Friday, 18 February 2022

मेरा भारत महान- तरुणाईला नव्याने जाणीव करून देण्याची गरज

मूळ विषयाला हात घालण्या पूर्वी ज्यानी जीवन दिले, जीवन घडविले त्या मातापित्यांना सादर समर्पित ...🙏🙏🙏🙏🙏

💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟

बहु यत्न केले 
वर्णावया  तुम्हाला,
विनवले बहु मी 
माते सरस्वतीला ,
परी शब्द स्तब्ध झाले, 
अन् अर्थ क्लान्त झाला 
वर्णू कशी तुम्हाला 
हे माय तात सदया ...
तुम्हीच शब्द  अमुचे 
तुम्हीच अर्थ आम्हा 
असता तुम्ही गृही हो 
नसते त्रुटी कशाला 
हे माय तात सदया ...
देशी अम्हा जरी तू,
शतजन्म रामराया
दे माय तात हे ची
मागू दूजे  कशाला 
वर्णू कशी तुम्हाला 
हे माय तात सदया ...
💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟

माझ्या तरुण विद्यार्थी मित्रानो नमस्कार ,

तुमच्या कडे पाहून मी अभिमानाने फुगून जाते.  तुमच्या सळसळत्या उत्साहाला , कार्यनिपुणतेला खरोखरीच सलाम. तुमच्या बरोबर वावरताना कुणालाही आपल्या वयाच्या विसर पडावा. विविध विषयातील  तुमचे नैपुण्य वाखाणण्या जोगेच आहे.  नवे पंख लावून आभाळात भरारी घेताना मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगाविशी वाटते..

"नका विसरू देशाते .."

नेहमी प्रमाणे तुम्ही विचारणारच .. कां ? ऐका ..
तुमच्यातील कित्येकांनी मोठी मोठी स्वप्ने पाहिली आहे. कुणी डॉक्टर, कुणी इंजीनिअर, कुणी आय ए एस होणार.  कुणी उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणार. तिथल्या सुखसोईंना भाळणार आणि आपल्या माणसांना विसरून तिथेच स्थायिक होणार.

अर्थातच तुम्ही सुखसोयीं चा त्याग करा असे मी म्हणणारच नाही . पण जरा विचार करा ...

ज्या भूमीत तुम्ही जन्म घेतला , जिच्या अंगाखांद्यावर खेळलात, मोठे झालात, तिचे ऋण फेडणे हे तुमचे आद्य कर्तव्य नाही काय? तुम्ही म्हणाल काय ठेवले आहे ह्या भूमीत? चला तर मी आज तुम्हाला ह्या भूमीची नव्याने ओळख करून देते...
चला तर पाहू या माझ्या महान भारतभूला. प्रथम तिला वंदन करू या 

"नमो मातृभूमि जिथे जन्मलो मी ।
नमो आर्यभूमि जिथे वाढलो मी ।।
नमो धर्मभूमि जियेच्याच कामी ।
पड़ो देह माझा सदा ती नमीन मी ।।

भारत माझा देश आहे आणि तो खरोखरीच खूप महान आहे.  ह्या देशाला खूप मोठी भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे.

प्रथम आपण तिचा भौगोलिक विचार करू या....

भौगोलिक दृष्ट्या विचार करता आपल्या लक्षात येईल की हा एक अतिविशाल देश आहे.  क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सातव्या स्थानावर आहे

भारताची सीमा शेजारील सात देशांना स्पर्श करते.

गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, नर्मदा ह्या सारख्या अनेक पवित्र नद्या ह्या भूमीचे सिंचन करतात. म्हणूनच ती सुजलाम सुफलाम आहे. 

एव्हडेच नव्हे तर अरबी समुद्र , बंगालचा उपसागर माझ्या मातृ भूमीचे पद क्षालन करताना अजिबात थकत नाही.
उंच व विशाल हिमालय पर्वत एखाद्या जबाबदार पाठीराख्या भावा प्रमाणे सीमेवर उभा राहून ह्या माझ्या मातृ भूमीचे रक्षण करतो आहे

