Kavyapushpa-kavitri-aanuradha Marathi free literature's and poems love poems छान मराठी पुस्तके उत्तम मराठी छान कथा कादंबरी देखील वाचा, ई-बुक्स Marathi Books, Marathi ebook epustak ई-साहित्य .
Monday, 28 March 2022
कातरवेळ आणि अजून काही
Wednesday, 9 March 2022
समिक्षण : उपक्रम ज्ञानदेवीचा-सहभाग माझा
ज्ञानाने म्हणजेच ज्ञानदेवीने एक सुंदर उपक्रम राबवला . प्रत्येकाने आपण वाचलेल्या कोणत्याही कथा,कादंबरी वा कवितेवर समीक्षा द्यायची. एकदा समीक्षा द्यायची ठरविल्यावर डोळ्यासमोर मोठ्या मोठ्या दिग्गजांची नावे डोळ्यासमोर तरळू लागली.
वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, सुमती क्षेत्रमाडे , पुरंदरे , शांता शेळके , कुसुमाग्रज , कवि अनिल , ग्रेस , पाटणकर ... अरे यादी संपायचे नावच नाही. केव्हढी श्रीमंती ही माय मराठी ची. साहित्याचे प्रकार तरी किती हो . सामाजिक , वैचारिक , संत साहित्य , ऐतिहासिक , पौराणिक, जुने, नवे अबबब ......शेवटी ठरविले अख्ख्या मराठी माणसाला गारुड घालणाऱ्या व. पु. नाच निवडावे. ठरले. व. पु. ची माणस हे पुस्तक मी निवडले .हे पुस्तक निवडण्या मागचे कारण असे की हे पुस्तक वाचल्यानंतर माणस वाचण्याचा मला नादचा लागला असे म्हणावे लागेल.
पुस्तकाचे नाव : व. पु. ची माणसे
सुरवातच फार सुंदर , बहिणाबाईंच्या कवितेने ---
ह्या पुस्तकात व.पु. नी ५२ माणस वाचलीत हो. त्या सगळ्यांवर समीक्षा लिहायची ठरविली तर ह्या पुस्तका पेक्षा ही मोठी कादंबरी तयार होईल. म्हणून मला मनापासून खूप आवडलेल्या व्यक्तिचित्रा वरच समीक्षा देतेय.
वांद्र्याहून सुटणार्या हार्बर गाडीत ही व्यक्ती म्हणजे आनंद - व. पु.चा मित्र - अनेक वर्षानी भेटलेला . त्यांच्या गप्पांची सुरवात ही कशी सुंदर.
हे वाक्य वाचल्यानंतर पुस्तक खाली ठेवणारा निश्चितच करंटा.
तर ही कथा आनंद आणि त्याची बायको ह्या दोन व्यक्तीं भोवती फिरते .
बर ही धडपड कोणासाठी ? तर वुई साठी . आहे ना मजा! बायकोचे नाव वुई . कसे ठेवले हे नाव ?
ह्या वुई ची आईही तेव्हडीच कणखर . लग्न ठरे पर्यंत तिला स्वतःच्या मनाने जगू दे , नंतर बेड्या आहेतच, असे म्हणणारी. तेव्हडीच सामाजिक भान असणारी - तिच्या जिवाला धोका नाही ना एव्हडेच मी बघते असे म्हणणारी.
आणि जुई ? थ्रील शिवाय आयुष्यात मजा नाही असे म्हणणारी . तर ही जुई पायाला सतत भिंगरी लावून फिरणारी , आयुष्य झोकून देऊन जगणारी, क्रिकेटप्रेमी, नवर्याच्या वाटेला अभावानेच येणारी.
पण नवरा अत्यंत संयमी आणि समाधानी . वुईचे बेभानपणे जगणे सहन करण्यासाठी त्या वरच्या शक्ति कडे प्रार्थना करणारा आनंद .
©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मिळालेल्या काही प्रतिक्रिया
ज्ञानदेवी वानखडेची प्रतिक्रिया
नागपूर गेट टुगेदर मध्ये लिपी वरील बऱ्याच लेखकांची ओळख झाली...त्यात काही व्यक्तिमत्त्व कायम मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवावेत असे होते..त्यातील एक म्हणजे मंजूषा अपराजित...वयाचा विचार करायला गेले तर आई मुलीचं नात लागेल आमच्यात पण मैत्री झाली आणि माझ्यासाठी ती मंजू झाली...
