Tuesday, 14 June 2022

वेडे मन

 मन असच असतं उंच उंच उडणाऱ्या पतंगासारखं ,

त्याला भानच नसतं दोराच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या कुणाच्या तरी हाताचं. 


मन असच असतं हे हवं ते हवंच्या नादात आपल्या माणसाला विसरणारं, 

अन ती माणसं हरवली की मगच त्यांची किम्मत जाणणारं.


मन असच असतं स्वतः ला कुणाचा तरी मित्र मानणारं, 

पण समोरच्याच्या मनात आपण किती आहो हे न जाणणारं.


भ्रमाचा भोपळा फुटला की स्वतः च रक्तबंबाळ होणारं,

कुणी तरी हात दिला की पुन्हा फुलारून येणारं. 


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 



Friday, 10 June 2022

मनाशी संवाद

 आपल्याच मनाची आपल्याच बरोबर सभा भरवावी,
आपण केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी आपणच आपली पाठ थोपटावी,
कळत - नकळत घडलेल्या चुकांसाठी मनोमन क्षमा मागावी ,
आपल्याच मनाची आपल्याच बरोबर सभा भरवावी.

विसरलेल्या गोष्टींची रीतसर यादी करावी,
पुन्हा न विसरण्याची तंबी ही द्यावी. 
सुखांच्या क्षणांची उजळणी व्हावी,
दुःखाच्या क्षणांची वजाबाकी व्हावी, 
आपल्याच मनाची आपल्याच बरोबर सभा भरवावी.

संध्याकाळच्या कातरवेळेची  हुरहुर उरी जपावी, 
देवघरातील देवापुढे मंद ज्योत पेटवावी.
क्लान्त शरीराने गादीवर पाठ टेकवावी, 
उद्याच्या बैठकीची लगोलग आठवण करून द्यावी, 
आपल्याच मनाची आपल्याच बरोबर सभा भरवावी.

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 


Wednesday, 8 June 2022

टाळी

 टाळी साठी आसुसलो मी ,

कर्मे माझी नित्य चांगली ,

परी सोयरे कृपण ते भारी, 

चढता सरणी देती टाळी.


ठावे त्यांना असे एकला ,

नसेल कोणी पिछवाडीला,

हवा तयाना पैसा अडका

नको तयाना माझा डंका .


कारे देवा ऐसी शिक्षा,

शुभ कर्माची ऐसी दैना ,

पापी सारे हसती न्यारी , 

पुण्यात्म्याच्या नयनी पाणी .


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 



Tuesday, 7 June 2022

वाटे मज सानची व्हावे

 वाटे मज  फिर फिरूनी व्हावे, 

सान, सान अन् सानची व्हावे.

मम मातेच्या मऊ स्पर्शी त्या ,

हलके हलके हरवूनी जावे.

मधूर तिच्या त्या गीता संगे,

स्वप्नाच्या त्या गावी जावे.

वाटे मज  फिर फिरूनी व्हावे, 

सान, सान अन् सानची व्हावे.


स्वप्नांच्या त्या गावा मध्ये, 

मम तातांचा वाडा होता.

वाड्या संगे भवताली तो , 

फळा  फुलांचा बाग ही होता .

बागेच्या त्या मधोमधी रे,

थोर असा तो वृक्ष ही होता.

त्या वृक्षाच्या पारंब्यासह,

वाटे बालपणा झुलवावे .

वाटे मज  फिर फिरूनी व्हावे, 

सान, सान अन् सानची व्हावे. 


वृक्षाच्या त्या छायेखाली, 

लपाछपीचा  डाव ही रंगे. 

लपाछपी च्या डावा मधले , 

सखे सोबती हरवून गेले.

शैशवास ही घेऊन गेले ,

सांग तरूवरा देशील कारे 

बालपणीचे सुख ते न्यारे...

वाटे मज  फिर फिरूनी व्हावे, 

सान, सान अन् सानची व्हावे.


नसे आता तो वृक्ष ही थोर ,

नसे आता ते शैशव गोड.