आपल्या ह्या मोठ्या भावाच्या कर्तृत्वावर आश्वासित होऊन विंध्य पर्वतराजी सह सह्याद्री, सातपुड्यानेही आपले हात पाय ऐसपैस पसरविले आहे. केवळ उंची वा रुंदीचा मोठेपणा ही पर्वत राजी मिरवीत नाहीत. ह्यानी आपल्या अंगाखांद्यावर अनेक वृक्षांना थारा दिला आहे. नाना प्रकारच्या औषधोपयोगी वृक्षांची वने ह्या ठिकाणी आहेत . हा वारसा इतर कुठल्या देशाला मिळाला असण्याची शक्यता फार कमी आहे. वने-उपवने, जंगले वैविध्यपूर्णतेने नटले आहेत. गहन, अति गहन होता होता ह्या वनानी आपल्या अंतरंगात तितक्याच विविध प्राण्यांना आणि पक्षांना सामावून घेतले आहे. हे वृक्ष , हे प्राणी , हे पक्षी एकत्रितपणे आमच्या देशाच्या वातावरणाचा समतोल सांभाळून आहेत. विविधतेतील एकतेचे हे ज्वलंत उदाहरणच म्हणावे लागेल.

सोन्याचा धूर निघणार्‍या ह्या देशाचा  आता सगळीकडे बोलबाला होऊ लागला होता. म्हणुनच की काय इतर खंडातील अनेक देशांची वक्र दृष्टी आपल्या देशाकडे वळली. भारत भूमी संकटात सापडली. 

इंग्रज, पोर्तुगीज,  फ्रेंच, डच हे  भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी धडपडू लागले . आपापसात ही लढू लागले होते.

त्यापूर्वीही मुगल राजांनी भारत भूमीला आणि भारतवासीयांना  व्यथित केले होते. परंतु छत्रपति शिवाजी महाराजांच्या कालखंडात मुस्लिम कारवायांना लगाम लागून मराठा साम्राज्याचा विस्तार झाला. 

त्यानंतर पेशवाई आली ती आसेतू हिमालया पर्यंत राज्य करण्याचे स्वप्नं घेऊनच. परंतु  बंड, भाऊबंदकी, फितुरी अशा अनेक घटनांना सामोरे जात पेशवाईचा अंत झाला.  ह्याचाच फायदा घेऊन आधीपासूनच व्यापाराचे कारण घेऊन भारतात शिरलेल्या इंग्रजांनी भारताला गुलामगिरीच्या खाईत लोटले. भारत माता व्यथित झाली.  गुलामगिरीच्या शृंखलेत जखडल्या  गेली . इंग्रजांचा लाल  बावटा दिमाखाने फडकू लागला.

एव्हढ्यात कंटाळला काय? असे कसे चालेल? चला थोडे वेगळे बोलू या. चला चला आपल्या भारत मातेची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणण्याचा प्रयत्न करू या .

पुराण तत्त्ववेत्या कडून मिळालेल्या माहिती नुसार आदि मानवाने ७०,००० वर्षा पूर्वी भारतात प्रवेश केला.  कळतोय का अर्थ?  म्हणजेच भारत भूमीला ७०,००० वर्षाचा इतिहास आहे .

साधारण पणे ९००० वर्षा पूर्वी भारतातील  मानव ग्रामीण व शहरी वस्त्या करून राहू लागला होता.

त्यानंतर सिंधू संस्कृती चा उदय झाला.  काही कालखंडा नंतर सिंधू संस्कृती लयास गेली. 

हळूहळू वैदिक संस्कृती जोर धरू लागली होती. पण भारत भूमीला आक्रमणाला सामोरे जावे लागत होते . त्यात इथली संस्कृतीही होरपळली जात होती.

अलेक्झांडरचे आक्रमण, मौर्य साम्राज्य, सम्राट अशोकाच्या राज्य विस्ताराची लालसा , त्यावेळी झालेला नरसंहार आणि त्या  नंतर पश्चाताप दग्ध सम्राट अशोकाला ह्याच भूमी ने पाहिले . अशोकाच्याच कालखंडात  बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार वेगाने झाला. अशी अनेक स्थित्यंतरे ह्या भारत भूने अनुभवली.  अनेक कटू प्रसंग पचवीले.

हळूहळू बौद्ध धर्माचा पगडा कमी होत गेला. वैदिक धर्माची पुनर्बांधणी झाली. साहित्य , गणित, शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली. व्यापारी दृष्ट्या ही भारत तेंव्हा अतिशय पुढारलेला देश होता. स्थापत्य क्षेत्रातील प्रगतीही स्तुत्य होती. त्या काळातील कित्येक बांध कामाचे विश्लेषण आजही तांत्रिक दृष्ट्या पुढारलेल्या  देश विदेशातील स्थापत्य शास्त्रज्ञांना करता येत नाही. 
हा काळ भारताच्या ऐतिहासिक काल खंडातील सुवर्ण काळ होता

म्हणूनच आपण अजूनही म्हणतो, " यहाँ डाल डाल पर  सोने की चिडीयाँ करती थी बसेरा... "

इतकी स्थित्यंतरे पाहणारा हा एकमेवच देश असावा.