तिचे दांडगे वाचन हे तिच्यासोबत बोलतांना तिच्या शब्द संपत्ती वरूनच जाणवते.... मंजू च्या मुखातून निघणारा एक एक शब्द म्हणजे जणू समुद्रातील एक एक माणिक मोती टीपावा !!
वसा वाचनाचा या पावन कार्याची सुरुवात तिने दर्जेदार केलीय. सुरुवातीला ती अनेक दिग्गजांचे नाव घेत होती ना तेव्हा माझा जीव वर खाली होत होता कारण ही मंडळी वाचून च मी लहानाची मोठी झालेय पण मनावरच गारूड काही उतरत नाही.आणि शेवटी तिने व. पु.यांचं नाव घेतलं आणि माझे ओठ आपोआप रुंदावले.
मी हे पुस्तक वाचले नाही अद्याप...पण आता लालसा जागी झालीय..नवऱ्याचा बर्थ डे आहे पुढे....त्याला रिटर्न गिफ्ट म्हणून हेच पुस्तक मागणार .. ठरलंय माझं😉😉.700
सुरुवात उत्कंठा वाढविणारी होती आणि म्हणून सलग व्हिडिओ मी बारकाईने दोनदा पाहिला...काही वाक्य नोट करून ठेवलीत...
पुस्तकातील एक वाक्य मनात घर करून गेलं...
' मित्र पुरेपूर कळला की राग उरत नाही '.
आणि त्यावर मंजू च वाक्य.."हे वाचून जो पुस्तक खाली ठेवेल तो करंटा".
'ओव्हरटाईम म्हणजे चैतन्याची पूजा '.
काय तो एकेक ओळीचा गाभा आणि त्यात मंजुचा मधुर आवाज...हो मधुरच....दुसरी उपमा नाहीच
सुरुवात ते शेवट कधी झाला मला कळलेच नाही...
काहीतरी चांगलं सुरू करतोय याच समाधान मिळालं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निशा पांढरेची प्रतिक्रिया :
उत्तम.. अतिउत्तम.. प्रत्येक वाक्याला प्रसंग आणि ते सादर करताना तुमचा निरागस, शांत चेहरा आठवला.. us आणि we मस्तच. त्याकाळी अशी बेभान जगणारी we होती आणि तिला समजून घेणारा us होता, याचं नवल वाटतं.. खरंच आहे, व. पु. ची माणसे श्रेष्ठ की त्यांची लेखनशैली श्रेष्ठ, विचार करायला लावणारी बाब आहे.. व. पु. आणि त्यांची माणसे आमच्यापर्यंत पोचवणाऱ्या तुम्हीही ग्रेटच.. मस्तच....👌🏻👌🏻👌🏻👌🏻
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
चला चारोळी च्या दुनियेत
🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆
एक रस्ता मी निवडलेला ...🔥
शब्दांच्या वाटेने जाणारा...🔥
शब्दसंतांची संगत घडविणारा...🔥
पुण्य नगरीत घेऊन जाणारा ....🔥
⬅️➡️⬅️➡️⬅️➡️
एक रस्ता मी निवडलेला..
शब्दांच्या गर्दीत हरवलेला ..
वेडी वाकडी वळणं नसलेला ..
स्वान्तः सुखाय ची अनुभुती देणारा ..
©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
⬅️➡️⬅️➡️⬅️➡️
एक मार्ग माझ्या आवडीचा ...💞
हात हाती घेऊन चालण्याचा..🤝
सुख दुःखाने भारलेला...😀😭
अंतिम श्वासापर्यंत साथ देणारा
⬅️➡️⬅️➡️⬅️➡️
आयुष्याच्या चित्रपटात मी एक कलाकार आहे
भूमिका देणारा मात्र तो देव आहे.
कधी सुखाच्या, कधी दुःखाच्या सार्या भूमिका त्याच्याच आवडीच्या.
त्याच्याच दिग्दर्शनात मी नाचते आहे,स्वतःलाच नशिबवान मानते आहे.
©️®️मंजूषा श्रीकांत अपराजित
⬅️➡️⬅️➡️⬅️➡️
हळव्याश्या त्या कुणा क्षणाला परते मोती बनूनी.
नको ग सखये होऊ कातर, विरहाचा तो क्षण ही
मंगल ,
जाता जाता देऊन जाईन प्रेमाचा तो गंध सुगंधित
⬅️➡️⬅️➡️⬅️➡️
तुझा सुप्रभात चा सांगावा ,
माझी सकाळ प्रसन्न करून गेला .