हुरहुरणारे मन ते सांगे,

मोठे झालो काळा संगे. 

बालपणीचा काळ सुखाचा ,

कुठेतरी तो संपून गेला .

नाही आता मागे जाणे,

स्वतः स हरवून पुढेच जाणे.

वाटे मज  फिर फिरूनी व्हावे, 

सान, सान अन् सानची व्हावे.


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

🏃‍♀️🏃🏃‍♀️🏃🏃‍♀️🏃🏃‍♀️🏃🏃‍♀️🏃🏃‍♀️



Saturday, 4 June 2022

पत्र एका राणीला

 चि . राणी ,


(ही राणी कोण्या राज्याची राणी नाही हो. स्वतः च्या मनाची , सुंदर रूपाची , गोड गळ्याची कर्तबगार राणी . झुंजते आहे बिकट परिस्थितीशी.  झुंजता झुंजता सध्या थोडी हताश नी हळवी झालीय .  म्हणजेच आपले कर्तव्य एकनिष्ठतेने पार पाडणाऱ्या आजच्या तरुणींची प्रतिनिधी ही राणी )


अनेक शुभाशीर्वाद, 


       कालच बोललो आपण.  पण तेव्हापासून तुझ्याच विचारात गुंतले आहे.   तुझ्या सगळ्या अडचणी  ऐकून मन विषण्ण झाले.  पण तेवढाच अभिमान पण वाटला की पोरगी जिद्दीने लढते आहे. 


    राणी तारुण्याची वाट चढाव्याची असते ग. संसाराच्या खूप सार्‍या जबाबदार्‍या,  त्या पार पाडताना सभोवतालच्या माणसांची फक्त नाराजी आणि त्यात सहचराची साथ नसेल तर मनाचा होणारा कोंडमारा,  सगळे सगळे  समजू शकते मी. 

ह्या वाटेवर ५ पावले पुढे चाललो की ३ पावले मागे घसरलोच म्हणून समज.  पण निराश होऊन नाही  चालत. अडचणींची शिखरं सतत खुणावतच असतात . २ पावलानी आपण पुढे सरकलो हीच यशाची गुरुकिल्ली समजायची आणि पुढची काटेरी वाट चढायला सज्ज व्हायचे. जो थांबला तो संपला . म्हणून...


        रुक जाना नही तू कभी हार के,

      काटों पे चलके मिलेंगे साये बहार के ....


    एक गोष्ट मात्र लक्षात ठेव . तुझ्या ह्या लढाईत तुझी वाटणारी माणस कदाचित तुला साथ देणार नाही पण देव मात्र अखंड तुझ्याबरोबर आहे . खूप कठीण प्रसंग आणवून तो तुझी परीक्षा नाही पहात आहे तर तो तुला अजून अजून खंबीर बनवतो आहे . कारण त्याला माहिती आहे की तू सोने आहेस.  सोन्यालाच आगीतून तावूनसुलाखून निघावे लागतं ना ग ?  म्हणून देवावरचा विश्वास अजिबात डळमळीत होऊ देऊ नको .


     स्वतः ची खूप काळजी घे . आई म्हणून आपल्या कर्तव्यात कमी पडू नकोस . हिरकणीची गोष्ट कधीच विसरू नको. एक स्त्री , एक आई सर्व जगाला बदलू शकते . जिजाऊ माऊलीचे उदाहरण आपल्या समोर आहे. खूप सुखी हो . आजचा दिवस जसा आहे  तसाच उद्याचा असणारं नाही ..

भविष्याची सुंदर स्वप्ने रंगवत नेटाने पुढे जा . आम्ही सर्व तुझ्या बरोबर आहोत . तुझ्या चेहर्‍यावरचे सुंदर हसू कधीही हरवू देऊ नकोस .


खूप खूप आशिर्वाद.  

शुभम भवतु.


                                       तुझी ताई .


