तिची मोठी बहीण अपूर्वा अमेरिकेत होती. त्यात तिची नुकतीच म्हणजे आई जायच्या आदल्या दिवशीच डिलिव्हरी झाली होती. आईचे शेवटचे दर्शनही तिला घेता आले नव्हते. तिला दुसरा मुलगा झाल्याचे आईने ऐकले आणि त्यानंतर पाचच मिनिटातच तिने डोळे मिटले होते.
ना आई आजारी होती ना अंथरूणावर झोपून होती .
नेहमीप्रमाणेच सकाळची सगळी काम तिने आटोपली होती.
काल संध्याकाळीच अपूर्वाचा फोन आला होता की ती अॅडमिट होतेय. तिच्या मुलीला सांभाळायला सासू सासरे आलेत. त्यामुळे काळजी करू नको.
.........................................................
चला जरा पूर्वेतिहास पाहू या ...
अपूर्वा, पूर्वा ,बाबा रमाकांत , आई सुमती आणि शेंडेफळ अपूर्व असे ते देशमुखांचे कुटुंब .
रमाकांत अत्यंत कर्मठ. तेव्हढाच प्रामाणिक, कष्टाळू. पण घरात वावरताना आपल्या मतांबाबत अति आग्रही असणारा .
घराबाहेर प्रत्येकाशी गोड बोलणारा . प्रत्येकाच्या अडचणी समजून घेऊन त्याप्रमाणे वागणारा, त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणारा .
त्यामुळे बाहेर त्याची ख्याती एक अत्यंत सुस्वभावी, गुणी माणूस अशीच होती .
घरात शिरता शिरता रमाकांतचा हा मुखवटा गळून पडत असे . मुळात स्त्री विषयी मनात घृणा असलेला हा मनुष्य. कारणही जबरदस्त.
ह्याच्या जन्मानंतर आईने, वडीलांच्या त्रासाला कंटाळून कोणालाही न सांगता गृहत्याग केला. ती माहेरी ही नाही गेली . पुढे तिचा कधीही पत्ता लागला नाही .
लोक प्रवादाला घाबरून वडीलांनी चक्क तिला चारित्र्यहीन ठरविले आणि मोठ्या होत चाललेल्या मुलाच्या मनात ही तेच विष कालवत गेले.
एकदाच तो आईच्या आठवणीने खूप रडला होता. त्या दिवशी त्याच्या बाबांनी त्याला खूप बदडून काढले होते. ह्या घरात तिचे पुन्हा नाव काढायचे नाही म्हणून त्याला तंबी दिली होती. तसेच बाहेर कोणालाही आपले दुःख दिसले नाही पाहिजे ही जरबही दिली होती . त्यामुळे घराबाहेर हसतमुखाने राहायचे आणि घरात शिरल्यावर राग राग व्यक्त करायचा , हा त्याचा स्वभावधर्म झाला होता .
लहान असताना आईविना पोर म्हणून आजूबाजूचे सहानुभूती दाखवत ती त्याला असह्य होत असे.
कधी मित्रांच्या आईने हातावर खाऊ ठेवला की तो त्याला नकोसा होत असे .
असे प्रसंग घडले की तो घरी येऊन आदळआपट करीत असे.
मनात कटू भावना ठेवत रमाकांत लहानाचा मोठा झाला. समस्त स्त्री जाती विषयी मनात तुच्छतेची भावना सरत्या काळाबरोबर वाढतच गेली.
शिक्षण आटोपले . बँकेत लगेचच नोकरी लागली. आता वडील ही म्हातारे झाले होते. जो पर्यंत त्यांना झेपत होते तोवर ते स्वतः घरातील कामे करत. स्वयंपाकाला सुद्धा त्यांनी बाई ठेवली नव्हती.
पण अलीकडे त्यांना सर्व कामे जमत नव्हती . रमाकांत ती कामं करून घेत होता पण त्यामुळे त्याची तारेवरची कसरत होत होती.
त्यातच एक दिवस वडील पडले आणि त्यांनी अंथरूण धरले . रमाकांतची अजूनच ओढाताण होऊ लागली . वडिलांची सेवा , त्यांचे औषधपाणी , त्यांचे पथ्य, घरातली सगळी कामं आणि हे सगळे आटोपून वेळेत बँक गाठायची.