दिवसभर राहील सोबतीला आता ,
तोच तुझा हसरा , गोड चेहरा .
वामांगी- अबला की सबला
वामांगी - वाम अंगाला असणारी ती वामांगी. वाम म्हणजे डावा. त्यानुसार डाव्या भागाला असणारी ती वामांगी.
आता कुणाच्या डाव्या भागाला ? पुरुषा च्या म्हणजेच नवर्याच्या डाव्या भागाला अथवा हाताशी असणारी ती त्याची बायको . अनेक शुभ प्रसंगी, पूजा अर्चना करताना गुरुजी सुद्धा सांगतात - बायकोने नवर्याच्या डाव्या हाताला बसा . का ? उत्तर नंतर शोधू या.
आता डावा भाग जो आहे तो नेहमी उजव्या भागापेक्षा थोडा कमकुवत मानतात. कधी कधी वाईट सुद्धा मानतात . उदा. वाम मार्गी म्हणजे वाईट चालीचा अथवा कमकुवत, असहाय्य , कमी शक्तीचा मानल्या जातो. ह्या हिशोबाने वामांगी ही पुरुषा पेक्षा कमकुवत , असहाय्य , कमी शक्ति असणारी स्त्री झाली. पुरुषप्रधान संस्कृतीने सरसकट ह्या विचाराला मान्यता दिली. आणि स्त्री अबला, बलहीन, क्षुद्र, कमकुवत ठरली.
अगदी विरुद्ध अथवा विरोधाभासी विचार पहा....
१. A road sign - For safety follow लेफ्ट side. लेफ्ट side is attributed to शक्ति.
२. वामे शक्ति धरम् - म्हणजे डाव्या हाताला शक्ति धारण करणारा असा तो शिव . सर्व विश्वाचा संहार कर्ता - ओळखल्या जातो आहे पार्वती मुळे - डाव्या भागाला असणार्या शक्ति मुळे . सांगा स्त्री अबला की सबला ?
३. वामे तु जनकात्मजा - म्हणजे कोण ? मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभू. ओळख कशी ह्यांची. डाव्या बाजूला असलेल्या सीते मुळे . श्रीराम प्रभू ची ही शक्ति आहे. तरीही स्त्री अबला ?
जिजाऊ मातेने संकटाशी सामना करत प्रसंगी तलवार चालवून शिवबाच्या मनी स्वराज्याचे बीज पेरले. ती माता अबला कशी? "श्री, सखी , राज्ञी जयती " असा शिक्का कट्यारीचा मान मिळवणारी येसु बाई राणी सगळ्यानाच ठाऊक आहे.
पुराणातील दाखले , इतिहासातील उदाहरणे आपल्याला सशक्त नारीचेच दर्शन घडवितात. स्वातंत्र्य पूर्व काळातील दाखला द्यायचा ठरविले तर सावरकरांच्या "त्या तिघी " कमी का होत्या ? गरोदर पणाचे नाटक करत जिवंत बॉम्ब पोटाला बांधुन क्रांतिकारकां पर्यंत पोहोचवण्याचे पुण्यकर्म करणार्या अबला नाहीत.
काय ह्या स्त्रीया फक्त आजच्या एका दिवसाच्या मानाच्या भुकेल्या होत्या? निश्चितच नाही.
स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक आहेत. "धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च नातिचरामी" असे वचन देणारा पुरुष हे वचन फार लवकर विसरतो . तरी ही शक्तिरूपीणी सगळाच लढा एकटीने देत असते.
जेंव्हा पूजा सांगणारे गुरुजी मंत्रोच्चार करताना स्त्री ला "हाताला हात " लावा असे सांगतात त्यावेळी हे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडावे ह्या साठी त्या स्त्रीच्या शक्तीचा आधार मागितल्या जातो.
म्हणजेच ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा होते त्या ठिकाणी देवतांचा निवास असतो . ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होत नाही त्या ठिकाणी केल्या गेलेली सर्व चांगली कर्मे निष्फळ होतात.
रावणाचे उदाहरण आपल्याला ठाऊकच आहे. अत्यंत मुत्सद्दी राजकारणी , महापराक्रमी , ज्ञानी, कट्टर शिवभक्त असून सुद्धा स्त्रीचा अपमान करण्याचे घोर पातक त्याच्या हातून घडले होते. त्यामुळे त्याच्या उत्तम गुणांचा र्हास झाला. आपल्या सर्व पुत्रांना गमावावे लागले. अंततोगत्वा त्याचा ही विनाशच झाला.