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 



Thursday, 2 June 2022

ओढ माहेराची

 उंच गगनी विमानातूनी,✈️

फिरता बघते मी धरणी.🌏


दिसे तिथे ते घर कौलारू, 🛖

कपिला आणिक तिचे वासरू .🐄


असे तिथे तो श्वान सख्या हो,🐕

तृप्त मनी तो हुंदडतो.


बाजूला ते शेत डुले हो,🌴🌲🌳🍀

वृक्ष, लता अन् फळे, फुले हो .🍎🍏🍅🍈🥬🥒🍑


दृश्य अचानक दिसे वेगळे,

भासे मज ते जरा आगळे. 


उभे तिथे तो वृद्ध एकला,🧙‍♂️

निरखूनी बघतो गगनाला. ☁️⛅️🌤


हालवून अपुल्या दोन्ही करांना,👋🖐👋🖐

भासे मज तो साद घालतो.


सय येई मज मग आजोबांची, 🗣

अन् दूर देशीच्या मम गावाची.


सय येई मज काकांची अन काकूंची, 👨‍❤️‍💋‍👨

भावांची अन भगिनींची. 👨‍👦👩‍👦


उभी माय ती गेही  एकली, 🧍‍♀️

वाट बघे ती आसुसूनी.


दृष्य रम्य ते धूसर झाले 💧💧💧

बघता बघता क्षणात एके. 


पुसूनी लोचने येता भानी,

दिसले मज मी अजूनी गगनी.


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

💦💦💦💦💦💦💦💦💦

Thursday, 12 May 2022

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी...बदलत्या संकल्पना आणि छेद देणार्‍या रूढी....भाग 3

 कालचा दिवस सगळ्यानीच खूप धमाल केली . कडक उन्हात ही कूलर , ए. सी. ला लाजवणारा  आमराईतला गारवा सगळ्यानाच सुखावून गेला .


गाव पाटलाची आमराई होती ती. शहरातील मंडळी येणार म्हणून त्यांनी उत्तम बडदास्त ठेवली होती होती आमची. 


कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यांचा तरुण मुलगा चांगला शिकला सवरलेला शेती करण्यात फार  उत्साही होता. नवीन तंत्रज्ञानाची उत्तम जाण होती त्याला तरीही नैसर्गिक संसाधने वापरण्यावर अधिक भर होता. 


जुन्या नव्याची उत्तम सांगड घातली होती त्याने. महत्वाचे म्हणजे वडीलांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. त्याने तयार केलेल्या नवीन प्रयोगा बद्दल त्याने बरीच माहिती दिली.


गप्पा च्या नादात किती फिरलो हे कुणालाच कळले नाही . गरम पिठले आणि भाकरीच्या सुगंधाने सगळ्यांना भुकेची जाणीव झाली. भाकरी, पिठले, मिरचीचा ठेचा , ताक , भात आणि सोबतीला मनसोक्त आंब्याचा रस. सगळ्यानीच आडवा हात मारला आणि गर्द हिरव्या आमराईत विसावले .


उन्ह उतरली तसे आम्ही आमच्या मुक्कामी परतलो .  


सुस्तावलेल्या शरीराला ताजतवाने  करण्याची गरज होतीच . तेव्हड्यात राणीने कालची चर्चा पुढे नेण्याचा प्रस्ताव ठेवला आणि मी कबूल केल्याप्रमाणे त्या दुर्दैवी मुलीची गोष्ट सांगायला सुरवात केली .


आटपाट नगर होते. त्या नगराच्या मध्यभागी गजबजलेल्या वस्तीत एक मोठ्ठे देवस्थान होते. मोठ्ठा वाडाच म्हणा ना. पिढ्या न पिढ्या त्या जागेवर लहाना च्या मोठ्या झाल्या . बाहेरच जग बदलले पण इथल्या रूढी आणि परंपरा मात्र बदलल्या नाहीत . किंबहुना त्या रूढीं नी जास्तच विकृत स्वरुप धारण केले असे मला वाटते.


