाती देऊन जोडीने वडाला धागा बांधायला दोघांनी सुरवात केली.   सात फेरे झाल्यावर दोघांनी एकमेकांच्या मनगटात रेशमी धागा बांधला . सप्त जन्माची साथ निभावण्याच्या आणा भाकांची अत्यंत प्रेमाने देवाण घेवाण झाली. 


वटवृक्ष ही अत्यंत तृप्त झाला होता. जाण्यापूर्वी त्या नव्या युगाच्या सत्यवान - सावित्रीने त्या वृक्षाला नतमस्तक होत भाविकतेने  हात जोडले .  आणि तृप्त मनाने वृक्षानेही भरभरून आशीर्वाद दिला. ते मनोरम दृष्य पाहण्याची तीव्र इच्छा रवी राजालाही आवरली नाही. आपल्या सहस्ररश्मी पसरवत त्यानेही ह्या दोघांना आशीर्वाद दिला .


वटवृक्ष आता निश्चिंत होता. ही परंपरेची पताका नक्कीच युगानुयुगे पुढे सरकत राहणार होती. भारतीय परंपरेचा, संस्कृतीचा  र्‍हास होणार नव्हता. 


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 


🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳


वाचक वर्ग अभिप्राय नक्कीच द्याल . स्टिकर पण चालणारच आहे. 


पण एक मनोगत व्यक्त करण्याचा  प्रयत्न केला आहे . वृक्ष वल्ली आम्हा सोयरी ... असे फक्त पाठ करण्यापुरता नाही आहे. पावसाळा आला आहे वृक्ष  लावा त्याचे पुढच्या पिढीसाठी संवर्धन करा. 


तसेच वडाची पूजा करण्यासाठी त्याच्या फांद्यांना  ओरबाडू नका .  जीव दुखतो हो त्याचाही . त्यापेक्षा तुमच्या घराच्या आसपास मोकळ्या जागेत वटवृक्षा चे झाड लावा . प्राणवायूचा  भरपूर साठा तुमच्या परिसरात सतत राहील....


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



Tuesday, 14 June 2022

वेडे मन

 मन असच असतं उंच उंच उडणाऱ्या पतंगासारखं ,

त्याला भानच नसतं दोराच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या कुणाच्या तरी हाताचं. 


मन असच असतं हे हवं ते हवंच्या नादात आपल्या माणसाला विसरणारं, 

अन ती माणसं हरवली की मगच त्यांची किम्मत जाणणारं.


मन असच असतं स्वतः ला कुणाचा तरी मित्र मानणारं, 

पण समोरच्याच्या मनात आपण किती आहो हे न जाणणारं.


भ्रमाचा भोपळा फुटला की स्वतः च रक्तबंबाळ होणारं,

कुणी तरी हात दिला की पुन्हा फुलारून येणारं. 


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 



Friday, 10 June 2022

मनाशी संवाद

 आपल्याच मनाची आपल्याच बरोबर सभा भरवावी,
आपण केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी आपणच आपली पाठ थोपटावी,
कळत - नकळत घडलेल्या चुकांसाठी मनोमन क्षमा मागावी ,
आपल्याच मनाची आपल्याच बरोबर सभा भरवावी.

विसरलेल्या गोष्टींची रीतसर यादी करावी,
पुन्हा न विसरण्याची तंबी ही द्यावी. 
सुखांच्या क्षणांची उजळणी व्हावी,
दुःखाच्या क्षणांची वजाबाकी व्हावी, 
आपल्याच मनाची आपल्याच बरोबर सभा भरवावी.

संध्याकाळच्या कातरवेळेची  हुरहुर उरी जपावी, 
देवघरातील देवापुढे मंद ज्योत पेटवावी.
क्लान्त शरीराने गादीवर पाठ टेकवावी, 
उद्याच्या बैठकीची लगोलग आठवण करून द्यावी, 
आपल्याच मनाची आपल्याच बरोबर सभा भरवावी.

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 


Wednesday, 8 June 2022

टाळी

 टाळी साठी आसुसलो मी ,

कर्मे माझी नित्य चांगली ,

परी सोयरे कृपण ते भारी, 

चढता सरणी देती टाळी.


ठावे त्यांना असे एकला ,

नसेल कोणी पिछवाडीला,

हवा तयाना पैसा अडका

नको तयाना माझा डंका .


कारे देवा ऐसी शिक्षा,

शुभ कर्माची ऐसी दैना ,

पापी सारे हसती न्यारी , 

पुण्यात्म्याच्या नयनी पाणी .


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 



Tuesday, 7 June 2022

वाटे मज सानची व्हावे

 वाटे मज  फिर फिरूनी व्हावे, 

सान, सान अन् सानची व्हावे.

मम मातेच्या मऊ स्पर्शी त्या ,

हलके हलके हरवूनी जावे.

मधूर तिच्या त्या गीता संगे,

स्वप्नाच्या त्या गावी जावे.

वाटे मज  फिर फिरूनी व्हावे, 

सान, सान अन् सानची व्हावे.


स्वप्नांच्या त्या गावा मध्ये, 

मम तातांचा वाडा होता.

वाड्या संगे भवताली तो , 

फळा  फुलांचा बाग ही होता .

बागेच्या त्या मधोमधी रे,

थोर असा तो वृक्ष ही होता.

त्या वृक्षाच्या पारंब्यासह,

वाटे बालपणा झुलवावे .

वाटे मज  फिर फिरूनी व्हावे, 

सान, सान अन् सानची व्हावे. 


वृक्षाच्या त्या छायेखाली, 

लपाछपीचा  डाव ही रंगे. 

लपाछपी च्या डावा मधले , 

सखे सोबती हरवून गेले.