प्रमोशन ड्यु असल्यामुळे सुट्टीही घेणे शक्य नव्हते.
थकून भागून घरी आल्यावर पुन्हा कामांची यादी तयारच असायची . जोडीला दिवसभर घरात एकटेच राहावे लागल्यामुळे बाबांची कुरकुर चालूच रहायची.
तरी बरे घर आणि बँक वॉकिंग डिस्टंस वर होते. लंच ब्रेक मध्ये रमाकांत घरी येऊन बाबांना हवे नको पाहून जात असे . ते नीट जेवले की नाही ह्याकडेही त्याचे बारीक लक्ष असे.
त्याच्या बँकेतल्या एका सहकार्याला त्याची अडचण कळली . त्याने त्याला एका घरगुती खानावळीचा पत्ता दिला. त्या खानावळ चालवणार्या काकू घरपोच डब्बे ही देतात असेही सांगितले .
पण रमाकांतने सुरवातीला तिकडे दुर्लक्ष केले. कारण बाबा फार कटकट करतील ह्याची त्याला पूर्ण कल्पना होती . पण थोड्या दिवसातच तो ह्या सगळ्या गोष्टीना कंटाळून गेला .
एक दिवस बँकेत भरपूर काम पुरले त्याला. सगळे आटोपून घरी पोहोचायला त्याला जवळपास आठ वाजणार होते . गेल्यावर पुन्हा स्वयंपाक करणे त्याच्या जिवावर आले .
त्याच्या सहकार्याने दिलेल्या खानावळीचा फोन नंबर त्याने फिरवला आणि दोघांच्या साठी घरपोच डब्बा साडे आठ वाजेपर्यंत पोहोचवायला सांगितला .
खानावळीचा पत्ता विचारताना त्याच्या लक्षात आले की खानावळ त्याच्या घराच्या मागच्याच आळीत आहे.
त्याने विचार केला ,आज खाऊन तर पाहूया . आवडले तर परत मागवता येईल . तसाही आपल्याला फारसा स्वयंपाक करणे जमत ही नाही आणि आवडतही नाही.
तेवढ्यातच प्यूनने येऊन सांगितले की साहेबांनी बोलावले आहे. मनातला विचार झटकत तो साहेबांच्या केबिन मध्ये शिरला.
मे आय कम इन ,सर ?
या या देशमुख , बसा. फाईल मधले डोके वर न करता जोशी साहेबानी त्याला खुर्चीवर बसायचा संकेत दिला .
पाच मिनिटे केबिन मध्ये शांतता होती. काम होताच जोशी साहेब रमाकांतला म्हणाले , "अभिनंदन , तुमचे . तुमचे प्रमोशन झालेय. क्लास वन ऑफिसर झालात आता तुम्ही .
तुमची बदली शिवाजीनगर ब्रँचला झालीय. आठ दिवसात तुम्हाला तिथे जॉईन व्हायचे आहे . "
प्रमोशनच्या नावाने हसरा झालेला रमाकांतचा चेहरा बदलीच्या नावाने खाडकन उतरला.
शिवाजी नगर ब्रँच म्हणजे घरापासून तासभराच्या अंतरावर. दहा वाजता ऑफिस गाठायचे म्हणजे नऊ वाजताच घर सोडावे लागणार . त्याआधी घरची सगळी काम आटोपून , बाबांची आंघोळ , नाश्ता, औषधपाणि , बापरे चांगलीच धावपळ होणार .
काय झाले देशमुख ? आनंद नाही झाला का तुम्हाला ?
भानावर येत रमाकांत म्हणाला , " असे नाही सर, आनंद तर झालाय , फक्त बाबांचा विचार मनात आला म्हणून थोडा विचारात पडलो "
"देशमुख , आता पटकन लग्न करून टाका. म्हणजे तुमची बाबांविषयीची काळजी दूर होईल . घरी हक्काचे माणूस राहील . चवीढवीचे खायला मिळेल . आता पगारवाढ ही झालीय म्हणजे कोणीही डोळे झाकून मुलगी देईल ." ज्येष्ठत्वाच्या नात्याने जोशी सरांनी हसत हसत सल्ला दिला.