तरीही मित्रांनो  ही भूमी रक्तबंबाळ होत असतानाही ताठ उभी होती. कारण तिचा तिच्या सुपुत्रांवर  आणि  सुकन्यांवर ठाम विश्‍वास होता. 

माझ्या प्रिय तरूण तरुणींनो अगदी अशाच विश्वासाची आजही गरज आहे . असो. 

"बंदीत माय भू ही आम्ही खुले कशाला?"

असे म्हणत म्हणत तिचे वीर पुत्र एक एक करत स्वातंत्र्य यज्ञाच्या बलि वेदीवर हसत हसत चढत होते.  लहान , मोठे, बाल ,वृद्ध स्त्रिया कोणीही मागे सरायला तयार नव्हते.  कोणी घरात राहून  कोणी समरांगणात जाऊन रक्ताची आहुती देत होते. राणी लक्ष्मी बाई , तात्या टोपे, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, वासुदेव बळवंत फडके,  चाफेकर बंधू, चंद्रशेखर आझाद,  स्वातंत्र्य वीर सावरकर  किती किती जणांची नावे सांगू?  

विद्यार्थी मित्रानो ह्या सर्वानीच आपल्या रक्ताची शिंपण करून भारत मातेला स्वतंत्र केले. 

टिळक -गोखले- आगरकर- रानडे ह्यानी  सतत समाज जागृतीचा यज्ञकुंड पेटवता ठेऊन  देश भक्तीच्या प्रखर  भावना युवकांमध्ये जागत्या ठेवल्या. ह्या अशा नमूद केलेल्या आणि अनेक अनाम वीरांच्या  बलिदाना पुढे  इंग्रज सत्तेला हार मानावी लागली. भारतातून इंग्रजांची उचल बांगडी झाली.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. *कृतकृत्य झालेला तिरंगा अभिमानाने फडकू लागला .

विद्यार्थी मित्रांनो अशा नर रत्नांची खाण असलेली ही भारत माता महानच आहे. 

अनेक वर्षांपासून किंवा शतकापासून आपल्या परंपरा , रिवाज सांभाळून ठेवुन पुढच्या पिढीकडे हा वारसा सहजतेने दिल्या जातो. त्यांचा सांभाळ करा . स्वातंत्र्य संग्रामातील आपल्याच बांधवांचे चरित्रात आठवा. त्यांचे गुण आत्मसात करा. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या संस्कृतीचा ठेवा जतन करा . सत्यम शिवम सुंदरमचा  आग्रह धरा . वाईटाची कास धरू नका . 

भारत देशाचे  विश्वगुरू होण्याचे स्वप्न पूर्णत्वास न्या  आणि मोठ्या अभिमानाने गर्जना करा "मेरा भारतमहान"

🟥🟧🟨जयहिंद🟥🟧🟨


©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित

Monday, 31 January 2022

ताई तुझी आठवण येते....

 ताई ,दोनच दिवसा पूर्वीची गोष्ट आहे. स्वतः च्या मनाशी एकट्यात कबूल करायचा प्रयत्न केला की आता तू नाहीस आमच्यात. तसही मनाला झालेली जखम अजून ओली आहे हे तेंव्हा ही जाणवले. पण तरीही कसेतरी दामटून मनाला गप्प बसवले.