म्हणून एकच सांगणे स्त्रीचे केवळ एक दिवस पूजन करून भागणार नाही. सदैव तिचे ऋणी रहा. माता , भगिनी, पुत्री, भार्या, स्नुषा ह्या सगळ्या रूपाचा आदर करा.
©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
Friday, 18 February 2022
मेरा भारत महान- तरुणाईला नव्याने जाणीव करून देण्याची गरज
Monday, 31 January 2022
ताई तुझी आठवण येते....
ताई ,दोनच दिवसा पूर्वीची गोष्ट आहे. स्वतः च्या मनाशी एकट्यात कबूल करायचा प्रयत्न केला की आता तू नाहीस आमच्यात. तसही मनाला झालेली जखम अजून ओली आहे हे तेंव्हा ही जाणवले. पण तरीही कसेतरी दामटून मनाला गप्प बसवले.
....आणि आज सकाळी सकाळी घरी येताना रस्त्याने निर्वाण रथ दिसला. तसे त्यात नवीन काहीच नव्हते. असे दृश्य तर नेहमीचेच . पण माझ्या मनाने अगदी नकळत त्यातल्या फरकाची नोंद केली .
.... त्या वाहनात असलेला देह निळ्या प्लास्टिक मध्ये गुंडाळला होता . आजूबाजूला कोणीही आप्त नाही. फक्त एक ppe किट घातलेला व्यक्ती अंतर साधून बसलेला . देहावर एकही हार किंवा फुल नाही. लक्षात आलं करोनाचा बळी.
.... आणि लक्षात आले आपली ताई ही अशीच अगदी एकटी गेली.ती भयानक रात्र जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहिली . तेंव्हा झालेली जखम भरत आलीय असे वाटत असतानाच जखमेवरची खपली खसकन निघाली आणि भळभळत वाहू लागली. खूप मोठ्याने ओरडून रडावसं वाटतय ग पण आवाजच नाही निघत. खूप घुसमट होतेय ताई. कुणाशीच दुःख वाटून घेता येत नाही. कुणाशी वाटू हे दुःख ? ९० वर्षाच्या आईशी, आपल्या पेक्षा खूप लहान असणार्या बहिणीशी? भाच्या लोकांशी? तू गेल्यानंतरही साध सांत्वनासाठी ही जीजू आणि तुझ्या पोरीं पर्यंत पोहोचू नाही शकले हे शल्य तर कायमच असणार आहे.
...लहानपणापासून कधीच भांडलो नाही म्हणून मोठ्या अभिमानाने मिरवली ग मी माझ्या सासरी. माझ्या लग्नानंतर ही सदोदित माझ्या अडचणीत तुम्ही दोघेही खंबीर पणे उभे राहिलात. त्याची परतफेड कशी करू? छोट्या छोट्या गोष्टी सतत एकमेकाना सांगत राहिलो, एकमेकांचे सल्ले घेत राहिलो अन ह्या अशा प्रसंगी शब्दाचीही देवाण घेवाण नाही? कारण असो नसो , एकत्र असलो की सतत हसत होतो, लोकांच्या असूयेचे कारण बनत होतो. ताई ते दिवस पुन्हा कधी येणार नाही हे स्वतः ला समजावून सांगताना खूप घायाळ होते ग मी. बर दिवस ही कोणता निवडला जाण्यासाठी ? हरतालिका ? अग दुसर्या दिवशी गणपती येण्याची गडबड नसणार का ? म्हणजे तुझ्या पुढच्या विधी साठी सुद्धा येऊ नाही ना शकणार मी . कधी शब्दानेही न दुखावणाऱ्या ताईने दिलेली ही कठोर शिक्षा आयुष्यभर कशी भोगू?
सौ.मंजूषा श्रीकांत अपराजित
Friday, 21 January 2022
कवितेच्या दुनियेत
|| श्री गणेशाय नमः||
१.
निश्चय
जग मला हरवायला निघालयं,
ऐकून मी हादरलेच होते.
कारण माझ्या जगात सारे
आप्त माझे भरले होते.👨🎤👩🎤🧑🚀🕵♀️👮
भगवत् गीता मला आठवली
"सीदन्ती मम गात्राणिʼʼ चा
अनुभव मला देऊन गेली .