शैशवास ही घेऊन गेले ,

सांग तरूवरा देशील कारे 

बालपणीचे सुख ते न्यारे...

वाटे मज  फिर फिरूनी व्हावे, 

सान, सान अन् सानची व्हावे.


नसे आता तो वृक्ष ही थोर ,

नसे आता ते शैशव गोड.

हुरहुरणारे मन ते सांगे,

मोठे झालो काळा संगे. 

बालपणीचा काळ सुखाचा ,

कुठेतरी तो संपून गेला .

नाही आता मागे जाणे,

स्वतः स हरवून पुढेच जाणे.

वाटे मज  फिर फिरूनी व्हावे, 

सान, सान अन् सानची व्हावे.


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

🏃‍♀️🏃🏃‍♀️🏃🏃‍♀️🏃🏃‍♀️🏃🏃‍♀️🏃🏃‍♀️



Saturday, 4 June 2022

पत्र एका राणीला

 चि . राणी ,


(ही राणी कोण्या राज्याची राणी नाही हो. स्वतः च्या मनाची , सुंदर रूपाची , गोड गळ्याची कर्तबगार राणी . झुंजते आहे बिकट परिस्थितीशी.  झुंजता झुंजता सध्या थोडी हताश नी हळवी झालीय .  म्हणजेच आपले कर्तव्य एकनिष्ठतेने पार पाडणाऱ्या आजच्या तरुणींची प्रतिनिधी ही राणी )


अनेक शुभाशीर्वाद, 


       कालच बोललो आपण.  पण तेव्हापासून तुझ्याच विचारात गुंतले आहे.   तुझ्या सगळ्या अडचणी  ऐकून मन विषण्ण झाले.  पण तेवढाच अभिमान पण वाटला की पोरगी जिद्दीने लढते आहे. 


    राणी तारुण्याची वाट चढाव्याची असते ग. संसाराच्या खूप सार्‍या जबाबदार्‍या,  त्या पार पाडताना सभोवतालच्या माणसांची फक्त नाराजी आणि त्यात सहचराची साथ नसेल तर मनाचा होणारा कोंडमारा,  सगळे सगळे  समजू शकते मी. 

ह्या वाटेवर ५ पावले पुढे चाललो की ३ पावले मागे घसरलोच म्हणून समज.  पण निराश होऊन नाही  चालत. अडचणींची शिखरं सतत खुणावतच असतात . २ पावलानी आपण पुढे सरकलो हीच यशाची गुरुकिल्ली समजायची आणि पुढची काटेरी वाट चढायला सज्ज व्हायचे. जो थांबला तो संपला . म्हणून...


        रुक जाना नही तू कभी हार के,

      काटों पे चलके मिलेंगे साये बहार के ....


    एक गोष्ट मात्र लक्षात ठेव . तुझ्या ह्या लढाईत तुझी वाटणारी माणस कदाचित तुला साथ देणार नाही पण देव मात्र अखंड तुझ्याबरोबर आहे . खूप कठीण प्रसंग आणवून तो तुझी परीक्षा नाही पहात आहे तर तो तुला अजून अजून खंबीर बनवतो आहे . कारण त्याला माहिती आहे की तू सोने आहेस.  सोन्यालाच आगीतून तावूनसुलाखून निघावे लागतं ना ग ?  म्हणून देवावरचा विश्वास अजिबात डळमळीत होऊ देऊ नको .


     स्वतः ची खूप काळजी घे . आई म्हणून आपल्या कर्तव्यात कमी पडू नकोस . हिरकणीची गोष्ट कधीच विसरू नको. एक स्त्री , एक आई सर्व जगाला बदलू शकते . जिजाऊ माऊलीचे उदाहरण आपल्या समोर आहे. खूप सुखी हो . आजचा दिवस जसा आहे  तसाच उद्याचा असणारं नाही ..

भविष्याची सुंदर स्वप्ने रंगवत नेटाने पुढे जा . आम्ही सर्व तुझ्या बरोबर आहोत . तुझ्या चेहर्‍यावरचे सुंदर हसू कधीही हरवू देऊ नकोस .


खूप खूप आशिर्वाद.  

शुभम भवतु.


                                       तुझी ताई .


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 



Thursday, 2 June 2022

ओढ माहेराची

 उंच गगनी विमानातूनी,✈️

फिरता बघते मी धरणी.🌏


दिसे तिथे ते घर कौलारू, 🛖

कपिला आणिक तिचे वासरू .🐄


असे तिथे तो श्वान सख्या हो,🐕

तृप्त मनी तो हुंदडतो.


बाजूला ते शेत डुले हो,🌴🌲🌳🍀

वृक्ष, लता अन् फळे, फुले हो .🍎🍏🍅🍈🥬🥒🍑


दृश्य अचानक दिसे वेगळे,

भासे मज ते जरा आगळे. 


उभे तिथे तो वृद्ध एकला,🧙‍♂️

निरखूनी बघतो गगनाला. ☁️⛅️🌤


हालवून अपुल्या दोन्ही करांना,👋🖐👋🖐

भासे मज तो साद घालतो.


सय येई मज मग आजोबांची, 🗣

अन् दूर देशीच्या मम गावाची.


सय येई मज काकांची अन काकूंची, 👨‍❤️‍💋‍👨

भावांची अन भगिनींची. 👨‍👦👩‍👦


उभी माय ती गेही  एकली, 🧍‍♀️

वाट बघे ती आसुसूनी.


दृष्य रम्य ते धूसर झाले 💧💧💧

बघता बघता क्षणात एके. 


पुसूनी लोचने येता भानी,

दिसले मज मी अजूनी गगनी.


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

💦💦💦💦💦💦💦💦💦

Welcome

संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर

 ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात,  किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...