....आणि आज सकाळी सकाळी घरी येताना रस्त्याने निर्वाण रथ दिसला. तसे त्यात नवीन काहीच नव्हते. असे दृश्य तर नेहमीचेच . पण माझ्या मनाने अगदी नकळत त्यातल्या फरकाची नोंद केली .
.... त्या वाहनात असलेला देह  निळ्या प्लास्टिक मध्ये गुंडाळला होता .  आजूबाजूला  कोणीही आप्त नाही. फक्त एक ppe किट घातलेला व्यक्ती अंतर साधून बसलेला . देहावर एकही हार किंवा फुल नाही. लक्षात आलं करोनाचा बळी.
.... आणि लक्षात आले आपली ताई ही अशीच अगदी एकटी गेली.ती भयानक रात्र जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहिली . तेंव्हा झालेली जखम भरत आलीय असे वाटत असतानाच जखमेवरची खपली खसकन निघाली आणि भळभळत वाहू लागली. खूप मोठ्याने ओरडून रडावसं वाटतय ग पण आवाजच नाही निघत. खूप घुसमट होतेय ताई. कुणाशीच दुःख वाटून घेता येत नाही. कुणाशी वाटू हे दुःख ? ९० वर्षाच्या आईशी,  आपल्या पेक्षा खूप लहान असणार्‍या बहिणीशी? भाच्या लोकांशी? तू गेल्यानंतरही साध सांत्वनासाठी ही जीजू आणि तुझ्या पोरीं पर्यंत पोहोचू नाही शकले  हे शल्य तर कायमच असणार आहे.
...लहानपणापासून कधीच भांडलो नाही म्हणून मोठ्या अभिमानाने मिरवली ग मी माझ्या सासरी. माझ्या लग्नानंतर ही सदोदित माझ्या अडचणीत तुम्ही दोघेही खंबीर पणे उभे राहिलात. त्याची परतफेड कशी करू? छोट्या छोट्या गोष्टी सतत एकमेकाना सांगत राहिलो, एकमेकांचे सल्ले घेत राहिलो अन ह्या अशा प्रसंगी शब्दाचीही देवाण घेवाण नाही?  कारण असो नसो , एकत्र असलो की सतत हसत होतो, लोकांच्या असूयेचे कारण बनत होतो. ताई ते दिवस पुन्हा कधी येणार नाही हे स्वतः ला समजावून सांगताना खूप घायाळ होते ग मी.  बर दिवस ही कोणता निवडला जाण्यासाठी ? हरतालिका ? अग दुसर्‍या दिवशी गणपती येण्याची गडबड नसणार का ? म्हणजे तुझ्या पुढच्या विधी साठी सुद्धा येऊ नाही ना शकणार मी . कधी शब्दानेही न दुखावणाऱ्या ताईने दिलेली ही कठोर शिक्षा आयुष्यभर कशी भोगू?

सौ.मंजूषा श्रीकांत अपराजित

Friday, 21 January 2022

कवितेच्या दुनियेत


|| श्री गणेशाय नमः||

१.

निश्चय                                            

जग मला हरवायला निघालयं,
ऐकून मी हादरलेच होते.
कारण माझ्या जगात सारे
आप्त माझे भरले होते.👨‍🎤👩‍🎤🧑‍🚀🕵‍♀️👮

लहानपणी पाठ केलेली
भगवत् गीता मला आठवली
"सीदन्ती मम गात्राणिʼʼ चा
अनुभव मला देऊन गेली .

त्या क्षणी आठवला त्या 
युग पुरुषाचा संदेश
कृतनिश्चय म्हणत म्हणत
भरला मी माझ्यात आवेश 

ह्या क्षणी दोस्तहो 
मी फार खुशीत आहे
ह्या जगाशी ,नव्हे ह्या आप्तांशी
लढण्यासाठी दंड मी थोपटले आहे.

ह्या युद्धात जिंकले तर 
राणी तुमची बनून येईन
दुर्दैवाने संपले तर
आठवणी माझ्या देऊन जाईन.

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

----
.

पुन्हा एकदा ती वेळ यावी🕧🕐🕜

पुन्हा एकदा ती वेळ यावी ,
मोठेपणाची गुर्मी सरावी.
बालपणीच्या त्या काळात जावे,
सख्यांसवे मग तेथे रमावे.🤼‍♂️🚴🤸🤾

झुला झुलावे , लपुनी बसावे,
त्या मातेच्या कुशी शिरावे.
बाबांसवे फिर फिरूनी यावे,
हवे तसे मग हुंदडावे .

देशील देवा  पुन्हा एक संधी,
शाळे मध्ये त्या पुन्हा जावयाची.🏢🧱
रांगे मध्ये त्या उभी राहण्याची.
मित्रां सवे त्या पुन्हा खेळण्याची .

-----

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

३.

कृष्ण शोध 

नि:स्तब्ध मी, नि:शब्द  मी
शब्दातल्या "अर्थात"  मी .
दृश्यातला अदृश्य मी  ,🌈
पिंडातला ब्रह्मांड मी.

रेणूहूनी अति सूक्ष्म मी,
मोठा तरी विश्वाहूनी.
वृक्षात मी ,  बीजात मी ,
हृदयी तुझ्या वस्तीस मी.

गात्रात मी , स्पर्शात मी
प्राणात मी , जीवात मी.
श्वासात मी, उश्वास मी,
शोधी मला पवनातही .