युग पुरुषाचा संदेश
कृतनिश्चय म्हणत म्हणत
भरला मी माझ्यात आवेश
ह्या क्षणी दोस्तहो
मी फार खुशीत आहे
ह्या जगाशी ,नव्हे ह्या आप्तांशी
लढण्यासाठी दंड मी थोपटले आहे.
ह्या युद्धात जिंकले तर
राणी तुमची बनून येईन
दुर्दैवाने संपले तर
आठवणी माझ्या देऊन जाईन.
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
पुन्हा एकदा ती वेळ यावी🕧🕐🕜
पुन्हा एकदा ती वेळ यावी ,
मोठेपणाची गुर्मी सरावी.
बालपणीच्या त्या काळात जावे,
सख्यांसवे मग तेथे रमावे.🤼♂️🚴🤸🤾
झुला झुलावे , लपुनी बसावे,
त्या मातेच्या कुशी शिरावे.
बाबांसवे फिर फिरूनी यावे,
हवे तसे मग हुंदडावे .
देशील देवा पुन्हा एक संधी,
शाळे मध्ये त्या पुन्हा जावयाची.🏢🧱
रांगे मध्ये त्या उभी राहण्याची.
मित्रां सवे त्या पुन्हा खेळण्याची .
-----
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
३.
कृष्ण शोध
नि:स्तब्ध मी, नि:शब्द मी
शब्दातल्या "अर्थात" मी .
दृश्यातला अदृश्य मी ,🌈
पिंडातला ब्रह्मांड मी.
रेणूहूनी अति सूक्ष्म मी,
मोठा तरी विश्वाहूनी.
वृक्षात मी , बीजात मी ,
हृदयी तुझ्या वस्तीस मी.
गात्रात मी , स्पर्शात मी
प्राणात मी , जीवात मी.
श्वासात मी, उश्वास मी,
शोधी मला पवनातही .
स्वरात मी, लयीत मी,
गीतात मी, तानेत मी.
सप्त स्वरांचा साज लेवुनी
शोधी मला मुरलीत ही.
राधेत मी , मीरेत मी ,
गोप गोपीच्या स्नेहात मी .
द्वेषात मी , प्रेमात मी ,
भक्त मनातील कृष्ण मी.
-----
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
४.
कैफ त्या माझ्या स्वरांचा
गंधाळलेल्या त्या स्वरांनों, या तुम्ही परतून या ,
रात्र आहे संपलेली, स्वागता तुम्ही सिद्ध व्हा.
शब्द माझा मी दिलेला ,ठेवूनी साक्षी शशिला
कालच्या त्या सार्या व्यथांना, तुम्ही पुन्हा प्रसवू नका .
तळपेन मी फिरूनी पुन्हा , सूर्या सवे नभ अंतरी
बरसेन मी धरती वरी , चपलेस ही हरवेन मी
तुम्ही परी गाऊ नका , कालची ती भैरवी ,
गंधाळलेल्या त्या स्वरांनों, या तुम्ही परतून या
ठिणगी ही मी , स्फुलिंग मी ,ज्वाला कधीही होईन मी .
जाळेन ह्या सार्या जगाला , विसरू कधी ना देईन मी ,
तुम्ही परी या साथ द्याया , जगण्यास या आतुरले मी
गंधाळलेल्या त्या स्वरांनों, या तुम्ही परतून या
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
🌲तुला मी विसरणार नाही,
वाटेवरच्या त्या वळणावर,
जरी मी तुला दिसणार नाही.🌲
विसरलास तू सारे
कळले जेंव्हा मजला ,
लाटांच्या त्या हिंदोळ्यानी
दूर किनारा केला .
काठावरचे सूर तुझे ते
मजला खुणवित होते ,
नयना मधले आसू सारे
मागे खेचित होते.
कणा कणा ने बुडता बुडता
तुजला निरखीत होते,
तिमीरात ही अंध दिशांना
तुलाच शोधत होते.
का रुसलासी
नव्हते मजला कळले,
विना गुन्ह्याचे नको
मला रे पहारे वेदनांचे.
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
-----
७.
शिदोरी
मी,माझे,माझ्यासाठी
तुझे, आपले आपल्यासाठी,
खूप सारे जगून झाले,
परतीच्या ह्या वाटेवरती
एकटेपण मला छळून गेले.