देवस्थान म्हणून सगळेच सणवार सतत होत असतच. तेही परंपरे नुसार,  सोवळेओवळे सांभाळून.  गोतावळा पण खूप मोठा . घरातलेच कुटुंब सदस्य धरले तर ४०-५० भरतील . त्यात येणारा जाणारा , भक्त मंडळी.  घरातल्या बायका २४ तास चूल आणि मूल ह्यात गुंतलेल्या .


अशा घरात जर सण असताना  एखाद्या स्त्रीचा मासिक धर्म सुरू झाला तर तिच्या नशिबी चार दिवस अंधार कोठडी.  जिथे मोकळा वारा नाही , नीट उजेड नाही तिथे तिने स्वतः ला बंदिस्त करून घ्यायचे.  घरातला धबडगा आटोपला की मग तिच्या पर्यंत जेवण पोहोचणार.


काळ उलटत होता. केंव्हा तरी घरातल्या एका सुनेने शहाणपणा करून डॉ . कडून अशा प्रसंगी पाळी लांबवायची कशी ह्यासाठी गोळ्या  घेऊन आली . मग काय सगळ्या बायकांमधे जणू शर्यतच लागली . कुळाचार असो, काही सण असो जा डॉ. कडे घे गोळ्या . त्याच्या परिणामाची कोणालाही जाणीव नव्हती.


ह्याच घरातली ती मुलगी कोवळी कळी होती. सुरवाती पासूनच तिला मासिक पाळीचा खूप त्रास व्हायचा.  त्यातच जर कोणती पूजा वगैरे असली की ती आरामात गोळ्या घ्यायची . पाळीचा  त्रास थोडा उशिराने सहन करावा लागणार ह्याचाच आनंद तिला मोठा वाटायचा . पण प्रॉपर गायनिक कडे जाऊन व्यवस्थित उपचार घेण्याचा विचार ती आणि तिच्या घरातल्या निर्बुद्ध जेष्ठ व्यक्तीनी केला नाही. 


व्हायचा तोच परिणाम झाला . एक दिवस तिची तब्येत अचानक खूप बिघडली. दवाखान्यात भरती करायची वेळ आली . पण केस हाताबाहेर गेली होती. डॉक्टरांच्या प्रयत्नाना यश नाही मिळाले. काही तासातच पोरीने डोळे मिटले. 


आई - वडिलांची एकुलती एक पोर काळाच्या पडद्याआड निघून गेली होती . अवघ्या २४ वर्षाची एक उमलती कळी लग्नाचे स्वप्न पहात सरणावर चढली .


घरातल्या इतरांनी सोयीस्कर रित्या डॉक्टरांच्या डोक्यावर अपयशाचे खापर फोडले  आणि आपल्या नित्य कर्मात स्वतः ला गुंतवून घेतले.


जीर्ण झालेल्या त्या वाड्याने एक उसासा सोडला. आजही त्या वाड्याचे भग्न अवशेष तिथेच उभे आहेत. भाऊ बंदकीत त्या वाड्याची रया पार बदलून गेली आहे.


पण ह्या उदाहरणावरून त्या घरातील कोणीही व्यक्ती शहाणी झाली नाहीये ही खरी शोकांतिका.....


जग पुढे जातय , मुली स्पेस मध्ये जातात, चंद्रावर जातात , पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत .... अगदी तिथेच स्त्री ची अशीही विटंबना होते ...


काय म्हणावे अशा विचारांना.  स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ....




वाचक वर्ग हा भाग प्रकाशित करायला  खूपच उशीर झाला . ......तब्येत चांगली नव्हती ....... क्षमा करा ...... पण वाचा , .......प्रतिक्रिया तर हव्याच...पण जिथे कुठे अशा गोष्टी घडत असतील तिथे स्त्रीलाच जागृत करा ....विरोध करा .... तूच तुझी शत्रू  असे म्हणायची वेळ येऊ देऊ नका . तर आणि तरच माझ्या लिखाणाचा काही अर्थ आहे असे मला वाटेल ..


समाप्त .


©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 



Welcome

संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर

 ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात,  किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...