रमाकांतने फक्त चेहरा हसरा केला आणि म्हणाला, " सर येऊ आता ."
हो, हो अवश्य . पुनश्च एकदा अभिनंदन.
जोशी सरांच्या केबिन बाहेर येताच त्याचे सहकारी त्याच्या भोवती जमा झाले आणि त्यांनी त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव केला .
प्रत्येकाचे अभिनंदन स्विकारत तो आपल्या खुर्चीकडे निघाला तोच स्त्री वर्गाने त्याला गराडा घातला.
कधीही कोणाही स्त्रीला हाय हॅलो न म्हणणारा रमाकांत गडबडून गेला .
साधारण त्याच्याच वयाची लोन डिपार्टमेंटची सरिता चिवचिवली, "अभिनन्दन रमाकांत, पार्टी द्या आता आम्हाला."
पेन्शन डिपार्टमेंटच्या काकू म्हणाल्या , " रमाकांत खूप खूप अभिनंदन . उद्या तुझ्यासाठी बेसनाचे लाडू नक्की घेऊन येईन हा. "
नव्यानेच जॉईन झालेली स्मिता गोडबोले, गालावर खळी पाडत , लाजत लाजत शेकहँड साठी हात पुढे करत म्हणाली , " सर, अभिनंदन".
बावचळून गेलेला रमाकांतला काय करावे ते समजेना . कसेबसे हात जोडून त्यांना धन्यवाद म्हणत आपली सुटका कशी करावी ह्याचा विचार तो करत होता .
त्यांचे प्रश्न त्याच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हते.
त्यांना धड उत्तर ही देऊ शकत नव्हता . त्याच्या स्वभावाची पूर्ण कल्पना असलेला प्यून दुरूनच त्याची गम्मत पहात होता.
शेवटी त्याची दया येऊन तो चहा घेऊन आला आणि म्हणाला , "अग तायानों, आपले रमाकांत दादा भारी आहेत बर. त्यांनी मला मघाशीच तुम्हाला सगळ्यांना चा-बिस्किट त्यांच्याकडून द्यायला सांगितले. "
अगबाई हो का ? म्हणत सारा स्त्री वर्ग आता प्यूनच्या दिशेने झेपावला आणि रमाकांतची सुटका झाली .
खर म्हणजे त्याला प्यूनचा त्यानी केलेल्या आगाऊपणा बद्दल खूप राग आला होता . पण आपल्या सुटकेसाठी त्याने ही युक्ती केली हेही त्याला जाणवले.
म्हणून वरून हसत हसत पण मनातून चडफडत त्याने सगळ्यांच्या चहा बिस्किटाचे पैसे प्यूनच्या स्वाधीन केले. आणि तो आपल्यासाठी कामात दंग झाला.
आठ दिवसात इथले काम संपवायची जबाबदारी त्याची होती आणि कामाच्या बाबतीत तो अत्यंत चोख होता. त्यामुळे त्याचे हात भराभर कामे उरकू लागले .
कामाच्या गडबडीत तो तहान, भूक , घर, बाबा, खानावळीचा डब्बा सगळेच विसरला. आठ वाजले तसे प्यून त्याच्या आजूबाजूला घुटमळत उभा राहिला. पण त्याला काही फरकच पडत नव्हता.
त्यामुळे शेवटी त्याला आवाज दिला , " रमाकांत सर, घरी बाबा तुमची वाट पाहत असतील ...."
रमाकांतने घड्याळ पाहिले आणि हडबडून उठत भराभर आपला टेबल आवरून तो घराकडे निघाला सुद्धा.
चला पाहूया घरापाशी पोहोचता पोहोचता काय काय घडते . पुढच्या भागात पुन्हा भेटू ..
क्रमशः .😀😀
©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
व्वा 👌
ReplyDeleteखूप छान मालिका सुरु केलीत आपण 👍
सातत्याने पोस्ट आता होतं राहिलं
आबा
🙏