सुखाच्या सरींनी मी
मोर बनून नाचले,
दुःखाच्या क्षणी मी
तळमळून रडले,
परतीच्या ह्या वाटेवरती
मलाच मी हरवले.
हा माझा, तो परका,
मी मोठा , तू छोटा .
हा उजवा, तो डावा,
खेळ होता मनाचा सारा.
परतीच्या ह्या वाटेवरती
गोंधळ सारा तसाच राहिला.
भूतकाळातील घटनांसाठी,
भविष्यातील स्वप्नांसाठी,
वर्तमानाशी जुळवते आहे.
मागची वाट खुंटलेली,
पुढली सारी अंधारलेली,
परतीच्या ह्या वाटेवरती,
तिथेच मी थबकलेली,
तिथेच मी थबकलेली...
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
-----
९.
सखये तुझ्याविना अधुरा मी..
सांग सखये काय गुन्हा केला ,
सर्व संगे संसार त्याग केला
दिली होती आण मीच मज गे
जपीन तुजला प्राण प्रतिष्ठेने
काय सांगू त्या वृद्ध माय ताता ,
काय कथु त्या भगिनीं आणि भावा
कशी निर्लेप अशी तू झाली
दोघी तनया विकल अति होती.
करोना तो काळ बनूनी आला
स्वये संगे तुज घेऊनी पळाला
बहुत विनये प्रार्थिले तयाला
तरी दुष्टा ने घात मला केला.
कसा राहू ह्या थोर महाली गे
तुझ्या विना हे भगभगीत सारे.
वृथा वाटे पदवी वैद्यकीची
नसे आता लालसा धनाची.
सांज समयी एकलाच मी गे
आठवानी तुज सी आळवी गे.
पुनः जन्मा येशील कधी तू गे?
पुन्हा मजला भेटशील का गे ?
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
-----
१०
अनोळखी पाऊलवाट
मीच माझ्या मैफिलीचा बेसूरा सूर जाहलो ,
चांदणे शापित ज्याचे त्या घराचा चंद्र झालो .
शब्द सारे ,अर्थ सारे , खिन्नता लेऊन आले
पौर्णिमेच्या चांदराती , मन असे काजाळले,
मीच माझ्या मैफिलीचा बेसूरा सूर जाहलो..
चांदणे शापित ज्याचे त्या घराचा चंद्र झालो .
तार ही छेडियली , सूरही झंकारले,
का ? कसे ? ते गीत माझे साज नाही ल्यायले,
मीच माझ्या मैफिलीचा बेसूरा सूर जाहलो...
चांदणे शापित ज्याचे त्या घराचा चंद्र झालो .
आरतीला दीप होता,भावनांचा गंध होता ,
गीत माझ्या आवडीचे, ईश्वराने त्यागीले,
मीच माझ्या मैफिलीचा बेसूरा सूर जाहलो
चांदणे शापित ज्याचे त्या घराचा चंद्र झालो .
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
-----
१२.
Mother's Call
I am there for her till my death.
I know she is strong enough,
physically as well as mentally.
She is brave, but will be lonly fighter, after my death.
Will you be there for her as a big support?
I promise you, she won't interfere in your family life,
I promise you, she won't depend on you for money ,
But sometimes she will be needing someone To talk to,
Will you be there for her as a good friend?
Sometimes in future she may get confused,
Or may not be able to find the correct way out,
Will you be there for her as a best guide ?
A mother is very panic for her,
When she thought about her future,
A mother gave her everything possible,
But was not able to give her a brother,
Will you be there for her as a big brother, after my death?
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
-----
१३.
प्रिय भगिनीस
Welcome
संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर
ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात, किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...
-
मागच्या भागात काय झाले ...... कामाच्या गडबडीत तो तहान, भूक , घर, बाबा, खानावळीचा डब्बा सगळेच विसरला. आठ वाजले तसे प्यून त्याच्या आजूबाजूला...
-
शंकर इंजिनियर झाला, नोकरीला लागला . नोकरी निमित्ताने त्याची वेगवेगळया गावात, शहरात बदली होत असे. आधी शिक्षणामुळे आणि आता नोकरीमुळे सतत बा...
-
नवीन बाळ घरात आले आणि घरातील वातावरण बदलले. वातावरण जरी बदलले तरी स्वभाव कसा बदलणार? फक्त त्या स्वभावाला तात्पुरती मायेची झालर जोडली गेली....