स्वरात मी,  लयीत मी,
गीतात  मी, तानेत मी.
सप्त स्वरांचा साज लेवुनी
शोधी मला मुरलीत ही.

राधेत मी , मीरेत मी ,
गोप गोपीच्या स्नेहात मी .
द्वेषात मी , प्रेमात मी ,
भक्त मनातील कृष्ण मी.

-----

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

४.

कैफ त्या माझ्या स्वरांचा 

गंधाळलेल्या  त्या स्वरांनों, या तुम्ही परतून या ,
रात्र आहे संपलेली, स्वागता तुम्ही सिद्ध व्हा.
शब्द माझा मी दिलेला ,ठेवूनी साक्षी शशिला
कालच्या त्या सार्‍या व्यथांना, तुम्ही पुन्हा प्रसवू नका .

तळपेन मी फिरूनी पुन्हा , सूर्या सवे नभ अंतरी
बरसेन मी धरती वरी , चपलेस ही हरवेन मी
तुम्ही परी गाऊ नका , कालची ती भैरवी ,
गंधाळलेल्या  त्या स्वरांनों, या तुम्ही परतून या

ठिणगी ही मी , स्फुलिंग मी ,ज्वाला कधीही होईन मी .
जाळेन ह्या सार्‍या जगाला , विसरू कधी ना देईन मी ,
तुम्ही परी या साथ द्याया , जगण्यास या आतुरले मी
गंधाळलेल्या  त्या स्वरांनों, या तुम्ही परतून या


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

------
५.
अखेरचे वळण

आठवणी माझ्या सरणार नाही,
🌲तुला मी विसरणार नाही,
वाटेवरच्या त्या वळणावर,
जरी मी तुला दिसणार नाही.🌲

🌲असा तू बावरू नकोस,
पाऊल मागे घेऊ नकोस,
वाटेवरचे ते वळण, 🌲
पार करायला विसरू नकोस.

वळणाच्या त्या पलीकडे,
🌲ताटव्याने मोगरा फुलला असेल,
प्रत्येक फुलाच्या गंधा मागे ,
सावली माझी तुला दिसेल.🌲

🌲गंध भरल्या सावलीनीशी,
तुला सोबत करत राहीन,
तुला विजयी झालेला,🌲
दुरूनच मी पहात राहीन.

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 
-----
.
विसरलास तू सारे

विसरलास तू सारे
कळले जेंव्हा मजला ,
लाटांच्या त्या हिंदोळ्यानी
दूर किनारा केला .

काठावरचे सूर तुझे ते
मजला खुणवित होते ,
नयना मधले आसू सारे
मागे खेचित होते.

कणा कणा ने बुडता बुडता
तुजला निरखीत होते,
तिमीरात ही अंध दिशांना
तुलाच शोधत होते.

का रुसलासी
नव्हते मजला कळले,
विना गुन्ह्याचे नको
मला रे पहारे वेदनांचे.

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

-----

७.

शिदोरी

नवीन प्रवासाची सुरवात केली,
आईने अनुभवाची शिदोरी गाठी बांधली.
निरोप दिला मायेने,
चाल म्हणाली सरळ वाटेने.
मीही हसून मान डोलावली,
पाणावलेल्या डोळ्यांनी पाठ फिरवली.
तेंव्हापासून सरळ वाट शोधतेच आहे,
नागमोडी वळण चुकवतेच आहे.
वाटेतले काटे मनातच पुरते,
तिला ख्यालीखुशालीचे पत्र पाठवते.
थकलेल्या डोळ्यातली चमक दुरूनच पाहाते,
आयुष्याचे सार्थक झाले , मनालाच सांगते.

©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 
----
८.
जीवन

🌈⛅⛈🌗🎆

मी,माझे,माझ्यासाठी
तुझे, आपले आपल्यासाठी,
खूप सारे जगून झाले,
परतीच्या ह्या वाटेवरती
एकटेपण मला छळून गेले.

सुखाच्या सरींनी मी
मोर बनून नाचले,
दुःखाच्या क्षणी मी
तळमळून रडले,
परतीच्या ह्या वाटेवरती
मलाच मी हरवले.

हा माझा, तो परका,
मी मोठा , तू छोटा .
हा उजवा, तो डावा,
खेळ होता मनाचा सारा.
परतीच्या ह्या वाटेवरती
गोंधळ सारा तसाच राहिला.

