कालचा दिवस सगळ्यानीच खूप धमाल केली . कडक उन्हात ही कूलर , ए. सी. ला लाजवणारा आमराईतला गारवा सगळ्यानाच सुखावून गेला .
गाव पाटलाची आमराई होती ती. शहरातील मंडळी येणार म्हणून त्यांनी उत्तम बडदास्त ठेवली होती होती आमची.
कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यांचा तरुण मुलगा चांगला शिकला सवरलेला शेती करण्यात फार उत्साही होता. नवीन तंत्रज्ञानाची उत्तम जाण होती त्याला तरीही नैसर्गिक संसाधने वापरण्यावर अधिक भर होता.
जुन्या नव्याची उत्तम सांगड घातली होती त्याने. महत्वाचे म्हणजे वडीलांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. त्याने तयार केलेल्या नवीन प्रयोगा बद्दल त्याने बरीच माहिती दिली.
गप्पा च्या नादात किती फिरलो हे कुणालाच कळले नाही . गरम पिठले आणि भाकरीच्या सुगंधाने सगळ्यांना भुकेची जाणीव झाली. भाकरी, पिठले, मिरचीचा ठेचा , ताक , भात आणि सोबतीला मनसोक्त आंब्याचा रस. सगळ्यानीच आडवा हात मारला आणि गर्द हिरव्या आमराईत विसावले .
उन्ह उतरली तसे आम्ही आमच्या मुक्कामी परतलो .
सुस्तावलेल्या शरीराला ताजतवाने करण्याची गरज होतीच . तेव्हड्यात राणीने कालची चर्चा पुढे नेण्याचा प्रस्ताव ठेवला आणि मी कबूल केल्याप्रमाणे त्या दुर्दैवी मुलीची गोष्ट सांगायला सुरवात केली .
आटपाट नगर होते. त्या नगराच्या मध्यभागी गजबजलेल्या वस्तीत एक मोठ्ठे देवस्थान होते. मोठ्ठा वाडाच म्हणा ना. पिढ्या न पिढ्या त्या जागेवर लहाना च्या मोठ्या झाल्या . बाहेरच जग बदलले पण इथल्या रूढी आणि परंपरा मात्र बदलल्या नाहीत . किंबहुना त्या रूढीं नी जास्तच विकृत स्वरुप धारण केले असे मला वाटते.
देवस्थान म्हणून सगळेच सणवार सतत होत असतच. तेही परंपरे नुसार, सोवळेओवळे सांभाळून. गोतावळा पण खूप मोठा . घरातलेच कुटुंब सदस्य धरले तर ४०-५० भरतील . त्यात येणारा जाणारा , भक्त मंडळी. घरातल्या बायका २४ तास चूल आणि मूल ह्यात गुंतलेल्या .
अशा घरात जर सण असताना एखाद्या स्त्रीचा मासिक धर्म सुरू झाला तर तिच्या नशिबी चार दिवस अंधार कोठडी. जिथे मोकळा वारा नाही , नीट उजेड नाही तिथे तिने स्वतः ला बंदिस्त करून घ्यायचे. घरातला धबडगा आटोपला की मग तिच्या पर्यंत जेवण पोहोचणार.
काळ उलटत होता. केंव्हा तरी घरातल्या एका सुनेने शहाणपणा करून डॉ . कडून अशा प्रसंगी पाळी लांबवायची कशी ह्यासाठी गोळ्या घेऊन आली . मग काय सगळ्या बायकांमधे जणू शर्यतच लागली . कुळाचार असो, काही सण असो जा डॉ. कडे घे गोळ्या . त्याच्या परिणामाची कोणालाही जाणीव नव्हती.
ह्याच घरातली ती मुलगी कोवळी कळी होती. सुरवाती पासूनच तिला मासिक पाळीचा खूप त्रास व्हायचा. त्यातच जर कोणती पूजा वगैरे असली की ती आरामात गोळ्या घ्यायची . पाळीचा त्रास थोडा उशिराने सहन करावा लागणार ह्याचाच आनंद तिला मोठा वाटायचा . पण प्रॉपर गायनिक कडे जाऊन व्यवस्थित उपचार घेण्याचा विचार ती आणि तिच्या घरातल्या निर्बुद्ध जेष्ठ व्यक्तीनी केला नाही.
व्हायचा तोच परिणाम झाला . एक दिवस तिची तब्येत अचानक खूप बिघडली. दवाखान्यात भरती करायची वेळ आली . पण केस हाताबाहेर गेली होती. डॉक्टरांच्या प्रयत्नाना यश नाही मिळाले. काही तासातच पोरीने डोळे मिटले.
आई - वडिलांची एकुलती एक पोर काळाच्या पडद्याआड निघून गेली होती . अवघ्या २४ वर्षाची एक उमलती कळी लग्नाचे स्वप्न पहात सरणावर चढली .
घरातल्या इतरांनी सोयीस्कर रित्या डॉक्टरांच्या डोक्यावर अपयशाचे खापर फोडले आणि आपल्या नित्य कर्मात स्वतः ला गुंतवून घेतले.
जीर्ण झालेल्या त्या वाड्याने एक उसासा सोडला. आजही त्या वाड्याचे भग्न अवशेष तिथेच उभे आहेत. भाऊ बंदकीत त्या वाड्याची रया पार बदलून गेली आहे.
पण ह्या उदाहरणावरून त्या घरातील कोणीही व्यक्ती शहाणी झाली नाहीये ही खरी शोकांतिका.....
जग पुढे जातय , मुली स्पेस मध्ये जातात, चंद्रावर जातात , पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत .... अगदी तिथेच स्त्री ची अशीही विटंबना होते ...
काय म्हणावे अशा विचारांना. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ....
वाचक वर्ग हा भाग प्रकाशित करायला खूपच उशीर झाला . ......तब्येत चांगली नव्हती ....... क्षमा करा ...... पण वाचा , .......प्रतिक्रिया तर हव्याच...पण जिथे कुठे अशा गोष्टी घडत असतील तिथे स्त्रीलाच जागृत करा ....विरोध करा .... तूच तुझी शत्रू असे म्हणायची वेळ येऊ देऊ नका . तर आणि तरच माझ्या लिखाणाचा काही अर्थ आहे असे मला वाटेल ..
समाप्त .
©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित