ताई ,दोनच दिवसा पूर्वीची गोष्ट आहे. स्वतः च्या मनाशी एकट्यात कबूल करायचा प्रयत्न केला की आता तू नाहीस आमच्यात. तसही मनाला झालेली जखम अजून ओली आहे हे तेंव्हा ही जाणवले. पण तरीही कसेतरी दामटून मनाला गप्प बसवले.
....आणि आज सकाळी सकाळी घरी येताना रस्त्याने निर्वाण रथ दिसला. तसे त्यात नवीन काहीच नव्हते. असे दृश्य तर नेहमीचेच . पण माझ्या मनाने अगदी नकळत त्यातल्या फरकाची नोंद केली .
.... त्या वाहनात असलेला देह निळ्या प्लास्टिक मध्ये गुंडाळला होता . आजूबाजूला कोणीही आप्त नाही. फक्त एक ppe किट घातलेला व्यक्ती अंतर साधून बसलेला . देहावर एकही हार किंवा फुल नाही. लक्षात आलं करोनाचा बळी.
.... आणि लक्षात आले आपली ताई ही अशीच अगदी एकटी गेली.ती भयानक रात्र जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहिली . तेंव्हा झालेली जखम भरत आलीय असे वाटत असतानाच जखमेवरची खपली खसकन निघाली आणि भळभळत वाहू लागली. खूप मोठ्याने ओरडून रडावसं वाटतय ग पण आवाजच नाही निघत. खूप घुसमट होतेय ताई. कुणाशीच दुःख वाटून घेता येत नाही. कुणाशी वाटू हे दुःख ? ९० वर्षाच्या आईशी, आपल्या पेक्षा खूप लहान असणार्या बहिणीशी? भाच्या लोकांशी? तू गेल्यानंतरही साध सांत्वनासाठी ही जीजू आणि तुझ्या पोरीं पर्यंत पोहोचू नाही शकले हे शल्य तर कायमच असणार आहे.
...लहानपणापासून कधीच भांडलो नाही म्हणून मोठ्या अभिमानाने मिरवली ग मी माझ्या सासरी. माझ्या लग्नानंतर ही सदोदित माझ्या अडचणीत तुम्ही दोघेही खंबीर पणे उभे राहिलात. त्याची परतफेड कशी करू? छोट्या छोट्या गोष्टी सतत एकमेकाना सांगत राहिलो, एकमेकांचे सल्ले घेत राहिलो अन ह्या अशा प्रसंगी शब्दाचीही देवाण घेवाण नाही? कारण असो नसो , एकत्र असलो की सतत हसत होतो, लोकांच्या असूयेचे कारण बनत होतो. ताई ते दिवस पुन्हा कधी येणार नाही हे स्वतः ला समजावून सांगताना खूप घायाळ होते ग मी. बर दिवस ही कोणता निवडला जाण्यासाठी ? हरतालिका ? अग दुसर्या दिवशी गणपती येण्याची गडबड नसणार का ? म्हणजे तुझ्या पुढच्या विधी साठी सुद्धा येऊ नाही ना शकणार मी . कधी शब्दानेही न दुखावणाऱ्या ताईने दिलेली ही कठोर शिक्षा आयुष्यभर कशी भोगू?
सौ.मंजूषा श्रीकांत अपराजित