भूतकाळातील घटनांसाठी,
भविष्यातील स्वप्नांसाठी,
वर्तमानाशी जुळवते आहे.
मागची वाट खुंटलेली,
पुढली सारी अंधारलेली,
परतीच्या ह्या वाटेवरती, 
तिथेच मी थबकलेली,
तिथेच मी थबकलेली...

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

-----

.

सखये तुझ्याविना अधुरा मी..

सांग सखये काय गुन्हा केला ,
सर्व संगे संसार त्याग केला
दिली होती आण मीच मज गे
जपीन तुजला प्राण प्रतिष्ठेने

काय सांगू त्या वृद्ध माय ताता  ,
काय कथु त्या भगिनीं आणि भावा
कशी निर्लेप अशी तू झाली
दोघी तनया विकल अति होती.

करोना तो काळ बनूनी आला 
स्वये संगे तुज  घेऊनी पळाला
बहुत विनये  प्रार्थिले तयाला
तरी दुष्टा ने घात मला केला.

कसा राहू ह्या थोर महाली गे
तुझ्या विना हे भगभगीत सारे.
वृथा वाटे पदवी वैद्यकीची
नसे आता लालसा धनाची.

सांज समयी एकलाच मी गे
आठवानी तुज सी आळवी गे.
पुनः जन्मा येशील कधी तू गे?
पुन्हा मजला भेटशील का गे ?


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

-----

१०

अनोळखी पाऊलवाट 

ओळखीची पाऊलवाट अनोळखी झाली
आणि सरळ वाटेला नागमोडी वळण दिसू लागली
एक एक पाऊल जड झाले
अन विसाव्याचे ठिकाण दूर जाऊ लागले
जीवाचा जिवलग परका झाला
मना चा किनारा तटकन तुटला
तीच वाट ओळखीची
पुन्हा एकदा अनोळखी झाली 

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 
-----
११.
मैफिल

मीच माझ्या मैफिलीचा बेसूरा सूर  जाहलो ,
चांदणे शापित ज्याचे त्या घराचा चंद्र झालो .

शब्द सारे ,अर्थ सारे , खिन्नता लेऊन आले
पौर्णिमेच्या चांदराती , मन असे काजाळले,
मीच माझ्या मैफिलीचा बेसूरा सूर  जाहलो..

चांदणे शापित ज्याचे त्या घराचा चंद्र झालो .


तार ही छेडियली , सूरही झंकारले,
का ? कसे  ? ते गीत माझे साज नाही ल्यायले,
मीच माझ्या मैफिलीचा बेसूरा सूर  जाहलो...

चांदणे शापित ज्याचे त्या घराचा चंद्र झालो .


आरतीला दीप होता,भावनांचा गंध होता ,
गीत माझ्या आवडीचे, ईश्वराने त्यागीले,
मीच माझ्या मैफिलीचा बेसूरा सूर  जाहलो
चांदणे शापित ज्याचे त्या घराचा चंद्र झालो .


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

-----

१२.

Mother's Call

I am there for her till my death.
I know she is strong enough,
physically as well as mentally.
She is brave, but will be lonly fighter,  after my death.
Will you be there for her as a big support?

I promise you, she won't interfere in your family life,
I promise you, she won't depend on you for money ,
But sometimes she will be needing someone To talk to,
Will you be there for her as a good friend?

Sometimes in future she may get confused,
Or may not be able to find the correct way out,
Will you be there for her as a best guide ?

A mother is very panic for her,
When she thought about her future,
A mother gave her everything possible,
But was not able to give her a brother,
Will you be there for her as a big brother, after my death?


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

-----

१३.

प्रिय भगिनीस

गे सखे भगिनी प्रिये गे
शब्द माझे पाठवू कां ? 
धुंद मधुर त्या तुझीया स्वरांचा
साज तू देशील का ?
गे सखे भगिनी प्रिये गे.....

ताल तो तव दास गे
सूरही  तुज अंकित गे
पोरक्या शब्दा सवे तू
सांग गे सजशिल का ?
गे सखे भगिनी प्रिये गे.....

माय तू त्या पोरक्यांची 
ते तुझे पुत्र गे
देऊनी ममता तुझी गे
सांग त्यांची होशील का ?
गे सखे भगिनी प्रिये गे....

लेवूनी माया स्वरांची 
दिगदिगांतरी फिरतील ते
जय पताका  गे तयांची 
सांग तू होशील का?
गे सखे भगिनी प्रिये गे......

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 


💕💟💕💟💕💟💕💟💕💟💕💟💕💟💕💟



Welcome

संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर

 ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात,  किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...